हम.........दिल दे चुके सनम..

एक राजस्थान किंवा तत्सम वाळवंटी प्रदेश आहे.इथल्या बायका टिकल्या नक्षीकामाच्या गुजराती साड्या किंवा घागरे घालतात.मोठ्ठं दुमजली बंगला किंवा हवेली म्हणता येईल असं घर आहे.घराचा प्रमुख एक खूप म्हणजे खूपच फेमस गायक आहे.इंटरनेट चा जमाना नसताना पण त्याच्याकडे इटली मधून शिकायला विद्यार्थी येणं ही खूप म्हणजे खूपच कॉमन गोष्ट आहे.

या घरात विजेचे लाईट नसावे.सगळीकडे प्रकाशमान आणि भरपूर दिवे मेणबत्या आणि झुंबरे दिसतात.तसा यांच्या घराचा मूळ पोटापाण्याचा व्यवसाय हा रहस्यमय असला तरी घरात एक एनआरआय आहे, त्याने थोडीफार जमापुंजी आणलीच असेल.गायक महाराजही बरंच कमावत असावे.बाकी वेळ घरातली माणसं अखंडपणे डायनिंग टेबल वर बसून 7 कोर्स मिल खातात किंवा गच्चीत/ओसरीत बसून गाणी गातात आणि नाचतात.

घरातल्या वस्तूंसाठी एक मोठी सप्लाय चेन आहे.पण ती आपल्याला चित्रपटात दाखवली जात नाही.पडद्याना टिकल्या शिवून देणारा शिंपी, संध्याकाळी पूर्ण हवेली ची झुंबरं मेणबत्त्या आणि तेल टाकून तयार ठेवणारा नोकर, हवेली मधला कुकिंग आणि क्लिनिंग स्टाफ,सलमान खान च्या स्टे साठी इंडियन वॉर्डरोब पुरवणारा शिंपी,नाजूक टिकल्या आणि अति भडक रंगाचे रंग जाणारे कपडे नीट वेगवेगळ्या वाहत्या पाण्यात धुवून देणारी लॉंड्री आणि ड्रायक्लीन करून देणारी सर्व्हिस.घरात एक भरपूर पुस्तकं वाली लायब्ररी पण आहे.पण ती बरीच अंधारी असल्याने तिथे कोणी पुस्तकं वाचताना दिसत नाही.लायब्ररी चा मूळ वापर कॉन्फलिक्ट हँडलिंग साठी होतो.

कहाणी नायक व नायिका अनुक्रमे अखिल इटालियन उडया प्रतियोगिता आणि अखिल वाळवंटीय हुतुतु सामन्यात प्रावीण्य मिळवलेले असल्याने प्रत्येक साधी गोष्ट उडया मारणे,उलट सुलट पडणे अश्या मार्गाने करतात.एकंदर प्रदेश अति दुर्गम असल्याने नायिकेला आकाश कंदील आणायला आणि नायकाला एअरपोर्ट वरून गुरूच्या घरी यायला चालत पूर्ण वाळवंट ओलांडावे लागणे अपरिहार्य असते.(भर वाळवंटात रेशमी/जॉर्जेट/शिफॉन चा टिकल्या काम केलेला घागरा किंवा दुकानातल्या शोकेस मध्ये दिसणारे बंदगला जोधपुर घालून चालणे,धावणे, उडया मारणे विचारात घेतल्यास सप्लाय चेन मध्ये 'पुरे परिवार का डिओडरंट सप्लायर' हा महत्वाचा घटकही लक्षात घ्यावा.)

तर महाराजा, आपले इटालियन विद्यार्थी गुरु म्हाराजांच्या घरी पोचलेले आहेत.गुरुपत्नी आमच्या खानदानाशी कोणतेही दूरचे नाते बाळगून नसल्याने नवर्याची 'अहो, जरा इकडे या.कुठचा कोण पोरटा लगेच घरी कसा ठेवून घेता?इकडे आपली आगाव नंदू, तिच्या चार पाच बहिणी आणि मला आता नातं लक्षात नसलेल्या तरण्या ताठया तीन चार मुली आहेत राहायला.जरा म्हणजे जरा पाचपोच कसा बै नाही तुम्हाला?' अशी खोपच्यात घेऊन खरडपट्टी न काढता 'आलास, ये.पाहिजे तितका राहा.आमच्याकडे तसा पण खोखो आणि हाऊजी ला एक मेम्बर कमी पडतोय' या विशाल बाहूंनी त्याला घरात सामावून घेते.गुरु महाराज रेंट आणि फी बद्दल निर्वीकार पणे "50% अभी चाहिये, फर्स्ट सेशन के पहले.बाकी 50% पैसा 8 सेशन के बाद.पेटीएम नही चलेगा.क्रेडिट कार्ड पे 2% टॅक्स लगेंगा.ऑनलाइन ट्रांसफर,कार्ड चलेगा" वगैरे आमच्या कोपर्यावरच्या सी प्लस प्लस इंस्टीट्यूट च्या काउंसेलर सारखी मख्ख उत्तरं न देता "वेळ आल्यावर सांगेन" म्हणतात.इटालियन विद्यार्थि पण आमच्या सारखे "नाही नाही, आता अंदाजे एस्टिमेट पाहिजे.त्यानंतर मी ठरवतो" वगैरे दुरुत्तरे न करता ओके म्हणतो.

यापुढे एक अखंड आंधळी कोशिंबिर आहे.नंदू आणि इटालियन बंडू गाणी गाणे, खाणा खुणा, कोपरखळ्या, एकांतात भेटणे हे सर्व करत असूनही बुवा(बुवा कुक वाला बुवा नव्हे,हिन्दीतली आत्या!) सोडून कोणालाही त्यांच्यात काही असावे अशी शंका येत नाही. परत एकदा, ही मंडळी आमचे दुरचे नातेवाईक नसल्याने हे थोडे फार पटणेबल आहे.आमच्या कडे ना, बारीक लक्ष आणि शंकाच फार! आता समीर नंदूने दिलेला मधाचा चमचा 8 वेळा उडवून लावतो आणि 9 व्या वेळेला खातो या उत्कट सीन ला "शी, चिकट झाली असेल बैठक मधाने.पटपट ओल्या फडक्याने घासुन पुसली तर ठीक.नाहीतर लाल मुंग्या नक्की लागणार सकाळी" हा पीस ऑफ इन्फॉर्मेशन द्यायची गरज आहे का? त्या गोळ्यांची बरसात रामलीला पिक्चर च्या वेळी पण तेच. ती दीपिका प्रेमाने धुपाचे पात्र उलट सुलट फिरवून चांगला सिडक्टिव्ह नाच करतेय आणि आम्ही आपले श्वास रोखुन चुकुन एक ठिणगी किंवा धुपाची राख खाली पडून बेड शीट बाद होणार का हे विचार करत बसलोय !! हे नंदू आणि बंडू आमच्या कडे असते तर त्यांनी झुंबर पाडल्या पाडल्या आमच्या कडे किचन गॉसिप चे अड्डे पडले असते.

नन्दु आणि बंडू च्या प्रेमात भांडणेच फार.साहजिक आहे.बंडू हा आमच्या युरोपियन कष्टमरासारखा शब्द चाचपडणारा आणि नन्दु "मुद्द्यावर या लवकर, डोक्यावर हापटलायत काय, किती लाम्बड लावताय" वाली परखड.तर या भांडणा नंतर नंदू एक खुप वेगात धावाय पळायचा आणि बसफुगडी घालायचा नाच करते आणि वनराज भाऊ तिला पसंत करतात.इथे क्षणभर थांबुन आपण वनराज भौंच्या अति तीक्ष्ण तैल दृष्टि ला दाद देउया. तिचा नाच पाहिलेले बरेच लोक नंतर "सारखा डोळ्यासमोरुन एक मोठा आकाशी पटटा हालतोय" म्हणून डोळे चोळत होते असे ऐकणयात आले.वनराज भौंना हा आकाशी ऑब्जेक्ट धावणारा/नाचणारा मनुष्य प्राणी, सुंदर महिला आहे हे कळले म्हणजे डोळ्याचा शटर स्पीड केवढा असेल!!
PJZf_N.gif

चित्रपटात बराच वेळ हसणे नाचणे गाणे झाल्याने हा पिक्चर एका प्रसिद्ध लग्नाच्या कॅसेट ची नक्कल आहे ऐसे म्हणू नये म्हणून यानंतर नंदू ची बहिण पळून येणे, परत पळून जाणे आणि नंदू बंडू एकमेकांसोबत पकडले जाणे असा एक दुःखी पॅच आहे.यात नंदू झोकयावर बसून लहान मुले 'इथे लागलं, इथे लागलं' सांगतात तशी स्वतःच्या अंगाला बोटं लावून सांगते.आई सहनशील असल्याने "मूर्ख कुठची.थोडक्यात सांग काय काय झालंय ते." म्हणून न खेकसता नंदू च्या आत्मयाला बंडू ने स्पर्श केलाय हे समजून घेते.या सीन ला आपण महाराष्ट्र राज्यातील एका शहरात बरेच वर्ष राहिला असाल तर आपल्या डोळ्या समोर ही काल्पनिक पाटी तरळील:

"आत्मानंद मसाज आणि हेल्थ स्पा"
"आमच्या इथे प्रशिक्षित इटालियन डॉक्टरांकडून मसाज करुन मिळेल"
नुसते होल बॉडी: 500 रु
होल बॉडी विथ आत्मा टच : 700 रु
नुसता आत्मा टच विथ हॅंड लेग मसाज: ३०० रु

पण नंदू च्या आईबाबां कडे इतका सहिष्णु दृष्टिकोण नसल्याने ते वनराज शी लग्न लावून देतात.इटालियन बंडू कडे नंदू ला न भेटण्या ची गुरु दक्षिणा मागितल्याने बंडू बरीच पत्रं लिहून माहेरी इटली ला निघुन जातो.इथे आपण बंडू असतो तर "काय हो, जर मी हे असं केलं नसतं तर गुरु दक्षिणा म्हणून किती मागितले असते?" असं विचारुन आकड़ा मनाशी धरुन "अरे वा इतके वाचले" असा सुप्त विचार केला असता.

आता बंडू ला शोधायला नंदू आणि वनराज इटली ला येऊन धडकतात.इटली हा एका दिवसात आगगाड्यानी फिरून सर्व गावांचा खातमा करता येईल ऐसा देश असल्याने पत्ता, शहर का नाम वगैरे काही बरोबर ठेवले नाही तरी चालते.फोटो नसला तरी चालतो.

तश्यात आणि नंदू बाईना गोळी लागते.
साधारण प्रेक्षकाच्या मनातला संवाद असा:
"गोळी कुठे लागली?"
"मानेला"
"मग प्लास्टर आणि पट्टी हाताला का?"
"कसला शंकाखोर आहेस रे!!!ती पडताना हात आधी खाली आपटून फ्रेक्चर झाला असेल"
"पण मग गोळी ची जखम प्लास्टर च्या आधी कशी बरी झाली?मानेला अजिबात पट्टी का नाही?"

तू इथे मी तिथे करत करत फायनली वनराज समीर आणि नंदू ची भेट होते.(एकन्दर एकमेकांचे फोन नंबर किंवा हॉटेल चे पत्ते लिहून घेण्याची सवय कोणीही अंगी लावून घेतलेली नाही.आधुनिक युगात या लोकांचे अवतार "माझे सिम कार्ड बदलले.मला सगळ्यांचा नंबर पाठवा" चे ईमेल दर सहा महिन्याने करणाऱ्या, तुमच्या लँडलाईन वर एस एम एस करणाऱ्या, वाईफ1 वाईफ2 वाईफ3 ने बायकोचे सर्व आजी माजी नंबर साठवणाऱ्यांच्या रूपाने पुनर्जन्म घेतात.)

नंदू आणि बंडू भेटतात आणि नंदू त्याला मंगळसूत्र दाखवते. आता नंदू ने प्रत्येक भांडणात "मला बघायला लोक येतील आणि मी लग्न करीन" अशी तम्बी दिलेली असताना बंडू ला इतका धक्का का बसावा हे प्रेक्षकाना कळत नाही.पण नंदू परत धावत पुलावर जाऊन वनराज ला दोन पैकी एक हात निवडायला सांगते.सुदैवाने वनराज चा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागून लग्न कायम राहते.(आता जनरल नवरा बायको ही गोष्ट पुढची किमान 5 वर्ष एकमेकांना बोलून दाखवून कडाकडा भांडतील.
"तेव्हा पण लकी ड्रॉ काढायला लावून माझ्या बरोबर आलीस. दूसरी एखादी असती तर हॉल मध्ये वर गेलीच नसती.पण निखळ प्रेम नाहीच ना आमच्या नशिबि!!"
"उगीच ऐकवून दाखवू नकोस.तू मूर्खा सारखी त्या लोकांना लिफ्ट मागितल्याने हात मोडला माझा.मान पण मोडली."
"रडत बस नुसती.इतकं इटली ला फिरवून आणलं त्याचं काही नाहीच.तरी आई सांगत होती या मुलीचे नखरेच फार.नको करायला सोयरिक.बघायला गेलो होतो तेव्हा तरी धड सूधेपणाने चहा कांदेपोहे तरी करुन आणले होतेस का?"

वगैरे....वगैरे....अनेक वर्ष.

(हा माझा अति आवडता पिक्चर आहे.माझी दर वीकेंड हा टीव्ही वर पाहू शकण्याची तयारी सूर्यवंशम किंवा इंद्रा द टायगर किंवा मुम्बई की किरण बेदी दर वीकेंड ला पहाणाऱ्या भक्तांपेक्षा तसूभरहि कमी नाही.हे परीक्षण विनोदी आहे ऐसा दावा नाही.हे परीक्षण आहे ऐसा दावा नाही.या निमित्ताने चित्रपट अनेक वर्षांनी चिरफाडिस व चर्चेस, स्तुतीस परत खुला करावा हा एकमेव हेतू.)

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle