मराठी भाषा दिन २०१८ मध्ये स्पर्धकांनी केलेल्या कविता

मैत्रीण.कॉमने मराठी भाषा दिन २०१८ निमित्त घेतलेल्या स्पर्धेतील हा एक टप्पा होता.

स्पर्धेची रूपरेषा :

१. खाली एकूण १५ शब्द दिले आहेत.
२. या शब्दांमधून निदान ३ शब्द वापरून तुमच्या गटाला एक काव्य रचायचं आहे.
३. हे काव्य आरती, अभंग, भावगीत, मंगलाष्टक, श्लोक, ओवी यापैकी एका प्रकारात मोडणारं असावं. काव्य गंभीर, भावूक, विद्रोही, विडंबन अथवा विनोदी कसंही चालेल. यमक जुळेल असं हवं आणि काव्यातून काही अर्थ निघावा अशी अपेक्षा आहे.
४. काव्य किमान एक कडव्याचं असावं आणि बाकी कितीही मोठं असेल तरी चालेल.
५. काव्य तयार झाल्यावर काय करायचं? - तुमचं काव्य तयार झालं तरीही लगेच धाग्यावर टाकू नका. धाग्यावर टाकण्यासाठी आम्ही वेगळा वेळ देत आहोत. फक्त त्याच वेळेत काव्य, त्याखाली तुमच्या गटाचे नाव आणि गटातील तीनही आयडींची नावं लिहून धाग्यावर टाकावे.
६. काव्य धाग्यावर लिहिण्याची वेळ : भावेनु सोमवार, २६ फेब्रुवारी संध्याकाळी ७.०० ते ९.०० दरम्यान.
७. एकदा धाग्यावर चढवलेले काव्य नंतर बदलता येणार नाही.
८. गुण कसे ठरतील? : आम्ही दिलेल्या १५ शब्दांपैकी जितके जास्त शब्द तुम्ही तुमच्या काव्यात योजाल तितके गुण जास्त मिळतील. शिवाय काव्य कितपत जमले आहे हे ठरवून गुण देण्यासाठी मैत्रीण टीममधील तीन सदस्य परिक्षक म्हणून काम करतील.

काव्यात वापरण्याचे शब्द आहेत :
जीवन, पर्णभार, अर्घ्य, धुंदी, कोष, रत्नजडीत, सखया, शुभ्र, कोवळे, अनिमिष, स्वतंत्र, शृंखला, रंगत, मृदू, रहस्य, मनस्वी
__________________________________________________________

स्पर्धकांच्या कविता खालील प्रमाणे आल्या :
__________________________________________________________

जिल्हे टीम- चर्चा, तन्वी आणि चिन्नु

अर्घ्य

धुंदी रत्नजडीत नभास सखया
शुभ्र चांदणी रंग नहाली
रहस्य कोवळे दाटता कोषी
पुष्प अन् पर्णभार जाहली

स्वतंत्र बेभान होते जीवन
अनिमिष नजर मनस्वी झाली
मृदु शृंखला तुझ्या प्रीतीच्या
विरक्त मनाला रंगत आली

सरसर शिरवे बरसती रंग
अंग अधीर, ये लाजही गाली
समाव जीवाला, ये सखया!
ही कुडी तुज मी अर्घ्य वाहिली!
__________________________________________________________

गट क्रमांक 7
आयडी -विनि,शब्दाली,विनार्च
कविता प्रकार मराठी भावगीत
शीर्षक -सखया रे

मराठी भावगीत
रत्नजडीत हा मुकुट जरी।
रुढींची शृंखलाचं ही माझ्या शिरी।
प्रीतीची ओढ लागता उरी।
बावरले कशाने,सखया रे।।1।।

तू अनिमिष नेत्रांनी पाहता मजला।
तुटली मनीची अदृश्य शृंखला।
स्वतंत्र अर्थ जीवनास दिधला।
जन्मले नव्याने, सखया रे।।2।।

स्पर्शता तू शुभ्र निशिगंध होऊन ।
बहरले कोषमुक्त फुलपाखरू बनून।
रंगत जाई इंद्रधनू मनात उमटून।
हरपले अशाने, सखया रे।।3।।

प्रातःसुर्यासम मुखमंडल तव पाहूनि।
वाटे अर्पावे जीवन तुज, अर्घ्य देऊनि।
हृदयीचे रहस्य हे सांगता ,ओलावते पापणी।
लाजते स्वप्नाने, सखया रे।।4।।

मृदू तरुलतेपरि कोवळी मम काया।
कशी साहेल विरहाचा पर्णभार ,प्रिया।
हृदय ना मजपाशी,धुंदीत सदैव तुझिया।
उरले न माझी, सखया रे।।5।।

मनस्वी मीरा तुझी, आता बावरते।
कलंदर तू,का मी तुला साहते।
वेडी विरहिणी केवळ गाण्यात उरते।
गाईन निरंतर,सखया रे।।6।।
__________________________________________________________

टीम मराठी पक्वान्न - मृनिश, दिपाली, मंजूडी

रक्तीमा तुझ्या गालावरी
करितो घायाळ हृदया
कोण घाली शृंखला
मनस्वी तुझ्या बोलण्या

अलवार मृदु हास्य तुझे
उलगडीतसे रहस्या
जादू करती मनावरी
शुभ्र दंत जणू कुंदकळ्या

कोवळे ओठ चुरडशी
गोडमिट्ट चुंबनांनी प्रिया
मत्त तुझ्या बाहुत
चढते रंगत प्रणया

नको कापूस नको रेशीम
पर्णभार पुरे शेजी आपुल्या
गुंतल्या नजरा अनिमिष
आता शब्द नको बोलण्या

अर्घ्य दिले जीवनाचे
धुंदी चढली सखया
राहू स्वतंत्र कोषी
रत्नजडीत रात्री अश्या
__________________________________________________________

नक्षत्रे गट - महुआ, प्राजक्ता, शकून
प्रकार- भावगीत

सांग सखया, तुजवीण काय करु...

उषःकालच्या कोवळ्या प्रभेला कशी सावरु
रत्नजडित मनस्वी त्या जलधाला कशी आवर ||१||

चंचल, स्वतंत्र, अथांग जीवनाला कशी पार करु
भरकटणार्या, धुंदावणार्या कायेला कशी तारु ||२||

तुजसंग रंगणाऱ्या निशेला कशी विसरु
तुजवीण शुभ्र, निष्प्रभ रातीला कशी मोहरु||३||

अनिमिष नजर तुझी कुठे किती धुंडाळु
स्मृतीकोष विणणार्या शृंखलेला कशी अंताळु ||४||

सप्तपदीचे रहस्य गुणगुणार्या तरंगिणीला कशी स्थिराऊ
तुझा परिमळ घेऊन येणाऱ्या मरुताला कशी सामाऊ ||५||

सारंगा,तुजवीण या वर्षेला कशी स्विकारु
अर्घ्याच्या संचित पुण्याला कशी नाकारु ||६||

तुला स्मरताना हिरवा पर्णभार कशी लेऊ
तुझ्यामाझ्या क्षणतेजाची उतराई कशी होऊ ||७||

सांग सखया,
तुजवीण हे मृदु, तरल स्वप्न कसे बघु
सांग जीवना,
तुजवीण कशी जगु ||८||
__________________________________________________________

नवर-मुलगी स्वतःच्या लग्नात स्वतः ही मॉडर्न मंगलाष्टकं म्हणत्ये :biggrin:

--- गट : मराठी संगीत नाटक - रायगड, जयु, प्राजक्ती

|| शुभमंगल सावधान||

लग्नाचा हा आपुल्या आज दिस असे
चार उपदेशामृत तुला पाजते, कसे!

वाटे तुला आज झालास तू स्वतंत्र
हो निश्चिंत, आता चाले माझे तंत्र

सोडोनी दे तो आपुला एकाकी कोष
अथवा ओढवून घे माझा रोष

आहेस तू माझा जीवन-पर्णभार
आणि मी तुझी भार्या, कर्णधार!

ही रंगली, आपुल्या लग्नाची रंगत
चल लवकर, बघ लागली पंगत

जीवनात तुझ्या आले मी रे सखया
बनूनी पार्टनर, तुझ्या सवे खावया!

मिळून खाऊ ते कोवळे मटण-सामिष
दीपून बघतील सारे नेत्रे अनिमिष!

दिसते जरी डोळ्यात तुझ्या धुंदी
थांब थोडे, पिऊ दे मज शुभ्र-बासुंदी

बापुंनी जरी केले कन्यादान, देऊन अर्घ्य
फेडशील आता लग्नातले तूच त्यांचे सारे कर्ज

अडून बसते, हवी मज रत्नजडित मेखला
पडता पायी विवाहाची ही शृंखला

खात्री लोकां,पत्नी मी मृदू-मनस्वी
रहस्य जपता मनी होशील तू यशस्वी

शुभमंगल सावधान!
--- गट : मराठी संगीत नाटक - रायगड, जयु, प्राजक्ती
__________________________________________________________

गट क्रमांक ८
मराठी व्याकरण प्रयोग गट - निलाक्षी, मंजूताई, नीलम
प्रकार - भावगीत

जीवनगाणे

जीवनगाणे नको जहाले, जर्जर वृक्षापरी
पर्णभार मनीचे गेले सुकूनी, शरीर अधांतरी
कोषात गुरफटूनी गतस्मृतीच्या, धुंदित रहावे सदा
रत्नजडित कोंदणात, जसा हिर्‍याला सोन्याचा वेढा
सूर्यकिरण कोवळे पसरती, मनोहर अंबरी
रंगत येई जीवनात, फुटता नवपालवी
कळ्या डोलती अंगावरती, फळाफुलांची लयलूट
पानोपानी सावल्या झिरपती, तरीही बंंध अटूट
रात्र येई घेवोनी, शुभ्र फुलांचा सडा
अनिमीष नेत्रांनी, साठवावी ती रहस्यमय चंद्रप्रभा
वेळ निघोनी चालला, तोडीत काळाच्या शृंखला
खग विहरती आसमंती, न ये पुन्हा भेटिला
तनावर दाटल्या सुरकूत्या, अर्घ्य देता सुर्याला
सखयांनी उघडली कवाडे, जपा मृदूमानसीला
स्वतंत्र या जीवाला, ओढ शेवटाची
मनस्वी या मनात, राहे गोडी अपूर्णतेची
नको आठवणी गतकाळाच्या, मना यातना कठिण
प्राप्तकाळ हा जगून घ्यावा, जतन मनाच्या कुपीत
__________________________________________________________

नद्या गट : नताशा, संघमित्रा, श्रद्धा
काव्यप्रकार : ओवी

ऐक राणी...

'मैत्रीण'नामे एक संस्थळ | जमल्या मैत्रिणी पुष्कळ |
खेळती अनोखे खेळ | म भा दिनानिमित्त ||

पहिले कार्य पार पडले | आयोजकें मग शब्द दिधले |
गुंफूनिया शब्द सगळे | रचा काव्य ऐसे सांगती ||

ऐका आटपाट नगरीची ही कहाणी | लावण्यखणी जिथली राणी |
सुमधुर जिची वाणी | कर्तव्यदक्षही असे जी ||

अगदी लहान वयात | दूरदेशी आटपाट नगरात |
देण्या राजासी समर्थ साथ | लग्न करुनी आली असे ||

राणी विद्याप्रवीण | तिला कलांचीही जाण |
माहेरची शिकवण | राज्यकारभारा योग्य अशी ||

राजास तिचे प्रेम भारी | लाड पुरवी नाना परी |
आभूषणे अनेक, वस्त्रे भरजरी | नेहमी तिला देत असे ||

दिसे अप्रतिम देखणी | रत्नजडित आभूषणे लेउनी |
तयांच्या भारे वाके राणी | पर्णभारे वाके जैसा तरु||

राजाचा शब्द प्रमाण | त्याखालोखाल राणीचा मान |
दरबारी महत्त्वाचे स्थान | होते कायम तियेचे ||

असे सगळे सुख असुनी | भूवरीच्या त्या नंदनवनी |
राणी उदास असे मनी | मनी दुःख करीतसे||

राजप्रासाद ते दरबार | दिवसभर राज्यकारभार |
आणिक पतीसौख्याचा विचार | यात चालले जीवन म्हणे||

निसर्गात रमे तिचे मन | मोकळी हवा, निळे गगन |
प्रासादाबाहेर परि पडणे कठीण | राजाज्ञेशिवाय ||

एके दिनी राजा जाण | पाहुनी तिचे म्लान वदन |
प्रिये का गे अशी खिन्न? | पुसता झाला प्रेमभरे ||

सर्वगुणसंपन्न तू माझी राणी | उदास तुझी चर्या बघुनी |
बरे न वाटे मजला मनी | सांग काय प्रिये करू?||

कारभाराचा शीण सखया | मनातून दूर करावया |
वाटे ऐसे मम हृदया | दूर जावे कोठेतरी ||

शुभ्र, कोवळे ऊन ऊबदार | घ्यावे पांघरून अलवार |
मृदू , मखमली हिरवळीवर | पहुडावे आनंदे ||

राजा बोलला प्रसन्नवदनी | एवढीच ना तुझी मागणी |
आपण त्वरित जाऊ वनी | इच्छा तुझी पुरवावया ||

सारा जामानिमा करुनी | सोबत निघे लवाजमा घेऊनी |
राणी खट्टू होई मनी | परि आनंदी भासवीतसे ||

सेवकांनी पुढे जाऊन | उभारल्या कुट्या जाण |
कशाचीही पडू नये वाण | म्हणुनी राहती दक्ष ते ||

येउनी पोचती पौर्णिमेच्या रात्री | प्रवासाचा शीण गात्री |
तरी राणी अनिमिष नेत्री | कौतुक सृष्टीचे पाहतसे ||

कोष जया अंतरी सुगंधी | मोगऱ्याने चढे धुंदी |
आम्रवृक्षाची वाकली फांदी | मोहोर अंगांगी मिरवीतसे ||

मोगऱ्याला ऐसा बहर | करिती राणीचा शृंगार |
माळा लेवविती अपरंपार | दासी त्या लगबगीने ||

चांदण्यात बैसली पंगत | मधुर वाद्यांची संगत |
आणी भोजनास रंगत | गायन राजगायकाचे ||

भोजनोत्तर पाचारण केले | समस्त दरबाऱ्यांसी भले |
नृत्यगायन, हास्यविनोद चाले | राजाचे मन रिझवावया ||

राणीचे न रमे मन | त्या कार्यक्रमात जाण |
आली कुटीत परतून | निद्रा ती घ्यावया ||

राणीस निद्रा येईना | परांची गादी सुखवेना |
कुटीत मुळीच राहवेना | बाहेर पडे चोरपावली ||

कुणी न येतसे बघून पाठी | राणी येई नदीकाठी |
तरूंची गच्च झाली दाटी | होती एक्या अंगाला ||

झुळझुळ वाहे जळ | चांदण्यात चमके निर्मळ |
त्यात एका खडकाजवळ | निजले होते कुणीतरी ||

राणीस वाटे बहुत नवल | पाही जाऊन हलकेच जवळ |
शिसवी काळी काया नितळ | झोपली होती एक स्त्री ||

राणीस अतीव आश्चर्य जाहले | हलकेच तियेला जागे केले |
'कोण तू, कोठील?' पुसले | एकटीच कशी आलीस येथे?||

मलीन वस्त्रे अंगावरती | तू लंकेची पार्वती |
दारिद्र्याचा घाला तुजवरती | सांग पडला असे का?||

अथवा पतीने तुज त्यागिले?| माहेरहि नाही उरले |
दैवाने हिरावून घेतले | घर तुझे असे का? ||

राणीचे प्रश्न ऐकुनी | हास्य करी ती रमणी |
राहते मी येथेच वनी | हेचि माझे घर असे ||

फळे, कंदमुळे, रानमेवा | मनास वाटेल तितुका खावा |
नंतर येउनी आराम घ्यावा | नदीकाठी खडकांजवळ||

हेचि असे माझे जीवन | मजला नको कोठलेही सदन |
जवळ जरी नाही धन | अंतरी समाधान वसे मम ||

राणी म्हणे, हे सुंदरी | तुझा हेवा वाटे अंतरी |
मुक्त, मोकळ्या पक्ष्यापरी | तुझे हे जीवन असे ||

काय याचे रहस्य जाण | मज सांगावे समजावून |
मजला हे समाधान | लाभू शकेल कवणे रीती?||

हासोन वदे ती तरुणी | तुजला हे शक्य नसे राणी |
ऐकोनि तिची अशी वाणी | राणी विनवी परोपरी ||

हे हार, पैंजण, ही मेखला | आभूषणे नोहे, ह्या तर शृंखला |
राजनियमांचे बंधन तुजला | व्यग्र राहसी पारतंत्र्यात ||

मी मनस्वी , मी स्वतंत्र | 'मनाचे ऐका' हाच मंत्र |
मग उरे ना मनात खंत | समाधान भरून राहतसे||

तिच्या या प्रसादवचनी | राणी शांतावली मनी |
अश्रूंचे अर्घ्य तिच्या चरणी | अतीव प्रेमें अर्पियले ||
__________________________________________________________

गट ३ शिवरायांच्या राण्या : सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई अर्थात माणिकमोती, वंदना आणि प्राची

काव्य प्रकार- श्लोक आणि ओव्या

आम्ही शिवरायांच्या राण्या, अमुच्या तोंडून ऐका शिवरायांच्या कहाण्या! 'मराठी भाषा दिन' निमित्ताने ज्यांच्या पराक्रमामुळे मराठी जिवंत राहिली त्या शिवरायाना आमच्याकडून हा काव्यरूपी मुजरा:

नाव: "अमुचा शिवबा छत्रपती"

पहिली माझी ओवी, कथा ऐका सांगते।
पुण्यनगरी प्रांती, जिजाऊ वस्तीस येते।।

दुसरी माझी ओवी, काय सांगू माझी व्यथा।
यवनांनी उच्छादली, माझ्या गावची गं प्रजा।।

तिसरी माझी ओवी, ऐका नवल वर्तते।
"मनस्वी" माय जिजाऊ, दुःख मनीचे जाणते।।

चवथी माझी ओवी, शिवबाची अलाबला घेई।
लेकरू गं रयतेसाठी, डोंगर दर्यांत जाई।।

पुढे जे घडले त्याने शिवराय मराठी जनांचे दैवत झाले:

"कोवळे" वय परी उरी।
स्वराज्य स्वप्न वसे।।
तू "जीवन" "अर्घ्य" अर्पिले।
प्राणाची तमा नसे।।१।।

झुगारुनी "रत्नजडीत"।
त्या दास्याच्या "शृंखला"।।
"मृदु"हृदयी जाणता राजा।
रयतेचा तया कळवळा।।२।।

त्यासी एकच "धुंदी" मनी।
मेळवावा तितुका मराठा।।
मिटवावे दुःखांचे "कोष"।
खुल्या कराव्या सौख्य वाटा।।३।।

हरेक मावळ्यातील तू।
चेतविलास सैनिक सच्चा।।
हे सुराज्य व्हावे ही तर।
साक्षात 'श्रींची इच्छा'।।४।।

योजूनी कावा गनिमी।
"रहस्य" विजयाचे दाविले।।
"स्वतंत्र" स्वराज्य करोनी।
बलशाली शत्रू जिंकले।।५।।

अशी सुरू झाली स्वराज्याची घोड़दौड. जात्यावरच्या ओव्या अभिमानात न्हाल्या. पुढे काय झाले, ऐकायचे आहे?

पाचवी माझी ओवी, सरू लागे काळरात।
उजळते गं अंगणी, पुन्हा "शुभ्र" दीपवात।।

सहावी माझी ओवी, बळीराजा सुखावला।
"पर्णभारे" शेतात गं, वड पिंपळ वाकला।।

सातवी माझी ओवी, अंगणी खेळती लेकी बाळी।
जगण्यास स्वराज्यानं, "सखयांनो" अशी "रंगत" आली।।

आठवी माझी ओवी, लाभले आम्हा छत्रपती।
"अनिमिष" लोचने ही, हृदयी रूप साठवती।।

गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!! हर हर महादेव! जय भवानी, जय शिवाजी!!
__________________________________________________________

टीम ४ - वृत्तं
- रश्मी, स्वाती२, नयना
-----------------
जीवन रत्नजडित शृंखला सखया
शुभ्र, मृदू मायेचा कोष विणीत
पर्णभार दिवसांचा अविरत
मनस्वीपणे सळसळत
रंगत धुंदीत कोवळे मन

रहस्य मायेचे कोणास विदित
स्वतंत्र होण्या आत्मा तळमळीत
चक्रव्यूह तो अभिमन्यूचे
प्राणअर्घ्य मागतो
__________________________________________________________

टीम १० : पारंपरिक अलंकार
- मौनी, मृणाल, लीलावती
--------------------------------
रहस्यमय किती तुझे ते मनस्वी हास्य ।
कोवळी धुंदी त्याची माझ्या जीवनावर ।
जाईन गुंतून मी तुझ्या अनिमिष नेत्रांत ।
सखया, आयुष्य होऊन गेले रत्नजडित ।।
__________________________________________________________

गट -६
मराठी पारंपारिक गीतप्रकार - अभंग, ओवी, पोवाडा -
नंदिनी, मोनाली, उजू
वापरलेले शब्द - १६

प्रकार - आरती
चाल - आरती ज्ञानराजा

शिर्षक - आरती सखयाची

आरती तुझी सखया, तुची खरा सखा माझा ।।धृ।।

रत्नजडीत सिंहासनी, तुला नाही बैसविले
तरी तू रागवेना, सर्वां आपलेसे केले ।।१।।

आरती तुझी सखया

जीवन धुंद असताना, तुला नाही आठविले
तरी ते रंगवुनी मग तू कोषातच नेले ।।२।।

आरती तुझी सखया

कोवळे जे पर्णभार, तेही आपलेसे केले
स्वतंत्र तुझा तू रे, ना कोणाचे कधी ऐकले ।।३।।

आरती तुझी सखया

मनस्वी जगताना, मी तरी रहस्य हे जाणिले
तूच एक माझा सखया, सत्य हे मी मानिले ।।४।।

आरती तुझी सखया

जरी तू माझा सखया, अर्घ्य तुला ना वाहिले
भेट तुझी माझी होईना, तरी का मी सुखावले ।।५।।

आरती तुझी सखया

शुभ्र तुझी नजर पहाता, काया धवल झाली,
अनिमिष दिशांतुनी, तुझी सादही आली ।।६।।

आरती तुझी सखया

भेट तुझी होता, शृंखला साऱ्याच तुटतील
मृदू वाटेल तुझी कूस , धुंदी वेगळीच जाणवेल ।।७।।

आरती तुझी सखया

तूच एक माझा सखया, तूच आहे माझा सर्वदा
हीच आहे खरी स्थिती, सर्वांसी मृत्यू येतोच शेवटी ।।८।।

आरती तुझी सखया

आरती तुझी सखया, मृत्यू तूच माझा सखा
आरती तुझी सखया

__________________________________________________________

गटाचे नाव : ऋतू
गीतप्रकार : विडंबन
वापरलेले शब्द : १६
शीर्षक : झिंगाट मभादि biggrin

हे... उरात होतंय धडधड 'धुंदी' डोळ्यांवर आली
काल मैत्रिणवरती 'शृंखला' ही मभादिची आली
आता 'स्वतंत्र' झालोया आणि 'मनस्वी' आहोत ना
मग मैत्रिणीसाठी सोडून 'सखया' इथवर आलोया
केलं पिंग पिंग पिंग पिंगाट..
पिंग पिंग पिंग पिंगाट पिंग पिंग पिंग पिंगाट ||१||

आता 'अनिमिष' डोळं माझं स्क्रीनवर लागलं
स्पर्धेच्या पानांना सारखं रिफ्रेश मारलं
'रत्नजडीत' कोडीकविता जणू 'रहस्य' झाल्याया
'मृदू' 'कोवळ्या' कवीजीवनाचा 'कोष'च झालाया
आगं समद्या पोरीत म्या लई जोरात 'रंगत' आलेया
झालं झिंग झिंग झिंग झिंगाट...
झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग झिंगाट.. ||२||

समद्या इंटरनेटगावाला झाली मभादिची घाई
'शुभ्र' ब्राऊजरवरती 'अर्घ्य' देते डिजिटल शाई
नवनव्या धाग्यांचा साईटला 'पर्णभार' झालाया
'जीवनातल्या' कटकटींना जरा विसरुन जाऊया
आगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात मभादिची आलीया
झालं झिंग झिंग झिंग झिंगाट...
झिंग झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंग झिंगाट.. ||३||
__________________________________________________________

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle