गुळाचा सांजा

दलियाची खीर झाली आता अजून एक थंडी स्पेशल पदार्थ. हा पण खूप जणांकडे होत असणार. माझ्या लहानपणी आमच्या शेतामधला खपली गहू घरी यायला. मग त्यातले थोडे गहू पाणी लावून सडून त्याची खीर आणि थोड्याचा घरीच रवा केला जायचा त्याचाच हा सांजा. खपली गहू चवीला छान असला तरी त्याच्या पोळ्या चांगल्या होत नाहीत. रंग एकदम काळपट लाल येतो. लोकवन मिक्स केल्याशिवाय पोळ्या होत नसत म्हणून मग संपवायचे हे प्रकार. याला सांजाच म्हणतात. गोडाचा सांजा आणि तिखटामिठाचा सांजा असे दोन्ही करतात.

साहित्य

१ वाटी गव्हाचा रवा (शक्यतो पांढरा रवा घेऊ नये. क्रीम ऑफ व्हीट किंवा हल्ली अग्रज,आर पी वैद्य वगैरेंकडे केशरी रवा म्हणून मिळतो घ्यावा. त्याने छान खमंग चव येते.)
१ वाटी बारीक चिरलेला पिवळा गूळ (कनक पावडर चालेल. रंग फक्त काळपट येईल)
२ चमचे साखर (गूळ कमी गोड असेल तर)
३-४ लवंगा
२.५ वाट्या पाणी (मऊ हवा असेल तर ३ वाट्या पाणी)(शक्यतो गूळ, रवा, पाणी एकाच वाटीने मोजून घ्यावे)
१ टेबलस्पून साजूक तूप

कृती

१)पॅन मधे १/२ टे.स्पू. साजूक तूप घेऊन त्यात लवंगा घालून त्या जळायच्या आत रवा घालून मंद गॅसवर परतावा. साधारण ५-७ मिनिटात वाटीभर रवा परतून होतो.
२) त्याच वेळी दुसरीकडे ३ वाट्या पाणी उकळायला ठेवून, पाणी उकळले की त्यात गूळ घालावा. गोड आवडत असल्यास त्यातच २ चमचे साखर पण घालावी. गूळ नीट विरघळून पाण्याला परत उकळी फुटली की ते पाणी भाजून झालेल्या रव्यात ते पाणी घालावे.
३) गुठळ्या न होऊ देता भरभर मिश्रण हलवावे. (या स्टेज ला मिश्रण खीरीसारखे पातळ दिसते. पण धीर सोडू नये.रवा भरपूर पाणी २ मिनिटात पितो. झाकण ठेवून वाफ आणावी. एकदा झाकण उधडून सांज्याची कन्सिस्टन्सी आली का हे चेक करून परत एक दणदणीत वाफ आणावी आणि मग उरलेले १/२ टे.स्पू. तूप सोडून सांजा मिक्स करावा आणि तातडीने गरम गरम खायला घ्यावा.

अधिक टीपा
१) हा सांजा गूळाचाच असतो. पूर्ण साखरेचा अजिबात चांगला लागत नाही.
२) यात काजू-बेदाणे-केशर-जायफळ-वेलदोडे अजिबात घालायचे नाही.
३) गरमच छान लागतो. गार झाला की ढेकळे-खरपूडी होते. उरलाच तर मायक्रोवेव्ह मधे किंवा कुकर मधे गरम करून छान लागतो.
४) खाताना परत सढळ हाताने घरचे साजूक तूप घेतल्यास ब्रह्मानंदी टाळी लागू शकते. :)
५) आजार्‍यांना, मुलांना, बाळंतीणीला आवर्जून थंडीत करतात. आपल्या कॅलर्‍यांच्या वकूबाप्रमाणे खावा.

हा फोटो

Sanja.JPG

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle