एक छोटासा लमहा है .... भाग ४

एक छोटासा लमहा है ,जो खत्म नही होता
मैं लाख जलाता हूं ,ये भस्म नही होता

नवीनच लग्न झालेले , सासू च्या माहेरून आमंत्रण आलं....
ऑफिस सुटल्यावर नवरा बायको निघाले तिकडे ... वाटेत नवरा आपल्या आजोळच कौतुक सांगत होता ,ती ऐकत होती ,नवीन लोकांबद्दल जाणून घेत होती , उत्सुकता दाटली होती तिच्या डोळ्यात ,पहिल्यांदाच जात होती ना ती ...

आजवर स्वतःच्या घरात नवीन येणाऱ्या सुनेला बोलवून केलं जाणार तीच स्वागत ,पुरवले जाणारे तिचे लाड पाहिले होते तिने ...आता पाळी तिची होती , खूप खुश होती ती ...

तास दोन तासांचा प्रवास करून पोहचले दोघे. घरात पाऊल टाकताच ,तिला सासू नी दीर समोरच बसलेले दिसले ...
अरे , हे देखील येणार होते ? बोलले का नाहीत,एकत्रच आलो असतो की ...
कदाचित आपण नवऱ्यासोबत एकटं यावं म्हणून नाही सांगीतले वाटते, किती समंजस लोकं आहेत ही ... मनोमन ती सुखावली...

बसल्या बरोबर तिच्या नवऱ्याला आतल्या खोलीत बोलवून घेतले , सोबत सगळेच गेले आत , ती एकटीच तिथे बसली...

किती वेळ झाला तरी कुणी बाहेर यायच नाव घेईना , काय चाललंय नक्की आत ?,तिला समजेना
दाराजवळ बसून कंटाळली ती , किती वेळ इकडे तिकडे बघणार ...
घरातल्या एकूण एक भिंती बघून झाल्या ,"उठून आत जावं का ?
नको ,कुणी ओळखीच ही नाही इथे त्यामुळे असं उठून फिरणे बरं दिसायचे नाही ...
शी बाबा काय ही पद्धत ?
नव्या नवरीला असं दाराजवळ बसवून ठेवतात होय ,माझ्या घरी असं केलं असत सुने सोबत कुणी तर माझ्या आई ने वाटच लावली असती एक एकाची" ...
विचारच विचार मनात सुरू होते , एक मन सांगत होत की ते लोकं ओटी बीटी भरायची तयारी करत असतील , सरप्राईज असेल काही तरी नाही तर कोण असे करेल ...

"ह्याने तरी यायचं ना बाहेर ,त्याला माहिती आहे माझा स्वभाव अनोळखी ठिकाणी किती बावरते मी ते ... भेटला की सांगतेच त्याला असा नको बाबा सोडून जात जाऊस मला" ...

इतक्यात आत बोलावणे आलं , हुश्श झालं तिला...
आत गेली तर वातावरण काही वेगळच होतं. सगळे गोल करून बसलेले नी तिला मध्ये बसवलं,तिला समजेना नक्की काय आहे हे? ...
तेवढ्यात सासू तावातावाने बोलू लागली , "विचारा विचारा हिला ,काय काम करते ही ?
कशाला म्हणून हात लावत नाही" ...
तिचा तो अवतार ती पहिल्यांदाच बघत होती ,चांगलीच हबकली ती ... "
अरे ,काही ही काय आरोप करताय ? सगळं तर मीच करतेय ,सवय नाहीय बिलकूल पण तरी करतेय की ...
खोटं का बोलताय ?"
लहानपणापासून तिला खोट्याचा अत्यन्त तिटकारा ,सहन व्हायचे नाही तिला खोटं बोलने वागणे आणि आज इथे तर खोट्याचे तांडव सुरू होतं ...
तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून नको नको ते आरोप केले जात होते ...
"कोण हे लोक ,मी नाही ओळखत यांना ...
का ह्यांनी न्याय निवाडा करावा माझा ?
मला ओळखतात तरी का हे , माझी बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केलाय का यांनी ?
समोर बसलेली मुलगी एक शब्द ही बोलत नाहीय हे समजतच नाहीय का यांना ?"

शब्दच फुटत नव्हते तिच्या तोंडून , डोळ्यातून पाणी वहायला देणे म्हणजे घोर अपमान होता म्हणून त्या पाण्याला थोपवून धरलं होत तिने मोठ्या कष्टाने

तिथून ती बाहेर कशी पडली ते तिला आठवत नाही , इतकी चोक झाली होती की भडभडून उलटी झाली तिला रस्त्यावर ,सुन्नपणे बसून होती ती किती तरी वेळ ...
नवरा काही तरी सांगत होता तिला.... पण शब्द पोहचत नव्हते तिच्यापर्यंत...

काही काळाने सगळं नीट झालं फक्त एक सून कधीच कुणाच्या घरी गेली नाही इतकंच ...

अर्चना राणे
08/05/2018

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle