वसंत ऋतू

वसंत ऋतू

नुकताच गुढीपाडवा झाला. नवीन वर्षासोबतच वसंत ऋतूचे स्वागत करणारा हा सण. पानगळ सरून गेल्यानंतर कोवळ्या पानांनी बहरून जाणारा ऋतू. आपल्याकडे वसंत ऋतूचे आगमन होते साधारणतः तेव्हाच जर्मनीमध्ये देखील ऋतूबदल व्हायला सुरुवात होते.

ऑक्टोबर पासून हळूहळू वाढत जाणारी थंडी.. त्यात न चुकता सोबत करायला कधी बर्फवृष्टी, कधी पाऊस, कधी अंगाला झोंबणारा गार वारा तर कधी लहर आली तर सगळेच सोबतीने येतात भेटायला..या थंडीच्या दिवसात सुस्तावलेल्या माणसांप्रमाणे सुस्तावलेला सूर्य.. आज बहुतेक सूर्य उगवायचाच विसरलाय कि काय अशी शंका यावी असे वाटायला लावणारे करडे आकाश.. उशिरा उजाडून संध्याकाळी चार साडेचार वाजताच निरोप घेऊन अंधारात गुडूप होणारा दिवस..कधीकाळी हिरवेपण मिरवणारी पण आता निष्पर्ण, रिक्त झाडं..त्यात कुठे बाहेर पडावेसे वाटले तर अंगावर जाडसर कोट अंगावर चढवल्याशिवाय बाहेर पडणे शक्य होणार नाही असे वातावरण..हे सगळे चित्र मार्च महिन्याच्या मध्यापासून पालटायला सुरुवात होते. या थंडावलेल्या वातावरणाला, थंडावलेल्या आयुष्याला कंटाळलेले लोकं अधिरतेने स्वागत करायला तयार होतात..सगळ्यांना भावणाऱ्या वसंत ऋतूचे..

जसजसा मार्च महिना पुढे सरकत जातो तसा हळूहळू सूर्य आळस झटकून जरा जास्त प्रमाणात हजेरी लावायला लागतो. एखादी लांबलचक सुट्टी संपवून आल्यावर नाराजीनेच काम करणाऱ्या नोकरदारासारखा सूर्य कामाला लागतो खरा पण कधीतरी दोन-चार दिवसानंतर एखाद्या दिवशी दांडी देखील मारतो. पण त्याचे तेवढेही दर्शन आसपास साचलेल्या बर्फाच्या थराबरोबरच मनभर पसरलेली मरगळ वितळवायला पुरेसे असते. खुप दुखः आयुष्यात आल्यानंतर सुखाची किंमत कितीतरी पटीने वाढते, अगदी तसे उदासीन हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसंत ऋतूची सुरुवात मन मोहवून टाकते.

जरा छान ऊन पडलंय म्हणून बाहेर निघावं तर कुठल्यातरी बागेच्या कोपऱ्यात नाजूक जांभळ्या, पिवळ्या फुलांची चादर पसरलेली असते. मागच्या आठवड्यात येऊन गेल्यावर असे तर काहीच नव्हते आणि आज अचानक फुलं कुठून आली असं आश्चर्य दर वर्षी वाटत राहते. हिवाळ्यातील बर्फाची पांढरी चादर बाजूला सारून वसंतात डॅफोडिल, ट्युलिप, लिली अशी कितीतरी नावाने माहित असणारी फुलं भेटतात. तर कित्तेक नावं माहित नसणारी फुलं रस्त्याच्या कडेला, बागेमध्ये भेटतात.

जर्मनीतील पानगळीमध्ये आणि वसंत ऋतूच्या आगमनामध्ये अनेक महिन्यांचा अवधी असतो. पानगळीनंतर इथल्या झाडांना पानही असतात याचाच विसर पडू लागतो. पण वसंत ऋतूत स्वतःचा पर्णभार संपूर्णपणे टाकून अनेक महिने समाधीमध्ये गेलेली कित्तेक झाडं आता इवली इवली पानं अंगभर मिरवायला लागतात. काही झाडांना तर पानांऐवजी सुरुवातीला फक्त फुलं येतात. चेरीचा बहर हा असाच वर्षातून एकदाच येणारा..आणि फक्त पंधरा,वीस दिवस टिकणारा.. नंतर पानगळ होईपर्यंत ते झाड केवळ पानमय होऊन राहतं. ही झाडं बघितल्यावर मला नेहमी प्रश्न पडतो कि हे झाडं वर्षभर फक्त एकदा फुलण्यासाठी आसुसत असेल का? पण हे असे वर्षातून एकदाच बहरण्याचा सोहळा इतका सुंदर आणि सुखकारक असतो कि तो एक बहर डोळ्यात, आठवणीत साठवून आपण पुन्हा पुढल्या वर्षीच्या बहराची वाट पाहतो.

हिवाळ्याचा एकसुरी रंगातून सुटका करत निसर्गाची वेगवेगळ्या रंगांची उधळण सुरु असते तेव्हा आजूबाजूचा परिसर देखील त्यात रंगून जातो. कपडे, बाजारपेठा एवढेच काय तर माणसं आणि त्यांचे मूडही रंगीबेरंगी होतात. ऊन जसेजसे वाढू लागते तसे बहुतांश जर्मन लोकं थंडीने कंटाळलेल्या शरीराला मुक्तपणे उन्हाच्या हवाली करतात. आपल्याकडे पर्यटनासाठी आलेले परदेशी लोकं जरा उन्हात फिरले तरी इतके का लालचुटुक होतात हे इथल्या थंड वातावरणात राहून कळलं. या रंगाच्या संदर्भात इथे बरेचदा येत असलेला अनुभव मांडावासा वाटतो. भारतात गोऱ्या रंगाबद्दल कौतूक आणि आकर्षण आहे. काळ कितीही बदललाय, पुढे गेलाय म्हंटले तरी आजही ‘वधू गोरी हवी’ अशा जाहिराती ढिगाने दिसतात. पण इथे ऊन्हात बसून त्वचा टॅन करून घेणे हा इथल्या लोकांचा आवडता छंद आहे. आपल्याकडे कौतुकाने ‘तू गोरी झालीस’ सांगतात. तसे इथे ‘अगं किती छान टॅन झालीस’ हा कॉम्पलीमेंट असतो. माझी शेजारीण भारतातल्या प्रत्येक सुट्टीनंतर हे कौतूक करायला विसरत नाही.

वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर रेस्टारंटच्या बाहेरच्या टेबल वर बसून लोकं जेवणाचा, कॉफीचा आस्वाद घेतात. रंगीत फुलांच्या रोपट्यांनी दुकानं सजतात. सगळ्यांच्या बाल्कनीमध्ये नवीन रोपं लावण्यात येतात. लोकांचे भटकंतीचे प्लॅन तयार होतात. नदीकाठाला बसून वाईनचा ग्लास रिचवणारे लोकं दिसू लागतात. अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते. एकंदर एखादे निद्रिस्त शहर जागे व्हावे तसे वाटू लागते. वातावरणात उत्साह भरभरून वाहत असतो.

निसर्ग माणसाला शहाणा करत असतो असे म्हणतात. ऋतुचक्र, काहीच न बोलता, कितीतरी भाव प्रकट करत हे म्हणणे किती योग्य आहे हे पटवून देत राहतो. सुख आणि दुखः हे ऋतूप्रमाणे आयुष्यात येत राहणार. दोन्ही ऋतूमध्ये आनंद घेत जगण्याचा संदेश मला मोलाचा वाटतो. जर्मनीत वसंताच्या वाटेवर चेरीचा बहर पाहताना मनात भारतातील घरासमोरचा गुलमोहरदेखील बहरत असतो.. आणि आंब्याचा मोहोर आसपास दरवळत राहतो.

(लेख पूर्वप्रकाशित)

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle