आठवणी

'आठवणी'

हल्ली एकटे असूनही रिकामा वेळ तसा फार कमीच मिळतो, कारण रिकामा वेळ रिकामा आहे ही जाणीवच न होऊ देता तो पूर्णपणे भरून टाकत मनाला कायम बिझी ठेवण्याची जबाबदारी स्मार्ट फोनने नकळत उचलली आहे. त्यामुळं बरीचशी कामं बोटाच्या एका क्लिकने करत कृतीचे वेळेचा सदुपयोग करणे चालू होते. पण मध्येच एकदम डोळ्याच्या पापणीचा केस फोनच्या स्क्रिनवर पडल्याचे तिला दिसले, आणि तिचे इतर सगळे विचार एकदम बाजूला सरकले. फोन बाजूला ठेवून पापणीला हातात घेऊन न्याहाळताना सहज लहानपणीची एक गोड आठवण तिच्या अगदी डोळ्यासमोर उभी राहिली. त्या वयात किती निरागस विश्वास असतो ना मनाचा काही गोष्टींवर... अशी आपसूक पडलेली पापणी हाताच्या उलट्या मुठीवर ठेवून, डोळे बंद करून आपल्याला हवंय ते मागायचं आणि तिला हळूच फुंकर घालायची. मग ती पापणी उडत उडत लांब देवाकडे जाते आणि आपली इच्छा पुरी करते...कित्ती वेडी कल्पना...पण अगदी गोड. कधी कधी अशा आठवणींचा पूर असा दाटून आला की तिला उगाच खूप हळवं व्हायला होतं. मग नकळत त्या आठवांचे पदर हळू हळू सुटत जातात. वाऱ्यावर उडत स्वतःभोवती लपेटून बसतात. बंद डोळ्यांसमोर कल्पनेचं ते विश्व क्षणात अवतरतं. काळाला मागे सारत ती दृश्यं, ते प्रसंग एखाद्या धाग्याने असे एकदम जवळ ओढून आणावेत तसे समोर उभे राहतात. कधी खूप सुखावतात आणि कधी अगदी नक्कोसे असतात. या सगळ्या विचारांमध्ये कृती अगदी हरवून गेली.

हे सगळे कल्पनेचे खेळ मनातल्या मनात कधी कधी इतका पसारा मांडतात ना, की आवरायलाही जीव नको म्हणतो. काठावर उभं राहून पाण्यात पडलेलं आपलंच प्रतिबिंब आधी कसं होतं आणि कसं बदलत गेलं हे सारं त्या पसाऱ्यात दिसायला लागतं. पडून राहू देत पसारा तसाच...माझामझाच. तसंही कोणाला डोकावता येत नाही, आतमध्ये पाहता येत नाही. मग वाटेल तेव्हा पसाऱ्यात पडून राहीन तशीच. हवंय ते परत परत गोंजारीन, नकोय ते बाजूला सारीन. काय काय जमवलंय आजवर त्याची होत गेलेली वजाबाकी शून्यावर तर गेली नाही ना ते ही कळेल...हेच काय ते माझं... या आठवणींचं आयुष्यही माझं मीच ठरवलेलं. नकळत आठवणींच्या पसाऱ्यात कृती शांतपणे पहुडली होती.

मनाची पण कमाल असते ना, भूतकाळ आणि भविष्य यांची आत्ताच्या वर्तमानात स्वतःपुरती भातुकली मांडून त्यातच रमायला ते बऱ्याचदा आसुसलेलं असतं. कदाचित त्यामुळंच आजच्या क्षणांना मोल यायला 'उद्या' उजाडावा लागतो आणि उद्याची कल्पनेतली स्वप्नं पृथ्वीवर अवतरे पर्यंतच त्याचं काय ते मोल रहात असतं. आठवणी आणि स्वप्नं या दोन काळांना जोडणारा प्रवास म्हणजे आत्ताचा क्षण. पण ही जाणीव एक तर तो क्षण आठवणीत गेल्यावर होते किंवा कल्पनेत...! त्यामुळंच कदाचित तो क्षण प्रत्यक्ष भोगण्यापेक्षा या दोन्हीचीच ओढ जास्त वेड लावत असावी. जुन्या आठवणी आणि भविष्यातील स्वप्नं या आभासी मनोऱ्यावर रचलेला आत्ताचा वर्तमान जीव तोडून जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो खरंतर. पण जे आहे त्यापेक्षा, जे होतं किंवा जे होईल या आधारावर.... अरे बापरे, कृतीने एकदम दचकून डोळे उघडले. ती पसाऱ्यातून बाहेर आली. आजूबाजूचं सगळं तर तसंच होतं, जिथल्या तिथं. काही हाललं नव्हतं. फक्त पापणीचा केस तेवढा तिथं नव्हता. गेलेल्या वेळेची फुंकर त्याला तेवढी जाणवली असावी कदाचित.

असो, आज ती परत त्याच वाटेवरून जात होती. आजूबाजूची झाडं, वस्ती, दुकानं, सारं काही तेच होतं. आजपर्यंत हा रस्ता, हाच माहोल कित्येक वर्ष, कितीतरी वेळा पायाखालून गेलेला. तोच रस्ता, तीच झाडं, पण मनातलं भावविश्व् मात्र दरवेळी निराळं. जेव्हा आनंदी पाऊलं त्या वाटेवरून गेली तेव्हा तीच दृष्यं मन आणखी प्रफुल्लित करणारी वाटलेली, स्वतःचीच वाटलेली आणि जेव्हा काळे ढग मनात भरून आले तेव्हा तीच अगदी नकोशी झालेली, परकी वाटलेली. नंतर तोच रस्ता इतका सवयीचा होत गेला की मनातील भावनिक चढ-उतारांचा त्याच्यावर होणारा परिणाम गृहीतच धरला गेला.
A

आज कितीतरी वर्षांनी जेव्हा त्याच वाटेनं चालताना जाणवतंय, ते कधीच माझं नव्हतं, माझ्यासाठी नव्हतं, ते फक्त 'तिथं' होतं, सुखी असताना मी उगीच त्याची जवळीक मानली आणि दुःखात उगीच त्याचा त्रागा करून घेतला. त्या माझ्याच मानसिक अवस्था होत्या. पण तरी गुंतले होते मी त्यामध्ये इतकी, त्या वाटेने जात होते म्हणून केवळ त्यांच्या असण्याचं अस्तित्व मानायला हवं होतं का? पण मी तर माझ्या सुखदुःखाच्या कल्पनेशीच त्यांचं नातं जोडलं होतं. हे कल्पनेचे, आठवणींचे खेळ अगदी वेडावून सोडणारे, पण तरीही हवेहवेसे.

--- अश्विनी वैद्य

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle