जीते हैं चल

नीरजा ह्या चित्रपटातलं 'जीते हैं चल' हे गाणं एकदा काम करता करता कानावर पडलं. आणि वाटलं, काय छान गाणं आहे, आत्तापर्यंत कसंकाय आपलं लक्ष नव्हतं गेलं ह्याकडे. साधे सोप्पे शब्द अन साधीशी चाल असलेलं पण खोल अर्थ असणारं.
आणि मग त्यावर मनात आलेलं झरझर कागदावर उतरलं, ते गाणं जसं मला भेटलं तसं खाली मांडतेय . गाणं प्रसून जोशी ह्यांनी लिहिलं आहे.

कहता ये पल ख़ुद से निकल
जीते हैं चल, जीते हैं चल जीते हैं चल

हा क्षण सांगतोय तुला, इतकं खोल खोल स्वतःमध्ये रुतून नको बसू, चल जरा स्वतःमधून बाहेर ये, बघ तरी , तुझी वाट कोण बघतंय , प्रत्यक्ष आयुष्य तुझी वाट बघतंय .

तू जन्माला आलीस तेंव्हाच त्याची आणि तुझी सोबत ठरलेली आहे. बाकी कुणी तुझ्याबरोबर असो वा नसो, मरेपर्यंत आयुष्याची साथ तुला असणारच आहे. ते तुला साथ देणारच आहे, आणि तुला फक्त एका प्रकारे त्याला साथ देता येईल. कशी? तर मनापासून जगून..जीते हैं चल

तू फक्त एकदा हिम्मत करून हो म्हणायची देर आहे, ते तर आहेच तिथे बसलेलं तुझी वाट पहात. येतस ना? जीते हैं चल.

एकदा हिम्मत केली कि जमेल तुला नेहेमीच. फार कठीण नाही काही त्यात. तुला फक्त वर्तमानात हजर राहायचं आहे. आयुष्य तुला तुझा हात पकडून पुढे नेईल. तू फक्त थोडी स्वतःतून निघून एक पाउल पुढे कर. बस्स; मग पुढे तुला सगळं सोप्पं होणार. आयुष्य असं तुझ्यापुढे पसरत , उलगडत जाईल , रस्त्याची चिंता तू करू नकोस. रस्ताच काय , तुझी साथ असेल तर आयुष्य त्यावर पायघड्याही पसरून तयार राहील. तू फक्त सामोरी जा..येतेस ना ?
जीते हैं चल...

ग़म मुसाफ़िर था जाने दे धुप आँगन में आने दे
जीते हैं चल, जीते हैं चल जीते हैं चल

दुःखाला अडखळलीस ? तुझी चूक नाही त्यात, असं होतंच. पण असं बघ , दुःख येतं, अगदी माणसाला काळोखात बुडवून टाकून , दम कोंडणारं दुःख. प्रकाशाचा टिपूसही कधी आपल्याला दिसणार नाहीये असं वाटायला लावणारं. मान्य आहे, अगदी खरंखुरं दुःख असतं ते. क्षणिकही नसतं, असतं आयुष्याला वेढून राहणारं.

पण हे जे काय आयुष्य नावाचं प्रकरण, ज्याचा हातात हात घेऊन आपण या जगात आलोय ना, ते महा वस्ताद. अश्या वेढणाऱ्या दुःखालाही ते पुरून उरतं. कसं?
तर ते शिकवतं आपल्याला, आपल्याही नकळत कि अशा दुःखानी तू थांबणार नाहीस आणि आयुष्यही. कदाचित त्या दुःखानंतरचं आयुष्य , तुला जसं आधीचं आयुष्य वाटायचं तसं नसेल. कारण असं न संपणारं दुःख पदरात पडल्यावर आता तू बदलशील, तू आता शिकशील त्या दुःखाबरोबर कसं जगायचं ते.
You cannot get over it
But now you learn how to live with it
म्हणजे तुला जे वाटतंय, कि आयुष्यच बदललंय, तर ते तसं नाही, तू बदललीस. कशी? तर पदरात पडलेल्या दुःखाला आता पदरात बांधून तू चालायला शिकलीस. पुढे जायला शिकलीस. आयुष्य तर तसंच आहे, पसरलेलं, किती अथांग माहित नाही, कुठवर माहित नाही. कदाचित नजर जाईल तिथवर, कदाचित क्षितिजासारखं, क्षितिजाजवळ गेलं कि आणखी पुढे सरकणारं.

तुला आंजारून गोंजारून पुन्हा तुझी कलती वाट ते वळती करणार. कारण असे होणे ही गरज आहे, तुझी आणि आयुष्याचीही.
As in life one can go only forwards
आलं जे दुःख तो मुसाफिर होता. आला तसा गेला. जाताना काही भेटवस्तू देऊन गेला असेल , ती स्वीकार आणि पुढे जा.

प्रकाश हळूहळू येईलच , त्याच्या प्रकाशवाटा कुणाला थांबवता आल्यात ? जीवनाचं, जगण्याच्या अपरिहार्यतेशी असलेलं घट्ट-घट्ट नातं, तो ओळखतो - आणि हे सगळं स्वीकारलेलं तुझं अस्तित्वही. तू आता प्रकाशाच्या स्वागताला तयार आहेस, अगदी थोडी का होईना असं कळल्यावर, मग येतो असा हळूचकन, आधी एक बिंदू, मग किरण , मग तिरीप, मग कवडसा असा हळूहळू तुझ्या अंगणात उतरतो. चांगले हातपाय मग पसरतो. तू येऊ दे त्याला बास्स

पण अशी कशी तू तयार होशील? प्रकाशाच्या स्वागताला ? जीवनाच्या वाहतेपणाला ? असं उरस्फोड दुःख सहन केल्यावर ? तर माहितीये, तुही करून बघितलंयेस असं - चालुदे जग पुढे, मी तिथेच थांबणार. मी वाहती होणार नाही, जग निसटू दे हातून. जगण्याला विन्मुख होऊन बघितलंयेस, पण ते जमणं कठीण. कारण असं होणं शक्य नसतं. चहूबाजूंनी जीवन तुला ओढून वाट वळणाला लावतंच. आणि मग तुलाच चालायची इच्छा होते. तर मग चलणार ना?
जीते हैं चल...

तलवों के नीचे है ठंडी सी इक धरती
कहती है आजा दौड़ेंगे
यादों के बक्सो में जिन्दा सी ख़ुशबू है
कहती है सब पीछे छोड़ेंगे

उँगलियों से कल की रेत बहने दे
आज और अभी में ख़ुद को रहने दे

ह्या मातीतूनच तू घडलीस आणि आता तुझ्या तळव्याखालची तीच मातीचीच असलेली धरा तुला खेळकरपणे विचरातेय, येतेस? पुढे जाऊया. चल हातात हात गुंफून चालू आणि इतक्या गतीनी जाऊ कि रस्ताही मागे राहील. सांगतेय जीवन जगण्यासाठी असतं राणी, असं विन्मुख बसू नकोस. फक्त अश्रू ढाळू नकोस, लढायला घाबरू नकोस. डोळे पूस, हिम्मत बांध, माझ्या हातात हात दे, खूप दूरवर जायचंय. स्वतःला कमी समजू नकोस. मी साक्षात धरित्री आणि माझीच तू मुलगी , माझ्याच कुशीमुशीतून घडलीस, ताठपणे आल्या प्रसंगाला सामोरा जा. पुढ्यात वाढलं पान नाकारू नकोस. चल मी सोबत आहे तुझ्या, निघूया ?
जीते हैं चल...

पुन्हा कुठे मागे जाते आहेस? काय शोधतेस ? आठवणींच्या पसाऱ्यात स्वतःला शोधतेयेस? तसंच करायचं असेल तर जरा वेळ कर. पण जर तू स्वतःला त्या पसाऱ्यात शोधत असलीस तर आता तुला तू तिथे गवसणार नाहीयेस. कारण तू कितीही स्वतःला आठवणींमध्ये अडकवून घेण्याचा प्रयत्न केलास तरी तू आता तिथे नाहीसंच. तिथे आहे तुझं भूतकाळातलं प्रतिबिंब, ज्या आरश्यातून तू ते बघशील तसंतसं तुला दिसणारं, प्रतिबिंब. तू तर आता जिथे आहे तिथेच खरी आहेस. तू पुढे निघून आलीयेस. कितीही तिथे रमलीस तरी तुला पाय आता तिथे अडकवून घेता येणार नाहीये. कारण त्या आहेत आठवणी. असं झालं असतं तर आणि तसं झालं असतं तर, हा खेळही फार वेळ खेळता येणारा नसतो. आणि हे तुलाही कळतंय. बघितलंस का? त्या खुद्द आठवणींमधलाही जो काही जिवंतपणा आहे, रसरसत्या जीवनाची अजूनही उरलेली जी खूण आहे ती तुला सांगतेय - खुद से निकल. निघ ह्या सगळ्यातून बाहेर, आठवणींमधे अडकायची काहीच गरज नाही, कारण त्यातून जे काही मिळालंय ते तुझ्यात आहे, तुझ्या बरोबर आहे, मग जे तुझ्यातच आहे ते काय शोधतेस बाहेर? सगळं मागे सोड आणि पाउल पुढे वळव.
तुझ्या ओंजळीतून, घडून गेलेला भूतकाळ, अलगद जशी समुद्रकिनाऱ्यावर वाळू हातून वाहून जाते, तसा वाहून जाऊ दे. ज्याला केवळ पुढे जाणं, चालणंच माहिती आहे, तो काळ कसा धरून ठेवशील तू? कालचक्र तर उलट फिरत नाहीच आणि तुही त्या चक्राशी बांधिल आहेस त्यामुळे तुलाही त्या चक्राच्या गतीनुसार पुढेच जावं लागेल. आज आणि ह्या आताच्या क्षणात स्वतः राहूदे . तिथे खरी तू आहेस.
जीते हैं चल...

एक टुकड़ा हसीं चख ले इक डाली ज़िन्दगी रख ले
जीते हैं चल, जीते हैं चल जीते हैं चल

ठेवलास पाय आठवणींच्या जंजाळातून बाहेर? सोडवलंस स्वतःला स्वतःमधूनच ? आता तयार आहेस का जरा आयुष्याकडे नव्याने पहायला ? स्वतःचीच नवी ओळख करून घ्यायला ?
फार कठीण नसतं गं ते. साधं सोप्पं असतं. फक्त जीवनाला , ते जगण्याला हो म्हणायचं असतं , थोड हसायचं - थोड रडायचंही असतं. रडतानाही एकंच लक्षात ठेवायचं असतं .
Facts are easy to process
Add emotions in them
and now the result is difficult to process

मग अशी आयुष्यात घोळून घोळून प्रगल्भ झालीस की, रडण्याचंही हसणं करून दाखवायची हिम्मत येईल तुझ्यात. तुझ्यात किती क्षमता आहे, हे तुलाच माहिती नाहीये.
मोकळेपणी जग, मोकळेपणी हस, जग तुझंच आहे. आणि हे करता-करता, शिकता-शिकता, जीवनाचं उलुसं रहस्य तुझ्या अंतरीच्या कोंदणात अल्लद ठेवून दे.
जीते हैं चल...

हिचकी रुक जाने दे सिसकी थम जाने दे
इस पल की ये गुज़ारिश है
मरना क्यूँ जी लेना
बूंदों को पी लेना
तेरे ही सपनों की बारिश है

पानियों को रस्ते तू बनाने दे
रौशनी के पीछे ख़ुद को जाने दे

आता जीवनातली उथल-पुथल थांबू दे. जे क्षणिक असतं त्याला सर्वव्यापी, सर्वकालीन समजू नको. शांत हो, आयुष्य आपल्याकडून काही मागत असेल ना तर ते हे -
Be calm, be present.
आहे ह्या क्षणात रहा. जिवंतपणे रसरसून जग, दुःख जग, सुख जग. जीवन जग. मरत मरत जगण्यात काय हशील? जे आहे त्याचा स्वीकार कर. रडावसं वाटलं तर रड, अश्रुंचाही स्वीकार कर. पण ते अश्रू आणि त्यामागची कारणं समजून घे आणि त्यांचाही स्वीकार कर. आणि पुन्हा उभी रहा. सगळं तुझ्यापासूनच सुरु झालं आहे. तूच मनात ठरवलेला, तुझ्या स्वप्नातला रस्ता जरा, तुझ्या दृष्टिने वाकडा गेला आणि तू सैरभैर झालीस? श्वास संपेपर्यंत सोबत करण्याचं आश्वासन आणि मैत्र आयुष्याचं आहे. रस्ता तुला हवा तसाच असेल असं आश्वासन कुणाचही नाही. तूच ठरवलंस आणि ते मोडल्यावर तूच मोडलीस? - तेरे ही सपनों की बारिश है

आता मात्र वचनच दे, सतत प्रकाशवाटा शोधण्याचं, प्रकाशाच्या मागे जाण्याचं, आयुष्याला हो म्हणण्याचं, पाउल पुढेच पडण्याचं. आजूबाजूचं तुझ्या हातात नाही. काय जे घडतंय ते घडणारच आहे. ते घडू दे , त्या सगळ्याला तू केवळ साक्ष रहा. सगळ्या घटना, परिस्थिती , एकात एक गुंफून जो काय पट तयार होईल तो होईल. - पानियों को रस्ते तू बनाने दे

रौशनी के पीछे ख़ुद को जाने दे
तू मात्र ह्या सगळ्यातून स्वतःला सोडवून, मुक्त करून, प्रकाशाच्या प्रवासाला लाग.

कहता ये पल ख़ुद से निकल जीते हैं चल, जीते हैं चल जीते हैं चल

चल मग बघ , आयुष्य तुझी वाट बघतंय. मोकळा श्वास घ्यायचं ठरवलंस ना? जगायचं ठरवलंस ना? स्वतःला भेटायचं?
जीते हैं चल ?

चल तर मग - जीते हैं चल .

-देवयानी गोडसे

/* */ //