प्लास्टिक चा पैसा-धडा १: सुरुवात-ऑनलाईन पेमेंट

बरं का, पूर्वीच्या काळी एका देशात खूप दरोडेखोर होते.खजिना, सोनं नाणं,दागिने काही एका गावातून दुसर्या गावी नेताना हे दरोडेखोर सर्व लुटून न्यायचे.जनता त्रस्त झाली होती.अश्यात राजाच्या मुलीचं लग्न होऊन ती एका लांबच्या राज्यात नांदायला जायची होती.राजा पडला चिंतेत.राजकन्येबरोबर दिलेला खजिना दरोडेखोर नक्की लुटून नेणार!!आता काय करावे?राजाने काढली एक युक्ती.त्याने राजकन्येच्या पालखीबरोबर काही सोनं नाणं न देता फक्त एक चिठ्ठी दिली."ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्यास इतकी सोन्याची नाणी द्यावी".दरोडेखोर अपेक्षेप्रमाणे जंगलात खजिना लुटायला आले.पण त्यांना काहीच मिळाले नाही.(आणि ते अमरीश पुरी/शक्ती कपूर/गुलशन ग्रोव्हर चे सिनेमे बघत नसल्याने त्यांनी राजकन्येला सोडून दिले).अशिक्षित असल्याने चिठ्ठीत काय आहे तेही कळले नाही.
आणि राजकन्येच्या माहेरच्या खजिन्याचा अपहार टळला. या अश्याच चिठ्ठ्याच्या पुढे कागदी नोटा बनल्या.आणि आता या कागदी नोटा जाऊन 80% व्यवहार प्लास्टिक च्या पैश्याने व्हावे(अशी सरकार ची अपेक्षा आहे).या प्लास्टिक च्या पैश्याने व्यवहार जवळ जास्त रोख रक्कम न बाळगता करता येऊ लागले.सुट्ट्या पैशांचा प्रश्न कमी झाला.व्यवहार स्वतःसाठी आणि सरकारसाठी इझी ट्रेसेबल बनू लागले.

नमनाला घडाभर तेल ओतून झालं, आता विषयाकडे वळू.

ऑनलाईन ट्रान्सफर म्हणजे काय?
=====================
१. एका व्यक्तीने दुसर्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवणे.उदा. अ ही माझी मैत्रीण आहे.तिने आमच्या तिसऱ्या मैत्रिणीसाठी एक गिफ्ट विकत घेतली, आणि मला माझ्या काँट्रिब्युशन चे पैसे तिला द्यायचे आहेत.पण ती तर उद्या दिल्ली ला निघालीय.माझ्या खिश्यात आता फक्त ५० रुपये आहेत.जाऊदे, मी तिला ऑनलाईन ट्रान्सफर करते पैसे तिच्या बँक खात्यात.
या उदाहरणात मला मैत्रिणीला ऑनलाईन पैसे पाठवायला तिचे बँकेचे नाव,तिचे त्या बँक खात्यावर असलेले नाव, बँकेची ब्रँच, ब्रँच चा आय एफ एस सी कोड इतक्या गोष्टी माहीत हव्यात.
२. एका व्यक्तीने काहीतरी खरेदी केली त्याची किंमत/एखाद्या सेवेची फी एका प्रोफेशनल संस्थेला/कंपनीला जमा करणे.
उदा. मी शॉपिंग साईट वर वस्तू विकत घेतली.वस्तू मोठी आहे, कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही.मी माझ्या बँक खात्यावरून या साईट च्या खात्यात पैसे पाठवले.

या उदाहरणात जर साईट शॉपिंग ची असेल, किंवा पैसे घेणं ही त्या साईट साठी नेहमीची घटना असेल तर मध्ये पेमेंट गेटवेज असतात,तुम्हाला या साईट चा अकाउंट नंबर,बँक,आय एफ एस सी कोड वगैरे गोष्टी माहीत नसल्या तरी चालू शकतील.पेमेंट गेटवे या गोष्टींची काळजी घेईल.

ऑनलाईन बँकिंग कसे चालू करावे:
=======================
१. प्रत्येक थोड्या मोठ्या बँकेचे ऑनलाईन बँकिंग असते.बँकेत एक फॉर्म भरून हे चालू करता येईल.फॉर्म मध्ये तुम्हाला पाहिजे असलेले ऑनलाईन बँकिंग चे युजरनेम विचारतात.१ आधीच वापरलेले असले तर, म्हणून 3 ते ४ प्रेफ्रन्सेस. काही बँक आधी एक ६ किंवा ७ आकडी नंबर युजरनेम म्हणून देतात, आणि नंतर तो तुम्हाला पाहिजे त्या युजरनेम मध्ये बदलता येतो.
२. फॉर्म भरून दिल्यावर त्याची पोच अवश्य घ्यावी.काही दिवसांनी घरी बँकेचे पत्र येते ज्यात फक्त युजरनेम असते.त्यानंतर दुसरे पत्र येते ज्यात फक्त पासवर्ड असतो.
३. हे सर्व घेऊन ऑनलाईन बँकिंग त्या बँक च्या वेबसाईट वर जाऊन चालू करून घेतल्यावर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर ला तयार झालात.

ऑनलाईन ट्रान्सफर ला काय काय लागेल:
============================
१. तुम्ही ज्या व्यक्तीला/संस्थेला पैसे ट्रान्सफर करू इच्छिता त्यांचा अकाउंट नंबर, अकाउंट टाईप,अकाउंट वर असलेले नाव आणि बँक च्या ब्रँच चे नाव किंवा आय एफ एस सी कोड.
२. तुमचा बँकेत दिलेला मोबाईल नंबर असलेला फोन आणि डेबिट(ए टी एम कार्ड) हाताशी.(दुसर्या खोलीत चार्जिंग ला लावलेला किंवा पर्स मध्ये खोलवर दडलेला नाही)

काय काळजी घ्याल:
=============
१. या ट्रान्सफर तुम्ही बँक ची वेबसाईट स्वतः बँक च्या डॉक्युमेंट वर बघून टाईप करून उघडणे.किंवा गुगल करून योग्य ती साईट शोधून ती उघडणे.
२. तुमच्या नेहमीच्या बँक चे लोगो, साईट कशी दिसते ते लक्षात ठेवणे.त्यात जराही बदल दिसल्यास(चित्रं वेगळ्या जागी) थोडं थांबून आपण टाईप केलेला साईट चा पत्ता नीट तपासून पाहणे.
३. बर्याच बँक युजरनेम आणि पासवर्ड देताना व्यर्च्युअल कीबोर्ड वापरायची सुविधा देतात.म्हणजे प्रत्यक्ष कीबोर्ड ने युजरनेम पासवर्ड टाईप न करता स्क्रीनवर कीबोर्ड चा दिसणारा लेआऊट असतो त्यातून अक्षरे क्लिक करून टाईप करणे.हा लेआऊट बरेचदा बदलता असतो.
४. हे युजर नेम पासवर्ड टाकून तुम्ही बँक च्या साईट वर आलात की तिथे 'लास्ट लॉगड इन' चे रेकॉर्ड दिसते ते पाहून लास्ट लॉगिन आपणच केले आहे ना हे सहज आठवून पाहणे.

पेयी(ज्याला तुम्ही पैसे द्यायचे आहेत/तुमच्याकडून पैसे जायचे आहेत तो ऍड करणे.)
========================================================
विशेष सूचना: हे स्क्रीनशॉट मोबाईल ऍप वरून बनवले आहेत.तुम्ही डेस्कटॉप कॉम्प्युटर वरून वेबसाईट उघडून हे करत असाल तर ही सर्व कामे लॉगिन केल्यावर डाव्या हाताच्या मेनू मध्ये दिसतील.
हे स्क्रीनशॉट आय सी आय सी आय बँक चे वापरले आहेत.पण सर्व बँक ची प्रोसेस अशीच असते.वेबसाईटवर लॉगिन करून मेनू वाचल्यावर कळेल.
१. प्रथम 'ऍड पेयी' वर क्लिक करा.
IMG_20170708_184609.jpg
२. आता पेयी ची आपण आधीच घेऊन जवळ कागदावर लिहून ठेवलेली माहिती तिथे भरा.ही माहिती म्हणजे पेयी नेम,पेयी अकाउंट नंबर, टाईप ऑफ अकाउंट(80% वेळा हा सेव्हिंग असतो),आणि पेयी च्या बँक चा आय एफ एस सी कोड.आय एफ एस सी माहीत नसेल तर त्याच्या बँक चे नाव आणि ब्रँच माहीत असेल तर आय एफ एस सी गुगल करून शोधता येईल.
IMG_20170708_184733.jpg
३. ही माहिती टाकून ओके केल्यावर पुढच्या स्किन वर तुम्हाला एक नंबर टाकावा लागेल एका रिकाम्या चौकोनात.हा नंबर म्हणजे ओ टी पी तुमच्या बँक अकाउंट मध्ये जो मोबाईल नंबर असेल त्यावर एस एम एस ने येईल.तो भरल्यावर ओके केल्यावर परत एकदा सर्व डिटेल्स वाले पान येईल, ज्यावर ओके केल्यावर हा माणूस पेयी म्हणून ऍड होईल.म्हणजे आता हा तुमच्याकडून ऑनलाईन पैसे घेण्यास लायक झाला.(तुम्ही तमक्याला पेयी म्हणून ऍड केले आहे हे त्याला कळत नाही आणि रिमूव्ह केले तरी कळत नाही.चिंता नको)
IMG_20170708_184812.jpg
४. पेयी म्हणून ऍड झाल्यावर लगेच पैसे पाठवता येत नाहीत.बँक टु बँक वेगवेगळा काळ, पण मक्झिमम 30 मिनिट थांबावं लागतं एखादा माणूस पेयी म्हणून ऍड केल्यावर पहिल्यांदा ट्रान्सफर करताना.
IMG_20170708_184853.jpg

ऑनलाईन ट्रान्सफर करणे
================
१. तुमच्या बँक च्या वेबसाईट वर तुम्ही युजरनेम पासवर्ड वापरून लॉगिन केल्यास बाजूला 'फंड ट्रान्सफर' शोधून त्यावर क्लीक करा.
Screenshot_2017-07-08-18-25-06-278_com.csam_.icici_.bank_.imobile.png
२. आधी आपण अश्या लोकांना पैसे पाठवणे शिकू, ज्यांची बँक तुमच्या बॅंकेच्या वेगळी आहे.म्हणज उदाहरणार्थ आय सी आय सी आय टु एस बी आय,एच डी एफ सी टु पंजाब नॅशनल बँक वगैरे वगैरे.
या ट्रान्सफर ३ प्रकारे होऊ शकतात
NEFT: जेव्हा तुम्हाला 10 लाखांच्या आतली रक्कम वर्किंग डे, वर्किंग टाईम ला पाठवायची आहे.या प्रकाराला बँक उघडी असणे गरजेचे असते.म्हणजे थोडक्यात तुम्हाला सोम ते शुक्र विकडेज ना 11 ते 4 आणि शनिवारी 8 ते 1.30 या काळात कोणाला पैसे पाठवयाचे असले तर NEFT वापरू शकता.या प्रकारातले पैसे कोणाकडून घ्यायला काही फी नाही.पण आपण पाठवायचे असतील तर 10000 च्या आत अडीच रु प्लस सर्व्हिस टॅक्स,10000 ते 1 लाख ला 10 रु अधिक सर्व्हिस टॅक्स असे नगण्य चार्जेस आहेत.
IMPS: शनी,रवी,किंवा कोणत्याही रात्री वेळी अवेळी कोणाला पैसे पाठवायचे असल्यास IMPS वापरा.या ट्रान्सफर ला वर्किंग डे, बँक हॉलिडे, किंवा बँक टायमिंग चे कोणतेही बंधन नाही.केव्हाही करा.जनरली तुम्ही हाच प्रकार जास्तीत जास्त वापराल.
RGTS: ही रियल टाईम ट्रान्सफर. अती मोठ्या रकमेची.2 लाख ते 10 लाखापर्यंत.(खरं तर मॅक्स लिमिट प्रत्येक बँकेची आपापली ठरलेली असते.काहींची 5 लाखाचीही असू शकेल.)या ट्रान्सफर ला वेळेची बंधनं आहेत.ऑफिस डेज आणि ऑफिस टाईम मध्येच(तो ही बँकांचा ऑफिस टाईम, आयटी वाल्यांचा ऑफिस टाईम नव्हे).

तर आता आपण IMPS ट्रान्सफर चं स्क्रीनशॉट सहित उदाहरण पाहू.
=============================================
१. प्रथम 'ट्रान्सफर फंड' ला क्लिक करा.
(स्क्रीनशॉट मोबाईल वरचा आहे, डेस्कटॉप कॉम्प्युटर वर शोधत असल्यास पानाच्या डाव्या बाजूला बघा.)
२. मग 'एनी बँक अदर दॅन(तुमची जी कोणती बँक आहे तिचे नाव)' हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
३. NEFT किंवा IMPS निवडा.नॉन वर्किंग डे ला करत असाल तर NEFT पुढे जाणारच नाही.
IMG_20170708_185421_0.jpg
४. पेयी चे नाव लिस्ट मधून स्क्रोल करून क्लिक करून निवडा.
IMG_20170708_185508_0.jpg
५. पाहिजे ती रक्कम टाईप करा आणि 'वन टाईम' आहे का रिपीटेड ते निवडा.(रिपीटेड फक्त जिथे तुम्हाला मंथली आपोआप पे व्हायला हवंय, आणि अमाउंट सारखी असणार आहे तिथेच लागेल.डिफॉल्ट सिलेक्शन वन टाईम वर आहे, सो तुम्हाला काही बदल न करता ओके म्हणून पुढे जायचे आहे.कमेंट्स मध्ये आपल्याला लक्षात राहील अशी चांगली कमेंट(उदा. फॉरमायलंचकॉन्ट्री) देऊन ठेवा.पुढे पैसे कश्यासाठी पाठवले हे चेक करताना सोपे पडेल.


IMG_20170708_185718.jpg
६. आता डबल व्हेरिफिकेशन म्हणून तुमच्या ए टी एम कार्ड वरील डिटेल विचारले जातील(म्हणजे, बहुतांश डेबिट कार्ड वर मागे a b c d e f g h टेबल आणि त्याच्या खाली 2 आकडी नंबर असतात.तुम्हाला व्हेरिफिकेशन मध्ये 'ग्रीड वरील a h आणि k खाली लिहिलेले नंबर इथे टाका सांगतील'. हे प्रश्न प्रत्येक वेळी बदलते असतील.हे तीन नंबर टाका आणि ओके करा.(मोबाईल बँकिंग मध्ये ही स्टेप वगळली जाऊन डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होत असल्याने(फारच भोळे बै हे मोबाईल बँकिंग ऍप चे कर्ते!!लगेच विश्वास ठेवतात) या स्टेप चा स्क्रीनशॉट इथे दिलेला नाही.
६. मग अजून एक कन्फर्मेशन डायलॉग येईल आणि त्यावर ओके केल्यावर पैसे ट्रान्सफर यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.या मेसेज वरील ट्रांझाक्षन नंबर नोंदवून ठेवा.किंवा या सक्सेस मेसेज चा स्क्रीनशॉट घेऊन जवळ ठेवा.तुम्हाला पेयीला 'मी पैसे ट्रान्सफर केलेत' सांगताना हा नंबर कोट करता येईल.हे डिटेल्स नंतर माय ट्रान्सफर्स मध्ये जाऊनही बघता येतील.
IMG_20170708_185813_0.jpg

ऑनलाईन बँकिंग करताना घेण्याची सावधगिरी:
===============================
१. क धी ही ऑनलाईन बँकिंग युजरनेम आणि पासवर्ड एका कागदावर लिहून एकत्र ठेवू नका.
२. को णा ला ही तुमच्या डेबिट म्हणजेच ए टी एम कार्डाची फोटोकॉपी/फोटो क धी ही घेऊ देऊ नका.
३. काही व्यवहार टेम्पररी असतील आणि आयुष्यात परत कधीही त्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर ची गरज लागणार नसेल तर असे पेयी एकदा ट्रान्सफर झाल्यावर डिलीट करायची सवय लावून घ्या.अगदी आयुष्यात कधी लागलेच तर परत घेता येतील डिटेल्स आणि परत पेयी म्हणून ऍड करता येईल.
४. हे व्यवहार घरच्या/ऑफिस च्या एकाच भरवश्याच्या कॉम्प्युटर वरून करा.जिथून कराल त्यावरून कोणी पॉर्न पाहणे, गेमिंग असे उद्योग करत नसल्यास उत्तम(बर्याच पॉर्न साईट वर फिशिंग सॉफ्टवेअर/व्हायरस असू शकतो)
५. को णी ही कितीही अर्जंट कामासाठी अमक्या तमक्या बँक मधून फोन केला तरी त्याला अकाउंट चे किंवा डेबिट कार्ड चे डिटेल्स अजिबात देऊ नका.'अर्जंट आहे, हे आता 10 मिनिटात नाही केलं तर तुमचा अकाउंट बंद होईल/ऑफर आजच आहे/मी घरी आमचा माणूस पाठवतो प्रूफ घ्यायला/मला तुमचा ऑनलाईन बँकिंग आयडी आणि पासवर्ड सांगा, मी तुमच्यासाठी करून देतो/गव्हर्नमेंट च्या नव्या पॉलिसी नुसार मला तुमचा ऑनलाईन आयडी रेकॉर्ड साठी लागेल' अशी अनेक कारणे सांगितली जातील.आताच्या आता न सांगितल्यास लीगल ऍक्शन घेतली जाईल अशी काहिही भीती दाखवली जाईल.याला बधायचे नाही.लक्षात ठेवा, हे ठग म्हणजे ड्रॅक्यूला सारखे आहेत.दे कॅनॉट डू यु हार्म अनलेस "यु इन्व्हाईट देम इन".(इथे इन्व्हाईट देम म्हणजे फोन वरून आपला ओ टी पी त्यांना सांगणे, ऑनलाईन बँकिंग चे युजरनेम पासवर्ड शेअर करणे, त्यांना घरी येऊन आपल्या पॅन कार्ड किंवा डॉक्युमेंट ची कॉपी घेऊ देणे,त्यांना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड च्या दोन्ही बाजूंचा फोटो वा कॉपी घेऊ देणे,ब्लॅंक कॅन्सल चेक देणे या आपल्याकडून झालेल्या चुका.)
तुम्हाला काहीही व्यवहार करायचाय तो बँक मध्ये जाऊन करा.स्वतः बँक ला योग्य नंबर वेबसाईटवर शोधून फोन करून करा.फोन तुम्हाला आला आणि त्यावर काहीही सांगितले तर "मी ब्रँच ला येऊन हे करतो" असे म्हणा. जग बुडणार नाही.आकाश कोसळणार नाही.आयुष्यात 'परत कधीही अन डू करता येणार नाही'अशी ऍक्शन फक्त आत्महत्या ही एकच असते हे लक्षात ठेवा.दबावाला बळी पडायचे नाही.
६. कोणत्याही मॉल मध्ये लकी ड्रॉ मध्ये फॉर्म भरून आपली माहिती आणि पॅन कार्ड नंबर किंवा बँक अकाउंट नंबर शेअर करायचा नाही.एव्हरीथिंग इज डील विथ डेव्हील.इट वील कम ऍट सम हिडन कॉस्ट. नो फ्री लंचेस हे स्वतःला नीट समजावून ठेवा.
७. ऑनलाईन शॉपिंग साईट भरवश्याच्या असतील त्यावरच पेमेंट चे व्यवहार करा.'सेव्ह युवर बँक डिटेल्स फॉर इझी ऑपरेशन नेक्स्ट टाईम' ला कायम अनचेक करा.अधून मधून ब्राऊजर हिस्टरी कलीयर करत रहा.
८. जितके धोके रस्त्यावर चोराने येऊन तुमची पर्स हिसकावून पळून जाण्यात आहेत तितकेच ऑनलाईन ट्रान्सफर व्यवहार करण्यात आहेत.ऑनलाईन व्यवहारांना घाबरू नका.त्यांच्याबद्दल वाईट मत करून घेऊ नका.फायदेही भरपूर आहेत.छोट्या व्यवहारांपासून चालू करा.आजूबाजूला लक्ष ठेवा.

बापरे!!चांगलंच मोठं प्रवचन झालं.पुढील अंकी पेटीएम,भीम,इ.ऑनलाईन वॉलेट्स बद्दल शिकूयात.

या धड्याचा होमवर्क:
=============
१. ऑनलाईन बँकिंग चे अकाउंट नसल्यास ते उघडा आणि ऑनलाईन बँकिंग चालू करा.
२. तुमच्या कुटुंबातील वेगळ्या बँकेत अकाउंट असलेल्या भरवश्याच्या व्यक्तीला किंवा मित्र मैत्रिणीला पेयी म्हणून ऍड करा आणि 10 रु IMPS आणि 10 रु NEFT ने पाठवा.
३. अमाझॉन किंवा कोणत्याही आवडत्या शॉपिंग साईट वर 99 रु खालची एक वस्तू ऑनलाईन पेमेंट करून खरेदी करा.

स्टे ट्युन्ड अँड हॅव अ हॅप्पी कॅशलेस लाईफ!!

अनुराधा कुलकर्णी

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle