चित्रपट : अचाट आणि अतर्क्य

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

चित्रपट : अचाट आणि अतर्क्य

चित्रपट - गंगा जमुना सरस्वती.

मोठ्ठं पटांगण. त्यात टकला अमरीश पुरी जोधपूर किंवा तत्सम पद्धतीची पँट, वरती चमचम करणारा चांदीच्या रंगाचा बंद गळ्याचा डगला, दागिने, आणि पायात गुडघ्यापर्यंत येणारे बूट घालून उभा. त्याने मीनाक्षी शेषाद्रीला पकडून ठेवलेले.

खांद्यावर जिवंत मगर बांधून घेऊन अमिताभ प्रवेश करतो. त्या मगरीला पटांगणात एका कडेला सोडतो. मगर एका विशिष्ट अंतरापलिकडे येऊ शकत नाही. (अमिताभने लक्ष्मणरेषा आखली असावी.) आता अमरीश पुरीला तो मारामारी करायचे आव्हान देतो. त्याच्याबरोबर काय काय हिशोब चुकते करायचे आहेत, त्याची उजळणी करतो. अमिताभ उर्फ गंगाच्या वडलांना अमरीश पुरीने त्याच मगरीच्या तोंडी दिलेले असते. (मगरींची आयुर्मर्यादा काय हो? आणि नेमकी हीच ती मगर हे कसे कळले? बहुधा मगर डाएट डायरी लिहीत असावी. दि. २५-जानेवारी-१९६०: अपचन. गंगाच्या वडलांना खाल्ले.)

आता रीतीप्रमाणे जबर हाणामारी सुरू होते. सुरुवातीला अमिताभ मार खातो, अमरीश हसतो. मग आईने 'उठ गंगे, मार इसको.' असा पटांगणाजवळच्या हवेलीच्या सहाव्या मजल्यावरून आरडाओरडा केल्यावर (म्हातारी असली तरी आवाज खणखणीत, फुफ्फुसं मजबूत!) अमिताभ उठून त्याला मारतो. मग त्याच्या छाताडावर बसून म्हणतो, याद है इसी जगह तुमने मेरा एक दूध का दांत तोडा था, और तभी मैने कहा था की एक दिन यहींपे मै तुम्हारी बत्तिसी तोड दूंगा. आसपास प्रेक्षकही असतात! ते मारामारी थांबवायच्या, पोलिसांना बोलवायच्या, नायकाला मदत करायच्या, इ. कसल्याच भानगडीत पडत नाहीत. ते केवळ गंगाच्या नावाने जयघोष करतात. मग अमिताभ एका ठोशासरशी अमरीशची बत्तिशी उखडून टाकतो.

...एकदमच मारामारी थांबते. तिथे मीनाक्षी शेषाद्री आणि जयाप्रदा अशा दोन दोन नायिका पळत पळत येतात. नायक एक, नायिका दोन आणि मगरीचा पाठीवरून वाहून आणूनही योग्य तो उपयोग झालेला नाही. इसका मतलब 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' खलनायकाचा अजून पुरता बंदोबस्त झालेला नाही. दोनच मिनिटांत खलनायक उठतो आणि बंदुकीतून अमिताभवर गोळी झाडतो. जयाप्रदा मध्ये येते (कारण तिचे सिनेमातले नाव सरस्वती. गंगा+जमुना संगम होताना सरस्वती लुप्त होते म्हणे!) आणि गंगाजमुना संगमाचा मार्ग मोकळा करून देते. मग मगरही आपलं काम चोख करते. (पुन्हा मगरीच्या डायरीतली नवी नोंद - 'पुन्हा अपचन. आज अमरीश पुरीला खाल्ले. गेल्या वेळचा अनुभव पाहता ही चूकच झाली.' अशी असेल काय?)

***

लहान असताना मला टीव्ही पहायची अजिबात आवड नव्हती आणि सिनेमे तर मी चुकूनही पाहत नसे, अशा सुरस आणि चमत्कारिक दंतकथा माझी आई अधूनमधून सांगते. आईला आठवणारी मुलगी दुसरीच कुणीतरी असावी, अशी माझी पक्की खात्री आहे. कारण मला (टीव्हीसमोर!) बसता येऊ लागलं तेव्हापासून मी टीव्हीवर आणि थेटरातल्या खुर्चीच्या एका हातावर तोल सांभाळत बसता येऊ लागलं तेव्हापासून थेटरात (खुर्चीच्या हातावर का? तर उंची कमी असली की समोरच्या पडद्यावरचा सिनेमा दिसत नै ना राव!) सिनेमे पाहतेय, असं मला नक्की माहीत आहे. फक्त दूरदर्शन असण्याच्या काळात रोजचा टीव्ही पाहण्याचा नेम चुकू नये म्हणून मी काही नाही तर आमची माती आमची माणसं, आपण यांना पाहिलंत का?, वगैरेही भक्तिभावाने बघत असे. आजकाल तर प्रॉब्लेमच नसतो. इतरत्र कुठेही बघण्यासारखं काहीही नसलं तर महुआ टीव्ही लावावा, तिथे गंगा जैसन माई हमार, सच भईल सपनवा हमार, बंबई की लैला छपरा के छैला, ऐ भौजी के सिस्टर, भोजपुरी दरोगा अशांसारखा एकतरी चित्रपट चालू असतो. मनोरंजनाची फुल ग्यारंटी! 'देवदास'सुद्धा भोजपुरीत रिमेक होऊन आला आहे. आहात कुठे? (म्हणजे आहात ना? हे वाचून पळून तर नाही ना गेलात?) तर ते असो. आपण आपले हिंदी आणि मराठी चित्रपटांवरच तूर्तास लक्ष केंद्रित करू.

चित्रपट कुठलाही असो, कथा कसलीही असो, अर्धा संपलेला असो वा नुकताच सुरू झालेला असो, दिसेल तो चित्रपट सारख्याच आत्मीयतेने पाहायचा, हे तत्त्व मी कायम पाळते. तसंच, एका चित्रपटाची आस असताना दुसराच चित्रपट पुढ्यात आला तरी त्याबद्दल वाईट वाटून घेत नाही. 'आशिकी' तुफान चालत होता त्या काळातली गोष्ट! कॉलनीतली मोठी ताईगँग 'आशिकी' बघून आली होती व त्यावर सदोदित चर्चा करत होती. साहजिकच आपण तो पाहायलाच हवा, असं माझ्या मनाने घेतलं. अजून एक ताईकंपू मला न नेताच आशिकी बघून आला, त्याबद्दल त्यांच्याशी भांडूनही झालं. शेवटी कुणीच नेईना तेव्हा बाबांनाच साकडं घातलं 'आशिकी पाहायचाय' म्हणून! (माझ्या बाबांइतका शूर आणि उदार माणूस शोधून सापडणार नाही. मला पाहायचेच होते म्हणून त्यांनीही सौदागर (इलूइलूवाला!), गुप्त, राम लखन, किंग अंकल वगैरे अनेक चित्रपट धीरोद्दात्तपणे पाहिले आहेत. खेरीज माझ्या एका वाढदिवसाला मला मैत्रिणींना थेटरात सिनेमा दाखवायचाच होता म्हणून 'रूप की रानी, चोरों का राजा'साठी पैसेसुद्धा दिले आहेत.) तर एका संध्याकाळी मी, बाबा आणि माझा लहान भाऊ आशिकीला गेलो. तिकिटं काढून बाल्कनीतल्या आमच्या जागांवर स्थानापन्न झालो. आधीच्या जाहिराती संपल्या नि पडद्यावर एकदम सचिन (पिळगावकर) अवतरला. "हा आशिकीत कसा?" या माझ्या प्रश्नाला बाबांनी 'गेस्ट अपिअरन्स असेल' असं उत्तर दिलं. कसला काय गेस्ट अपिअरन्स? त्यावेळेला आशिकीऐवजी 'आमच्यासारखे आम्हीच'चा शो होता म्हणे! तिकिटांचे पैसे काही परत मिळाले नसते (खेरीज दोन्ही चित्रपटांची नावं 'आ' या अक्षरावरूनच सुरू होणं हे केवढं मोठं साम्य!) त्यामुळे आम्ही मधून उठून न जाता तो सिनेमा पूर्ण पाहिला आणि शांतपणे घरी गेलो. (आशिकी पुढे व्हिडिओ कॅसेट व व्हीसीआर आणून पाहण्यात आला.)

केबल टीव्हीचं युग सुरू झालं आणि केबल चॅनलावर केबलवाल्याने नवनवीन चित्रपट लावणे, ही अतिशय थोर परंपरा भारतात सुरू झाली. जान तेरे नाम, प्यार का साया, खिलाडी, वक्त हमारा है, गुमराह (संजय दत्त-श्रीदेवी. या सिनेम्याची एक वेगळीच कथा आहे. केबलवाल्याकडच्या कॅसेटीवर बहुधा काहीतरी घोळ झाला असावा. अचानक भलत्याच सिनेम्यांतली गाणी त्यात अधूनमधून मोठ्याने वाजत होती. हा सिनेमा क्राईम थ्रिलर होता म्हणे! अधूनमधून संवादच ऐकू न आल्याने माझ्यालेखी तर हे थ्रिल फारच वाढलं होतं.), बोल राधा बोल, किशन कन्हैया, बाजीगर अशा अनेक सुंदर चित्रपटांचा त्यामुळे आस्वाद घेता आला. पुढे चोवीस तास चालणार्‍या चित्रपट वाहिन्या सुरू झाल्यावर तर जुन्या सिनेम्यांचीही लयलूट झाली. वर लिहिलाय तो 'गंगा जमुना सरस्वती' हा त्यातलाच एक मानबिंदू!

त्यातल्या मगरीवरून आठवलं, हिंदी सिनेमे आणि त्यात दाखवलेल्या पशुपक्ष्यांचं वागणं हा एका महाग्रंथाचा विषय आहे. अमिताभ बच्चनच्या 'मर्द' चित्रपटात एक विलक्षण प्रसंग आहे. गुंड मागे लागलेल्या निरुपा रॉयचं रक्षण एक वाघ करतो आणि तिला सुखरूप नावेत बसवून देतो. निरुपा रॉय कृतज्ञतेने वाघाला नमस्कार करते आणि.. वाघही पुढले दोन पंजे जोडून तिला प्रतिनमस्कार करतो! 'तेरी मेहरबानियां' चित्रपटात नायक-नायिका खलनायकांआधीच मरतात, तर त्यांचा कुत्रा शेरू हा व्यवस्थित योजना आखून एकामागोमाग एक खलनायकांना यमसदनाला धाडतो, खेरीज पोलिसांना पुरावेही नेऊन देतो. 'जागीर'मधली गुहेत लपवून ठेवलेली अफाट संपत्ती (जिच्यावर म्हणे केवळ त्या राजाच्या प्रजाजनांचाच हक्क असतो. मग बँकेत वगैरे ठेव ना बाबा!) त्यातला ससाणा एखाद्या बँकराच्या निष्ठेने सांभाळतो, कारण त्या गुहेचा पत्ता राजाने फक्त ससाण्याला सांगितलेला असतो. 'रूप की रानी, चोरों का राजा'मधल्या जँगो कबुतराला तर विज्ञानसुद्धा माहीत असतं. उकळत्या अ‍ॅसिडच्या विहिरीच्या तोंडावर शिडी आडवी पडावी (कारण अनिल कपूर-श्रीदेवी त्या विहिरीवर लटकलेले! त्यांना ज्याने बांधून ठेवलेलं आहे तो दोर तुटत आलेला!) म्हणून ते कबूतर नेटकेपणाने बाटली कशी घरंगळवतं, ती बाटली बादलीत पडून ती बादली इतर गोष्टींना कशी हलवते व सरतेशेवटी शिडी कशी अचूक त्या विहिरीच्या तोंडावर पडते, हा थरारक प्रसंग मुळापासून पाहण्याजोगा! खेरीज ह्या कबुतराला कुठल्याही गाडीचा नंबर एकदा पाहून लक्षात राहत असतो, हेही भारी. अशाच पद्धतीची स्मरणशक्ती असणारं दुसरं कबूतर 'मैने प्यार किया'मधलं! 'हम आपके है कौन?'मधला प्रचंड हुशार 'टफी'देखील याच मांदियाळीतला एक! तो क्रिकेटच्या खेळात पंच म्हणून काम करतो, लग्नात बूट सांभाळतो, घरात नवं बाळ आल्यावर आनंदी होतो आणि महत्त्वपूर्ण प्रसंगी दिलेली चिठ्ठी नक्की कुणाकडे पोचवावी, याचं त्याला ज्ञान असतं. हे कमी वाटलं म्हणून की काय, जुनून आणि काल या चित्रपटांमध्ये तर वाघाचं भूत आहे. 'जुनून'मधला वाघ अपार सहनशीलदेखील आहे. आपण पावरबाज भूत आहोत आणि तरीही आपल्याला राहुल रॉयला झपाटायचं आहे, हे तो धीरोद्दात्तपणे स्वीकारतो. 'परिवार' चित्रपटात एक कुटुंबवत्सल माकड आहे. ते कुटुंबासाठी रोज भाजीखरेदी करायला बाजारात जात असतं, तर घरातील मुलांना शाळेसाठी उठवणे व दूधकेंद्रावरून दुधाच्या बाटल्या आणणे ही कामगिरी घरातल्या कुटुंबवत्सल कुत्र्याकडे असते. ते दोघंही रोज आपापली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडत असतात. घरातील उर्वरित कुटुंबवत्सल मिथुन चक्रवर्ती काय करतात मग?, असा प्रश्न पडल्यास 'परिवार' पाहावा.
हे झालं साध्या प्राण्यांबद्दल. इच्छाधारी नाग-नागीण ही मात्र हिंदी चित्रपटांतली पेशल व्हरायटी. इच्छाधारी जमातीतली मंडळी, त्यांचं मानवातून नागात आणि उलट होणारं रुपांतर, त्यांची प्रेमप्रकरणं, मिळालेले शाप, नागमण्यांच्या मागे लागलेले खलनायक, इत्यादी विषयांवर ढिगानं चित्रपट आहेत. मूळ विषयच अचाट असल्यानं हे चित्रपट अतर्क्य असणं ओघानं आलंच. 'नागिन' (वैजयंतीमालाचा नव्हे; रीना रॉयचा) चित्रपटात शेवटी सुनील दत्त आणि इच्छाधारी नागीण रीना रॉयची मारामारी आहे. या मारामारीत आधी ती मनुष्यरुपात असते आणि सुनील दत्तला मारायला त्याचंच पिस्तुल वापरू बघते. बाई, अगं तुला विषारी दात आहेत ना, मग ते वापर की! आणि एवढ्या धामधुमीत मनुष्यरुपात राहायचा अट्टहास कशाला? नागीणरुपात काम लौकर नाही का होणार? तर ते असो. थोड्या वेळाने बाई नागीण बनून मारामारी चालू ठेवतात. तेव्हा सुनील दत्त तिला उंचावरून एका टोकेरी कुंपणावर पाडतो आणि ती मरते. पण मरताना ती मनुष्यरुपात परत येते. आजूबाजूची शहरी गर्दी 'हे काय नेहमीचंच आहे' अशा आविर्भावात नागिणीचं बाईत होणारं रुपांतर बघत उभी आपली! नागनागिणीच्या विरहकथेचा एक अनोखा पैलू 'आयी मिलन की रात' या चित्रपटात बघायला मिळतो. शाप मिळाल्याने दोन प्रेमिकांचे इच्छाधारी नाग-नागिणीत रुपांतर होऊ लागतं. पण त्यांच्या रुपांतराचं वेळापत्रक मात्र वेगळं. दिवसा दोघांपैकी एक मनुष्य, दुसरा नाग.. रात्री उलट! बराच काळ सर्परुपी जोडीदाराला कुरवाळत विरहगीतं गायल्यानंतर ती मिलन की रात एकदाची येते आणि आपणही सुटकेचा नि:श्वास टाकतो. 'जानी दुश्मन-एक अनोखी कहानी' चित्रपटात इच्छाधारी नागनागिणीच्या विरह-मिलन कथेला नायिका भूत होण्याचा जादा मसाला लावला आहे. नागनागीण जोडी आनंदाने जंगलात एकेठिकाणी नाचत असते, ते नेमकं एका गुहेचं छत असतं. गुहेत एक साधू तप करत असतो आणि ते संपायलाच आलेलं असतं. यांच्या दणादणा नाचण्यामुळे ते छत कोसळतं आणि त्याची तपश्चर्या भंगल्यामुळे तो यांना विरहाचा शाप देतो. पुढे नागीण मनुष्य म्हणून जन्मली असताना काही खलनायकांमुळे मरते आणि भूत होते. मग सूड घ्यायला ती आणि नाग टीम बनवून काम करतात. 'नगीना' चित्रपटात पूर्वजांच्या पडक्या हवेलीत दरवर्षी पूजेला जावं लागतं, हे माहीत असूनही ते कुटुंब हवेलीची डागडुजी वा साफसफाई करत नाही. पूजा चालू असताना त्या कुटुंबातला लहान मुलगा इकडेतिकडे नीट पाहत न चालता, वेंधळ्यासारखा चालत जातो आणि सरळ नागावर पाय देतो. नाग चावून मुलगा मरताक्षणी तिथं 'सापाचे विष उतरविनार, नागमनी शोधनार, सापाचे प्रान मानसात न् मान्साचे सापात ट्रान्स्फर करनार... मांत्रिकेऽऽऽऽय्' असा फिरता मांत्रिक अमरीश पुरी हजर. यातला नागमणी तर इतका प्रभावी आहे की, त्या एका नागमण्याच्या शोधासाठी नगीना आणि निगाहें असे दोन चित्रपट बनवावे लागले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीदेखील अशा बाबतीत मागे नाही बरं का! त्यांनी तर हिंदी नागपटांपुढे एक पाऊल टाकलं आहे. 'हिरवं कुंकू' या चित्रपटातली नागाची भूमिका ही 'डर' चित्रपटातल्या शाहरुख खानाच्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. नाग हा नागच असतो, पण तो नायिका लहान असते तेव्हापासून तिच्या प्रेमात पडतो. तो इच्छाधारी नाही, तरीही त्याचं मनुष्यनायिकेवर जिवापाड प्रेम आहे. इकडे नायिका त्याला केवळ मित्र मानून असणारी. तिचं लग्न एका मनुष्याशी होताच नाग तिच्या सासुरवाडीच्या मंडळींना दंश करून संपवू लागतो. मग नायिका त्याला चार खडे बोल सुनावते आणि सोळा सोमवारांचं व्रत करून आपलं कुंकू वाचवते.

कधीकधी एखादा चित्रपट साधासरळ चाललेला असतो. अचाट आणि अतर्क्य गोष्टी जरा मर्यादित असतात. (पण त्या असतातच!) आपण 'हुश्श..' म्हणणार तेवढ्यात एकदमच ट्रान्स्फर शीन होतो. चित्रपट 'अमानत'. संजय दत्ताच्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. तो ही हृदयद्रावक कहाणी मुकेश खन्ना या सहृदय माणसाला सांगतो. एकेदिवशी गावात एक कार आणि नि पाठोपाठ दोन ट्रक येऊन थांबतात. कारमधून मुकेश खन्ना उतरतो आणि संजय दत्ताला सांगतो की पाण्याच्या दुर्भिक्ष्याच्या कहाणीने द्रवून जाऊन त्याने त्याच्या गावासाठी दोन ट्रक भरून ट्यूबवेल आणल्या आहेत. ट्रकभरून थेट ट्यूबवेल??? 'पाताल भैरवी' हा तसा जादू, मंत्र-तंत्र, मांत्रिक वगैरे असलेला पुराणकाळात घडणारा चित्रपट. दिग्दर्शकाला यात घडणार्‍या गोष्टी पुरेशा अचाट वाटल्या नसाव्यात बहुधा. कारण पातालभैरवी देवीच्या दर्शनाला जाण्याआधी नायक रामू हा आंघोळ करायला जातो, तेव्हा सदरा काढताच त्याची झिप असलेली आधुनिक विजार आपल्याला दिसते. भारत जगापेक्षा कितीतरी पुढे फार पूर्वीपासूनच होता, हे सिद्ध करणारं हे दृश्य! 'मेरे दो अनमोल रतन' हा चित्रपट. त्यात मुकुल देव आणि अर्शद वारसी यांपैकी आपला मुलगा नक्की कोण असा प्रश्न सदाशिव अमरापूरकराला तब्बल वीस वर्षं पडूनच राहिलेला असतो. तो डीएनए टेस्ट वगैरे हमखास शंकानिवारण करणार्‍या गोष्टींच्या वाटेला जात नाही. त्याच्या मित्राची मुलगी परदेशातून शिकून येते नि तिचं स्टडफार्म असतं. ती केवळ घोड्याकडे पाहून घोड्याचं कूळ ओळखत असते म्हणून सदाशिवकाका तिला आपल्या दोन मुलांच्या सवयींचा वगैरे तपशीलवार अभ्यास करून आपला मुलगा ओळखायची कामगिरी देतात. (मग ती रीतीप्रमाणे त्यातल्या एकाच्या प्रेमात पडते.) 'मै प्रेम की दीवानी हूं'मधल्या सुंदरनगर या उंचावरच्या, हिलस्टेशन असलेल्या गावाला समुद्रकिनारादेखील असतो, तर सिंगापुरासारख्या उकाड्याच्या ठिकाणी जाणारा क्रिश अंगावर जाड ओव्हरकोट घालून जातो. 'अंधा कानून'मध्ये अमिताभ बच्चन एका खलनायकाला एका कमी वर्दळीच्या जागी गाठून तलवारीने मारतो, या वाक्यात अचाट काही नाही, असं प्रथमदर्शनी वाटेल. पण खलनायकाच्या मागे धावताना आधी अमिताभकडे तलवारच नसते. (है शाबास!) मग ती येते कुठून, हा प्रश्न लगेचच मनात येईल. तर त्याचं उत्तर असं आहे की, त्या कमी वर्दळीच्या जागी एक माणूस असाच आपला हातात नंगी तलवार घेऊन रस्त्याने सहज चाललेला असतो. त्याची तलवार हिसकावून घेऊन अमिताभ खलनायकाला ठार करतो.'कातिलों के कातिल'मध्ये लहानप़णी कुटुंबापासून दुरावलेल्या धर्मेंद्राला एक मुस्लिम कुटुंब दत्तक घेतं. या घरात दिवाणखान्यात दर्शनी भागी 'एका मुलाच्या कलेवराजवळ बसून दोन बायका शोक करत आहेत' असा फोटो लावलेला असतो, त्यावरून त्या घरातला तेवढ्याच वयाचा मुलगा दगावल्याने धर्मेंद्राला त्याच्याजागी आणलं आहे, हे प्रेक्षकांना कळतं. (अरे पण कुठले फोटो तुम्ही दिवाणखान्यात लावाल, याला काही सीमा?!) असो. या उदाहरणांना अंत नाही.

***

या लेखाची सुरुवात 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..' प्रकारचा शेवट असलेल्या 'गंगा जमुना सरस्वती'नं केली होती, तसाच प्रकार असलेला 'एजंट विनोद(नवा)' आपण आता शेवटी बघूया. हा एक जागतिक चित्रपट आहे. कारण अफगाणिस्तानातून सुरू होऊन तो रशिया, मोरोक्को, लाटव्हिया, सोमालिया, पाकिस्तान अशी अनंत वळणं घेत शेवटी भारतात पोचतो. तिथे काही दृश्यांपुरता थबकून लंडनमार्गे दक्षिण आफ्रिकेला जातो. चित्रपटाला अतिशय वेग आहे. (मी रेकॉर्डेड चित्रपट अर्ध्याने स्लो करून पाहिला होता!) तर या चित्रपटात सर जगदीश मेटला हे एक पात्र आहे. पूर्ण चित्रपटभर २४२ या कोडनंबराने ओळखल्या जाणार्‍या बॉम्बच्या मागे खलनायकांची फौजच्या फौज आणि त्यांना प्रतिकार करणारे रॉ एजंट यांची धुमश्चक्री आहे, पण मेटला मात्र पूर्ण चित्रपटभर निवांत! अधूनमधून काही प्रसंगांमध्ये ते 'मी पण आहे बरं का! लक्षात आहे ना? मी जगदीश मेटला..' एवढी आठवण प्रेक्षकांना करून देण्यासाठी पडद्यावर अवतरतात. बॉम्ब हस्तगत करून त्याचा भारतात, दिल्लीत स्फोट घडवू पाहणारा मुख्य खलनायक असतो 'कर्नल'. हा फिटनेस फ्रीक असतो. तो केवळ सॅलड खातो आणि समोरच्या दुसर्‍या आडमाप आकाराच्या खलनायकाला तो खात असलेले बटाट्याचे चिप्स कसे जास्त मीठ असलेले, त्यामुळेच हानिकारक आहेत, हे सांगतो. विघातक आणि विधायक कृत्यांचा समतोल साधणारा असा खलनायक विरळा! तर ते असो. आपण आता थेट शेवटाकडे वळू. कर्नल, एजंट विनोद, डॉ. इरुम (म्हणजे करीना कपूर!), सर जगदीश मेटला (हे पण आहेत. नाम तो याद रहेगा?), थोडे इतर पोलिस, असे सगळे एका इमारतीत आता एकवटले आहेत. कर्नल संधी साधून इरुमला पॉइंट ब्लँक अंतरावरून गोळ्या घालतो. पण तिला थोडा वेळ मिळावा, म्हणून या गोळ्या तो हृदयाच्या जागी वा डोक्यात घालत नाही. तरीही डॉ. इरुमच्या वैद्यकीय ज्ञानामुळे इथे तिचा घात होतो. कारण या गोळ्या यकृतावर लागल्या असून त्यामुळे आपण वाचणार नाही, हे तिला उमजतं. (अशा जिवावर बेतू शकणार्‍या मारामारीला अशिक्षित नायक-नायिका चांगले! गोळ्या कितीही, कुठेही लागोत, त्यांचं अज्ञान त्यांचं रक्षण करतं. खेरीज कधीकधी त्यांचा असाध्य आजारही या प्रक्रियेत बरा होतो. मिथुनच्या एका चित्रपटात (क्रिशन अवतार) त्याला असाध्य असा ब्रेन ट्यूमर असतो. त्याचं ऑपरेशन करणं फार धोकादायक असतं. निर्णायक मारामारीत खलनायकाने मारलेली गोळी मिथुनच्या डोक्याला लागून ट्यूमरसकट बाहेर पडते व तो बरा होतो. यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही.) मोबाइलावर जेमतेम २-३ टक्के बॅटरी उरली असताना एक शेवटचा इमर्जन्सी कॉल करावा, तद्वत इरुम बर्‍याच वरच्या मजल्यावरच्या खिडकीची काच सर्व शक्ती एकवटून फोडते आणि तिथूनच ओरडून ('उठ गंगे. मार इसको.'वाल्या निरुपाची आठवण आली की नाही?) कर्नल हाच सगळ्या कटाचा सूत्रधार असल्याचं सांगते. त्या प्रसंगात कर्नल संपतो.. पण चित्रपट संपत नाही. 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' कारण, सर जगदीश मेटला! आहे ना अजून आठवण? तर सर जगदीश मेटलांना चित्रपटात उगीच घेतलेलं नाही. सगळ्या प्रकारामागचे मुख्य सूत्रधार असतात जगदीश मेटला. मग पुन्हा कंबर कसून एजंट विनोद लंडनात जाऊन त्यांना संपवायचा बंदोबस्त करतो आणि दक्षिण आफ्रिकेला सुट्टीसाठी म्हणून रवाना होतो.

***

अधूनमधून 'आपण कायम असलेच चित्रपट पाहत असतो, छ्या!!' अशी भावना उगीचच मनात निर्माण होते. तिला कमी करायला मी आवर्जून फक्त नोलन वगैरेच मंडळींचेच चित्रपट पाहणं सुरू करते किंवा थेट आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या डीव्हीड्या आणते. बाकी दुसरी बात नस्से! त्यातच कधीतरी हिंदी चित्रपटांचे चॅनल टाळून भराभर पुढे जाताना नासिरुद्दीन शहाच्या आवाजात -

'पाप से धरती फटी(फटी फटी फटी - तीनदा), अधर्म से आसमान..

अत्याचार से कांपी इन्सानियत, राज कर रहे है हैवान..

जिनकी होगी ताकत अपूर्व, जिनका होगा निशाना अभेद..

जो करेंगे इनका सर्वनाश,

वो कहलायेंगे त्रिदेव...'
या ओळी ऐकू येतात, तंबाखूचं व्यसन असलेला आणि अस्सल देशी स्टायलीत तंबाखू मळणारा 'ब्रिटिश' दलिप ताहिल पडद्यावर अवतरतो आणि मी चॅनल बदलता हात थांबवून नव्या उत्साहानं 'त्रिदेव' पाहायला सरसावून बसते.

(माहेर २०१३ दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित.)

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com