मी, अन्या आणि लग्न वगैरे...

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

मी, अन्या आणि लग्न वगैरे...

***माबोवर लिहिलेल्या कथांपैकी माझी एक फेव्हरिट कथा***

तो घरात ज्या पद्धतीने आला ते पाहूनच मला जाणवलं स्वारी अस्वस्थ आहे आज. पायातले फ्लोटर्स त्याने भर्रकन काढून कोपर्‍यात भिरकावले. डोक्यावरची कॅप काढून टीपॉयवर फेकली आणि खिडकीजवळच्या दिवाणावर धप्पकन येऊन बसत त्याने फर्मावलं, "देवू, पाणी आण गार." आणि लगेच माझ्याकडे चमकून पाहात "ओह, तू ऑलरेडी पाणी घेऊनच आलीयेस की!" म्हणून पाण्याची बाटली हिसकावून घेत घटाघटा पाणी प्यायला.
"कुठे उनाडक्या करून येतोयस?" मी त्याच्याशेजारी बसत म्हणाले.
"काही विशेष नाही. असंच मनीषच्या फ्लॅटवर गेलो होतो. अजितपण आला होता. मग काय टीपी, गप्पाटप्पा... दाल-रोटीमध्ये जाऊन जेवून आलो."
"हं, म्हणजे तसा नेहमीसारखाच चालला होता तुझा आजचाही दिवस एकूण! मग माशी कुठे शिंकली? "
"तू ते काय म्हणतात तशी 'चाणाक्ष' आहेस. तुला कसं कळलं माशी वगैरे शिंकलीये ते? "
"अरे अन्या, आता सात वर्षं होतील आपल्याला एकमेकांना ओळखायला लागून. त्यावरून एवढं कळतंच की मला. बोला..."
"एवढंच जर आहे तर गेस कर की तूच!" त्याने आव्हान दिल्यासारखं म्हटलं.
"हात्तिच्या! त्यात गेस करण्यासारखं काय आहे? अविनाशकाकांचा फोन आला असणार आणि बोलता बोलता गाडी त्यांच्या सध्याच्या अतिजिव्हाळ्याच्या विषयाकडे सरकली असणार. तू लग्न कधी करतोयस?"
"देवू, पाय दाखव तुझे. डोकं ठेवतो. भयंकर अंतर्यामी झाली आहेस. गुरुमैया आप महान है.." म्हणत अन्या नाटकीपणाने माझ्या पायांशी वाकला.
"हं, तर ही आजची पंचविसावी वेळ ह्या वादाला तुझ्यात आणि अविनाशकाकांमध्ये तोंड फुटण्याची आणि मुलीचं गुणवर्णन केलं गेलं असेल एखाद्या तर ही दहावी मुलगी!" मी बोटांवर मोजत म्हणाले.
"वा काय चोख हिशोब आहे. मानलं! इसी खुशी मे कालचे उरलेले गुलाबजाम फ़्रीजमध्ये आहेत ते आण." तो आरामात बाहेरच्या उन्हाकडे बघत तक्क्याला रेलला.
"खादाडपणा करू नकोस. आज दाल-रोटी म्हणजे तुम्ही गाजर का हलवा वगैरे हाणलं असणारच आहे. जरा वाढत्या वजनाकडे लक्ष द्या अन्यासाहेब..."
"ए चले, मी कालच वजन केलं एका वजन करण्याच्या मशिनावर! गेल्या दोन वर्षांत फक्त दोन किलो वाढलंय वजन. अजूनही माझी चार वर्षांपूर्वीची जीन्स घालता येतेय मला. (दोनचार इंच ढिली करून. - मी. पण अन्या लक्ष देत नाही.) जे नियमित व्यायाम करत नाहीत त्यांनी असं जड खाल्लं तर त्यांचं भराभर वजन वाढतं, हा तुझा सिद्धांत अतिशय चुकीचा आहे. माझी पचनशक्ती उत्तम असल्याने मला तुझ्यासारखी रोजच्या रोज व्यायाम करण्याची अजिबात गरज नाही. तेव्हा निष्कर्ष काय तर गुलाबजाम आण."
... त्याच्या हातात चार गुलाबजामांनी भरलेला बोल देऊन मी पुन्हा दिवाणावर त्याच्याशेजारी बसले.
"अजून चार गुलाबजाम शिल्लक आहेत. ते हवे असतील तर उठून, आतमध्ये जाऊन, घेऊन यायचे आणि भांडं नीट घासून जागेवर ठेवायचं."
"मी का म्हणून भांडं घासू? तुझी बाई कामाला येणार नाहीये का? आणि काल 'तुम्ही जरा लौकरच या. तुमच्याशी गप्पा मारता मारता माझा स्वयंपाक चटकन होईल.' असं सांगून मला आणि अजितला जवळजवळ निम्मा स्वयंपाक करायला लावलास त्यामुळे या आठवड्याचा आमचा घरकामाचा कोटा पूर्ण झालेला आहे."
मला माझ्याही नकळत हसू आलं. हा इतक्या ठामपणे घरकामाचा कोटाबिटा शब्द वापरून भांडं घासून ठेवणार नाही म्हणतोय आत्ता आणि प्रत्यक्षात मात्र चटकन आत जाऊन, नीट धुवून, जागच्या जागी लावून ठेवेल भांडं.
"हसलीस का?" त्याने संशयाने माझ्याकडे पाहात विचारलं आणि पुन्हा एकदा वॉर्निंग दिल्यासारखा म्हणाला "मी काहीही उचलून, आवरून, घासून घेणार नाहीय."
"बरं राहिलं... नको करूस. आणि आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. काय झालं?"
"अगं तसं खास काही नाही. त्यांनी कसल्याशा मंडळात माझं नाव नोंदवलंय, मग रीतसर कुणातरी मुलीच्या वडिलांचा त्यांना फोन आला. मुलगी देखणी, हुशार, गृहकृत्यदक्ष, महत्त्वाकांक्षी, करीयरकडे लक्ष देणारी, पुन्हा घराकडे लक्ष देणारी वगैरे वगैरे वगैरे आहे म्हणे..."
" बाप रे ग्रेटच! इथे मला ऑफिसात लक्ष देताना घराकडे पाहायला होत नाही आणि घरी लक्ष द्यायचं म्हटलं तर त्या कामाने दमून जाऊन ऑफिसमध्ये जांभया येतात. थोडक्यात काय, तर उद्या बाबांनी वधूवरसूचकमंडळात माझं नाव नोंदवायचं ठरवलं तर लिहायला मॅटर कमी पडणार."
"जाऊ दे ना. तू टेन्शन घेऊ नकोस. मी, अजित, मनीष... आम्ही सगळे मिळून तुझा फेक रेझ्युमे तयार करू. त्यात तू परीसारखी सुंदर, भयंकर हुशार, घरकामात प्रवीण आहेस, असं सगळं लिहू. तेवढ्याने नाही भागलं तर हुंडा पण देऊ. तू काही काळजी करू नकोस. मी आणि अजितने ऑनसाईट ट्रिपांमध्ये मिळवलेले सगळे पैसे आम्ही तुझ्या हुंड्यासाठी ठेवू."
मला एकदम अनावर हसायलाच यायला लागलं. हे दोघे गांजलेल्या चेहर्‍याने, मिळवलेला एकही पैसा खर्च न करता माझ्यासाठी 'हुंड्याची' तरतूद करतायत, मुलाच्या घरच्यांबरोबर माझ्या लग्नाची बोलणी करतायत, हे दृश्य कल्पना करून पहायलादेखील भयंकर विनोदी वाटत होतं.
आधी इंजिनीयरिंगच्या निमित्ताने आणि नंतर इथेच नोकर्‍या मिळाल्यामुळे गेली साताठ वर्षं बंगलोरमध्येच आहे मी. कॉलेजपासून जमलेल्या ग्रुपापैकी थोडाफार इथे उरला आहे. पण आता हळूहळू काहीतरी बदलत चालल्याचंही जाणवतं. ग्रुपातल्या बहुतेक मुलींची लग्नं झाली आहेत, ठरली आहेत. काहींनी आपापली जमवली, काहींची घरच्यांनी ठरवली. काही मुलांचीही झाली लग्नं. माझ्या अगदी जिवाभावाच्या मंडळींपैकी मोहित, तृप्ती(ही तर डायरेक्ट देशच सोडून गेलीय) वगैरेंची लग्नं झालीत. मनीषचं ठरलंय, पण त्याची होणारी बायको पूजा सध्या ऑनसाईट गेल्याने लग्नाची तारीख काढलेली नाहीय. आता अन्याचा नंबर लागलाय. उद्या माझाही? छे, मी मनातून ती शक्यता झटकून टाकली. आई तर नाहीये, बाबा एकतर भारतभर फिरत असतात, घरी असले तरी त्यांच्या लेखनामध्ये गुंग असतात. माझ्या लग्नाबद्दल कुणी त्यांना विचारलं तर काय बरं म्हणतील ते?
'अं? देवूचं लग्न? करू की... काय घाई आहे? नाहीतर तिचा तिने जोडीदार शोधला तरी मला हरकत नाही. नाही शोधला तर मी शोधेनच. पण तिला लग्न करायचं असेल तेव्हाच! काय देवू... करायचं आहे का लग्न?' असं म्हणून माझ्याकडे पाहतील मी त्यांच्या विचारांना दुजोरा द्यावा म्हणून! तात्पर्य काय, मी विषय काढेपर्यंत बाबा माझ्यामागे लग्नाचा भुंगा लावणार नाहीत. (बरंच झालं की! की नाही? कोण जाणे!) आई असती तरी तिनेदेखील हेच केलं असतं म्हणा!
" ए.. कशाचा विचार करतेयस? लगेच मुलगा शोधण्याच्या दृष्टीने आखणी करायला सुरुवात केलीस की काय? "
अन्या म्हटला तशी मी भानावर आले.
" नाही रे, आपल्या ग्रुपाबद्दल विचार करत होते. बदलायला लागली नाही रे सगळ्यांची आयुष्यं? "
" हं खरं आहे! पण हा बदल नको वाटतो कधीकधी. पुन्हा त्या वयाचं होऊन कॉलेजात जाता आलं तर काय धम्माल येईल नाही? " तो बाहेरच्या उन्हाकडे एकटक पहात म्हटला.
अन्याची ही जुनी सवय आहे. जुने दिवस आठवून उसासे टाकायचे. आमच्या कॉलेजच्या पाठीमागे एक माध्यमिक शाळा आहे. रोज नऊ वाजता ती मुलं छान टापटीप गणवेष घालून शाळेमध्ये यायला लागली की अन्या 'यार, ह्यांच्याकडे पाहून पुन्हा शाळेत जावंसं वाटतं.' म्हणायचा. आठवड्यातून एकदातरी! अजित त्यावर गंभीरपणे ' हं, मलाही तसंच वाटतं. जा! पण हाफ पॅंट घालून नको. आम्हाला पाहवणार नाही.' म्हणायचा. आणि मग अजित-अन्याची जुंपायची. एकमेकांचा एक शब्द खाली पडू द्यायचे नाहीत दोघे. आणि ती मजा बघत मी, तृप्ती, मोहित, मनीष यथेच्छ टाईमपास करायचो. अजूनही कधी कधी अजित आणि अन्याची जुगलबंदी रंगते, तेव्हा मात्र अन्याची सवय मला लागली की काय, असं वाटायला लागतं.
मी अन्याकडे बघितलं. तो अजूनही खिडकीबाहेरच बघत होता. पार हरवून गेल्यासारखा!
"अन्या.."
" अं? अरेच्च्या! पुन्हा यादें याद आती है सुरु झालं वाटतं माझं." तो किंचित हसत म्हणाला.
" हं. पण मजा वाटते रे मलादेखील कधीकधी ते सगळं आठवून! आपल्या कँपसमध्ये आपण घातलेला धुडगूस, एकदा गर्ल्स होस्टेलात भूत असल्याची अफवा होती, तेव्हा तू आणि मनीषने आपल्या सरांना विचारलेला 'सर आम्ही तिथे मुलींच्या रक्षणासाठी राहायला जाऊ का?' असला भन्नाट प्रश्न ( इथे अन्याचा सुस्कारा), रंगपंचमीला कॅंटीनचं आवार खराब केल्याबद्दल शिक्षा म्हणून आपल्या पूर्ण ग्रुपाने रविवारची सुट्टी खर्चून केलेली सफाई, इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षी टॉपर असलेली आणि पुढे मॉडेलिंगकडे वळलेली आपली सगळ्यात फेमस सिनियर भाग्यलक्ष्मी (अन्याचा उसासा). सगळं आठवून मलापण तुझ्यासारखं नॉस्टॅल्जिक व्हायला होतं."
"खरंच गं देवू, काय सही दिवस होते ते. एक सालं टेन्शन नव्हतं, धमाल करायचो, मग परीक्षेआधी रात्ररात्र जागून अभ्यास करायचो.. वेळ नेहमीच कमी पडायचा मग तयारीला, पण फेल होऊ अशी काळजी वाटली नाही, कमी मार्क मिळण्याचीदेखील काळजी वाटली नाही तेव्हा. नोकरी मिळेल/न मिळेल याचीही फिकीर नव्हती. आता जॉबचंच उदाहरण घे, तीन जॉब बदलले मी गेल्या तीन-साडेतीन वर्षांत. पुरेशी तयारी असली तरी दर वेळी मनात धाकधूक, होईल ना सगळं नीट म्हणून?"
"हं खरं आहे. कभी कभी कुछ पाने के लिये कुछ खोना भी पडता है. और कुछ खोकर कुछ पानेवालेको बाजीगर कहते है.. और हमने खो दिया है अपने मन का चैन.. हमेशा हमेशा के लिये.."
"देवू, पहिली गोष्ट म्हणजे चुकीचे ड्वायलाक टाकू नकोस. आणि अगदीच मनःशांती हरवलीये असं नाही म्हणता येणार गं. प्रत्येक नव्या गोष्टीबद्दल सुरुवातीला वाटणारी भीती संपली की येतं ना मन नॉर्मलला. मग आपण एंजॉय करायलाच लागतो की आपसूक."
"मग अगदी हाच्च नियम तू लग्नाला का लावत नाहीस? नवी नवलाई ओसरली की तुझ्या मनातली लग्नाबद्दलची असलेली थोडीफार धाकधूक कमी होईलच ना तुझ्या या नियमानुसार?"
"आयला, कुठून कुठे पोहोचतेस तू देवू? आत्ता विषय चालले होते आपल्या कॉलेजबद्दलचे, नोकरीचे. तू मध्येच हे लग्नाचं काय काढलंस परत?"
"अरे, माझा मेंदू जात्याच शार्प असल्याने मला तुझा नियम तुझ्या लग्नाबाबतही जसाच्या तसा लागू होतो असं जाणवलं, तेव्हा लगेच मी तुला ते दाखवून दिलं."
अन्या का कोण जाणे, एकदम गंभीर मूडमध्ये गेला. म्हणजे आज दाल-रोटीमधला गाजराचा हलवा चवीला तितकासा बरा नसणार.
"गाजराचा हलवा अप्रतिम होता. मी दोनदा ऑर्डर करून खाल्ला. त्यामुळे मी खरोखरच गंभीर आहे. हे गांभीर्य हलव्याच्या बेकार चवीने आलेलं तात्पुरतं गांभीर्य नाही."
मला भयंकर हसायला यायला लागलं.
"मला बर्‍यापैकी फेस रीडिंग करता येतं." अन्याचा तोच गंभीर सूर कायम! मी दिवाणावर अक्षरशः लोळण घेतली. अनावर हसता हसता अचानक जाणवलं, अन्या गप्प झालाय एकदम. बापरे! माझं हसणं थांबलंच!
"अन्या, काय रे? आज खूपच वादावादी झाली का अविनाशकाकांशी?" अन्याने उत्तर दिलं नाही. तो पुन्हा खिडकीतून बाहेर पहात राहिला. निरुद्देश्य!
"ए अन्या, बोल ना! काय झालं आज एवढं?" अन्याने कष्टाने नजर माझ्याकडे वळवली.
"अगं आईबाबा जसे काही इरेलाच पेटलेयत. याच वर्षी माझं लग्न झालंच पाहिजे म्हणून! आत्ता पाहिलेली ही मुलगी तर फारच आवडली त्यांना. त्यांचा युक्तिवाद बिनतोड आहे गं, इंजिनीयरिंग झालंय, पुढे शिकायचं नाहीये, चांगला जॉब आणि पगार आहे, वय २५ पूर्ण.. मग काय हरकत आहे लग्न करायला?"
अविनाशकाका आणि आशाकाकूच्या या बोलण्यात तसं पाहिलं तर खुसपट काढण्यासारखं काही नव्हतं. काकाकाकू शिक्षण, नोकरी, लग्न अशा चाकोरीला मानणारे असले तरी आतापर्यंत त्यांनी अन्यावर कसलंही प्रेशर आणलं नव्हतं. इतकेच मार्क मिळाले पाहिजेत, अमुकच पगाराची नोकरी हवी, वगैरे. अन्यानेही कधी फार ठराविक पठडीबाहेरचं काही केलं नव्हतं. त्यामुळे कदाचित लग्नाचं पहायला तो चटकन तयार होईल, अशी काकाकाकूंना अपेक्षा असावी.
"खरं सांगू का देवू? मला सध्यातरी ठरवून केलेल्या लग्नाची फारच भीती वाटते."
मी सुस्कारा सोडला. लग्नाची भीती? मला काका आणि अन्यामधल्या सव्विसाव्या वादविवादाची शक्यता दिसायला लागली.
"का रे अन्या?"
"मलाही नक्की नाही गं सांगता येत देवू! पण मनात भीती आहे खरी. ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायचंय, त्या व्यक्तीला एखाददोन भेटींमध्ये पारखण्याची कल्पनाच विचित्र वाटतेय मला. अगं मैत्री करताना देखील एकदम एकदोन भेटींमध्येच 'तू माझा जिवश्चकंठश्च मित्र' असं म्हणायला लागत नाही आपण. मग इथे तर फार कठीण मामला झाला. बरं भेटींची संख्या वाढवावी, तर प्रत्येक भेटीगणिक वाढणार्‍या इतरांच्या अपेक्षांचं ओझं जाणवायला लागतं."
"खरंय अन्या. पण मग 'पहली नजरमे पहला प्यार हो गया'सारखं काही जमतंय का बघावं ना!"
अन्याच्या चेहर्‍यावर आता हसू फुटलं.
"देवू, अगं तो सिनेमा आहे का? नजरेला नजर भिडली की लगेच मनात प्रेमाचे अंकुर, तिचं लाजणं, त्याचं हसून तिच्याकडे पाहणं, तिचं पदराच्या टोकाशी चाळा करणं आणि बॅकग्राउंडला जोरजोरात वाजणारी सतार.. व्वा! अगं, गेल्यावेळी घरी गेलो होतो तेव्हा जबरदस्तीने एक मुलगी पहायला नेलं होतं मला. मुलगी दिसायला एकदम झकास. म्हटलं, नजरानजर झाली तर व्हायचंही पहिल्या नजरेत प्रेम.. पण कसचं काय? त्या मुलीला माझ्यात काहीच रस नव्हता वाटतं. एकतर प्रचंड अवघडल्यासारखी बसली होती. (स्वतःच्याच घरात???? - मी) सारखी खाली नाहीतर इकडेतिकडे पाहात होती. 'तुला मला काही विचारायचं असेल तर जरा बाहेर जाऊया का?' विचारलं तर नको म्हणाली. मग काय, थातुरमातुर गप्पा मारून आम्ही जायला निघालो, आईबाबा जरा पुढे गेले आणि मी बुटाची लेस बांधत मागे थांबलो होतो तर मला आतलं बोलणं ऐकायला आलं.
'तो एवढा विचारत होता तर गेली का नाहीस? किमान चार प्रश्न विचारता आले असते.'
'साडीच्या निर्‍या सुटल्यायत, म्हणून. उगीचच्या उगीच घोळ घातलास ना तू साडीचा ऐनवेळी! आजकाल कुणी इतकं बघतं का? आणि तसाही दिसायला अजिबात धड नाहीय तो मुलगा.'
"आयला अन्या, त्या परीने तुझा अगदी निर्दयपणे मनोभंग केला म्हणायचा..."
"देवू, जाऊ दे. बर्‍याच भेटी असल्याच निरर्थक होणार यामध्ये. मला वाईट वाटलं ते त्या अवघडलेपणाचं. त्या मुलीला या सगळ्या कार्यक्रमासाठी तिने काय घालावं याचंदेखील स्वातंत्र्य न दिल्याचं. मला तिने पाहताक्षणीच नापास केलं होतं. आय डोन्ट ब्लेम हर, इट्स हर चॉईस. पण ते कळवायलादेखील तिच्या आईवडिलांनी पाच दिवस घेतले."
"कदाचित तू कित्ती कित्ती देखणा आहेस ते तिला समजावून सांगण्यात तेवढा वेळ गेला असेल.." मी परत अन्याला चिमटा काढला.
"अरे जाने दो. ज्या माणसाला एकदा भाग्यलक्ष्मीने 'यू लुक ग्रेट..' असं म्हटलंय तो कशाला अशा लोकांच्या शेर्‍यांची पर्वा करेल? वा, काय ती रम्य दुपार. ( अन्याचा फ्लॅशबॅक सुरु.) अशी भाग्यलक्ष्मी समोरून चालत येतेय. असा मी तिच्याकडे बघत बघत तिच्या दिशेने चालतोय."
"त्या नादात तू पाय सटकून कॅंटीनसमोर साचलेल्या चिखलयुक्त पाण्यात पडलास. नंतर अजित, मनीषने तुला हात देऊन उठवलं तेव्हा भाग्यलक्ष्मी तुझ्याजवळ येऊन कसंबसं हसू आवरत ते वाक्य म्हणाली होती." मी तत्परतेने अन्याची रम्य कहाणी पूर्ण केली.
"देवू, किती तो दुष्टपणा? पण हे सगळं खरं असलं तरीही मुख्य मुद्दा काय तर 'भाग्यलक्ष्मी' मला म्हटली होती तसं..."
" हं, तर त्या मुलीला भेटायचा मुद्दा! या असल्या निरर्थक भेटींमुळे, आणि बाकी सर्व झपाट्याने बदलत असताना या पद्धती त्याच वेगाने बदलत असल्याची चिन्हं न दिसल्यामुळे अशा नियोजित लग्नांमध्ये मध्ये आता काही राम उरलेला नाही असं म्हणायचंय का तुला? "
"कदाचित हो. आणि नाहीही."
"अन्या एक काय ते सांग. हो की नाही?"
"नाही सांगता येत नक्की. कदाचित ही सिस्टीम इतकी प्रचंड आहे की, आपल्याला आलेल्या दोनपाच अनुभवांवरून डायरेक्ट अंतिम निष्कर्ष काढू नयेत कोणी. म्हणजे सरसकट ही सिस्टीम चांगली की वाईट याबद्दल मत बनवून घेऊ नये. एवढंच करावं, की ज्याने त्याने मला ही सिस्टीम सूट होतेय का याचा विचार करावा."
"मग तू केलास का विचार?"
"हो, नाही सूट होत ही सिस्टीम मला. निदान आत्तातरी तसंच वाटतंय..."
"मग तू स्वतःसाठी मुलगी स्वतःच का शोधत नाहीस?"
"साडेतीन वाजले, कॉफी पिऊया."
अन्या अगदी युद्धाच्या धुमश्चक्रीतही हे वाक्य बरोबर साडेतीनला न चुकता म्हणेल, असं मला नेहमीच वाटतं.
"तू कर कॉफी.."
"चालेल."
तो उठून कॉफी करायला आत निघून गेला आणि मी शेजारी टीपॉयवर पडलेलं मासिक चाळायला लागले.
"देवू, ही घे कॉफी." अन्याने माझ्या हातात एक मग देत पुन्हा दिवाणावर बसकण मारली. अन्याचा मूड कसाही असो, कॉफी नेहमीच अप्रतिम असते. अन्याचं लक्ष माझ्या हातातल्या मासिकावर गेलं.
"काही विशेष लेख वगैरे?"
"अं हं... नेहमीचंच सगळं! आवर्जून वाचावा असा कुठला लेख नाही. तुझा मूड नॉर्मलला आला का पण?"
"घ्या. माझ्या मूडला काय झालं होतं?"
"अन्या, नाटकं करू नकोस. मघापासून आपण ज्या विषयावर बोलतोय त्याने तुझा मूड गेलाय. खरं की नाही?"
अन्याने पहिल्यांदाच इतक्या कमी वेळात पराभव मान्य केला.
"खरंय देवू. माझा मूड खरोखरच गेलाय."
"पण हा तर न टाळता येणारा विषय आहे नं अन्या? मग तू दरवेळी का मूड घालवतोस यावरनं?"
"मलाही नक्की नाही सांगता येत. खरंतर का आहे तो विषय न टाळता येण्याजोगा? मी लग्न सत्ताविसाव्या/तिसाव्या/चाळीसाव्या वर्षी केलं तर काय फरक पडेल नक्की? सध्या ज्या पद्धतीने माझ्याबाबतीत तो विषय हाताळला जातोय, ती पद्धत माझ्या पचनी पडत नाहीये."
"बापरे, तुझ्यासारख्या उत्तम पचनशक्ती असलेल्या माणसाच्यादेखील 'पचनी' न पडणारी गोष्ट म्हणजे भलतीच हेवी असणार."
"देवू, अगदी टुकार पीजे मारू नकोस." बापरे! दिवसातनं दुसर्‍यांदा अन्या गंभीर मूडमध्ये चालला होता. ही लक्षणं खरोखर चिंताजनक होती.
"बरं अन्या, चुकलं. थांबवूयात इथे हा विषय आपण! पण एक सांगते, आपण आपल्या ग्रुपमध्ये जरी यावर विचार करायचा नाही असं ठरवलं तरी अविनाशकाका तो विषय काढायचं थांबवणार नाहीयेत."
"तेच तर.. त्यांना किती वेळा सांगितलंय की मी माझं पाहीन काय ते! पण ते ऐकायलाच तयार नाहीत. देवू, तू सांगशील का त्यांना समजावून प्लीज? तुझं ते बर्‍यापैकी ऐकतात."
बापरे! अविनाशकाकांशी बोलायचं तेही अन्याच्या लग्नासारख्या त्यांच्या अतिजिव्हाळ्याच्या विषयावर????? तसे ते फार छान आहेत स्वभावाने, अन्या म्हणाला त्यातही बरंच तथ्य आहे. अन्यापेक्षादेखील ते माझं कधीकधी जास्त ऐकतात. पण म्हणून या विषयावर त्यांच्याशी बोलायचं धैर्य मला होईल असं वाटेना. इकडे अन्या अपेक्षेने माझ्याकडे बघत होता.
"अन्या, मला एकच सांग, त्यांना तुझी बाजू पटवून देण्यासाठी कारण काय सांगू?"
अन्या विचारात पडला. आधीच त्याला भरल्यापोटी विचार करता येत नाही. त्यातून दोन प्लेट 'गाजर का हलवा' पोटात असल्यावर अन्याला काहीही व्यवस्थित सुचणं अशक्य! आताही त्याचं लगेचच प्रत्यंतर आलं.
"तू त्यांना सांग, की मुलांसाठी २५ हे लग्नाचं योग्य वय नाही म्हणून!"
ते ऐकून मी परत हसायला लागले आणि अन्या चिडलाच...
"तुला हसू येणारच देवू.. तुझ्या मागे कोणी असा धोशा लावला नाहीय ना अजून! तुझ्यावर असलं काही प्रेशर नाही. तेव्हा तुला हसू येणारच!"
अन्याचा तो तीव्र स्वर ऐकून मी एकदम चपापले.
"अन्या, माझ्या मागे कुणी धोशा लावला नाहीय लग्नाचा हे खरंय. खरंतर धोशा लावायलादेखील कुणी नाहीय ही वस्तुस्थिती आहे. बाबा त्यांच्या कामात गुंग असतात. त्यांना बाकी गोष्टींशी फारसं घेणंदेणं नसतं. आई असती तर एव्हाना तिने माझ्या लग्नाची चिंता सुरु केली असती कदाचित, पण तीही नाही म्हटल्यावर..."
मी एकाएकी गप्प झाले. 'आई आता नाही' या विषयावर बोलताना मला कधीकधी अवघड जातं अजूनही. ती गेली तेव्हा मी सहावीत होते. त्यानंतर बराच काळ कुठलीही गोष्ट नीट झाली नाही की 'आई असती तर..'(सगळं कसं व्यवस्थित झालं असतं), या विचाराच्या आधाराने मी घालवला. नंतर माझी मीच प्रत्येक गोष्ट सांभाळायला शिकले. मग आज या विषयासंदर्भात बोलताना तिची उणीव प्रकर्षानं का बरं जाणवावी? लग्नाबाबत मला नक्की काय वाटतंय? इतर घरांमधून दिसतं तसं बाबांनी माझ्या लग्नासाठी खटपटी कराव्यात, हे हवंय का मला? गप्प झालेल्या माझ्याकडे बघून अन्या बराच निवळला होता.
"सॉरी देवू... मी पण काय एकदम बोलून गेलो! माझ्या बोलण्यानं दुखावली गेलीस तू."
"जाऊ दे रे अन्या.. होतं असं कधी कधी. आणि तसंही मीपण वेडीच आहे. आईला जाऊन इतकी वर्षं झालीत... तेव्हा 'आई असती तर..' असा सारखा विचार करून काय होणार आहे? आणि तसं पाहता, माझ्या लग्नाबद्दलही मी अजून तरी काहीही विचार केलेला नाहीय." माझा घसा पुन्हा दाटून आला. अन्या शांतपणे माझ्या पाठीवर थोपटत राहिला.
घरात अंधारून आलं होतं. अन्याचं लक्ष खिडकीबाहेर गेलं आणि तो किंचाळलाच.
"देवू, आभाळ कसलं भरून आलंय बघ."
खरंच की! बाहेर आभाळ गच्च भरून आलं होतं.
"सही आहे ना?" अन्या माझ्याकडे वळून पाहत म्हणाला.
"हं..."
अन्याने पुन्हा नजर खिडकीकडे वळवली. दहा मिनिटं झाली तरी अन्या खिडकीबाहेर बघणं सोडण्याची लक्षणं दिसेनात. बाहेर पाऊसही सुरु होत नव्हता. कुठल्याही क्षणी सरी सुरु होतील, असं आभाळ गच्च भरलेलं, वारा साफ पडला होता मात्र! अन्या मात्र आपल्याच नजरेच्या शक्तीने पाऊस पडणार, अशा आविर्भावात बाहेर बघत होता.
"ए अन्या..."
"अं..."
"मी काय म्हणतेय?"
"हं..."
"ऐक ना!"
"हं..."
"अन्या, तुझ्या डोळ्यांत पाऊस पाडण्याइतकी शक्ती नाहीये. तेव्हा आता इकडे बघ."
"तुला चेतन आठवतो का?" अन्याने विचारलेल्या प्रश्नाने मी खरंतर जबरदस्त दचकले. अन्याची अजूनही माझ्याकडे पाठ होती म्हणून, नाहीतर नक्की त्याच्या लक्षात आल्यावाचून राहिलं नसतं.
.... 'तुझं हे महत्त्वाचं वर्ष आहे देवू, नंतर तुझा जॉब सुरू होईल. आणि मलाही माझ्या करीयरकडेदेखील लक्ष द्यायला हवंय. जरी आपण एकमेकांना आवडत असलो तरी सध्या आपण दोघांनीही त्याचा फार विचार न करणं बरं!" उल्सूर लेकच्या एका भेटीत चेतनने मला शांतपणे समजावलं होतं. तेव्हा मी फारच परिकथांमध्ये रमणारी वगैरे होते. चेतनमध्ये प्रचंड गुंतले होते. चेतनने म्हटलं असतं तर लगेच मी त्याच्याशी लग्न करूनदेखील मोकळी झाले असते. बापरे! आता माझा तेव्हाचा वेडेपणा आठवला तरी खूप हसू येतं. गंमत म्हणजे अन्या, मनीष या माझ्या अगदी जवळच्या लोकांनाही माझ्याबद्दल आणि चेतनबद्दल पुसटशीही कल्पना नाही. मी त्यांना सांगितलं नाही कारण त्या नात्याचं पुढे नक्की काय होणार?, याचा मलाच अंदाज नव्हता. आम्ही दोघे एकमेकांना आवडतो हे आम्ही एकमेकांशी बोललो, त्यानंतर लवकरच त्याचं शेवटचं वर्ष संपवून तो बाहेर पडला आणि आमच्या ग्रुपाशी होणार्‍या त्याच्या भेटीगाठी जवळपास बंदच झाल्या, हेही त्याचं कारण असेल.
चेतनने एक वर्ष जॉब केला. त्यातच कधीतरी कॅट क्लीअर करून तो आयआयएम अहमदाबादला गेला. सुरुवातीला वरचेवर होणारी आमची मेलामेली आणि फोन पुढे चांगलेच मंदावले आणि कधीतरी बंदच झाले. आणि गंमत म्हणजे हेदेखील आमच्या बर्‍यापैकी सहज अंगवळणी पडलं.
पण गेल्या महिन्यात आलेल्या चेतनच्या कॉलने गोष्टी पुन्हा थोड्या बदलताना दिसतायत.
"देवू, मला माहीतेय इतकी वर्षं मध्ये गेल्यावर, आपला संपर्क जवळपास पूर्ण तुटल्यावर तो विषय पुन्हा काढणं जरा धाडसाचंच आहे. मी हे बोलतोय कारण, मला तू अजूनही आवडतेयस. आपल्या नात्याला पुन्हा एक चान्स द्यावा, असं मला खूप वाटतंय. अर्थात, तूही तसाच विचार करावास, असा माझा अजिबात आग्रह नाही. सध्या मी भारताबाहेर आहे आणि चार महिन्यांत परत येतोय. तोवर तुला जर मनापासून वाटलं तर नक्की विचार कर या गोष्टीचा. मी वाट पाहीन तुझ्या उत्तराची. उत्तर 'हो/नाही' काहीही असू दे."
"ए देवू, मी काय विचारतोय?" कुणी उत्तर दिलं नाही तरी अन्या चिकाटीने प्रश्न लावून धरू शकतो.
"चेतन म्हणजे आपला सिनियर होता तोच ना? तुला एकदम त्याची आठवण कशी आली म्हणे?" बर्‍यापैकी निर्विकार चेहरा ठेवत मी अन्याला प्रतिप्रश्न केला.
"हे 'डोळ्यांच्या शक्तीने पाऊस पडणे' त्याचंच वाक्य आहे की. आपण सावनदुर्गाला गेलो होतो तेव्हाही असंच आकाश भरून आलं होतं आणि पाऊस मात्र पडत नव्हता. तेव्हा अख्ख्या प्रवासात कुणीही शून्यात पाहत बसलं की तो त्याला हे बोलून चिडवत होता."
"अन्या, गाजराच्या हलव्याने स्मरणशक्ती तल्लख होते, हे माहीत नव्हतं मला."
"खाऊन बघ म्हणजे कळेल. तुला असं काही दिसलं की आधी कॅलर्‍या का आठवतात देव जाणे! नाहीतरी कुणीतरी म्हटलंच आहे... टिंब टिंब टिंबला हलव्याची चव काय?"
अन्या नेहमीप्रमाणे मला चिडवत सुटला आणि चेतनचा विषय बाजूला पडला. जवळपास सहा वाजायला आले होते. बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. अन्याला मी 'जेवायलाच थांब' म्हणून सांगितलं आणि अजित, मनीष येत असतील, तर त्यांनाही बोलव, म्हणून सांगितलं. अन्याने त्यांना कॉल केले आणि तो माझ्यामागोमाग स्वयंपाकघरात आला.
"चल देवू, मी मदत करतो तुला. बाकी काका घरात नसल्याने कंटाळलीयेस ना?"
"खरंय रे. बाबांचा दौरा यावेळेस जरा जास्तच लांबलाय. घरात कुणीच बोलायला नाही. कंटाळून गेलेय अगदी."
"ते कळतंय. नाहीतर आम्हाला लागोपाठ दोन दिवस तू कुठली जेवायला घालणार. नाही का?"
अन्याचं हसणं स्वयंपाकघरात घुमलं. खरंच, अन्या असला की वेळ कसा जातो कळत नाही.
"अन्या एक विचारू?"
"पुन्हा माझ्या लग्नाबद्दल बोलणार असलीस तर प्लीज नको."
"अन्या मला तुझ्या आणि अविनाशकाकांच्या सतत होणार्‍या वादांबद्दल बोलायचंय."
"तोच विषय पुन्हा! वादांचं कारण तुला माहीत आहे देवू... ते आपला हट्ट सोडत नाहीत तोवर असंच होणार."
"एक विचारू? तुला नक्की काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल हे कधी तू सविस्तर बोलला आहेस त्यांच्याशी?"
"बोललोय की... पण त्यांना ते अजूनही नीट कळत नाहीय बहुधा. किंवा कळत असेल पण पचनी पडत नसेल. आय डोन्ट नो!"
मी गप्प झाले. अन्याचंही बरोबर आहे म्हणा! अविनाशकाकांशी वारंवार होणार्‍या वादावादीने अन्याही दुखावला जातो खरंतर! त्याचीही बाजू कुणीतरी समजून घ्यायला हवीच आहे.
"खरंच सांगतो देवू, मला लग्न करायची इच्छा नाही, असं नाही. पण आत्तातरी हे माझ्यावर लादलं जातंय, असं वाटतंय. मला विचार करायला वेळ हवाय. माझ्या जोडीदारासंबंधीच्या अपेक्षादेखील स्पष्ट नाहीयेत माझ्या मनात आत्ता. उगीच मुली पाहून तरी काय करणार आहे मी, देवू?"
"हं.. खरं आहे तुझं! पण हे बदलता नाही येणारेय अन्या एकदम."
"मला एक कळत नाही गं देवू... आपले आई बाबा. लहानपणापासून आपण कसे घडतोय, कसा विचार करतो, आपली मतं कशी बनतायत हे त्यांनी पाहिलेलं असतं. तरी याबाबतीत एकदम ते सगळं विसरल्यासारखे का वागायला लागतात हे?"
अन्याचा मुद्दा बिनतोड होता.
"अन्या, मे बी आपली सोसायटी काय म्हणेल याचं प्रेशर..."
"का पण?"
"नाही माहीत.. पण अशा बाबतीत ते प्रेशर येतं असावं खरं त्यांना. ज्या वेगानं सर्व बदलतंय त्या वेगानं त्यांना बदलता येत नसेल कदाचित. आणि काही बाबतीत आपल्या मुलांनी चारचौघं वागतात तसं वागावं, अशी काहीशी अपेक्षा असणार."
"पण या अपेक्षांमुळे तणाव निर्माण होतायत त्याचं काय?"
मी उत्तर देणार एवढ्यात दारावरची बेल वाजली. अजित, मनीष नेहमीप्रमाणे अतिउत्साही मूडमध्ये होते. त्यांनी येता येता दुकानातून मलाई सॅंडविच आणले होते. ते पाहून अन्याचा गेलेला मूड नक्कीच परत आला. अजितला दोन, मनीषला दोन आणि मला अर्धं (तेवढंच पुरे... भयंकर कॅलर्‍या!) अशी मलाई सॅंडविचची वाटणी झाल्यावर उरलेला बॉक्स स्वतःकडे घेऊन अन्याने त्यांचा फडशा पाडला. त्यावरून मी, अजित आणि मनीषने अन्याला भरपूर चिडवूनही झालं.
जेवणं होऊन सगळी आवराआवर झाल्यावर मनीषने झकास कॉफी बनवली आणि पाऊस थांबलेला असल्याने आम्ही आपापले मग उचलून गच्चीवर गेलो.
"वा! काय सही गारवा आलाय." अजित गच्चीच्या कठड्यावर चढून बसत म्हणाला. अन्याने त्याच्या जवळच्या पाण्याच्या टाकीवर बैठक मारली आणि मी, मनीष कठड्याला टेकून उभे राहिलो. बाहेरचं वातावरण खरंच छान होतं. गेले काही दिवस जाणवत असलेला त्रासदायक उकाडा नाहीसा होऊन आता छानसा गारवा जाणवत होता. त्या इतक्या छान वातावरणात कुणालाही काहीही बोलायची इच्छाच होत नव्हती. किती तरी वेळ आम्ही कॉफीचे घोट घेत शांतपणे आजूबाजूचा परिसर बघत होतो.
नेहमीच्या रिवाजाप्रमाणे अजितने शांततेचा भंग केलाच!
"अन्या, मग केव्हा जायचं आहे मुलगी पाहायला?"
#$@$#@$#!@ मी मनातल्या मनात अजितला शिवी घातली. आत्ता एवढ्या छान वेळेला नेमका हा विषय पुन्हा काढायची काही गरज? पण नाही. तेवढं सुचेल तर तो अजित कसला?
"तुला का नसत्या पंचायती?" अन्याच्या आवाजावरून तरी अजून मूड चांगला होता. मलाई सॅंडविच चढले असावेत बहुधा! मी मध्येच काहीतरी बोलू पाहत होते, तेव्हा मनीषने चटकन माझ्याकडे पाहून 'गप्प रहा'ची खूण केली. आम्ही दोघं शांतपणे अजित-अन्याची जुगलबंदी पाहू लागलो.
"पण मला एक समजत नाही अन्या... काका तुला मुलीच बघायला सांगतायत ना? मग बघायच्या ना जाऊन! तसंही आजकाल बघितलं की हो म्हटलंच पाहिजे असं कुठे आहे? आणि आपण लाख 'हो' म्हणू रे, मुलीने म्हणायला हवं ना 'हो'. माझंच उदाहरण घे, एकीला भेटायला पायात फ्लोटर्स घालून गेलो तर तिने नापास केलं. तिला फ्लोटर्स घातलेली मुलं अजिबात आवडत नव्हती म्हणे! तेव्हा तात्पर्य काय, जायचं, बोलायचं, परत यायचं आणि आपलं मत घरच्यांना सांगायचं."
"तुमच्या डोक्यात काहीही स्पष्ट नसतानादेखील? आणि समजा, कुणीतरी धाडकन 'हो' म्हणून टाकलं तर?"
"हो. काय हरकत आहे? अशा भेटींमधून कदाचित तुझ्या डोक्यात काहीतरी पक्कं होत जाईलही. स्वतःच्या अपेक्षा नीट समजतील कदाचित. आणि मुख्य फायदा म्हणजे घरच्यांशी वाद होणार नाहीत सारखेसारखे! आणि धाडकन 'हो' म्हणून टाकलं तर टाकलं. तेव्हा करता येईल विचार. निर्णय पक्का करण्यासाठी अजून काहीवेळा भेटता येईल."
अजितचा दृष्टिकोन भलताच कॅज्युअल वाटला तरी कुठेतरी मला ठीकही वाटत होता. त्यातल्या त्यात वाद टाळायचा मध्यममार्ग! अन्याने माझ्याकडे मोर्चा वळवला.
"तुला काय वाटतं, देवू? हे असं करणं बरोबर आहे का? असल्या निरर्थक भेटींमुळे काय साध्य होणारेय?"
"बरोबर की चूक, हे जाऊ दे अन्या. त्याला पटणारा मार्ग तो तुला सुचवतोय. तुला पटतोय का बघ. आणि या भेटींना पूर्णपणे निरर्थकदेखील नाही म्हणता येणार. कदाचित अजित म्हणतोय तसं तुला यातून काय हवं आहे हेदेखील कळेल."
"हेच मी त्याला दुपारपासून सांगायला बघतोय देवू. काकांशी वाद झाला की याचे दोनेक दिवस खराब जातात. त्यांना या वयात कदाचित बदलणं अवघड जातंय. आणि अन्यानेही आपला मुद्दा त्यांना दुखावू नये, म्हणून सोडून देणं बरोबर नाही. म्हणून मी असा काहीतरी तात्पुरता उपाय देऊ पाहत होतो. पण हा ऐकायलाच तयार नाही. शेवटी माझ्यावर चिडून तो बाहेर पडला."
अन्याला अजूनही अजितचं म्हणणं पटलं नव्हतं बहुधा! तो शांतपणे आपल्या हातातल्या कॉफीचे घोट घेत शून्यात कुठेतरी लांबवर बघत होता.
"चल छोड यार अजित... इतकी छान हवा आहे आणि तुम्ही गंभीर विषयांवर काय चर्चा करताय? अन्याला आधीच आज गोडाचा ओव्हरडोस झालाय त्यात आणखी हे जड झालं तर तो कदाचित चक्कर येऊन पडायचा आणि मग तुला आणि मला त्याला उचलून न्यावं लागेल." मनीष विषय बदलत म्हणाला.
उरलेला वेळ मग पुन्हा अन्याचा मूड मूळपदावर आला. त्याने त्याच्या पचनशक्तीचे किस्से ऐकवले, अजित- मनीषने 'अन्या पडला तर त्याला उचलून न्यायच्या १०१ पद्धती' वगैरेंवर चर्चा केली, मी ते अर्धं मलाई सॅंडविच असं अनिच्छेने खाण्यापेक्षा ते अन्यालाच दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं वगैरे फालतू चर्चाही करून झाली.
"चला मुलांनो, आपण निघूया. साडे अकरा वाजलेत." अन्याला आज एकंदरच वाद आणि चर्चेमुळे प्रचंड 'शीण' आल्याचं दिसत होतंच. त्याने लगेच अजितला पाठिंबा दर्शवला आणि पाचदहा मिनिटांत तिघंही घरी जायला निघाले.
"बाय! गुड नाईट!!" त्यांना निरोप देऊन मी आजच्या दिवसाचा विचार करतच घरात आले. माझी आणि अन्याची चर्चा, अजितचा उपाय, अविनाशकाकांची काळजी... एवढी दिवसभर चर्चा करूनही अन्याच्या 'प्रॉब्लेम' वर अजूनही काही उपाय सापडलेला नाहीये मला आणि त्यालाही. अन्याला पुढे काय करायचं हे सुचत नाहीये, आणि तसं पाहिलं तर मलाही चेतनच्या कॉलनंतर पुढे काय करायचं ते सुचत नाहीये.
दरवाजा लॉक करून मी माझ्या बेडरूममध्ये येऊन बेडवर टेकले. बाहेरच्या बागेतून भिजलेल्या मातीचा सुंदर वास येत होता. गारवा जाणवण्याइतपत होता म्हणून मी कपाटातून रग काढून पांघरला. रगच्या उबेमुळे डोळे मिटायला लागलेच!
'चार महिने आहेत अजून चेतनला परत यायला! काय असेल बरं चार महिन्यानंतरची परिस्थिती? आपण कदाचित चेतनला हो म्हटलेलं असेल किंवा नाहीही, अन्याच्या डोक्यातला गोंधळ कमी झाला असेल किंवा नाहीही, अजितचं लग्न ठरलं असेल कदाचित किंवा नाहीही... अरेच्च्या किती अनिश्चित आहे हे सगळंच! आणि आपण तरी का सगळ्यांची उत्तरं ताबडतोब मिळावीत म्हणून विचार करतोय? सापडतील बहुधा सगळ्याची उत्तरं आपोआपच. उद्या, चार महिन्यांनी वा चार वर्षांनी! तोवर हे चार महिने फक्त पाऊस एंजॉय करायचा.
बस्स इतकंच! '

समाप्त

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com