बार्क ऑटोग्राफ़

किनौर २०१२
आर्ट-नेचर कॅम्पमधल्या नोंदी

खिडकीच्या थेट समोर शहतुतचं झाड आहे. त्याला शेवटचा फ़ळांचा बहर कधी येऊन गेला त्यालाही आठवत नसेल इतकं म्हातारं. मात्र खोड मजबूत, गाठाळलेलं, तपकिरी. इथल्या अंगणात सफ़रचंदाची आणि पीचची भरपूर हिरवी, तरुण झाडं आहेत पण नजर या खोडावर खिळून रहाते.
दुपारी डेमियनने शहतुतच्या खोडावर कागद ठेवून क्रेयॉनने घास असं सांगीतलं. कागदावर खोडाचं टेक्स्चर उमटायला लागलं. ही बार्क ऑटोग्राफ़ी. त्याच्या फ़ोल्डरमधे जगभरातल्या खोडांचे ऑटोग्राफ़्स आहेत असे. फोटोग्राफ़्स पेक्षा हे ग्रेट. जिवंत, ऑरगॅनिक.

खोडांचं मला ऑब्सेशन आहे. झाड समोर आलं की फ़ांद्या, पान फ़ुलं वगैरे नंतर दिसतात. आधी खडबडीत त्वचेवरुन हात फ़िरवण्याचा मोह होतो. तो स्पर्श अफ़ाट सुंदर. खरखरीत, काटेरी, कधी गुळगुळीत. क्वचित एकसंध मऊ सुद्धा.

नारळाचं उंचं, टंगाळं खोड घराच्या खिडकीत खेटून आहे. किती वर्षांचं सोबती. त्याचा काळसर रुक्ष रंग, पाठीवरच्या बारक्या चीरा. कष्टकरी, वृद्ध, भेगाळलेल्या पायांसारखं हे खोड दिसतं. त्यावरुन दिवसभर तरुण, उत्साही खारी फ़िरतात.

हिमालयात देवदारांच्या भव्य टणक पाठींचा स्पर्श सतत होत असतो. एरवी अप्राप्य असलेला म्हणूनच हवाहवासा. त्यांच्या खोडांमधून स्त्रवणारा सोनेरी, चिकट गोंद. त्याचा भुलवणारा गंध. औलीला देवदारांच्या दाट रांगा आहेत गोल गोल, चक्राकार. गेल्या अठवड्यात त्यांच्या पोटांवर पत्र्यांचे लाल बिल्ले ठोकले गेले. फ़ॉरेस्ट ऑफ़िसर म्हणाला इथे इंटरनॅशनल स्केटींग रिग होणार. ही झाड कापणार. क्रूर आहे हे. पुन्हा औलीला जाणार नाही.

चीनच्या फ़ॉरबिडन सिटीमधे हजारो वर्ष वयाची वृद्ध खोडं पाहिली होती. त्यांच्या खोडांमधून अजूनही वहाणारा जिवंत, वहाता प्रवाह. कान लावला तर इतिहासातल्या किती प्राचीन कहाण्या ऐकू येतील.

लहानपणी खानदेशातल्या आजोळी उन्हाळ्यात जाताना एस.टी.मधून दिसणारी भुसावळच्या रस्त्यांवरची चुन्याने रंगवलेल्या पांढ-या पोटांची मजेशीर झाडं मोजायचा छंद होता. चिंचेच्या खोडाचा स्पर्श पाठीला अजून आठवतो. त्याला टेकून वाचलेली पुस्तकं कोणती होती?
सुकलेल्या, मृत खोडांमधेच घर करणारे बार्बेट. जुनाट खोडांच्या ढोलीतले हिरवेगार पोपट, सुतार पक्षी. कधी साप. जांभळाचं खवलेदार खोड. आंब्याचं गाठाळलेलं. चंदनाचं सामान्य दिसणारं गाभ्यात अनमोल खोड, जळगावच्या नक्षत्रवनातली रक्तचंदनाच्या देखण्या खोडांच्या तकतकीत रांगा. तल्लूरचं चांदीची नाणी खोचलेलं काळं खोड.

खोडांवर नावं लिहितात. त्यांना दोरे गुंडाळतात. खोडांवर खिळे मारतात, लाल चिंध्या लटकवतात. शहरात खोडांभोवती वीजेच्या दिव्याच्या रंगीत माळा गुंफ़तात तेव्हा ती केविलवाणी, मृत वाटतात. खोडांच्या पोटातल्या वयाच्या खूणा सांगणारी वर्तुळ किती मोहक, देखणी. खोड आडवं कापल्यावरच दिसतात ती. कापलेल्या खोडांचे ओंडके वाहून नेतात ते दृश्य सर्वात भयानक.

हिंदीत काय म्हणतात खोडाला? गुलझारच्या कोणत्यातरी कवितेत असेल तो शब्द. बघायला हवा.

यापुढे भेटणा-या प्रत्येक खोडाचा ऑटोग्राफ़ घ्यायला हवा.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle