हिमालय सफर

हिमालयाची सफर

निसर्ग आपल्या दोन्ही हातानी सौंदर्याची उधळण जर कुठे करत असेल तर ती हिमालयाच्या कुशीत. पांढरी शुभ्र पर्वत शिखर, हिरव्यागार दरया, त्यातून वाहणाऱ्या बर्फाळ नद्या, आकाशाचा वेगळाच मोहवणारा निळा रंग, वातावरणातील गुलाबी थंडी आणि त्याच्या बरोबर आपल्या इथे क्वचित अनुभवायला मिळणारी निरव, स्तब्ध शांतता!

वायव्य पासून ते ईशान्य पर्यंत पसरलेल्या या पर्वतमय परिसरात हिंडायचे तर ते एका दमात शक्य नाही. हिमालय ज्यांना जवळून समजून घ्यायचा आहे त्यांनी तो चार विभागात पाहावा. लेह-लदाख, काश्मीर-वैष्णोदेवी, डलहौसी-धरमशाला-कुलू-मानली-शिमला, आणि चारधाम आशा चार विभागात पहाण केव्हाही चांगल. २००९ ला डलहौसी-धरमशाला-कुलू-मानली जाण्याचा योग आला. साप्ताहिक सकाळचे पर्यटन विशेषांक, इंटरनेट द्वारे भरभरून माहिती गोळा केली होती. काश्मीर-श्रीनगरच्या अस्तीर वातावरणामुले किंवा अन्य कारणांनी म्हणा इथे पर्यटकांचा ओघ खूप वाढलेला दिसला. परिणामी HPTDC ची त्रेधातिरपिट जागोजागी अनुभवायला मिळत होती. हिमालयातला आनंदाचा संबंध खरतर त्याच्या पावित्र्य राखण्यात आहे. पण का कोणास ठाऊक हि निसर्गाची उधळण एखाद्या अधाश्या सारखी, हावरटा सारखी पर्यटक ओरबाडत आहेत अस वाटून जात.

पुण्याहून झेलमने सुरु झालेला प्रवास चक्कीबँकला संपला. पुढचा प्रवास टक्सीचा. डलहौसीचा मुक्काम दोन दिवसांचा. सकाळचा आल्हाददायक वातावरणात सत्तधार, पंचामुला हि ठिकाण मॉर्निंग वॉक करतानाच पहिली. तर दुपारी खाज्जीयार! ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. लेखा मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटन स्थळावर स्वतंत्र लेख लिहिता येईंल इतक सृष्टी सौंदर्य इथे ओतप्रोत भरलेलं आहे. चाम्बाव्हालीमधील हे टुमदार पर्यटन स्थळ. इथे मार्केट मध्ये दोन्ही दिवस संध्याकाळी गरमागरम जिलेबीचा आस्वाद घेतला.

डलहौसीपासून धरमशाला १४३ कि.मी. डलहौसी मधून दूरवर दिसणारे हिमपर्वत आता झूम केल्यावर कसे दिसतील तसे जवळ भासू लागले. तो भास नव्हता आता आम्ही खरचच टप्याटप्याने हिमपर्वतांच्या जवळ जात होतोत. या सर्व परिसरात चहुबाजूनी अशा बर्फाच्या टोप्या घातलेल्या डोंगरांच रिंगण पाहायला मिळाल. इथला सगळा प्रवास हा घाटातला. वाहन चालवताना कोणतीही चूक क्षम्य नाही.

धरमशालातील हॉटेलच्या जवळ एक सनसेट पॉइंट होता. आतापर्यंत पाहिलेले सनसेट हे एकतर समुद्र किनाऱ्यावरून किंवा डोंगरमाथ्यावरून अनुभवलेले. तीन दिवसाच्या इथल्या मुक्कामात एकदाही हा सनसेट पाहण्याची संधी सोडली नाही. एका बाजूला मावळता सूर्य तर विरुद्ध दिशेला या सूर्याच्या सोनेरी किरणांनी माखून निघालेली बर्फाछादित पर्वत शिखर. हा नजारा अक्षरशः डोळ्यांनी पिऊन घेण्यासारखा. या ठिकाणाला भेट देऊन दोन वर्ष होत आली तरी इथल्या निसर्गाचा रम्य नजारा रोज एकदा तरी मनात तरळून जातो आणि मेडीटेशन मुळे साध्य होणारी अनुभूती हा निसर्ग आठवून येते आणि रोजच्या ताण-ताणावानी जडवलेले मन पिसासारखं हलक होऊन जात.

धरमशाला मध्ये एखादातरी ट्रेक करायचा आधीच ठरवल होत. वेळे अभावी 'त्रिउन्द' चा अप्रतिम ट्रेक जमला नाही पण एक मिनी ट्रेकचा प्लान केला. व्यायामाची सवय असणाऱ्यांनी असे धाडस करायला हरकत नाही. हजार एक फुट खोल दरी मध्ये उतरून पुन्हा त्या खडतर वाटेनी परत वर येणे असा निवांत तीन - चार तासांचा ट्रेक होता. गर्द झाडांच्या मधून पाऊल वाटेनी नेणारा हा मार्ग अप्रतिम आणि तेवढाच थरारक अनुभवाचा! तुमच्या फिटनेसची परीक्षा पाहणारा! निसर्गाची इतकी जवळून ओळख पहिल्यांदाच. घनदाट झाडी, मधूनच धबधबे, कधी न पाहिलेले पक्षी, त्यांचे अनोखे गोड आवाज, रस्ता संपूच नये वाटणारा प्रवास! या खडतर वाटेनी जाणारी शाळेची मुलेपाहून अचंबा वाटला. पावसापाण्याचा हा प्रवास केवढातरी धोक्याचा पण त्यांची शिक्षणाची ओढ पाहून कौतुक वाटल. दीड-दोन तासांच्या उतरणी नंतर आम्ही व्हालीच्या तळाशी पोहोचलोत. पावसाळ्यात या डोंगरांच्या घळीतून प्रचंड वेगानी पाणी वाहत येत असणार. प्रचंड मोठे गोटे घरंगळून आलेले दिसत होते. आम्ही एक ग्रामस्थ ‘गाईड’ म्हणून बरोबर घेतला होता. त्यान पाण्याच्या वेगावर चालणारी ग्रामीण चक्की दाखवली. या छोट्याश्या ट्रेकने खूप अनोख्या गोष्टींची माहिती गोळा करता आली. एक गोष्ट मात्र प्रकर्शाने खटकली. त्या सुंदर व्हालीमध्ये एका अलिशान हॉटेलचे बांधकाम चालू होते. नयनरम्य निसर्ग देखाव्यात ते डोळ्यांना अक्षरशः खुपत होत. या प्रसन्न निसर्गाला अस ओंगळवाण रूप आणणाऱ्याना युद्धपातळीवर थोपवणारे उपाय व्हायला हवेत अस राहून राहून वाटत होत.

धरमशाला पासून २३५ कि.मी.वर मानली. पर्यटकांच आवडत ठिकाण. इथे हजारोंच्या संखेनी हॉटेल्स आहेत. धरमशाला ते मानली प्रवासात वाटेत तपोवन (चिन्मय
स्वामी समाधी), चामुंडा देवी, वैज्यनाथ इ. पाहत पाहत इथे पोहोचलोत. सगळा प्रवास बियास नदीच्या काठावरून. इतका नयनरम्य घाटातला प्रवास पूर्वी कधी केला नव्हता. एका बाजूंला छाती दडपवणारे उंचच उंच पर्वत तर दुसऱ्या बाजूला खोल दरीतून खळाळत वाहणाऱ्या नदीचा धीरगंभीर आवाज.

निसर्गाचे हे रौद्र रूपही इतक खिळवून टाकणार असत यावर विश्वास बसत नव्हता.

मनालीला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी मानीकरण, गुरुद्वारा, गरमपाण्याचे झरे (कुंड) वगैरे निसर्गाचे चमत्कार अनुभवत अख्खा दिवस प्रवास केला. दुसऱ्या दिवशी रोहतांगपास!

पर्यटकांच खास आवडत बर्फात खेळण्याचे ठिकाण. इथे जायचे तर पहाटे निघणे चांगल. लवकर अशासाठी, पाहिलं म्हणजे कमी ट्राफिक आणि दुपार नंतरचा हवेच्या बदलाच धोका टाळण्यासाठी. मानली पासून रोहतांगपास ५१ कि.मी. आणि समुद्रसपाटी पासून १३०५० मी. उंच. ० ते - पर्यंत असणाऱ्या तपमानाचा प्रदेश. मानालीतून निघाल्यावरच काही अंतरावर गरम कपडे मिळण्याचे स्टोल सुरु होतात. कपडे, गौगल, बूट अशा तयारीनिशीच निघावं लागत. आम्हीतर स्कीईंग कीट व गाईड सकट निघालोत. थोड महागात पडल पण खूप एन्जॉय करायला मिळाल. ५.३०-६ ला आम्ही रस्त्याला लागलो होतोत. वाटल होत आपणच पहिले असू पण आमच्याही आधी निघणारे चलाख लोक होते. पोहोचल्याच्या दोन तासानंतर तिथे जत्रा भरल्यासारखी गर्दी दिसत होती. हजारो गाड्यांच्या रांगा त्याला गुणिले पाच (किमान) एवढी लोक तिथे होती.

गर्दी पूर्वीचे दोन तास तो बर्फ, स्कीईंग आणि बर्फातील गूढ शांतता यांचा पुरेपूर आनंद घेतला. आम्ही लेह लदाख कडे जाणाऱ्या वळणा पर्यंत पोहोचलो होतोत. फार उशीर केला तर हे शक्य होत नाही. इतकच काय, उशिरा गाडी मागेच लांबवर उभी करून चालत-चढत याव लागत. आणि हवेच्या विरळ थरांनी ते अनेकांसाठी एक दिव्यच ठरत. मानली ते रोहतांग वाटेवर एक सुंदरसा होल्ट आहे. नाश्ता घेण्यासाठी बहुतेकजण इथे थांबतात. हातातून पोटात जाई पर्यंत तो गारढोण होतो. इतका गार वारा वाहात असतो. ब्रेड- ओम्लेट खाण सोप वाटल.

इथल्या निसर्गच वर्णन म्हणजे पट्टीच्या लेखकाच काम. वाचकांना मनानी तिथे नेणे मला जमण अवघड. वाचून पेक्षा अनुभवण्याचा हा आनंद! (मी माझी सुटका करून घेते आहे) गाडीतून उतरल्यावर ड्रायव्हरने लडाखला जाणारा रस्ता दाखवला. लेह-लडख म्हणल कि युद्धाची आठवण होते. आणि मनोमन त्या लढवय्या वीरांच्या आठवणीनी उर अभिमानानी भरून येत. आपण तासा -दोन तासासाठी o डिग्रीच्या खालील तापमानात मजा म्हणून बागडतो पण अशा हवेत महिनोंमहिने जीवावर उदार होऊन लढण…, माझेतर त्या वीरांना शतशः प्रणाम!

या बर्फाच्या पठारावर चक्क चहा मिळतो. त्या गरम घोटाची अनुभूती जिभेपासून पोटापर्यंत जाणवली. निसर्गाची आणखी एक बहार तिथून निघताना अनुभवायला मिळाली. अचानक निळ्या आकाशात दाट काळे ढग जमू लागले. चहूबाजूंनी वातावरण पावसाच झाल. ढग नुसते आकाशात नाही तर चहूबाजूंनी जमलेले होते. आम्ही ढगातच होतो म्हणाना! वाऱ्याच्या झोता बरोबर बर्फाची भुरभूर सुरु झाली आणि बर्फवृष्टी (तीहि

आल्हाददायक) काय असते तेही अनुभवायला मिळाले. प्रचंड बर्फवृष्टीन गेल्या वर्षी अनेक लोक अडकून पडली होती. आपण ते वाचलंय. १२-१५ फुट बर्फ काही तासात साठल होत.

अशा नैसर्गिक आपत्तीचा अनुभव हिमालयात वरचेवर येऊ लागला आहे. लेह मधील ढगफुटी, रोहतांगपासची बर्फवृष्टी हि त्याचीच उदाहरण. अभ्यासकांना वाटतंय कि ‘अनिर्बंध पर्यटन’ याला कारणीभूत होऊ शकत. एकूणच पर्यटकांची संख्या आणि त्यांची वृत्ती पाहता ते जिथे जातील तो भाग वाळ्वंट करायचा मागे लागले आहेत अस वाटत. निसर्गाच्या संकेतच भान आजूनही माणसाला येत नाही, यात बदल झाला नाही तर निसर्गाच्या रौद्र आविष्काराला सामोरे जाण्यावाचून हातात काहीच उरणार नाही.

निसर्ग पर्यटन हे एखाद्या कमलावर बसणाऱ्या भुंग्या प्रमाणे हवे किंवा गुलाब पुष्पाला चुम्बन देणाऱ्या फुलपाखरा सारखे हवे, अस डॉक्टर संदीप श्रोत्री आपल्या एका लेखाद्वारे सांगतात. प्रवाशांमध्ये निसर्गाचा आदर राखण्याची मानसिकता हवीच हवी पण बरोबरीने शासन, वनखात, पर्यटन खात, टुरिस्ट कंपन्या, पोलीस यंत्रणा, स्थानिक लोक, स्वयंसेवी संघटना, लोकनेते, ग्रामस्थ ई. यांनीच हा निसर्गाचा ऱ्हास होण्यापासून देशाला अगदी आपल्या पृथ्वीला वाचवायला हवे. असे अनिर्बंध पर्यटन होत राहिले तर उद्याच्या पिढीला दाखवायला निसर्गच शिल्लक राहणार नाही. तसेच आत्ता आहे अशीच जर पर्यटन विकासाची गती/व्याख्या असेल तर आपला देश पर्यटन दृष्ट्या मागास राहिलेलाच बरा अस वाटेल. निसर्गाच्या कुशीत, स्थानिकांमधील एक होऊन, त्यांची संस्कृती आपलीशी करत, तेथील खास पदार्थची चव घेत पर्यटन होऊ शकेल. पण आपल्या हायफाय गरजांमुळे निसर्गाचा होणारा हा ऱ्हास थोपवता येणार नाही का? महाराष्ट्रातच पहा न सिह्गड, गणपतीपुळे, महाबळेश्वर, शिर्डी, अजंठा-वेरूळ, माळशेज घाट, भीमाशंकर इथे हल्ली काय पाहायला मिळतेय - पर्यटकांची हुल्लडबाजी, त्यांच्या मुळे होणारी अस्वच्छता, बेशिस्त, स्थळांची नासधूस. आता तर कोकण पर्यटन विकास होऊ घातला आहे. कोकणचा गोवा न होवो आणि तिथल्या पवित्र संस्काराचा ऱ्हास नजीकच्या काही वर्षात न होवो हीच इच्छा. रविवार १५ मे, लोकरंग पुरवणीत सुचिता देशपांडे यांचा लेख वाचण्यासारखा, नव्हे अभ्याण्यासारखा आहे. संवेदनक्षम मनाला अंतर्मुख करणारा. पर्यटक म्हणून भेट देत असलेल्या स्थळाचा आपण आस्वाद घेतो का? विकसित आणि विकानशील पर्यटन स्थळ पाहता, नको तो विकास असंच वाटत. तेव्हा गरज आहे संवेदनक्षम पर्यटनाची! आपल्या सवयी, हव्या तशा सोयी उपलब्ध होण्याचा आग्रह, हे सोडून निसर्गातील एक होऊन केलेला प्रवास, ते खर पर्यटन! पर्यटनासाठी सुगीचे हे दिवस. तेव्हा निसर्गप्रेमी पर्यटकहो "निसर्गाचा आदर राखण्याच काम आपल्या पासूनच सुरु होऊ देत."

/* */ //