कैरीच्या तासाचे लोणचे

कैरीच्या तासाचे लोणचे

साहित्यः ४ लोणच्याच्या राजापुरी कैर्‍या, २ चमचे मोहोरीची डाळ, कैरीच्या तासाच्या निम्मा गूळ किंवा आवडीप्रमाणे, २ चमचे तेल(फोडणीसाठी), पाव चमचा मेथ्या पावडर, पाव चमचा हळद, पाव च. हिंग

कृती: कैरीचा तास म्हणजे काय ते प्रथम पाहू. लोणच्याच्या राजापुरी कैर्‍या जर ४ असतील तर या कैर्‍या नेहेमीच्या लोणच्यासाठी कापून घ्या. या राजापुरी कैर्‍यांना गर खूप असतो. त्यामुळे फोडी करताना अगदी कोयीजवळून खरडून न घेता फोडी करा. या फोडींचे नेहेमीच्या पद्धतीने लोणचं करा.
Image 2
हे सालासकटचं नेहेमीचं वर्षाचं लोणचं. आता हे बाजूला ठेवा. तासाचं लोणचं हवं असेल तर तर कैर्‍या आणून त्या घरीच चिरून आधी नेहेमीचं लोणचं घालावंच लागतं. तेव्हाच हे तासाचं लोणचं मिळतं!

कैरीच्या तासाचे लोणचे:
आता कोयी उरल्या असतील. या कोयींना भरपूर गर असेल. आता हा गर अगदी खरवडून तासून घ्या. कोयी अगदी स्वच्छ करा. काही तुकडे जर खूप लांब रुंद वाटले तर तेही नीट कापून घ्या. साधारणपणे एकसारखे तुकडे होण्यासाठी.
आता या मऊ लुसलुशीत तासाला हळद मीठ लावून पाच सहा तास ठेवा.
Image 3
पाच सहा तासानंतर याला पाणी सुटलेले असेल. हे पाणी वेगळे काढून घ्या. यात २ चमचे मोहोरी डाळ घालून हे मिश्रण मिक्सरमधे बारीक करा. अगदी फाइन पेस्ट झालीच पाहिजे असं नाही. थोडी भरड राहिली तरी चालेल. तासाच्या फोडीवर हे मिश्रण ओता.
Image 4

image 5
मीठ घाला. गूळ हाताने किंवा सुरीने बारीक करून त्या मिश्रणात मिसळा. आता २ चमचे तेलाची फोडणी करा. तेल तापल्यावर, मोहोरी तडतडल्यावर गॅस बंद करून त्यात पाव चमचा मेथ्या पावडर व हिंग आणि हळद घाला. फोडणी थंड झाल्यावर लोणच्यावर ओता.

व्यवस्थित ढवळून बाटलीत भरून ठेवा.
हे लोणचे अत्यंत चविष्ट लागते.
गेली दोन वर्षं वर्षाच्या लोणच्यासाठी कैऱ्या बाजारातूनच फ़ोडून आणत असल्याने हे लोणचं झालंच नाही. म्हणून या वर्षी कैऱ्या आणून त्या घरीच कापण्याचा खटाटोप केला. या तासाच्या लोणच्यासाठी.
तसं कैऱ्या आणून सालं काढून त्याच्या बारीक फ़ोडी करून हे लोणचं तुम्ही करू शकता. पण कोयीजवळचा लुसलुशीत तास खरवडून त्याचं लोणचं करण्यात जी मजा आहे ती औरच.
आता फारच सुगरणगिरी :winking: करायची असल्यास ................
१) आपण कोयी अगदी तासून खरवडून घेतल्या आहेत. तरीही या उरलेल्या कोयी कुकरमधे भांड्यात पाण्यात वाफ़वून त्याचं पन्हं केलं म्हणजे पाककृती सुफ़ळ संपूर्ण.
२)एक दोन कोयी बाजूला ठेवून त्या ओल्या खोबऱ्याच्या कढीसाठी किंवा आमटीत सुद्धा वापरू शकता.
या कोयींमुळे कढी व आमटीची जी काही लज्जत वाढते...............!
३)खूप जास्त कर्‍यांचं लोणचं घातलं असल्यास काही कोयी संपूर्णपणे वापरून नंतर काहीही शिजवताना कुकरमधे तळाशी ठेवा. कुकर मस्तपैकी पांढरा स्वच्छ होईल.

Image 1

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle