आल्प्सच्या वळणांवर - भाग ७ - आलेच आणि ऱ्होन ग्लेशियर, फुरका-सस्टेन पास आणि परिसर

इंटरलाकेनला भटकल्या नंतर पावसाने तशी पुढच्या दिवशी विश्रांती घेतली. पण हवामान ढगाळच होते. त्यामुळे त्या दिवशी फारसे काही पाहिले नाही. जे काही पाहिले तो अनुभव वेगळाच होता, एकूण दिवस मस्त गेला होता पण तो भाग अगदीच लहान होत असल्याने शेवटच्या भागात त्याबद्दल लिहुयात असा विचार करून आरं नदी आणि जवळपासचे धबधबे यांना पुन्हा एकदा उचलून पुढच्या भागात ढकलले आहे.

जेव्हा संपूर्ण सहलच मनासारखी होत असते, हे बघू की ते बघू असं होत असतं, किती फोटो काढावे हा प्रश्न पडतो, निसर्गाचे गुणगान करायला शब्द कमी पडतात तेव्हा खरं तर अशा सहलीतला सर्वोत्तम दिवस, सर्वोत्तम स्थळ हे निवडणे म्हणजे महाकठीण (कुणी विचारतंय का हा प्रश्न, पण तरीही मलाच आपलं सांगायचंय त्यामुळे वाचाच आता Wink ) तर सगळ्याच अर्थाने अविस्मरणीय आणि संपूर्ण सहलीचा कळस ठरावा असा हा दिवस होता. का हा प्रश्न पडला असेलच. हे न वाचता पहिले फोटो बघितले असतील तर कदाचित याचा अर्थ लागला असेल, नसेल तरीही मी थोडी भर घालण्याचा प्रयत्न करते.

आधीचे दोन ते तीन दिवस थोडी आजारपण आणि जवळचीच पर्यटन स्थळे, पाऊस यामुळे तसे संथ गतीने गेले होते. सूर्य पुन्हा हजेरी लावणार अशी चिन्हे दिसली आणि नियोजनात प्रमुख असलेला एक बेत प्रत्यक्षात उतरला. मुख्य ध्येय होते आलेच या हिमनदीला भेट आणि फुरका पास आणि सस्टेन पास या दोन प्रसिद्ध पासेस मधून प्रवास. यापेक्षा बरंच काही अधिक अनुभवता आले आणि त्यामुळे सहलीला चार चांद लागल्यासारखे वाटत होते. बराच लांबचा प्रवास असल्याने सकाळी लवकर उठून आवरून निघालो. जीपीएसला पत्ता दिला पण त्याची गाडी काही रुळावर नव्हती. 'मी तुम्हाला रस्ता सांगणार नाही' हे त्याने पक्केच ठरवले होते. मोबाइल स्विसमध्ये चालत नसल्याने तो पर्याय बाद होता. मग 'अरे बाबा दाखव ना रस्ता' म्हणून प्रेमाने जीपीएसला आर्जवून झाले. तरीही ऐकत नाहीये म्हणल्यावर 'इथे ऐन वेळी काय त्रास द्यायलाच हवा का' वगैरे वगैरे म्हणत शिव्या घालून झाल्या. पण त्याला काही हेका सोडायचा नव्हता. मग काय, आधी नियोजन करताना जी काही माहिती वाचली होती, त्याप्रमाणे चर्चा करून रस्ता धरला. थोड्याच वेळात घाट सुरु झाला आणि पुन्हा वेगळ्या प्रदेशातले पर्वत, खडक लक्ष वेधून घेऊ लागले. सस्टेन पास (Sustain Pass) या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका पास मधून हा प्रवास होता. उंचच उंच पर्वत, हेअरपिन टर्न्स आणि न संपणारा वळणदार रस्ता आणि बोगदे, मधेच काही मानवनिर्मित तर काही नैसर्गिक पाण्याचे साठे, जलाशये असा प्रवास सुरु होता. हा पास संपल्यावर पुन्हा इतरत्र मधून मधून दिसणारी टुमदार खेडी सोबतीला होतीच. कितीही वेळा पाहिली तरीही प्रत्येक वेळी वेगळा आनंद देणारी. तीच ती फुलं, एका बाजूने जाणारे रूळ, त्यावरून धावणारी ग्लेशियर एक्स्प्रेस, हिरवळ, प्रत्येक गावातले चर्च वगैरे वगैरे न संपणारी यादी. जेवढे जमेल तेवढे गाडीतून टिपायचा प्रयत्न सुरूच होता. सायकलस्वार आणि बाईक वाले उन्हाळ्याचे शेवटचे दिवस म्हणत आनंद घेत होते.

.

.

.

.

.

.

.

सुदैवाने कुठेही न चुकता आणि वाहतुकीचा काहीही त्रास न होता अगदी वेळेत योग्य ठिकाणी पोहोचलो - फ़िएच ला (Fietsch). आलेच (Aletsch Glacier) हिमनदी बघण्यासाठी ज्या ठिकाणाहून रोप वे आहे ते हे पायथ्याचे गाव. ऐन दुपारची वेळ होती आणि रस्त्यावर शुकशुकाट होता. पर्वतावर जायच्या आधी काही खायला काही मिळतंय का म्हणून शोधत होतो तर काहीच दिसेना. सगळी दुकानं बंद. अरेच्चा. हे तर जर्मनीहून अवघड दिसतंय, (का पुण्याहून?) सापडलं एक हॉटेल शेवटी. खायला काय असं विचारूच नका. चीज चीज आणि चीज. फोटो घ्यायचा पण कंटाळा आला होता आताशी. चीजमय होऊन रज्जुमार्गाच्या स्थानकावर आलो. तिकीट काढले आणि वर पोहोचलो. आत्तापर्यंत सगळीकडे रोप वे खच्चून लोक भरलेले असायचे. इथे म्हणजे होल वावर इज अवर असा प्रकार होता. फारतर दहा डोकी असतील. पहिला दिलासा इथेच मिळाला.

आल्प्स पर्वतरांगांमधील सगळ्यात मोठी अशी ही आलेच हिमनदी. तीन छोट्या हिमनद्या एकत्र येउन तयार झालेली ही हिमनदी २३ किमी लांब तर एकूण १२० स्क्वेअर किमी परिसरात पसरलेली आहे. या हिमनदीचा उगम युंगफ़्राउ पर्वत रांगांमधून होतो. आलेचफ़िर्न, आलेचहॉर्न आणि द्रायएकहॉर्न (Aletschfirn, Aletschhorn, Dreieckhorn) या तीन हिमनद्या कोनकोर्डीयाप्लात्झला (Konkordiaplatz) एकत्र येतात जिथून पुढे मुख्य आलेचचा प्रवाह सुरु होतो. इथे अंदाजे १ किमी उंचीचा असलेला बर्फाचा थर पुढे दक्षिणेकडे उतरत वितळत जाऊन नंतर १५० मीटर पर्यंत कमी होत पुढे यातूनच मासा या नदीचा उगम होतो.
वर पोचलो तर तिथल्या रेस्टॉरंटमध्येही शुकशुकाट. 'नशीब आपण खालीच खाउन घेतले ते' असे म्हणत बाहेर आलो. थोडे चालत पुढे गेलो आणि समोरच्या निसर्गाने भान हरपून गेले.

.

.

.

.

.

.

.

परंतु या सगळ्याला एक काळीकिनार आहे. फार पूर्वीपासूनच हवामानातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग च्या तडाख्यात ही हिमनदी दिवसेंदिवस आटते आहे. आणि कदाचित येत्या काही वर्षात इथे हिमनदी म्हणण्यासारखे काहीच राहणार नाही अशी भीती पर्यावरण रक्षकांनी व्यक्त केलेली आहे. आम्ही तिथे असताना एका पर्यटकाशी बोलत होतो. तो झुरीचचा रहिवासी होता आणि अनेक वेळा या भागात आला होता. 'मी प्रत्येक वेळी येतो तेव्हा सहज जाणवेल एवढ्या प्रमाणात बर्फ घटलेला दिसतो' असे तो म्हणाला. ही माहिती देणारे अनेक फलक देखील लावले होते. ज्या देशात वृक्ष संवर्धन आणि एकूणच पर्यावरण मित्रत्वाची भूमिका आहे तिथे सुद्धा ही अशी परिस्थिती आहे तर मग इतर ठिकाणांबद्दल काय बोलायचे.

भूक लागली म्हणून वर एकच छोटेसे टपरीवजा हॉटेल होते. तिथे खास आल्प्स मधील गायीचे दुध आणि मध, अ‍ॅपल पाय असे काही प्रकार मिळाले.

.

.

परत जायचे म्हणजे उठणे तर आलेच. सगळे काही दोन-अडीचशे फोटोंमध्ये आणि अर्थात डोळ्यात, मनात साठवत खाली आलो आणि परतीच्या रस्त्याला लागलो.

.

परत येतानाचा रस्ता थोडा सस्टेन पास पार करत मग नंतर फुरका पास (Furka Pass) ने वर चढत जाऊन परत खाली उतरायचे असा ठरवला होता. फुरका हा देखील असाच एक विलोभनीय पास. या भागात धबधब्यांचे प्रमाण बरेच जास्त दिसले. प्रत्येक ठिकाणी थांबणे शक्य नव्हते. तरीही जिथे शक्य आहे तिथे कधी थांबून तर कधी गाडीतून हे साठवणे सुरु होते.

.

.

फुरका पास चढत असतानाच दुरून ऱ्होन ग्लेशियर (Rhone Glacier) दिसू लागले. तसाही ब्रेक आवश्यक होता आणि तसा अंधाराच्या आत परतायला देखील वेळ हातात होता म्हणून इथे थांबलो. ऱ्होन ग्लेशियर हे ७. किमी लांब पसरलेले आहे आणि बर्फाच्या थराची कमाल उंची ३५० मीटर पर्यंत आहे. इथून वितळणारे पाणी पुढे ऱ्होन नदीला जन्म देते. आलेच प्रमाणेच ग्लोबल वॉर्मिंग चे परिणाम इथेही दिसताहेत. आलेचच्या तुलनेत तशी लहान असलेली ही हिमनदी लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

.

.

.

आत एक सुवेनिअर शॉप होते. बाकी काहीच दिसेना. पुढे जाण्यासाठी ७ फ्रँक तिकीट आहे हेही अगदी एका साध्या कागदावर लिहिले होते. जिथे शक्य आहे तिथे हे लोक पैसे काढतात म्हणत आत गेलो. 'काहीच दिसत नाहीये तिकडे तर काय करायचेय आता अजून तिकडे जाऊन' म्हणून मी पहिले नकारच दिला. खरं तर दिवस इतका छान गेला होता आणि इतकं तृप्त वाटत होतं की आता माझ्यात अजून काही बघण्याची, अनुभवण्याची, साठवण्याची कसलीच तयारी नाही असं काहीसं माझं झालं होतं. पण 'उगाच घेतील का पैसे एवढे, काहीतरी असेलच. आपण जातोय आत' असा जबरदस्त आशावाद बाळगत नवरा मात्र तिकिटे काढून तयार होता. मग काय, निघाले मीही. रस्ता असा काहीच दिसत नव्हता आणि हिमनदीवर कापड घातलेले दिसत होते. कशासाठी केले असेल याचा अंदाज येत नव्हता. इथेही ग्लोबल वॉर्मिंग मुळे होणारे परिणाम दर्शविणारे फलक होते आणि इतर ठिकाणांप्रमाणेच स्विस झेंडा फडकत होता.

.

.

'एका चौथऱ्या वरून हे बघण्यासाठी दिले का आपण पैसे?' त्यातल्या त्यात मुद्दा पटवण्याचा माझा प्रयत्न. तेवढ्यात खालून दोन लोक आम्हाला वर येताना दिसले. याचा अर्थ तिथे जाता येतं. त्या दगडांवरून वाट काढत खाली आलो. आणि आत जाऊन बघतो तर काय, त्या हिमनदीच्या आत गुहा तयार करून त्यात फिरता यावे म्हणून रस्ता होता आणि दिवे लावले होते. हे असे मानवनिर्मित प्रकार आहेत असे ऐकले आहे. पण इथे प्रत्यक्ष हिमनदीच्या आत जायचे होते. एकही माणूस दिसेना. पहिला विचार डोक्यात हाच आला की बाकी ठिकाणी पर्यावरण रक्षक असणारे हे लोक इथे कसे बरे हे चालवून घेतात. हा प्रश्न अजूनही आहेच की यात निसर्गावर उगाच आक्रमण केले जातेय तरीही हे कसे चालते? यात धोका नाही का? असो. जरी योग्य व्यवस्था असेल तरीही फार आत जायला नको, म्हणून अगदी थोड्या भागात जाऊन एक चक्कर मारली. असे काही असेल याची कल्पना नसल्याने आम्ही जॅकेट्स वगैरे न घालता आलो होतो. त्यामुळे थंडी पण वाजत होती. दुरून वेगळेच भासणारे हे बर्फाचे थर प्रत्यक्षात किती प्रचंड आहेत हे कळले.

.

.

.

'आलो ते चांगलेच झाले, वेगळाच अनुभव मिळाला' असे म्हणत बाहेर आलो. पुढे 'माझ्यामुळे बघायला मिळाले' हे मी किती वेळा ऐकले याची कल्पना करण्यास आपण सुज्ञ आहात. Wink

इथून निघालो त्यानंतर ढग अगदी खालपर्यंत उतरलेले दिसत होते. अंधार असा नव्हता पण नेहमीपेक्षा लवकरच उजेड कमी झाला होता.

.

.

थोड्याच वेळात या ढगांनी आम्हाला चहुबाजूनी गुंडाळले होते. ढग इतके जवळ आले की अगदी ४-५ मीटर पलीकडचे काही दिसेना. ढगातून वाट काढत गाडी पुढे जात होती. आधीच सगळा दिवस इतका विशेष ठरला होता आणि त्यात हा शेवटचा अर्धातासाचा प्रवास कहर होता. या वेळात जे काही वाटले ते शब्दांच्या पलीकडले आहे. चारही बाजूनी ढग होतेच आणि आणि यावर कळस म्हणून या ढगांना एक छिद्र पडावं तसा सूर्य क्षणभर दर्शन द्यायला आला आणि हे काय होतंय अद्भुत असे विचार सुरु असतानाच म्हणता म्हणता सूर्य परत ढगाआड गेला देखील. विधात्याने सगळे काही खास आपल्यासाठीच घडवले की काय असे वाटत होते. निव्वळ सुरेख, सुरेख आणि सुरेख. (इथली संपूर्ण चित्रफीत हे सगळं प्रत्यक्ष बघण्याच्या नादात बरीच गंडली. शिवाय घाटाचा रस्ता आणि समोरचे काहीच दिसत नसल्याने अति सावधगिरी बाळगावी लागत होती, चित्रफितीतून एक दोन फोटो जमवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे क्वालिटी यथातथाच आहे. फक्त जे बघितले ते थोडक्यात दिसावे इतपत जमवले आहे)

.

हळूहळू जसजसे खाली उतरलो तसे ढग विरळ होत गेले. घाट संपून नेहमीचा रस्ता लागला.

.

आपण जे काही अनुभवले ते खरे होते का म्हणून स्वतःलाच चिमटा काढावा वाटत होता. त्याच धुंदीत पुढचा अर्धा तासाचा प्रवास संपवून परत आलो. 'क्षण हा क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी' अशी अवस्था झाली होती. हॉटेलवर पोचता पोचता बराच उशीर झाला होता. विल्डर्सविल झोपायच्या तयारीत होते. अंधाऱ्या रात्री चांदोबा झाडांमागे लपंडाव खेळत होता आणि चिरकालीन स्मरणात राहतील अशा या आठवणीतच झोपेने ताबा घेतला होता. सहलीचा अंतिम टप्पा जवळ आलाय हा विचारही नकळत मनात येतच होता आणि पुढचे वेध लागले होते, ग्रींडेलवाल्ड आणि त्यानंतर परतीचे. त्याविषयी आता अंतिम भागात…

क्रमशः

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle