तो पाऊस.. हा पाऊस..

अगेन.. फार जुनं लिखाण.. :)

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.
मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..

पाऊस.. !

का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! :) )
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद..

लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो!
वाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो ! बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक? पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता..

पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्‍याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी, मानसी व विशाखा सायकलवरून निघायचो. माझा व मानसीचा रेनकोट अगदी स्सेम ! खरंतर कोणाएकीकडेच असता तर तो फार युनिक पीस झाला असता! पण असो. आम्हा दोघींकडे सारखाच “युनिक”(?) पीस होता!! (माझ्यामते) पीस्ता व (मानसीच्यामते) नीळा असलेला तो जाडसर व थोडा ट्रान्स्परंट रेनकोट अम्हाला फार आवडायचा! त्यामुळे साहजिकच पावसाची वाटच बघायचो आम्ही! आणि नंतर दोघींनी सेम रेनकोट घातलाय, किती मंद दिसत असू , म्हणून खिदळत जाणे तर नेहेमीचेच. पाऊस म्हटला की नळस्टॉपचा रस्ता, संध्याकाळची गर्दीची वेळ, तरीही गर्दीतसुद्धा जसं काही रस्त्यावर आम्हीच फक्त आहोत अशा आविर्भावात सायकल हाकणार्‍या आम्ही , मैत्रिणींनी(?????) माझे ओले कुरळे केस पाहून म्हटलेले “ओ हसीना जुल्फोवाली” गाणे?!?!, ते वेड्यासारखे खिदळणे, पावसाळ्यातल्या सायकलीचे ब्रेक्स कामातून गेले असतानाच्या सायकल-रेसेस… huh.. काय काय नाही आठवत ? कसं पावसाला पाहून, हे आठवून वेड लागणं शक्य नाहीये?

७-८वीत असताना, एकदा असाच मुसळधार पाऊस आला होता. सावनी मला भिजायला बोलवायला आली होती. मी गेले. ती मी व दिप्ती. कॉलनीतून उन्हात फिरत असल्यासारख्या धोधो पावसात चालत गप्पा मारत फिरलो होतो. व नंतर सावनीच्या घरच्या गच्चीवर जाऊन पाय बुडतील एवढ्या पाण्यात मांडी घालून मी त्यांना मृत्युंजय कादंबरी व कर्णाची झालेली उपेक्षा यावर अनेक तास लेक्चर दिले होते.. !

११-१२वी मध्ये असताना, पहिल्या पावसाला, आख्खा क्लास, शिक्षकांसकट, ग्राउंडवर जमून पावसात भिजला होता ! पावसातच बास्केटबॉल अन काय काय गेम्स खेळलो होतो.. शिवाय अजुन मजा.. घर आणि कॉलेजमध्ये केवळ ४ बिल्डींग्सचे अंतर असल्याने मी नेहेमी आरामात भिजतच घरी यायचे. कॉलेजम्धल्या १-२ ओळखीच्या मुलांनी माझे घर माहीत नसल्याने चक्क तेवढ्याश्या अंतरावर लिफ्ट हवीय का विचारल्यावर मी केवळ खदाखदा हसून त्यांना समोरचे माझे घर, माझे आई बाबा सुद्धा दाखवल्याचे आठवतेय!! :) )

थोडं मोठं झाल्यावर, इंजिनिअरिंगचा पाऊस वेगळाच होता. मैत्रिणींबरोबर कुठेतरी हॉटेल मध्ये बसून चहा पीत गप्पा मारणे हेच मुख्य आमचे काम. पावसाच्या बॅकग्राऊंडवर गप्पा अगदी खुलतात! वर्तमानकाळात न जगायचा तो काळ ! कायम भविष्याची चिंता व स्वप्ने.. कदाचित स्वप्नेच जास्त..!
मी व स्वीटी, माझ्या स्कुटीवरून रेनकोट न घालता चिंब भिजत जाणे हा दुसरा उद्द्योग ! नंतर मी परत तशी कधी भिजले की नाही, पडणार्‍या त्या पावसाच्या पाण्याला कधी इतकी मनापासून भेटले की नाही कोणास ठाऊक ! कॉलेजचे दिवस म्हणूनच सतत आठवतात.. इंस्टिंक्ट्सवर डिंपेंड होऊन सर्वात वेडगळासारख्या गोष्टी आपण तेव्हा करतो, ज्या नंतर आपण प्रॅक्टिकल वागण्यात मिस करत बसतो..

आणि आता हा.. कॅलिफोर्नियातला पाऊस. कधी मधी उगवणारा. दुष्काळी कॅलिफोर्नियाला दिलासा देणारा. वाळलेले गवत, झाडं लखलखीत पुसून हिरवी करणारा.. त्याचबरोबर आपली मनं देखील हिरवीगार करणारा.. पूर्वीसारखे भिजायचा प्रयत्न करायला गेलो तर अतिशय थंडगार पाणी येणार चेहेर्‍यावर..!
त्यामुळे बरेचदा घरातल्या खिडकीतूनच पाहायचा हा पाऊस..
पण म्हणून काय झाले?
पाऊस तो पाऊसच !
वेड लावणारच तो !!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle