फॅमिली क्रॉनिकल्स ७ : खरेदी आख्यान

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
------------------------------------------------------------------------------------------------

आता खरेदी या विषयावर मी लिहीणं-बोलणं म्हणजे डोनूदादांनी स्त्री-पुरुष समानता, स्त्रीयांविषयी आदर, पर्यावरण-रक्षण वगैरे विषयांवर बोलण्यासारखं आहे. माझ्या मुलखाच्या आळशीपणात, काहीही करण्यात येणारा कंटाळा यात अगदी खरेदीचाही समावेश होतो. मागे कधीतरी मी खरेदी करण्याबाब्त लिहीलं असलं तरी सांगून टाकते आता - सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि अस्मादिकांची फार तर २ दुकानांपर्यंत!

म्हणजे मला theoretically खरेदी करायला फार आवडते हं. कोणी काही नविन मस्त खरेदी केलेली बघितली, कुठे आपलया त्या फेबुवरचे फोटो- बिटो बघितले की मलापण नशा चढते, आपण पण खरेदी करुया! मग आजू-बाजूच्या, फेसबुकावरच्या बायका कसे नवर्‍याबरोबर खरेदीला गेल्याच्या पोस्टी टाकतात, कसे बाई आम्ही रोमँटिक म्हणून - त्याला स्मरून मी घरी आदेश काढते - या रविवारी तू आणि मी खरेदीला जायचंय - कध्धी कध्धी म्हणून तू माझ्या बरोबर खरेदीला येत नाहीस. बाकीचे नवरे बघ कसे त्यांच्या बायकांबरोबर मस्त खरेदीला जातात. आमच्या मेल्या नशिबी हे काही नाही. हा माझा भडिमार नवरा शांतपणे ऐकून घेतो. मला माझा त्रैमासिक अ‍ॅटॅक आलाय याची त्याला मनोमन खात्री असते. मग नेहेमीप्रमाणे तो आपला - अगं जाऊ की. या रविवारी जाऊ - असं बिनदिक्कत कबूल करतो. त्याला पूर्ण खात्री असते, एक वेळ तो खरेदीत उत्साह दाखवेल पण मी!

ते इतरांचे फेसबुकिय फोटो बघून मी तावातावाने निघते खरी बाहेर. पण काय घ्यावं हेच कळत नसते. कपडे म्हणावं तर ढीगाने घरात पडलेले - माझ्या चंद्रासारख्या कलेकलेने बदलणार्‍या तनुला, सर्व कलांना साजेसे असे असंख्य साईझ मधले अनंत कपडे कपाटात ओसंडून वहात असतात. पण सहज सोप्पं म्हणून त्या दुकांनांकडे पाय, म्हणजे गाडीची चाकं वळतात. आता कपडे घ्यायचं म्हणजे त्यांची ट्रायल घेणं आलं. तिथे घोडं पेंड खातं. आधी आवडेल असं काही शोधा. त्याच्या विविध साईझा ट्रायल करायला घेऊन जा. मग ती ट्रायल रूमच्या बाहेर बसलेली सुंदरी उगाच दमदाटी करून - फक्त ५ कपडे आत नेता येईल असं काहीतरी सांगते. आत नेलेले ५ - त्यांचं आणि माझं अर्थातच जमत नाही - परत आपला मूळ कपडा चढवा, बाहेर या - दुसरे पाच आत न्या... इथपर्यंत माझ्यातला पेशन्स संपतो. चला-चला इथे काही नाही, हे दुकान जरा बोअरच आहे. असं काहीसं बडबडत मी बाहेर पडते. नवरा आपला माझ्यामागे - अगं, आत्ताशी तर एक सेक्शन बघितलास, अजून कित्येक आहेत, बघ हवे तर...नंतर मग म्हणशील मी थांबत पण नाही - असं काहीसं बोलत - मागे मागे धावत येतो.

ते काही नाही..हे दुकान बोअरच आहे. चल आपण जरा स्टारबक्सात जाऊन मस्त कॉफी घेऊ, किंवा ते दोन टोळभैरव नाही आहेत बरोबर तर दोघंच जरा मस्त लंच घेऊ कुठेतरी! आमची गाडी - खाणं - या मूळपदावर येते. मग कुठेतरी मस्त हाणून, वर परत स्टारबक्सात कॉफी ढोसून आम्ही घरी! कशाला नवरा नाही म्हणेल या अश्या खरेदीला सोबत करायला! ही अशी माझी खरेदी! मुलखाचा कंटाळा खरेदीचा.

बरं कपडे सोडले तर पर्सेस, चपला या कधी-मधी उत्साहात मी घेतल्या जरी असतील तरी एकच एक पर्स आणि चप्पल वापरत रहाणे हा माझा खाक्या आहे. पुल म्हणतात तसं - मळखाऊ आणि टिकाऊ - हे धोरण जारी ठेऊन - इतर दहा नाजूक-साजूक पर्सेस आणि चपला सोडून मी आपली माझ्या व्यक्तीमत्वाला शोभेलश्या मळखाऊ आणि टिकाऊ वस्तू घेऊन फिरते. त्यामुळे ते ही राहिलं.
नाही म्हणता, घरातल्या वस्तू घेण्यात मला बरीक उत्साह आहे. पण त्यादेखील तंगडतोड न करता. ते हल्ली अमेझॉननी एक बरं केलं आहे. बेडवर पार्श्वभाग चिकटवून बसल्या बसल्या हवे ते मागवून मोकळं होता येतं. अमेझॉनची निम्मी उलाढाल ही माझ्यामुळे होत असल्याची एक बारीक शंका आहे मला!

तर अशी मी एका खरेदीला मात्र उत्साहात असते - ग्रोसरी शॉपिंग! आधीच खाणे म्हणजे अती जिव्हाळ्याचा विषय...मग त्याकरीता तसं जातीनं शॉपिंग नको करायला? त्यामुळे त्या खरेदीला मी अगदी आवर्जून तयार असते. मग दुकानात जाणे, कित्येक काळ उगीच खाण्याच्या वस्तू न्हाहाळत बसणे आणि मग अर्थातच नको असलेल्या कित्येक घरी घेउन येणे....हे आलंच!
आता खादाडी शॉपिंग – म्हणजे ग्रोसरी शॉपिंग मध्ये सगळ्यात वरती नंबर लागतो तो कॉस्टकोचा! शॉपिंग मध्ये शॉपिंग - ग्रोसरी शॉपिंग, पण कॉस्टको म्हणजे नो मोज मापिंग!!!

दर वेळी ठरवून एक यादी बनवून घेऊन आम्ही आत शिरतो. अगदी पण करून की या यादी बाहेरची एकाही गोष्ट घ्यायची नाही. पण एकदा का कॉस्टकोच्या जादुई गुहेत शिरलं की आत जे काही गुंतून जायला होतं की बस्स! मग मात्र अनेक गोष्टींची गरज एकाएकी निर्माण होते. फळं, नटस, salads दिसले की आता कसे आपण हेल्थी खाणार आहोत, याची आठवण होते. मग ४-५ निरनिराळ्या फळांचे, नटसचे वगैरे (अर्थातच कॉस्टको साईझ) बॉक्सेस कार्टात जाउन बसतात. फिश/ चिकन/ मीट तर विचारही करायची गोष्ट नाही. त्यांची मोठाली पाकिटं कार्टवर आरूढ होतात. (मी दोन गोष्टीची फार ऋणी वगैरे आहे. म्हणजे त्या
जगनियंत्याने मला जन्माला घालण्याआधी, कॉफी व कोंबडी या दोन गोष्टी बनवल्यात हे फार छान केलंय.) मग salad ड्रेसिंग/ कुठलेसे डीप्स वगैरे बाजूच्या गोष्टी घेणं आलंच. त्यांचा प्रचंड आकार, एक नाही तर २-२ बाटल्या यांचं दडपण तेव्हा येत नाही.

दुकानात टेस्टीग counters नामक भूलभुल्लैये लावलेले असतात. तिथे ती लोकं नेमकी काय करतात, कोणास ठाउक पण वाट्टेल तो पदार्थ तिथे चांगला लागतो आणि मग त्याची भव्य-दिव्य पाकिटं आमच्या cart मध्ये विराजमान होतात. एवढंच नव्हे तर घरातल्या प्रत्येक माणसाला आपली नाविन्याची हौस भागवायची लहर ही कॉस्टकोतच येते. कुठलातरी, धड नावही वाचता येणार नाही असा पदार्थ फ्रोजन नाहीतर ताज्या बनवलेल्या पदार्थांच्या रांगेतून उचलायचा. नको म्हटलं की, “तूच तर नेहेमी - नविन पदार्थ नको म्हणण्याआधी चाखून बघावा - असं सांगत असतेस ना, मग आता घेतलाच नाही तर कसा चाखणार?” असं तोडीस तोड उत्तरही तयार असतं. मग अश्या नाविन्यपूर्ण, न चाखता घेतलेल्या पदार्थांचा कार्ट मध्ये शिरकाव होतो.

एव्हाना बाकीचे tempting पदार्थ दिसू लागलेले असतात. कप केक्स, Croissant, चिप्स यासारखे पदार्थ दिसले की आपणच काही वेळापूर्वी हेल्थी खायचं ठरवून असंख्य फळ-फाळवळ आणि salads घेतली आहेत, याचा विसर पडतो. चूक आमची नसते. हा सर्व कॉस्टकोचा महिमा असतो. ज्या कार्टवर खाली ह्या हेल्थी वस्तू असतात त्यातच वर हा सगळा माल स्थानपन्न होतो.

ब्रेड, अंडी, चीज हे तर रोजचे आवश्यक पदार्थ. सर्व प्रकारचे चीज न्याहाळण्यात कित्येक काळ जातो. मग त्यातले काही जुने-नवे चीजचे प्रकार जाउन बसतात कार्ट मध्ये.

नशिबाने भाज्या वगैरे गोष्टी आम्ही कॉस्टकोतून घेत नाही. एवढ्या प्रचंड भाज्यांना घरी उठावच नसतो. बाल-थोर समस्त मंडळीनी भाज्या ऑप्शनला टाकलेल्या आहेत. आमचं तर मत आहे, लोकं घरी भाज्या वगैरे पिकवतात ना, तसं आपण कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन करूया झालं. तेच आपल्याकरीता योग्य आहे. असो.

तर कार्ट अर्थातच ओथंबून वहात असते. हे सगळं आमच्याचकडे घडतं का? एकदा एका मैत्रिणीबरोबर कॉस्टकोला गेले तर त्या पठ्ठीने बरोबर लिस्ट प्रमाणे माल घेऊन पाऊण तासात बाई बाहेर पडायला तयार होती. कार्टच्या तळाशी गोष्टी! बघून सुद्धा भरून आलं मला. तिच्या बिलाचा तो चिटोरा, आमचा लांबलचक रोल!! मग मी माझी समजूत घातली – ते व्हेजिटेरियन आहेत, कशाला एवढ्या गोष्टी होतील, त्यात आपल्याकडे वाढत्या वयाची मुलं! हे मनोमन म्हणत बाहेर येत्ये तर दाराशी दुसरी मैत्रीण, आता येत होती! अगं, काय घेऊन चाललीस एवढ.. आमच्याकरिता काही ठेवलंयस की नाही दुकानात!! झालं!! आता खाणं हा आमचा थोडासा वीक पॉईंट आहे, तो असा चार चौघात जगजाहीर करावा? आजूबाजूच्यांना मराठी येत नसलं तरी अविर्भाव वगैरे समजतातच ना? वर आणखी माझ्या हातात असलेल्या बिलाच्या रोल मध्ये डोकावून डोळेही फिरवून दाखवले!

मग घरी आल्यावर काय होतं कोण जाणे. या कॉस्टकोच्या फळांना ना धड चव पण नाही असा शोध लागतो. छोटी-मोठी समस्त मंडळी कप केक्स, चिप्स वगैरे गोष्टी - थोड्याच खातो-थोड्याच खातो, करत पुढले ४ दिवस हात मारत रहातात आणि संपवतात.. दर वेळी ते खाताना बाकीची salads वगैरे पण आपण खाल्ली पाहिजेत यावर सर्वांचं एकमत होतं. कुक्कुट, मत्स्य मंडळीना यथास्थित सदगती मिळतेच. नटस ची पोती पण भरपेट जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून तोंडात टाकायला उपयोगी येतात.

पण सॅलडस, फळं यासारखे प्रकार मात्र केविलवाणे पणे फ्रीजात पडून रहातात. मग ती फळं संपवायला अतिरिक्त खरेदी करून दूध आणायचे – त्यांचं फ्रूट सॅलड बनवायचं आणि त्यानिमित्ताने अतिरिक्त साखर पोटात ठोसायाची, हे आलंच मागून! सॅलडसची पानं सॅलड म्हणून न खाता शेवटी आमटीत नाहीतर पराठे करून त्यात ढकलून कशीबशी संपवा – त्याकरीता मस्त तुपात भाजलेले आलू पराठे बनवा आणि ४ बटाट्यांमागे ४ पानं खपवा असले साईड उद्योग करायाचे !! चालायचंच....

तिथल्या tasting counters वर taste करून, आवडल्याची खात्री करून आणलेले पदार्थ पैसे मोजून घरी आणल्यावर चव का बदलतात काही कळत नाही. न चाखता आणलेल्या पदार्थ ची परीस्थिती अर्थातच लक्षात आलीच असेल. मग आम्ही नेल्सन आणि तत्सम काही जिवांचे भले करून सोडतो.

“महत्वाच्या” सगळ्या गोष्टी संपल्या की आम्ही तयार पुढच्या ग्रोसरीला, यादी करून आणि यावेळी नक्की यादीनुसार सामान आणायचं असं ठरवून!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle