टर्कीश कबाब आणि पिडे - खाऊगिरीचे अनुभव ४

मागच्या कोणत्यातरी लेखात मी म्हटले होते की टर्कीश कबाब ही ऑस्ट्रेलियाची खासियत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या गेल्या पहिल्या एक-दोन दिवसांमध्येच कबाब आणि पिडे ह्या दोन्ही पदार्थांशी माझी ओळख झाली. ऑस्ट्रेलियात गल्लोगल्ली टर्कीश कबाब शॉप्स आहेत (म्हणजे तेव्हा होते) अगदी स्वस्तात मस्त पोटभरीचे जेवण म्हणजे कबाब किंवा पिडे. टर्कीश कबाब खाण्याआधी मला कबाबचे विविध प्रकार असतात हे माहित नव्हते. कबाबचा अर्थ भाजलेले मांस हेही माहीत नव्हते!!! मांस भाजायच्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक देशामध्ये कबाबचे विविध प्रकार आहेत. सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे शिश कबाब आणि डोनर कबाब. हे दोन्ही प्रकार टर्कीश आहेत. शिश कबाब म्हणजे मांसाचे तुकडे काडीवर लावून भाजणे (Skewers). डोनर कबाबमध्ये एका मोठ्या काठीवर मांस ठेवून सर्व बाजूनी ज्वाळांवर भाजतात. वरच्या बाजूचे मांस शिजले की ते तासून काढले जाते. हे तासून काढलेले मांस म्हणजे डोनर कबाब.

ऑस्ट्रेलियाच्या टर्कीश कबाब शॉप्समध्ये डोनर कबाबचे रॅप्स मिळायचे. टर्कीश लवाश ब्रेडचे हे रॅप्स फार मस्त लागायचे. त्यात चिकन, लॅम्ब आणि मिक्स्ड (चिकन आणि लॅम्ब एकत्र) कबाब असे प्रकार असायचे. शाकाहारी फलाफल कबाब पण मिळायचे. फलाफल म्हणजे चण्याच्या पिठाची (चिकपी) तळलेली भजी. कबाबला स्वत:ची चव तशी फार नसते. रॅप्समध्ये घातलेल्या सॅलड्स आणि सॉसेसनी कबाबला चव येते. मला आणि नवऱ्याला लवाश ब्रेड फार फार आवडायचे. पुष्कळ वेळा पोळीच्या ऐवजी आम्ही भाकरी सारखे हे लवाश ब्रेड खायचो. त्यामुळे हे रॅप्स आम्हाला अतिप्रिय होते हे सांगणे नकोच

टर्कीश लवाश ब्रेडवर हमस (छोले मॅश करून केलेली एक प्रकारची चटणी), गार्लिक सॉस, आपले कबाब आणि वर सॅलड आणि तबुली. तबुली म्हणजे बारीक चिरलेले पार्सली, पुदिना, कांदा, टोमॅटो, बलगूर (गव्हाच्या एका जातीचे सिरीयल. दलियासारखे असते), ऑलिव्ह ऑइल वगैरे घालून केलेली कोशिंबीर!!

आमच्या जवळच्या मॉलमध्ये एक कबाब शॉप होता. गुरुवारी रात्री आम्ही तेथे जायचो. तेव्हा मी उपवास वगैरे करत होते त्यामुळे फलाफल कबाब खाऊन माझा उपवास सुटायचा. आणि हे त्या कबाब शॉप मध्ये काम करणाऱ्या मुलीला पण माहीत झाले होते. त्यामुळे गुरुवारी मी दिसले की लगेच ती फलाफल कबाब आणि वीकएंडला दिसले तर चिकन कबाब बनवायला घ्यायची.

ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्या कबाब शॉप्समध्ये पिडे नावाचा अजून एक प्रकार मिळायचा. पिडे म्हणजे टर्किश पिझ्झा!! त्याचा आकार एखाद्या होडीसारखा असतो. टर्कीश फ्लॅटब्रेडवर आपल्या मनासारखे टॉपिंग्स घालून बेक केले की झाला पिडे. अर्थात त्याची चव पिझ्झाच्या जवळपासही जाणारी नसायची. त्याला खास टर्कीश चव असायची. एग अँड बेकन पिडे आमच्या सर्वात आवडीचा होता.

युकेमध्ये आल्यापासून चांगला लवाश ब्रेड, चांगले कबाब रॅप्स मिळणे दुरापास्त झाले आहे. युकेमध्येसुद्धा कबाब शॉप्स आहेत पण येथील कबाबला ती मजाच नाही. हे नुसते मी नॉस्टॅल्जियामुळे म्हणत नाही पण येथे कबाब रॅप्स बनवायची पद्धत खूप वेगळी आहे. हमस, तबुली वगैरे येथे काही वापरत नाहीत. ऑस्ट्रेलिया सोडल्यापासून तर तबुली खाल्लीच नाही. युकेमधील कबाब रॅप्स मला विशेष कधी आवडलेच नाहीत. पिडे तर येथे पाहिल्याचेही आठवत नाही. काहीकाही गोष्टी आपण आयुष्यात इतक्या गृहीत धरतो की त्यांची किंमत जेव्हा कळते तेव्हा त्या गोष्टी फार लांब गेलेल्या असतात. असो.

त.टी. फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत (अनुक्रमे शीश कबाब, डोनर कबाब, फलाफल, तबुली, एग अँड बेकन पिडे)

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle