परोमा - भूमिकांच्या पलीकडे स्त्रीत्वाचा शोध

चित्रपट सुरू होतो तोच पुजोबाडीच्या उत्साहित करणार्‍या, प्रफुल्लित वातावरणात, तयारी चालली आहे . लगबग, गडबड संगीत... सुस्नात, सिंदूर लावलेल्या लाल काठाच्या साड्या नेसलेल्या वंगललना कामात मग्न आहेत. मुले धडपडत आहेत. बाप्ये गप्पा मारत बसले आहेत. ह्याचे एक केंद्र आहे ती मूर्ती आणि दुसरे आहे काकीमा/ बौदी परमा चौधरी, धाकटी सून. म्हणजे आपली राखी - इतके सोज्वळ खानदानी सौंदर्य, त्यातही फारशी जाणीव न ठेवलेले. घरकामात, पूजेच्या तयारीत मग्न.

ह्या घरगुती माहौल मध्ये आलेला एक सर्वस्वी परका - राहुल - फोटोग्राफर ,तिच्या सौंदर्याने मोहित होतो व एक फोटो फीचर करायची रीतसर परवानगी घेतो. परमा प्रथम बावचळते.पण मग हो म्हणते.

घरात नवरा सर्वोच्च स्थानावर, त्याही वर सासुमा, व मग मुले ह्यांचे करण्यात स्वत्वाकडे दुर्लक्ष झालेली ही चाळीशीची गृहिणी. तिचे माहेर असे तसेच. एक लग्न झालेला भाउ आणि म्हातारी आई.- सुनेच्या राज्यात दबलेली.

नवरा रात्री दिवा बंद करतो तेव्हा ती चटकन ऑटोमेटेड रिस्पॉन्स असल्यासारखी त्याला सामोरी जाते. ( अचानक सापडलेली सतारीची नखी विसरून) मुलांचे सासूचे करण्यात, कधी मधी किटीपार्टीला जाण्यात दंग.

राहुलचा कॅमेरा तिला दशदिशांनी सिड्यूस करतो. फोटो प्रक्रियेत ते दोघेही मनाने शरीराने जवळ येतात. तिच्या मनाला पंख फुटतात. पण झेप घेण्याआधी तिचा हा विवाहबाह्य संबंध घरच्यांना कळतो. मग तिला रिजेक्ट केले जाते. मुले नवरा सासू, घरचे नातेवाईक तिला मखरातून काढून फेकून द्यायला बघतात. त्यांना तिची घृणा, तिरस्कार वाटतो. नवरा तर इगो दुखावल्याने अगदीच संवाद तोडतो.

पण तिला अपराधी वाटत नाही. उलट् ती स्वतःशी जडलेले नाते जोपासू बघते. नोकरी करून चरितार्थ चालवायला जमेल का ते चाचपते. शरीराच्या नव्या जाणिवा
पुसून न टाकता पुढे जाते. इतकी बेसिक ही कथावस्तु.

चित्रपटाचे वेगळेपण आहे त्याची ट्रीटमेंट. एका संवेदनशील स्त्री दिग्दर्शिकेने बनविलेला जेनिफर ह्या आपल्या मैत्रिणीला अर्पण केलेला चित्रपट. परमेचे व्यक्तिमत्व तिच्या कौटुंबिक सामाजिक भूमिकेत इतके मिसळून, हरवून गेलेले असते कि ती देखील आपले स्वत्व विसरून जगत अस्ते आणि सुखी देखील दिसते. राहूल च्या निमित्ताने शरीर मनावर जमलेली
सुखवस्तू धूळ उडून जाते व आतले कलासक्त, हसरे मन
झेप घेउ पाहते. ती असे करू पाहते आहे ह्या शक्यतेनेच नवर्‍याचे विश्व हादरते. तो तिला हातखर्चाला जास्तीचे पैसे देउन समेट घडवू बघतो. पण आधी तिला वेश्या म्हणून त्याने नाते काय लेव्हलला आहे ते स्पष्ट केलेच आहे. हा सीन बघवत नाही.

एका अलिप्त भावनेने ती हे सर्व नाकारते व स्वतःचे जीवन जगू पाहते. त्यात तिला राहूल आला तरी आता फारसा फरक पडणार नाहीये. त्या सुखद पण अल्पजीवी नात्याने तिला एका वेगळ्या शक्यतेकडे धाडले आहे. आधीच्या मजबूत बांधण्या तोडमोड करून.

राखीने ह्यात अतिशय सहज अभिनय केला आहे. अप्रतिम दिसते. आपल्यालाही प्रेमात पडायला होते. काय ते सुरेख लांब केस, ते डोळे आणि ते कुंकू. ते हसणे, त्या सुती साड्या आणि तो गृहिणीचा वावर. ते राहूल म्ह्णून चित्कारणे. ते बिलोरी हसणे.

आजच्या मानसिकतेतून बघायला गेले तर अनजान माणसा बरोबर कोणी इतक्या लिबर्टीज घेणार नाही. दूर फिरायला जाणे, काय छापणार ह्या बद्दल करार नसणे, फोटो काढताना तिसरे कोणीच नसणे. पण ती काही ट्रेन्ड मॉडेल नाही.

राहुलच्या सहवासाची चटक लागल्यावर तयार होउन जाताना सासूने/ मुलीने हटकल्यावर ती बावरते, बिचकते पण तरीही
जातेच. एक प्रकारे इच्छेची बळी. आपले कुटुंब खरे तर आपले नाहीच ही तिला जेव्हा जाणीव होते तो खरा मुक्तीचा क्षण. मग पुढे राहूलची साथ असो वा नसो. हाच मुद्दा लंचबॉक्स चित्रपटातही आला आहे १९८४ मधली मानसिकता, नैतिकतेच्या कल्पना आता जरा विचित्र वाटतात.
वैयक्तिक स्वातंत्र्या बाबत तर आपण माय चॉइस हे वळण घेतले आहे. तीस वर्शापूर्वी आलेल्या ह्या चित्रपटाने भद्रलोक
मानसिकतेला तडा गेला असेल कि नाही माहीत नाही पण तो एक सशक्त प्रयत्न तरी आहे.

बिग बॅड इंटरनेट. यूट्यूब वर भाग सहा, सात आठ चे व्ह्यूज आहेत २ ४ ते ८ लाखाच्या घरात. फॉर द इंटिमेट सीन्स. :angry: बाकी भागांचे हजाराच्या घरात. शेवटच्या १२ व्या भागात कथेची संगती पूर्ण होते. ती शोधत असलेले झाडाचे नाव तिला सापडते. मध्यमवर्गीय गृहिणीच्या जीवनात घडणार्‍या नाट्याचे साधे चित्रण. जीवन बदलून टाकणारे मोहाचे क्षण...
त्यांना हो म्ह्णायचे कि नाही हा आहे खरा हर चॉइस.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle