साद देती हिमशिखरे - कुआरी पास हिवाळी ट्रेक

तर इथे 'आपली मैत्रीण' चालू असताना मी लिहिले होते की, मला एक तरी हिमालयातला ट्रेक करायचा आहे. इथल्या मैत्रिणींनी शुभेच्छाही दिल्या होत्या, आणि अगदी लगेचच देवाने "तथास्तु" म्हटले असावे...

जानेवरीच्या शेवटच्या आठवडयातच ह्या ट्रेकबद्दल एका मैत्रिणीने वाचले. हो-नाही करता-करता माझे जायचे ठरले, आडोलासुध्दा गळ घातली होती, पण तिला आत्ता जमणार नव्हते...

तर १२ मार्च - १७ मार्च असा कुआरी पास ट्रेक करून मी शनिवारी परत आले, आणि खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली.
त्या आधी १.५ दिवस ऋषिकेशला होतो, त्यात गंगा-आरती, व्हाइट-वॉटर-राफ्टींग, आणि गंगेवर झिप लाइनही केले.

मी 'Trek the Himalayas'तर्फे गेले होते, आणि त्यांची व्यवस्था अतिशय उत्तम होती. खाण्याची तर रेलचेल होती, १२००० फुट उंचावर गरमागरम जिलेबी, समोसे, होळीनिमित्त गुजिया, गुलाबजाम करणार्‍या त्या खानसाम्याला मनोमन साष्टांग नमस्कार घातला मी. 'मीठे से परहेज'ची ऐशी की तैशी.... पण जेवण चांगले होत असल्यामुळे सगळे कष्ट विसरले जायचे, हे ही खरेच.

आमच्या ग्रूपमध्ये १७ जण होते, आणि बर्‍याच जणांचा हा पहिलाच हिमालयातला ट्रेक होता. ह्यावर्षी अजुनही उत्तरेत हिवाळा चालू असल्यामुळे पहिल्या दिवसापासून आमचे camping बर्फावर होते. रात्रीचे तापमान -५ ते -८ असायचे.. पहिल्या दिवशी रात्री तर hailstorm झाले. कपड्याचे ३ लेयर, स्लिपिंग बॅगचे थर्मल आणि वर स्लिपिंग बॅग तरी सुध्दा थंडी वाजत होती, कारण आम्ही बर्फाच्या लादीवरच झोपत होतो. बरं, लादीसुध्दा सपाट नाही, कशीही ओबड-धोबड रात्री टॉयलेटला जावे लागले तरी गेटर्स, शूज, जॅकेट असा सगळा जामानिमा करावा लागायचा. कारण टॉयलेट टेंट थोडे लांबच असायचे.

रोज बर्फातून चालत होतो, नुकताच बर्फ पडून गेला असल्यामुळे आमचा ट्रेक-लीडर बर्फावरून चालत पुढे जायचा वाट बनवायला, आणि मग आम्ही त्याच्या अक्षरशः पावलावर पावले टाकून पुढे जायचो. शेवटच्या दिवशी तर ३ फुट बर्फ होते, पाय जरा बाजूला पडला की मी अर्धी बुडायचे biggrin .

आम्ही कुआरी पासपर्यंत जाऊ शकलो नाही, कारण तिकडे ६ फुट बर्फ होते अजून, एक दिवस राहिला असताना आमच्या ग्रूपमधल्या ७ जणांनी परतीची वाट धरली - थंडीला कंटाळून. बाकी आम्ही मात्र ग्रूप समिटपर्यंत तरी जाऊ, म्हणून झंडीनारपर्यंत गेलो.

काल आडोबरोबर भरभरून बोलताना ती मला एवढेच म्हणाली - "welcome to the mad people's club!"
ते अगदी मनोमन पटले.
एकदा हिमालयात जाऊन आल्यावर मन भरतच नाही. आपसूकच पुढच्या ट्रेकिंगचे प्लॅन सुरु होतात. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे, देवभूमीतली माणसं, अतिशय निर्मळ मनाची आहेत आणि समाधानीसुध्दा.

आपण रोजच्या आयुष्यात किती छोट्या छोट्या गोष्टी गृहीत धरतो, ते समजण्यासाठी तरी एकदा ट्रेकिंगला जायलाच हवे.
एकंदर खूप मजा आली, मला interesting विषयालासुध्दा बोअर करून सांगण्याची कला अवगत आहे, त्यामुळे इथेच थांबते smile

आमची तिथली दैनंदिनी!

१० मार्च : आम्ही दुबईकर तिघी देहरादूनला १२:३० ला पोहोचलो. मग कॅब घेऊन ऋषिकेशजवळ शिवपुरी कॅम्पवर गेलो. तासाभरात मुंबईकर दोघी आल्याच. आधी आमचा त्याच दिवशी राफ्टींग करायचा प्लॅन होता, पण हवा बघता बघता पालटली, खूप आभाळ आलं, मग फक्त गंगा-आरती करून यायचं ठरलं. रामझुलाला पोहचेपर्यंत पाऊस सुरु झालाच. जोरदार विजा, आणि मुसळधार पाऊस. गंगेचं ते पहिलं दर्शन खूप छान होतं. पावसामुळे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे हातात दिवे घेऊन गंगा-आरती करता आली - अगदी शांतपणे. कॅम्पवर येताना मात्र पूर्ण भिजलो, तापमान पण खूप कमी होते, कारण तिथले लोक म्हणत होते - इथे पाऊस होतोय म्हणजे पहाडात स्नो होतोय. praying आमची तर इथल्याच थंडीने फे-फे उडाली होती, शिवाय कपडे वाळवायचे तरी अवघड, त्या रात्री अजिबात झोप लागली नाही. त्यातच तंबूत खालून एकदा कुत्रे शिरले. लाईट गेले होते. ट्रेक-ट्रीपची सुरुवातच अशी झाल्याने थोडी धडकी भरलीच.

११ मार्च: दुसरा दिवस उजाडलाच तो एकदम नीरभ्र आकाश घेऊन, तिथल्या हवेची ही एक मजा आहे. नाष्टा करून आम्ही राफ्टींग करायला बाहेर पडलो, मला पोहता येत नाही, पण तरी त्यांनी खात्री दिली की, पोहणं जमायची गरज नाही. फ्रीजमधल्या गार पाण्यासारखे गंगेचे पाणी होते. राफ्टींग सुरु केल्यावर पहिल्यांदा थंडी वाजली, मग सरावलो. २-२.५ तास खूप मजा आली. रॅपिड्समध्ये बोट ७०-८० डिग्रीमध्ये उभी आडवी होत होती, मी एकदा चुकून पडणार होते. जाम तंतरली होती, एका रॅपिडमध्ये. असे मस्त राफ्टींग झाल्यावर, काठावर येऊन मॅगी आणि आलं घातलेला चहा घेतला. मग परत कॅम्पवर येऊन थोड्या वेळात जेवण केले.
तासाभराने झिप-लाइनवर गेलो. झिप-लाइन पूर्ण गंगा नदी क्रॉस करते, खाली राफ्टींगच्या बोटी, खळाळते पाणी, डोंगर, सगळेच खूप लोभसवाणे दिसते. झिप-लाइन करतानाच पाऊस सुरु झाला होता. त्यामुळे आदल्या संध्याकाळसारखेच होणार, अशी मनाची तयारी केली होती, आणि पुन्हा एक धक्का बसला. कारण ७ वाजता आकाश एकदम मोकळे झाले, दुसर्‍या दिवशी पौर्णिमा होती, त्यामुळे टिपूर चांदणे होते. मस्त कॅम्प फायर केला आणि शेकत बसलो पुढचे २ तास.

१२ मार्च: ऑफिशियल ट्रेक ह्या दिवशी सुरु झाला. सकाळी ८:४५ ला TTH (trek the himalayas) च्या ड्रायवरने पिक केले. आणि सुरु झाला घाटांचा ८-९ तासाचा जोशीमठ प्रवास. २४०-२५० किमी अंतर आहे, पण पूर्ण रस्ता डोंगरातून. एका बाजूला नदी अन एका बाजूला डोंगर. देवप्रयाग, रुद्रप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, आणि विष्णूप्रयाग असे ५ प्रयाग लागतात वाटेत. देवभूमी का म्हणतात, ते लगेच कळते. सगळेच खूप फोटोजेनिक होते. कॅमेरा थिटा पडतो खरं तर...
६:३० च्या आसपास जोशीमठला पोहोचलो. तिथे पुन्हा कुडकुडायला सुरुवात झाली. इथे आमची बाकीच्या टीममेंबर्सशी गाठ पडली. आमच्या ट्रेक-लिडरने "This is the hottest place of your trek." असं म्हणून अजून एक धक्का दिला. संध्याकाळी बाहेर पडलो तर गावात होळी पेटवली होती. चांदणे पडले होते, समोर हिमालयाची शिखर दिसायला लागली होती. एक थंडी सोडल्यास अगदी मस्त होतं वातावरण!

१३ मार्च: जोशीमठपासून सकाळी ८ ला निघालो - ढाक खेड्याकडे.. जीपने! हे साधारण १२ किमी अंतर होते. इथून आम्ही चालायला सुरुवात केली. ह्या दिवशी ७ किमी जायचे होते. बर्‍यापैकी खडा चढ होता(हे उतरत असताना जास्त जाणवले). त्याच दिवशी धुळवड होती. खालच्या गावातून चालत येत होतो, तेव्हा सगळ्यांनी आम्हालाही रंग लावला. पहिल्या ३-४ किमी नंतर मनुष्यवस्ती अजिबात नव्हती. इथेपासूनच स्नोची सुरुवात झाली. पहिले कॅम्पिंग एका डोंगर पठारावर होते. द्रोणागिरी पर्वत समोर होता आणि मागून नंदादेवी डोकावत होता. आधी मिळालेल्या टीप्सनुसार, पोहचल्यावर अजिबात विश्रांती घेतली नाही. तंबू ठोकणे, फोटो काढणे, असा टाइमपास केला. मग गरमा-गरम जेवण आले.

मधे एक तास वेळ होता, त्यात कपड्यांचे लेयर्स चढवले. हिमालयात एक नियम आहे, climb high, sleep low, त्यामुळे चहा घेऊन acclimatization walk ला गेलो. स्नोमध्ये खूप खेळलो. रात्री जाम थंडी वाढली. मग सूप घेऊन डिनर टेंटमध्ये थोडा टाइमपास झाला. इथे आम्हाला ट्रेक-लीडरने २ पर्याय दिले होते (स्नोची लेवल बघून), हीच कॅम्पिंग साइट ठेवून २ दिवस थोडी चढाई करायची, किंवा पुढचा कँप थोडा वर तालीच्या जंगलामध्ये करायचा. त्यावर भरपूर चर्चा झाली. बहुमत आमच्या विरोधी झाले आणि ताली जंगलामध्ये जायचे ठरले. sad (पण जे झाले ते उत्तम, हे नंतर पटले). रात्री तंबूत अजिबात झोप आली नाही. बर्फावर तंबू होता, त्यातच hailstorm झाले. काहीही केले तरी थंडी वाजत होती.

१४ मार्च : सकाळी चहा-नाष्टा करून निघालो. ग्रूपचा नियम होता: ६-७-८! ६ ला चहा, ७ ला नाष्टा आणि ८ ला निघायचे. तंबू वगैरे गुंडाळूनच निघालो. ह्या दिवशी चालायला सुरुवात केल्यापासून २ फुट बर्फ होते पायाखाली. गेटर्स्, क्रॅम्पॉन्स सगळे घालूनच चालायचे. मी आमच्या वाटाड्याबरोबर चालत होते. त्यामुळे वाट तयार करतच जात होतो. अंतर तसे जास्त नव्हते - ४ किमी. पण जेवणाच्या आत पोहचायचे असायचे. चढ बराच होता, शिवाय बर्फ. १ किमीला जवळ-जवळ १ तास लागायचा.
ताली जंगलात पोहचलो, तेव्हा १-१३० झाला होता. इथे तर २ फुट बर्फ. अजिबातच लेवलिंग न करता तंबू ठोकले. ज्याचे परिणाम रात्री झोपल्यावर जाणवले. biggrin
इथे प्रचंड थंडी होती. पाण्याच्या बाटल्यांमधल्या पाण्याचे बर्फ होत होते. त्यात भरीस भर म्ह्णून टॉयलेट टेंट २०० मी वर होता , २-२.५ फुट बर्फातून जावे लागायचे. साधे टॉयलेटला जायचे तरी १० मिनीटे तयारी करावी लागायची. आम्ही त्याचे 'टॉयलेट एक्सिपिडीशन' नाव ठेवले होते. सपाट बेड आणि घरातल्या घरात टॉयलेटची सोय, ही मोठी लक्झरी वाटायला लागली २ दिवसात मला.
ह्या संध्याकाळी काही जण ताली लेकपर्यंत गेले, मी मात्र फार थकले होते, २ दिवस झोप नव्हती, त्यामुळे थोडे चालून परत आले. माझ्या बाकीच्या मैत्रिणींनी दुसर्‍या दिवशी खाली जायचा निर्णय घेतला. मला मात्र ते पटत नव्हते. सकाळी उठल्यावर बघु, म्हणत गुलाबजामचे जेवण चापले. मग ३-४ लेयर चढवून गुडुप झाले. ह्या रात्री चांगली झोप लागली.

१५ मार्च : सकाळी ४ ला मैत्रिणीने उठवले, तिला टॉयलेटला जायचे होते म्हणून. तशीही माझी ५-६ तास झोप झाली होती. मस्त वाटत होते. मी सांगून टाकले - मी पुढे जाईन. ५ मधल्या आम्ही दोघी थांबलो, बाकी तिघी परत गेल्या. एकूण ७ जण उतरायला लागले. एकीला तर खेचरावर बसून उतरवावे लागले.
तर आम्ही १० जण पुढे निघालो. तास दीड तासाने मेडोज आले. तिथून हत्ती पिक, गौरी पिक आणि २-३ पिक्स दिसत होती. इथून आणखी तिघे परत फिरले. आम्ही अजून थोडे पुढे गेलो. इथेच तो traverse आला. सगळीकडे नुसते बर्फच बर्फ. पण आतापर्यंत सवय झाली होती. एक लक्षात आले, बर्फात पडले तरी रुतून बसायला होत होते, घसरून पुढे जात नव्हते. १२ पर्यत जो डोंगर चढु शकलो, तो चढलो. फोटो वगैरे काढून परत फिरलो. आल्यावर परत मस्त राजमा-राइस खाला. ग्रूप समिट तरी झाले, म्हणून खूश होतो.
माझा 'ताली लेक' बघायचा राहीला होता, म्हणून संध्याकाळी मी आणि एक जण अशा दोघीच ट्रेक-लीडरबरोबर जाऊन आलो. तिथून खूप्पच छान व्यू होता. रात्री जेवायला गरमा-गरम जिलेब्या होत्या. २ घास जरा जास्तच गेले, झोपही बरी लागली.

१६ मार्च : ऑलीला जायला मिळावे, म्हणून सकाळी लवकरच उतरायला सुरुवात केली. दुपारचे जेवण बरोबर घेतले होते. उतरताना माझी थोडी वाट लागली. बर्फ वितळला होता, तिथे आता चिखल झाला होता. आणि माझ्या पायाची बोटं ठेचली जात होती. साधारण ४-४.५ तासात पोहोचलो. पुढचा ग्रूप बराच पुढे, आणि मागचा बराच मागे, असे झाले होते. आम्ही मधले ४-५ जण एकदा रस्ता चुकलो, फार नाही पण तरी.... आम्ही ढाकला पोहोचलो आणि पाऊस सुरु झाला. देवाचे आभार मानले.
ऑलीला जायचे पावसामुळे रद्द करावे लागले. आदल्या दिवशी जे उतरले होते, ते ऑलीला जाऊन आले होते. पण त्यांनाही स्नो फॉलमुळे २ तासात परतावे लागले. आता जोशीमठला थंडीचा अजिबातच त्रास झाला नाही. संध्याकाळी आद्य शंकाराचार्य मंदिरात जाऊन आलो.

१६ मार्च ते १७ मार्च आमचा परतीचा प्रवास झाला.

ट्रेकमध्ये आणि परत आल्यावरही मला शारिरीक काहीही त्रास झाला नाही, थंडीसाठीच फक्त मनाची तयारी नव्हती, पण निभावले.
रोज मी घरचे ७ आणि ऑफिसचे ४ मजले दोनदा चढत होते महिनाभर. त्याचा नक्कीच फायदा झाला असेल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आता फोटुज!!!

जोशीमठ्ला जाताना, गंगा नदी

P_20170312_122232.jpg

चढताना पहिला रेस्ट पॉईंट

rsz_img_20170313_085613_2.jpg

मेडोज, झंडीनारला जाताना

IMG_7258.JPG

खालच्या फोटोमध्ये नीट कळत नाही आहे, पण डावीकडे पूर्ण उतार होता, उजव्या बाजूला कलून चालावे लागत होते. हे मला जरा अवघड गेले.. डावीकडे बघितले तर खालची जमिन दिसत नव्हती एव्हढी उंची होती. ह्या नंतर २० मिनीटांनी आमचा समिट पॉईंट होता.
traverse.jpg

डावीकडे हत्ती पिक, आणि समोर गौरी पिक

rsz_img_0352.jpg

ताली लेक

talilake.jpg

ताली लेकवरून दिसणारा नजारा

talilake2.jpg

talilake3.jpg

acclimatization with snow

accamalitazation.jpg

ग्रूप समिट

groupsummit.jpg

IMG_3221.JPG

IMG_3229.JPG

camping

IMG_7158.JPG

/* */ //