नवनिर्मिती

वसंत ॠतू म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर येते ती निसर्गातील 'नवनिर्मिती'ची प्रक्रिया.

शिशिरातील गोठवणार्‍या थंडीमुळे पर्णहीन झालेले वॄक्ष हलके हलके उबदार होत जाणाया ,हव्या-हव्याशा वाटणार्‍या सूर्यकिरणांमुळे कोवळी, लुसलुशीत पालवी धारण करु लागले असतात. काही दिवसांतच त्यांच्या अंगा-खांद्यांवर हिरवीगार पाने, कळ्या, फुले फुलू लागतात आणि सर्वत्र रंग-गंधाची उधळण अनुभवायला मिळते. या निसर्गाच्या आविष़्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचा पक्ष्यांनी जणू चंगच बांधला असतो ! जिकडे जागा मिळेल तिथे त्यांची घरटे बांधायची घाई, जोडीला कोकिळ-कुजन म्हणजे विणीचा हंगाम सुरु झाल्याची नांदीच !

अशी ही नवनिर्मिती, चराचरात भरुन राहिलेली, आनंद, उत्साहाची उधळण करणारी ! आणि म्हणून सार्‍या सॄष्टीला हवीहवीशी वाटणारी !

पण खरंच सर्वांसाठी असेल का ही प्रक्रिया "आनंददायी" की कुण्या एकीच्या अंतरी दडवून ठेवलेली जखम या सॄजनाच्या काळातच भळभळून वाहू लागत असेल? केलाय का आपण कधी असा विचार?

हाच विचार मांडावासा वाटला या "सॄजनाच्या वाटा" उपक्रमांतर्गत. कुणालाही दुखावण्यासाठी केलेला हा शाब्दिक छळ नाही मैत्रिणींनो, तर एका जवळच्या मैत्रिणीने अनुभवलेले वास्तव, जे कायम घर करुन राहिलेय माझ्या मनात, त्याला मोकळी वाट करुन द्यावीशी वाटतेय आणि शक्य असल्यास त्यावर थोडे वैचारिक मंथन व्हावेसे वाटते या निमित्ताने.

अशा कितीतरी सख्या असतील ज्यांच्या वाट्याला हा आनंद काही कारणाने येऊ शकला नाही, अगदी आधुनिक विज्ञानाची मदत घेऊनसुद्धा. पण अशा स्वतः "आई" न होऊ शकलेल्या स्त्रियांनादेखील हा नवनिर्मितीचा आनंद उपभोगता यावा आणि समाजाने 'अनाथ' असा शिक्का मारलेल्या कैक चिमुकल्या जीवांना एक मायेचे, ऊबदार घरटे मिळावे अशी सोय समाजात, कायद्याने उपलब्ध असतानाही कितीतरी जणी तिचा लाभ घेऊ शकत नाहीत, हे बघून वाईट वाटते.

माझ्या मैत्रिणीची अशीच करुण कहणी. मेडिकल रिपोर्टसनुसार पती-पत्नी दोघांतही काहीच प्रॉब्लेम नसूनही गर्भधारणा होतच नव्हती. नवरा डॉ. त्यामुळे आय.व्ही. एफ. ची प्रक्रिया १-२ वेळा नाही तर तब्बल ८ वेळा करूनही यश आले नाही.मात्र तिच्या घरात कुणीही असा विचार केला नाही की या ट्रिटमेंटचा तिच्या शरीरावर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना? त्यापेक्षा वेळेवरच एखादे गोंडस बाळ दत्तक घेता आले असते. पण नाही, सगळ्यांना स्वतःचं बाळच हवं होतं.... हो स्वतःचं बाळच.... मग त्यासाठी आईला कितीही त्रास सहन करावा लागला तरी तिने तो करावाच हीच अपेक्षा नवर्‍यासकट सार्‍यांची. महत्वाचं म्हणजे तिने हे सारं निमुटपणे विनातक्रार सहन केलं, सुशिक्षित, कमावती असूनही, आणि पदरी पडलं फक्त नैराश्य, अवहेलना आणि हार्मोन्सच्या अति सेवनामुळे झालेला त्रास. ही घटना काही फार पूर्वीची वगैरे नाही, तर गेल्या वर्षापर्यंत हे सारं चालू होतं, मुंबईसारख्या शहरात राहणारे, स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे लोक नवर्‍याचं दुसरं लग्न पण लावायला तयार होते बाळासाठी हे ऐकलं आणि धस्स झालं मनात.....का हा एव्हढा अट्टाहास?

मान्य आहे मला की आई होणं ही खरच फार सुंदर गोष्ट आहे स्त्रीसाठी आणि जिच्या वाट्याला हे सुख येत नाही तिच्या मनाचीही कल्पना करु शकते. पण स्वतःचं बाळ असावं यासाठी माणूस स्वतःच्या पाशवी वृतीची परिसीमा गाठतो याचं खरंच वाईट वाटतं.

आणि स्वतःचं बाळ ही संकल्पनादेखील जोपर्यंत लेबर रूममध्ये डॉ. बाळाची नाळ कापत नाहीत तोपर्यंतच असते ना? त्यानंतर "आई आणि मुल" हे नातं फक्त आपल्या मानण्यावरच अवलंबून नसतं का? मग आपला समाज आज २१व्या शतकातही का नाही हे मोठ्या मनाने स्वीकारत?

अशी बरीच दांपत्ये आहेतही ज्यांनी वेळीच दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि सुखी झालेत. पण खरंच ही आकडेवारी आजही नगण्यच म्हणावी लागेल आपल्या देशात. सत्य तर हे आहे की आजही बाईला अनेकानेक लहान्-सहान गोष्टींसाठी झगडावं लागतंच.

इथे कुठेही मला मेडिकल सायन्सच्या विरोधात जायचे नाही किंवा त्या शास्त्राच्या त्रुटीही दाखवायच्या नाहीत. अनेकांना या शास्त्राचा फायदा झाला आहे हेही मी जाणते,पण अनेक जोडपी स्वतःच्या वयाचा, तब्येतीचा विचार न करता केवळ पैसा आहे म्हणून कित्येकदा हा प्रयोग स्वत:वर अनेकदा करुन घेतात, हे चुकीचे. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी एखाद्या बाईला असे मूल झालेही तरी ते सांभाळायची, वाढवायची ताकद तिच्यात व नवर्‍याच्यात असणार आहे का? हा साधा विचारही मनात येवू नये?

माझ्या मैत्रिणीनेही तिच्या वयाच्या पंचेचाळीशीत व नवर्‍याच्या जवळजवळ पन्नाशीत हताश होऊन व सर्व नातेवाईकांचा विरोध पत्करून गेल्यावर्षी एक वर्षाचे बाळ दत्तक घेतले. आता त्यांना हीच एकमेव काळजी आहे की हे बाळ मोठे होइपर्यंत आपण व्यवस्थित असू ना? हाच निर्णय १० वर्षांपूर्वी जरी घेतला असता तर गोष्टी वेगळ्या असत्या.

ही मानसिकता बदलायची गरज आहे, आता आपल्या पिढीतल्या बायका बर्‍याच सजग झाल्याही आहेत, पण त्यांना आधीच्या पिढीतल्या लोकांशी या बाबतीत झगडावे लागत आहे. कैक कुटुंबात एक मूल असूनही दुसरे हौस म्हणून दत्तक घेतल्याची समाजासमोर आदर्श ठेवणारी उदाहरणेही आहेत पण ती अगदी तुरळक. जास्त करुन हे असेच चित्र दिसून येते की दत्तक घेतलेल्या बाळाला आजी-आजोबांनी, काका- मामानी न स्वीकारणे, त्याच्याशी तुच्छपणे वागणे. स्वतः शिक्षकी पेशा असलेल्या बायका, ज्यांनी इतकी वर्षे विद्यार्थ्यांना समानतेचे धडे दिले त्या मूल असलेल्या व मूल नसलेल्या सूनेशी भेदभाव करताना दिसतात. तेव्हा असा विचार केला जात नाही की स्वतःच्या रक्तामांसाच्या मुलांनीही आई-वडीलांची त्यांच्या वॄद्धपणी आबाळ केल्याची उदाहरणे आहेतच तशीच जन्म न देताही प्राणप्रिय असलेली माय-लेकरांची जोडगोळीही आहेतच.

आपण या निमित्ताने एकत्र आलेल्या मैत्रीणींनी तरी हे बदलायला हातभार लावला पाहिजे, असे कुठेतरी वाटते. आपल्या अवतीभवतीच्या अशा मनोवृत्तीच्या स्त्रियांशी बोलून. स्त्रीच स्त्रीचा शत्रू असते असं म्हणतात. या अशा खुळचट कल्पना मनात वागवल्यामुळे हे घडते, जिचा नवरा नाही ती अपवित्र, जिला बाळ नाही ती त्याहून अपवित्र. या बुरसटलेल्या विचारांचे जोखड फेकून देऊया आणि अशा एखादीला आधार देऊया की "बाई गं तुझ्यात काही कमी नाही तर आमच्यापेक्षा काहीतरी अधिक असावे ज्यामुळे तुला ही संधी बहाल केली गेली आहे नवनिर्नितीचा हा असाही पैलू अजमावण्याची, जी सार्‍यांना नाही अजमावता येत, अशी सुसंधी तुला प्राप्त झाली आहे. त्यामुळे तूही हे सारं सकारात्मकतेनेच बघायला शिक".

असेही अगदी मनापासून वाटते की मूल हवं आहे की नको, हवं असेल तर केव्हा आणि ते शक्य नसल्यास इतर कोणत्या शक्यता विचारात घ्याव्यात या सार्‍या गोष्टींचा निर्णय वैवाहिक जीवनांत पती-पत्नी दोघांनी मिळूनच घ्यायचा असला, तरीही या बाबतीत करण्यात येणार्‍या शारिरीक उपाययोजना या स्त्रीच्याच शरीराशी मुख्यत्वे निगडीत असल्यामुळे तिच्या मताला झुकते माप देण्यात यावे, जे घडत नाही. तिची जर पूर्ण मानसिक तयारी असेल आय.व्ही.एफ किंवा सरोगसी साठी तर ठीकच, पण जर तिला नको असेल हे सारे किंवा तिला दत्तकही घ्यायचे नसेल तरी काय हरकत आहे? मूल असणे आणि ते सांभाळून वाढवणे हीच तिच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे तर नाही ना? एखादीला तिला आवडणारे असे दुसरे काही काम करण्यात स्वतःचे आयुष्य व्यतीत करायचे असेल तर तिच्या इच्छेला मान दिला जावा. व्यक्ती तितक्या प्रकृती या प्रमाणे जर एखादीला लग्नसंस्कार मान्य नसूनही मूल हवे असू शकते तसे लग्न झालेल्या बाईला नकोही असू शकते किंवा हवे असेल पण होणे शक्य नसेल तर तिची काही हरकत नसू शकते.

हे जे सृजन आहे, स्त्रीच्या अंतरीची उर्मी, तिची नैसर्गिक ताकद, जिच्यावर कुणाचाही दबाव असणार नाही की तिला कुणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार नाही असे स्वातंत्र्य जर आपल्या देशात स्त्रियांना मिळू शकले, हो पण हे स्वातंत्र्य आहे स्वैराचार नाही याची जाणीव ठेवून तिनेही सजगपणे, सभानपणे पावले उचलली तर तिच्यातून साकार होणारी नवनिर्मिती ही सार्‍या समाजाला एक खूप मोठी सकारात्मकता देऊन जाईल आणि या चाकोरीबद्ध समाजव्यवस्थेत झालेले ते खरेखुरे 'वसंतागमन' असेल.

medium_ba_0_0.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle