फेनेल सॅलड

फेनेल म्हणजे (एका जातीच्या) बडिशेपेचा कांदा. बडिशेपेच्या स्वादाचा, शिवाय चवीत गोडसर आणि कडवट असे दोन्ही रस असलेला हा प्रकार. सहसा मी नारळाच्या दुधातल्या स्ट्यूमधे वापरते पण यावेळी हे सॅलड करून बघितले आणि आवडले.

साहित्य :
१ फेनेल कांदा, चार उभे भाग करून, पातळ चिरून (कांदा उभा पातळ चिरतो तोच प्रकार.)
१ मोठी ढोबळी रंगीत मिरची
मूठभर पुदिन्याची पाने, बारीक चिरून (खचाखच)
मूठभर पार्सले पाने, बारीक चिरून
अर्धे लिंबू + आवडत असल्यास त्या लिंबाच्या सालीचा कीस (लेमन झेस्ट)
कुरकुरीत सॅलड पाने, उदा लेटस १०० ग्रॅम = १ पाकीट (क्रंची सॅलड लीव्हज़)
५० ग्रॅम फेटा चीज
२ चमचे तेल (सूर्यफूल किंवा शेंगदाणा)
मीठ

कृती
जाड बुडाची, मोठ्या मापाची कढई तापवत ठेवून त्यात २ चमचे तेल घातले.
पातळ चिरलेले फेनेलचे काप त्यात पसरले. आच अगदी कमी ठेवली. फेनेलच्या जास्तीत जास्त तुकड्यांना थेट कढईशी संपर्कात राहता येईल असे पाहिले.
अधून मधून हलवत ३० मिनिटे परतले.
परतताना ढोबळी मिरची चिरून घेतली. मी मोठे चौकोनी तुकडे केले, पण लांब कापही चालतील.
पुदिना आणि पार्सले बारीक चिरून घेतली.
सॅलडपाने धुवून किचन नॅपकिनवर वाळवत ठेवली.
एका मोठ्या कुंड्यात सॅलड पाने घेऊन त्यात लिंबू हलकेच किसले, मग अर्धे चिरून, अर्धे लिंबू पानांवर पिळले.
फेनेल झाले की कांद्याचा रंग बदलतो तसा कॅरेमल रंग येऊ लागतो. मग गॅस बंद करून एका कुंड्यात हे काप गार होत ठेवले.
त्याच कढईत मोठ्या आचेवर ढोबळी मिरची भराभर परतली. दोन मिनिटात साले काळी पडू लागल्यावर गॅस बंद केला. (ढो मि तुकडे तसेच कढईत ठेवले. आणि नवीन तेल वापरले नाही.)
१० मिनिटांनी गार झालेल्या भाज्या सॅलडवर घातल्या.
वरून थोडे फेटा चीज चुरले.
पार्सले व पुदिना घातला.
मीठ घातले.
मोठ्या लाकडी चमच्यांनी व्यवस्थित खाली वर हलवले.
सॅलड तयार.
fennel salad

--
मी जोडीला छोटे नवे बटाटे उकडून आणि मग बटरवर थोडे परतून घेतले होते.
+१ ने नुसतेच काय बटाटे असं म्हणून स्वतःपुरते क्रूटॉन्सही करून घेतले.
आणखी पर्याय म्हणजे यातच कूसकूस किंवा किन्वा किंवा मसुराचे दाणे शिजवून घालणे.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle