रव्याचे लाडू

मी अ‍ॅडमिन टिमचं काम हलकं करतेय. पाकप्रश्नावरच्या रव्याच्या लाडवांच्या कृती इथे एकत्र करतेय.
अ‍ॅडमिनटिम, नंतर प्लिज तिथले इथे फोटो जोडा.

सई

सुग्रणींनो!!
मला पाकातल्या रव्याच्या लाडवांची (आणि त्याचे काही व्हेरिएशन असतील तर) रेसिपी हवी आहे. .
आणि तूप वापरायचे असल्यास त्याचे एगगझॅक्ट प्रमाण (तूप जास्त झाल्यामुळे बुदगुल बसलेल्या सगळ्या लाडवांच्या साक्षीने).
आधीच आभारी आहे. कारण तुम्ही एक से एक देणार रेसिपी!

सुमुक्ता

सई. ओगले आज्जींची रेसिपी जर जशीच्या तशी फॉलो केलीस तर मस्त होतात रवा-नारळ पाकातील लाडू.

मी माझे प्रमाण सांगते.
४ वाट्या रवा
४ वाट्या साखर (मला भरपूर गोड आवडतो. ओगले आज्जी ३.५ वाट्या साखर सांगतात)
१ वाटी खवलेला नारळ
१ टेबलस्पून तूप (मी पुष्कळदा तूप न घालता सुद्धा करते. पण त्याने लाडू थोडे कोरडे होतात आणि लाडू वळताना दुध लावायला लागते)
वेलदोड्याची पावडर चवीप्रमाणे

थोड्या तूपात बारिक आचेवर रवा गुलाबी रंग येइपर्यंत भाजून घे. नंतर त्यात खवलेला नारळ टाक आणि अजून थोडे भाजून घे. गॅस बंद कर.
एका पातेल्यात ४ वाट्या साखर बुडेल एवढे पाणी घे आणि मंद आचेवर उकळवत ठेव. अधूनमधून ढवळत रहा. चवीप्रमाणे वेलदोडा पूड टाक (मी थोडी पूड रवा-नारळ मिश्रणात आणि थोडी पूड पाकात टाकते)
तुला एकतारी पाक करता येतो का? एकतारी पाक होणे ही खूप महत्वाची स्टेप आहे. त्यामुळे पाक करताना सतत लक्ष ठेव. पाक जास्त किंवा कमी झाला तर लाडू होणार नाहीत.
एकतारी पाक झाला की गॅस बंद कर. त्यानंतर लगेचच पाकात रवा-नारळ मिश्रण टाक. नीट ढवळून घे.
मिश्रण पातळ वाटले तरी घाबरू नको. गार झाले की ते घट्ट होते.
गार झाले की लाडू वळ. हे मिश्रण थोडे कोरडे वाटले तर किंचीत दुध शिंपड.
लाडू वळताना मी एक-एक बेदाणा घेऊन लाडू वळते.

माधवी

सुमुक्ताची रेसिपीप्रमाणेच मी पण करते, मी १:१ घेते रवा, नारळ. पाक एकतारी पाकाच्या जरा पुढे गेला चुकून आणि मिश्रण घट्ट झाले तर दुध शिंपडून जरावेळ मावे करते. मस्त होतात लाडू आणि मऊ पण. म्हणजे पाक थोडाफार जास्त झाला तरी टेन्शन नाही. smile आणि मी केशर-वेलची सिरप घालते. मस्त स्वाद लागतो.

मिनोती

मी पण रवा लाडूच्या बाबतीत ओगले आजींची भक्त आहे. माझी मम्मी स्गळ्या वड्या प्रकार मस्त करते त्यामुळे ती नेहेमी रवा खोबर्‍यच्या वड्याच करत असे (आमचा आग्रह) त्यामुळे हे लाडू मी स्वतः आजीबाईंचे पुस्तक वाचून शिकले smile सुमुक्ताने लिहीलेय अगदी तसेच पण मी तूप साधा१/४३-४ टेबलस्पून घालते. मी हेच व्हेगन लाडू पण केलेत वॉलनट ऑइल वापरून. यंदा खोबर्‍याचे तेल वापरून करून पाहेन.

मनीमोहोर

मध्यंतरी मी रव्याचे लाडू पाक बिक न करता केले होते. चांगले झाले होते.
एक वाटी बारीक रवा एक चमचा तेलावर अगदी थोडावेळ भाजून घेतला . तो साधारण गार झाल्यावर त्यात एक वाटी ओला नारळ मिक्स केला . नंतर ते मिश्रण कुकरमध्ये एका डब्यात घट्ट झाकण लावून ठेवलं. शिट्टी काढून पंधरा मिनिटं स्टीम केलं. दहा मिटनांनंतर ते मिश्रण बाहेर काढलं . गरम असतानाच त्यात पिठी साखर घातली. वेलची पावडर घातली आणि दुधाचा हात लावून लाडू वळले. वर बेदाणे लावले.
लाडू छान झाले होते. आवडले सगळ्यांना. तुप न आवडणाऱ्या लोकांसाठी , आणि पाक न येणाऱ्यांसाठी छानच आहे ही रेसिपी.

मंजूडी

हेमाताई, सुपर पाककृती! मी असे सोप्पे लाडू करून बघणारच नक्की. प्लिज ह्याचा नवा धागा बनवा.

मी एरवी मायबोलीवर शोनूने प्रमाण दिलं होतं तसे करते - ४ भाग रवा, ३ भाग साखर, २ भाग ओ. खो., दीड भाग पाणी. रवा भाजला जाईल इतपतच तूप. शिर्‍यापेक्शा कमीच.

मृणाल

आता मला पण खावेसे वाटायला लागले
आता करणे आले
माझी रेसिपी सुमुक्ता सारखीच पण साखर कमी
४ वाट्या रवा
३ वाट्या साखर
१ वाटी नारळ (थोडा जास्त पण घालते कधीकधी )
वेलदोडा आणि मनुके

अंजली.

मी पाक करत नाही. बारीक रवा भरपूर तुपात चांगला भाजून घ्यायचा. बाजूला काढून घेऊन त्यात तेव्हढंच ओलं खोबरं परतून घेऊन घालायचं. चवीनुसार चाळलेली पिठीसाखर, वेलची केशर घालून छान मिक्स करून घेऊन लाडू वळायचे. अगदीच गरज पडली दोन चमचे गरम दूध घालायचं. पण तूप योग्य प्रमाणात असेल तर दूध घालावं लागत नाही. हे लाडू आमच्या इकडं बाहेरही ८ दिवस टिकतात. भारतात बहुदा फ्रीजमधे ठेवावे लागतील.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle