हळद्या

आमच्या घराबाहेरच्या हिरव्या परिसरात अनेक पक्षी आपल्या उदरनिर्वाहासाठी, बागडण्यासाठी येत असतात.त्या सगळ्यात एक लक्षवेधी पक्षी येतो जो आला की घरातल्या व्यक्तींना/बच्चे कंपनीला हाका मारून तो दाखवण्यासाठी जमवले जायचे. माझी कॅमेरा घेऊन फोटो काढण्यासाठी धडपड चालू असायची. पिवळा धम्मक रंग व त्या पिवळ्यावर तितकाच शोभणारा भडक काळा रंग पंखांवर असणारा, लाल-गुलाबी सुबक चोच, पाणीदार डोळ्यांचा लावण्यवान असा हा हळद्या याचे क्वचित होणारे आगमन आमच्यासाठी एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणे असायचे. सुरुवातीला हा हळद्या फोटो काढायला जाम भाव खायचा. कॅमेरा धरला की लगेच दुसऱ्या फांदीवर, पानाआड नाहीतर सरळ दुसऱ्या झाडावर आड जाऊन बसायचा. पण हळू हळू त्याला आमच्या पेरू, आंबा जांभळाच्या झाडांचा की आमचाच कोण जाणे! लळा लागला आणि तो वारंवार येऊ लागला. समाधानकारक अन्न व निश्चिंत निवाराही त्याचे मुख्य कारण असणार. आता आम्ही एकमेकांना परिचित होत गेल्याने तो फोटो साठी मला चांगल्या पोझही देऊ लागला. अगदी मन भरेपर्यंत फोटो काढून देतो हल्ली. मला तर वाटू लागलं की हा फोटो काढण्यासाठी नटून थटून येतो की काय इतका रुबाबदार आणि देखणा दिसतो. हिरव्या पानांमध्ये हळदी रंग अजून उठावदार दिसतो. एक दिवस तर आमच्या बेडरूमच्या खिडकीजवळ असलेल्या पेरू च्या झाडावर संध्याकाळी निवांत बसलेला दिसला. काढ गं बाई हवे तेवढे तुला फोटो अशा आविर्भावात वाटला मला. मी ही संधी साधून बरेच फोटो काढून घेतले आणि स्वयंपाकाला लागले. उरकून वर गेले आणि सवयीप्रमाणे सहजच झाडावर पाहील तर त्या पेरूच्या झाडावर मला पिवळा टेनिसचा बॉल अडकल्याचा भास झाला. उत्सुकतेपोटी मी टॉर्च घेतली आणि पाहिलं तर हळद्या साहेबच आपल्या शरीराचा चेंडूसारखा आकार करून गाढ झोपी गेलेत. नंतर वाचनात आलं की पक्षी असे चेंडू करून झोपतात. त्या दिवशी हळद्या आपल्या झाडावर वस्तीला आहे ह्याचा एखादा आवडता पाहुणा आपल्या घरी राहायला आलाय असा आनंद झाला होता. माझ्या मुलीही मधून मधून टॉर्च घेऊन हळद्या झोपलाय की उडाला हे मधून मधून पाहायच्या. पण हवेतल्या गारवेने तो छान निद्रिस्त झाला होता. सकाळी मात्र तो आपल्या दिनचर्येसाठी लवकर उठून गायब झाला होता. पण ती संध्याकाळ आणि ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. अजूनही तो अधून मधून हजेरी लावतो. आता तर मादीही दिसू लागली आहे. कदाचित त्याचंच कुटुंबही असेल ते.

१)
Photo:

२)

Photo:

३)
Photo:

४)
Photo:

५)
Photo:

६)
Photo:

७)
Photo:

८)
Photo:

९)
Photo:

१०)
Photo:

११)
Photo:

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle