लोकल किस्से

इथे मनुष्यस्वभावाचे इतके नमुने बघायला मिळतात ना! ट्रेलिंग इमेल्स कशा असतात....आधीचा मजकुर नव्या इमेल सोबत लगडून आलेल्या तशा असतात इथल्या बायका. प्रत्येकी सोबत एक ट्रेलिंग इमेल असतो. प्रीव्यु मधे फ़क्त वरवरचा मेसेज तेव्हढा दिसतो इमेल मधला आणि ट्रेल्स वाचायला इमेल उघडून स्क्रोल करत जावं लागतं तसच असतं इथल्या बायकांचं. आपल्या समोर त्यांच्या स्वभावाचा दिसणारा ट्रेलर हा प्रत्यक्षात बऱ्याच ट्रेलिंग इमेल्सना दिला गेलेला रिप्लाय असतो. त्या रिप्लायचा अर्थ वाचायला जसं आधीचे इमेल्स स्क्रोल करुन वाचावे लागतात तसच स्वभावाचही. म्हणून माझी मैत्रिण म्हणते तसं मी स्वत:लाच कायम बजावते की इथे जज बनायची घाई करायची नाही, शक्यतो जज बनायचच नाही.

 

मी कॉलेज संपवून नोकरीला लागले तेव्हापासून जवळजवळ ८-१० वर्ष माझी एक डोंबिवलीहून सुटणारी ट्रेन ठरलेली होती. ट्रेनच नाही नुसती तर मोटरमनच्या मागच किचन कंपार्टमेन्ट आणि तिथला आमचा गृप हे ही ठरलेल होतं. या गृपने लग्नाआधीची मी, लग्न ठरल्यावर ट्रेनमधे बॅग टाकून ट्रेन सुटायची वेळ होईपर्यंत होणाऱ्या नवऱ्यासोबत प्लॅटफ़ॉर्मवर उभं राहून हळू आवाजात गप्पा मारणारी मी, लग्न झाल्यावरची नवी नवरी ते लेकीच्या शाळा प्रवेशापर्यंतच्या प्रवासात अधीकाधीक मॅच्युअर होत गेलेली मी जवळून बघीतलेय.

 

ही आमची ट्रेन सेमीफ़ास्ट होती, मुलुंड पर्यंत स्लो आणि पुढे फ़ास्ट. तर आमच्या ट्रेनला मुलूंडहून एक बाई चढायची. तेव्हा मी २३-२४ ची आणि ती होती ३०+. माझं लग्न ठरलं  होतं आणि त्यामुळे तेव्हा मी आमच्या गृपमधे गिऱ्हाईक होते. भरपूर थट्‌टा मस्करी चालायची. मी तेव्हा अगदी लाजून लाल बील व्हायचे. अगदी माझ्याच दुनियेत असल्याने गृपच्या या मस्करीत,कौतुकात रमायला आवडायचं मला. तेव्हा ही बाई माझ्या तशी गावीही नव्हती. ही रोज यायची, आमच्या इथे उभं रहायची. आम्ही आलटून पालटून सीट शेअर करायचो ,इतरांनाही बसायला द्यायचो थोडाथोडावेळ तसच कधीतरी हिलाही द्यायचो. एकीकडे आमची भंकस मस्करी चालूच असायची. इतरांना या मस्करीचा मानसीक त्रास होत असेल अशी कल्पनाही नव्हती आली कधी डोक्यात माझ्या.

 

ही बाई बऱ्यापैकी भांडकुदळ म्हणुन फ़ेमस होती ट्रेनमधे. असेना का? आमचा तिचा डायरेक्ट संबंध येत नव्हता तोपर्यंत आम्ही त्याची दखलही घेतली नव्हती. एकदिवस तिचं आमच्या गृपमधल्या सोनालीशी वाजलं (*नाव बदललं आहे) वाजलं तेव्हा ते जुजबी होतं. होता होता शब्दाशब्दी होत प्रकरण हातापाईवर आलं. मी आणि अजून एका वहिनींनी दोघींच्या मधे पडून दोघींना बाजुला केलं आणि शांत केलं. आमच्या मते मॅटर क्लोज झालं. अशी भांडणं ट्रेनमधे अधूनमधून होतच असतात. पण ते तितक्यावर थांबलं नाही दुर्दैवाने. त्या मुलूंडवाल्या बाईने दुसऱ्यादिवशी महीला पोलीसांना बोलवून आणलं आणि माझ्या त्या मैत्रिणीची रितसर तक्रार केली. आणि त्याहून मजा म्हणजे मैत्रिणीसोबत माझी आणि त्या वहिनींचीही तक्रार केली की यांनी मला मारलं. गाडीतल्या इतर सगळ्या बायकांनी त्या महीला पोलिसांना सांगितलं की या दोघींचा काहीच संबंध नाही. या कुणाशीही वाद घालत नाहीत कधीच. पण तरी त्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने तक्रारीत नाव दिलेल्या सगळ्यांना नाईलाजाने दादरच्या रेल्वे पोलीस कार्यालयात यावच लागेल. आमची वरात दादरला उतरुन पोलीस ठाण्यात गेली. नशीब आमचं, बेड्या घालून अथवा ते रस्सी बांधून नेतात तसं नाही नेलं आम्हाला. त्यावेळी मोबाईलचा जमाना नव्हता. जामिनाची रक्कम होती ५००/- ती द्या आणि जा असं सांगण्यात आलं आम्हाला. पण तितकी रक्कम माझ्याकडे नव्हतीच. घरी फ़ोन नव्हता त्यावेळी. शेजाऱ्यांना फ़ोन करुन असा निरोप घरी द्यायचा तरी पंचाईत. बरं! निरोप देऊन येणार कोण घरून? आणि केव्हा येणार? बाबा शाळेत गेलेले. माझा नुकताच साखरपुडा झालेला. तेव्हा माझा होणारा नवरा वरळीला कामाला होता आणि त्यादिवशीच नेमका लवकर जायचं असल्याने माझ्या गाडीला नव्हता. पण तो ऑफ़िसमधे पोहोचला असणार हे स्ट्राईक झालं. मी त्यालाच फोन करुन बोलवायचं ठरवलं. याबद्दल नंतर माझ्या आईने मला मुर्खात काढलं होतं. आईनेच काय पण त्या वहिनीही मला तेव्हा म्हणत होत्या की त्या त्यांच्या कोणा मैत्रिणीला बोलवून सोय करतील सध्या दोघींची पण होणाऱ्या नवऱ्याला नको फोन लावूस. एकतर कांदेपोहे लग्नं. त्यात होणारी बायको जामिन द्यायला बोलावतेय म्हणजे काय ग्रह होतील माझ्याबद्दल? आणि लग्न मोडेल की काय यावरुन? अशी त्यांना भीति होती. रास्त असेलही ती भीति पण माझं इन्ट्युशन सांगत होतं की मी त्याच्यावरच विश्वास ठेवू शकतेय आणि तो लगेच येईलच. त्यावेळी मला फक्त त्याचीच आठवण आली. तो ही आला, जामिन सोपस्कार झाले. बाहेर पडल्यावर आधी हॉटेलमधे जाऊन नाश्ता केला. मग त्याने विचारलं "नक्की काय झालं?" त्यावर मग परत एकच प्रश्न "हे घरी सांगायचं की इथेच सोडायचं?" माझ्यात राजा हरिश्चंद्र संचारतो अशावेळी तसा तो यावेळीही संचारला. "म्हंटल टु द फ़ॅक्ट स्वरुपात सांगू दोन्हीकडे...दोन्हीकडे म्हणजे माझ्या माहेरी आणि त्याच्या माहेरी". पुढे विषय समाप्त. पुढचा दिवस उंडारण्यात गेला.

 

दुसऱ्यादिवशी ट्रेनला गेले. ती बाई परत मुलूंडला चढली. आमच्याच इथे येऊन उभी राहीली आणि मला म्हणाली "काय मग फ़ार उडत होतीस ना लग्न ठरलं लग्न ठरलं म्हणून? मुद्दाम तुझं नाव दिलं. बघू कसं लग्न टिकतं ते आता?"

 

वयाची ३०+ सरली तरी तिचं लग्न ठरत नव्हतं. त्या मानसिक , सामाजिक ताणाचं ट्रेलिंग मेल सोबत घेऊन ती येत होती. आमचे हास्यविनोद, माझी लग्न ठरल्यावरुन होणारी चेष्टामस्करी तिच्या दुखऱ्या नसेवर टोचायला कारणीभूत ठरत होती. त्याच्या उद्रेकाला निमित्त झालं सोनाली आणि तिच्यातलं भांडण. त्यानिमित्ताने एक चांगली गोष्टही घडली. माझा होणारा नवरा काय वाट्‌टेल ती परिस्थिती आली तरी माझी साथ सोडणार नाही याची लिटमस टेस्टच झाली. या एका गोष्टीकरता मी तिची चूक मनोमन माफ करुन टाकली.

 

या बाईशी जिचं भांडण झालं होतं त्या सोनालीचीही एक वेगळीच कहाणी होती. माझ्याच शाळेतली ही सोनाली माझ्यापेक्षा बरीच मोठी होती. ती ही ३० च्या आसपासची होती. शिक्षण बेताचं कारण तितकी आवड नव्हती, गती नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. त्यावेळची परिस्थिती अशी होती की ती घरचा कर्ता होती. दात पुढे, सावळी, केस विरळ, बांधा आडवा आणि उंची बुटक्यात जमा अशी ती  सोकॉल्ड मॅरेज मटेरिअल कॅटेगरीमधे मोडत नसल्याने लग्नाच वय उलटलं तरी लग्न जमत नव्हतं. (हे वय उलटणं वगैरे त्याकाळात तिला, घरच्यांना आणि दारच्यांनाही सतत वाटायचं). मनाला जसा संसार थाटावा वाटायचा तसा तो शरिरालाही वाटत असणारच ना? त्यात आम्ही तिच्याहून लहान अशा २-३ जणी आपापल्या पारव्यांसोबत गुटुर्गु करताना बघायचं म्हणजे एकप्रकारे शिक्षाच की तिच्या मनाला.

 

अधून मधून ती एका पुरुषासोबत फिरताना हिला, तिला दिसायला लागली. कुजबुज वाढायला लागली. ज्याच्यासोबत फ़िरायची तो लग्न झालेला थोराड वयाचा होता. त्याला मोठ्या वयाची दोन मुलेही होती आणि त्याची बायको हयातही होती आणि तिला तो सोडणारही, ही माहितीही कर्णोपकर्णी होत आमच्यासमोर आली. ज्याचं त्याचं आयुष्य असं म्हंटलं तरी या प्रवासाला चांगला एन्ड नाही हे जाणवून वाईट वाटायचं. मग कालांतराने त्यातून तिची ती बाहेर पडली. एकदिवस आम्हाला गाडीत लग्न ठरल्याचे पेढे वाटले. होणाऱ्या नवऱ्याचा फोटो दाखवला आणि आमच्याकडून होणाऱ्या चेष्टा मस्करीत ती ही हरवून गेली. सहज माझी कॉलेजमधली एक मैत्रिण संध्याकाळी ट्रेनमधे भेटली. तिचं माहेर आणि हिचं घर समोरासमोर. आपसुक तिचा विषय निघाला. म्हंटलं बरं झालं नाही तिचं. फ़ार खुष असते आजकाल. दुसऱ्यादिवशी तिचा फोन आला, "अगं मी काल आईचा फोन आला होता तेव्हा सोनाली बद्दल बोलले. आई तिच्या आईचं अभिनंदन करायला गेली होती. पण कळलं की तिचं लग्न ठरलेलच नाहीये. ती तुम्हाला खोटं सांगतेय"

 

त्यानंतरही सोनाली रोज भेटायची. रोज तिच्या लग्नाच्या तयारीबद्दल बोलायची. "आज तो हे म्हणाला, आज त्याने भेटायला बोलावलय, आज त्याची आई आलेली, माझ्यावर खुष होती" असं काहीबाही सांगायची. तिचा हा प्रवास आधीच्या त्या प्रवासापेक्षाही अंगावर काटा आणायचा. तिला या स्वत: रचलेल्या जगातून बाहेर आणायचं का? आणायचं तर कसं? असा प्रश्न पडायचा. शेवटी एक दिवस तिनेच सांगितलं की हे लग्न मोडलं. त्याला अपघात झाला आणि असच बरच काही. बरेच दिवस पुन्हा हा विषय निघाला नाही.

 

मधल्याकाळात मला दुसरा जॉब मिळाला, माझ्या जाण्यायेण्याची वेळ बदलली आणि माझी ती गाडी सुटली. कधीतरी कानावर आलं तिचं लग्न झालं. मैत्रिणीची आई लग्नाला गेली होती म्हणजे यावेळी तरी खरच झालं. तिथेही काही फ़ार बरं चाललं नव्हतं असं कळलं. मुद्दाम चौकशी केली नाही तिची तरी कानावर यायचच कुठून ना कुठून. आणि यायचं ते अगदीच वाईट साईट यायचं. मतितार्थ एकच असायचा सांगणाऱ्यांचा की "ती वाया गेली" एक दिवस कोणा मित्रासोबत बाईक वरुन जात होती. बाईकचे ब्रेक फ़ेल झाले आणि तिच्या आयुष्याच्या प्रवासालाच ब्रेक लागला. संपली तिची कहाणी. चार दिवसाची चुटपूट, एक फ़ोटो एक हार १३ दिवस, एक वर्षश्राध्दं. बस संपली तिची कहाणी.

या दोघींनीही जाणीव करुन दिली...माणुस समोर दिसतो त्याच्या आगेमागे बऱ्याच ट्रेलिंग इमेल्सच लटांबर तो सोबत घेऊन हिंडत असतो. आपल्याला फ़क्त वरवरच वागणं दिसतं. ट्रेलिंग मेल सारखं त्या वागण्याचा माग घ्यायला स्क्रोल करत करतच जावं लागतं.

 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle