चिकन फहिता

इथे आल्यावर पहिल्यांदी चाखलेला मेक्सिकन पदार्थ म्हणजे चिकन फहिता. स्पॅनिशमधे 'J' चा उच्चार 'ह' होतो हे महित नसल्याने ' हे फजिटा काय आहे' अस विचारुन स्वतःची फजिती करुन घेतलेली आजही आठवते. फहिता हा बीफचा स्कर्ट स्टेक हा भाग येतो त्या पासून करतात. पण माझ्या सारख्या बीफ न खाणार्‍यांसाठी चिकन फहिता हा प्रकार आहे.

फहितासाठी लागणारे साहित्य
२ बोनलेस चिकन ब्रेस्ट
१ कांदा उभा चिरुन
१ लाल किंवा हिरवी ढब्बू मिरची उभी चिरुन
१-२ टे स्पून तेल

६ ६- इंच वाल्या तॉर्तिया
जोडीला आवडी प्रमाणे
चिरलेला लेट्युस
१/२ कप किसलेले चिज
१/२ कप सॉवर क्रिम
ग्वाकोमोल
साल्सा किंवा पिको डे गायो

महत्वाचे साहित्य म्हणजे चिकन मुरवायला लागणारे मॅरिनेड.
त्या साठीचे साहित्य-
१/४ कप वुस्टरशर सॉस
१/४ कप सायडर विनेगर
१ टी स्पून जिरे पावडर
२-३ मोठ्या लसणाच्या पाकळ्या(देशी असल्यास जास्त), पेस्ट करुन
१/२ टी स्पून तिखट
१/२ टी स्पून मीठ
१ टी स्पून मिरे पावडर
२ टे. स्पून बारीक चिरुन कोथिंबीर

कृती-
चिकन साधारण दोन तास मुरत ठेवायची आहे तेव्हा त्या हिशोबाने प्रथम मॅरीनेड तयार करुन घेवू. आदल्या दिवशी मॅरीनेड तयार करुन फ्रीजमधे ठेवले तरी चालेल.मॅरीनेडसाठी दिलेले सगळे साहित्य एका बोलमधे फोर्कने ढवळून एकत्र करा. यातले निम्मे मॅरीनेड आपण चिकन मुरवायला वापरणार आहोत. तेव्हा ते एका बोलमधे काढून बाजूला ठेवा. उरलेल्या मॅरीनेडमधे १ टीस्पून तिखट घाला आणि नीट ढवळा. हे जास्तीचे तिखट घातलेले सॉस बाजूला ठेवा. ते नंतर शिजवताना घालायचे आहे.
चिकन मॅरिनेड्मधे २ तास मुरवत ठेवा. मुरले की ग्रील करा किंवा कास्ट आयर्न पॅनमधे १ टे. स्पून तेल गरम करा. चांगले तापले की त्यात चिकन घाला. ४-५ मिनिटे एकाबाजुला शिजले की उलटा ४-५ मिनिटे शिजू द्या. कापून मधे चिकन गुलाबी नाहियेना ते बघा. असल्यास अजून थोडा वेळ शिजवा. बाजूला काढुन ठेवा.

मोठ्या पॅन मधे १ टे. स्पून तेल तापत ठेवा. चांगले तापले की त्यात उभा चिरलेला कांदा घाला. ३-४ मिनिटे परता. आता त्यात चिरलेली ढब्बु मिरची घालून ४-५ मिनिटे परता.एकीकडे चिकनच्या पातळ पट्ट्या कापा. पॅन खालची आच वाढवा. बाजुला ठेवलेले सॉस घाला. पॅन चांगले गरम असेल तर सिझल होईल. लगेच चिकन घाला आणि २ मिनिटे परता. आच बंद करा.
मायक्रोव्हेव मधे ओलसर पेपर नॅपकिन मधे गुंडाळून तॉर्तिया २५-३० सेकंद गरम करा. तव्यावर गरम करणार असाल तरी त्यावरुन ओला पेपर नॅपकिन फिरवून घ्या आणि तव्यावर ३० सेकंद शेकून घ्या.
वाढताना तॉर्तियावर मधोमध चिकनचे मिश्रण घाला. सोबत आवडीप्रमाणे टॉपिंग्ज - बारीक चिरलेला लेट्युस, चीज, सॉवर क्रिम, ग्वाकोमोले , साल्सा घाला.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle