लुई द ओन्ली वन (२)

१५ एप्रिलला आमच्या घरातला एक सदस्य "लुई" याचे दु:खद निधन झाले. इथल्या बऱ्याच "मायबोली"कर मुलींना लुईची चांगलीच ओळख आहे. लुईच्या वयानुसार हळूहळू सगळ्या अ‍ॅक्टिविटीज मंदावल्या होत्या. शेवटी शेवटी त्याच्या पाठीमागून पाहिले तर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर काही तरी जखमा दिसत होत्या, त्या लवकर बऱ्या होईनात.

आमच्या घर आणि ऑफ़िसच्या मधे एक भलामोठा वाफ़ा आहे. त्यात रनिंग स्पॅरोचं रान माजलं आहे. संध्याकाळी आमचा ऑफ़िसचा शेवटचा स्टाफ़ घरी गेला की गेटला कुलूप लावून आम्ही लुईला मोकळं सोडत असू. मोकळं म्हणजे काय? तर....तसा तो अंगणाच्या अगदी कडेच्या एका मोठ्या तुकड्यात मोकळाच असे दिवसभर. तो अंगणाचा तुकडा आम्ही तारेच्या जाळीच्या कंपाउंडमधे बंदिस्त केला होता. इथून तो सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेऊन असायचा. ऑफ़िसमधे नवीन येणारा क्लाएन्ट आधी घाबरायचाच. कारण लॅब्रेडॉर तसे मोठेच असतात ना आकाराने! खरं म्हणजे लॅब्रेडॉर हा काही तसा राखणीचा कुत्रा नव्हेच. कारण ही जात महा प्रेमळ! आमच्या लुईचे तर डोळेच खूप प्रेमळ होते!

असो....तर या कंपाउंडचे दार उघडून त्याला संपूर्ण अंगणात मोकळा सोडला की तो आधी या रनिंग स्पॅरोच्या वाफ़्यात घुसायचा. ही झाडं पुरूषभर उंचीची झाली आहेत. बहुतेक तो खाजवून घेत असावा. त्या वाफ़्यात त्याचं अंग घासलं जात असावं. तर आम्हाला वाटलं की असं घासलं गेल्यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टला जखम झाली असावी. पण ते त्याचं दुखणं खूपच विकोपाला गेलं आणि त्याच्या त्या पार्टवर सर्जरी करून तो पार्ट(दोन्ही) काढावा लागला. त्याला इथल्या एका व्हेटर्नरी हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट केला होता. त्या दुखण्यातूनही तो बरा झाला. पण एकंदरीतच तो खूप मंद झाला. त्याला ऐकू येइनासे झाले. एका डोळ्याला दिसेनासे झाले.
आणि त्याला एक प्रकारची इमोशनल इन्सिक्युरिटी आली. आम्ही फ़ोनवर बोलायला लागलो किंवा हॉलमधे बसून एकमेकांशी गप्पा मारायला लागलो की तो समोर ठाण मांडून बसायचा आणि कंटिन्युअस वर तोंड करून भुंकत रहायचा. आम्ही त्याच्यासमोर फ़ोनवर बोललेलंही त्याला आवडेनासं झालं होतं.
विशेषत: मी हॉलमधे खुर्चीवर बसले की अगदी भराभरा जवळ येऊन अगदी डोळ्यात बघायचा...अगदी केविलवाणेपणाने....आता त्याच्या डोळ्यातला आधीचा तो बालीश अवखळपणा, खोडकरपणा हळूहळू लुप्त होत चालला होता. जवळ येऊन माझ्या मांडीवर त्याचं संपूर्ण तोंड ठेवायचा, मान तिरकी करून अगदी जोरच लावायचा. आणि तसाच उभा रहायचा. मला हलू किंवा उठूच द्यायचा नाही.

इतक्या मोठ्या दुखण्यातून बरा होऊनही वर्षभराने त्याच्या पोटावर बाहेरून लालसर रंगाचे ट्यूमर दिसत होते. ते वाढतच गेले. मग डॉक्टर घरी येऊन त्याला अ‍ॅनॅस्थेशिया देऊन त्याचं व्यवस्थित ड्रेसिंग करायचे. कारण भूल दिल्याशिवाय ते शक्य नव्हतं. पण मग डॉकटरांनी सांगितलं की आता आपण त्याला होमिओपपॅथि औषधं सुरू करू आणि असं पाहू की त्याला कमीत कमी यातना होतील. बाकी काही ऑपरेटिव्ह आता त्याला झेपणार नाही. आम्हा सर्वांना साधारण परिस्थिती लक्षात आली. तरीही तो गेला तेव्हा खूप धक्का बसला. असं वाटत होतं की हे फ़ार लवकर घडलं.

आधी काही कारणाने त्याला इंजेक्शन द्यायला लागले तर ती एक सर्कसच असायची. कारण तेव्हा त्याच्या अंगात प्रचंड ताकत होती. मग त्याला त्याच्या कंपाउंडमधे आत ठेवून त्याची साखळी मात्र कंपाउंडच्या जाळीबाहेर कुणीतरी ओढून धरायची. त्याच्या तोंडावर मास्क लावायचा, दोघातीघांनी धरायचं आणि मग इंजेक्शन किंवा ओरल डोस ....काय असेल ते द्यायचं.
या सर्व कामात आमच्याकडे काम करणारा मुलगा शरद याचा सिंहाचा वाटा असायचा. खूप प्रमाने तो त्याचं सगळं करायचा. त्याला सकाळी बाहेर फ़िरवून आणणं,बाहेरच त्याची शी शू उरकून येणे, त्याची अंघोळ, त्याला खायला घालणं...... डॉक्टर आले की त्याला धरायला तर शरदच लागायचा.

माझ्या धाकट्या जावेने पोटच्या मुलाचं करावं तसं त्याचं सगळं केलं. त्याचं रोजचं खाणं पिणं तीच करायची. त्याच्या पोळ्यांसाठी एक बाई लावल्या होत्या. कारण या कुत्र्यांचा आहार भरपूर असतो. त्या बाईंनी काम सोडल्यावर ती स्वता:च सगळं करायची. तिची फ़क्त एक गंमत आहे...तिला तो जवळ आलेला आवडत नसे. लुई लहान होता तेव्हा फ़ार खोडकर होता. तिला तो जवळ गेलेला आवडत नाही हे त्याला माहिती होते. तो मुद्दाम तिच्या जवळ जायचा, तिला अंग घासायचा. मग तिची धावपळ किंवा किंकाळ्या! पण घरी लाडू केले तरी लुईसाठी तिचा घास अडकायचा. आईसक्रीम आणलं तर ती आठवणीने त्याच्यासाठीही वेगळा कप आणणार.
काहीजणांना प्राण्यांचा स्पर्श नकोसा वाटतो! तसंच तिचं होतं! पण लुईवर प्रेम मात्र जिवापाड.
खरं म्हणजे माझ्या पुतणीच्या हट्टाने लुईचं आगमन झालं होतं आमच्या घरात.

तिला हा धक्का सहन करणं फ़ार कठीण गेलं. ती शिक्षणासाठी गेली चार पाच वर्षं बाहेरगावी असते. पण नेमकी ती घरी आलेली असतानाच हे घडलं.
असो......मायबोलीवर तो लेख लिहिताना वाटलंच नव्हतं की काही वर्षांनी असंही लिहावं लागेल. अजूनही वाटतं........गेट उघडलं की येईल धावत. पावणेदोन वाजता भुंकून सर्वांना लंच टाइम झाल्याची वर्दी देईल आणि ऑफ़िसमधून बाहेर काढेल, जेवायला बसल्यावर अक्षरश: त्याच्या हाताने(म्हणजे पुढच्या पायाने) आपल्या मांडीला स्पर्श करून आपल्या ताटातली पोळी मागेल!
अजूनही कधी कधी डब्यातला लाडू लुईसाठी ठेवावा काय असं मनात येऊन जातं. आइसक्रीम, इडली किंवा काहीही गोड केलं की त्याची मूर्ती डोळ्यापुढे उभी रहाते.
कुणाला खोटं वाटेल, पण आम्ही काही त्याच्या आवडीचं खायला घेतलं, त्याला न देता, तर तो समोर ठाण मांडून बसायचा आणि डोळ्याला डोळा देऊन अगदी चक्क हुज्जत घालायचा आमच्याशी, तो आवडता पदार्थ मिळेपर्यंत! अगदी माना ओवाळून. आपण म्हणतो ना.......अरे हो लुई, देणार आहे तुला, थांब जरा ताटली आणते तुझी....किंवा असंच काही, तर तोही वेगळे आवाज काढून गुरगुरून हुज्जत घालत रहायचा!

पुतणीने त्याचा पट्टा, दु्धाचा कुंडा, ताटली, केस विंचरायचा ब्रश....सगळ्या गोष्टी स्वच्छ धुवून कपाटात ठेवल्या आहेत. तो गेल्यानंतर तिचा व्हॉट्सॅपचा डीपी: लुईचा मोठा कणखर, नखं दाखवणारा पंजा आणि त्यावर ठेवलेला तिचा नखं रंगवलेला हाताचा कोवळा पंजा! असा होता.

त्याचा रिकामा ओकाबोका पिंजरा(तोच अंगणाचा जाळीबंद केलेला तुकडा) आता अगदी बघवत नाही. प्रियाच्या "लौकिक" बद्दलच्या लेखात त्यांना जसं लौकिक गेल्यावर "आता दुसरं कुत्रं घ्या" असे सल्ले मिळाले, तसे आम्हालाही मिळतात. इतक्या मोठ्या प्रिमायसेसमधे निदान सेफ़्टीसाठी तरी एखादं कुत्रं घ्या इ.इ. पण आता मन धजावत नाही. आणि लुईच्या जागी दुसरा कुणी तिथे आम्ही बघू शकत नाही!
आणि तो इथे नाहीये हे मन मानतच नाही.....अजूनही!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle