सिनेमा पॅरॅडीसो ( १९८८)

सध्या टीव्हीवरचे शेकडो चॅनेल्स युट्युब ,नेटफ्लिक्स ,ऑनलाईन स्ट्रीमिंग इ. च्या गर्दीत मोठ्या पडद्यावरचा सिनेमा बघणं कमी होत आहे.पण एक काळ असाही होता जेव्हा गावातलं एकुलतं एक पडदा थिएटर हेच लोकांच्या मनोरंजनाचं एकमेव साधन होतं. दर शुक्रवारी कोणता नवा सिनेमा याची वाट लोक बघत असायचे. अशाच एका काळातील कथा सांगणारा एक इटालियन सिनेमा 'सिनेमा पॅरॅडीसो'.

हे 'सिनेमा पॅराडिसो' म्हणजे इटलीतल्या एका छोट्याशा गावात असणाऱ्या एकमेव थिएटरचं नाव असतं.

सिनेमा फ्लॅशबॅकने सुरु होतो. साल्व्हेटर हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे. एका रात्री उशिरा घरी परतल्यावर त्याला निरोप मिळतो की त्याच्या गावातील कुणी अल्फ्रेडो नावाचा माणूस मरण पावला आहे. ती बातमी ऐकून साल्वेतर आपल्या बालपणीच्या आठवणींत हरवतो.

चित्रपटाची कथा म्हणजे नॉस्टेल्जियाचा प्रवास आहे.साल्व्हेटर ६-७ वर्षाचा असताना इटलीतल्या एका छोट्याशा गावात आपल्या आई आणि लहान बहिणीसोबत राहत असतो.त्याला सगळे टोटो म्हणून ओळखत असतात. नुकत्याच संपलेल्या दुसऱ्या महायुद्धात त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो. घरची परिस्थिती हलाखीची. छोट्या टोटोचा विरंगुळा म्हणजे गावातल्या मुख्य चौकात असणाऱ्या सिनेमा पॅरॅडीसो मध्ये चित्रपट पाहणे. या आवडीतूनच त्याची ओळख अल्फ्रेडोशी होते. अल्फ्रेडो त्या सिनेमागृहात पिक्चर दाखवणारा प्रोजेक्शनिस्ट असतो. हुशार पण अवखळ असलेल्या टोटोला पळवून लावायचा प्रयत्न सुरुवातीला तो करतो पण नंतर त्यांची मैत्री होते आणि तो टोटोला प्रोजेक्शन रूम मधून पिक्चर पाहायची परवानगी देतो. इथून त्यांची मैत्री फार सुरेखपणे उलगडत जाते.

प्रोजेक्शन रूम मधून चित्रपट पाहता पाहता टोटो चित्रपटाबद्दल तर शिकत जातोच पण काही मजेदार प्रसंगाचाही साक्षीदार बनतो. कोणताही नवा चित्रपट गावात आला कि गावातला धर्मगुरू तो चित्रपट एकट्याने बसून आधी पाहत असे आणि त्या चित्रपटात जर चुंबनदृश्य असेल तर ते अलफ्रेडोला फिल्म मधून कट करायला लावत असे. अशा कट केलेल्या चुंबन दृश्यांचा ढीग प्रोजेक्शन रूम मध्ये पडलेला असे. तो पाहून त्यातली एखादी फिल्म आपल्याला मिळावी यासाठी टोटोने कितीही हट्ट केला तरी त्यातली एकही फिल्म अलफ्रेडो त्याला देत नसे.

अशी लोकली सेन्सॉर केलेली फिल्म बघायला लोक आले की त्यांचा उमटणाऱ्या प्रतिक्रियाही फार मजेदार असतं. एखादा प्रणय प्रसंग अतिशय रंगलाय असं वाटत असतानाच ते दृश्य कट झालं कि थिएटर मध्ये बसलेली लोक अलफ्रेडोच्या नावाने शिव्यांच्या लाखोल्या वाहत असतं.

पुढे एकदा प्रोजेक्शन रूम मध्ये झालेल्या अपघातात अल्फ्रेडोचे डोळे जातात पण टोटोच्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचतो. त्या गावात दुसऱ्या कुणालाही पिक्चर प्रोजेक्शनची माहिती नसल्याने ६ वर्षाचा टोटो बनतो सिनेमा पॅरॅडीसोचा नवीन प्रोजेक्शनिस्ट तर आता अलफ्रेडो त्याचा मित्र ,मार्गदर्शक बनतो. तो चित्रपटांसोबत आयुष्यातील गोष्टीबद्दलही टोटोबरोबर बोलत असतो. पाहता पाहता १० वर्ष उलटतात.

टोटो १६-१७ वर्षांचा तरुण प्रोजेक्शनिस्ट आहे.सोबत तो आपल्या छोट्या फिल्म कॅमेरावर छोटे प्रयोग करत असतो. तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्यांचं प्रेम फुलतंय असं वाटत असतानाच ती कुटुंबियांच्या दबावाने मागे फिरते . निराश झालेला टोटो मोठ्या शहरात आपला नशीब आजमावायला जातो तेव्हा अलफ्रेडो त्याला आठवणीत न अडकता पूर्ण झोकून देऊन काम करायचा सल्ला देतो आणि पुन्हा कधीच परतून येऊ नकोस म्हणूनही सांगतो.

टोटो शहराकडे जायला निघतो, तिथे फ्लॅशबॅक संपतो आणि चित्रपट वर्तमानात सुरु होतो. टोटो हा आता साल्व्हेटर आहे , ३० वर्षांनी गावी परत येतो. गावातले छोटे मोठे बदल तो टिपत राहतो. अलफ्रेडो च्या फ्युनरल मध्ये त्याला सिनेमा पॅरॅडीसो मध्ये चित्रपट पाहायला येणारे काही चेहरेही दिसतात.गावातल्या मुख्य चौकात ते येतात तेव्हा कोपऱ्यात सिनेमा पॅरॅडीसो दिसतं. ते पाडून तिथे मॉल उभा राहतोय ,हेही त्याला कुणीतरी सांगतं.

त्यानंतर तो अलफ्रेडो च्या घरी जातो.अलफ्रेडोची बायको त्याला अलफ्रेडोने त्याच्यासाठी ठेवलेला एका फिल्मचा रीळ देते. गावातून निघून तो शहरात परत येतो.घरी जाऊन ती फिल्म बघतो. तर ती फिल्म असते प्रत्येक फिल्म मधून कट केलेल्या चुंबनदृश्यांचा एक मोंटाज.एका मागोमाग दिसणारे ते प्रेमाचे सीन्स पाहून साल्व्हेटरचे डोळे भरून येतात. इथे चित्रपट संपतो.

यातल्या अनेक फ्रेम्स फार सुंदर आहेत . एक आवडलेलं दृश्य आठवलं ,टोटो शहरात जायला निघतो ,त्या स्टेशनवरून त्याची ट्रेन हळूहळू दूर दूर होत जाते ,प्लॅटफॉर्मवर त्याला निरोप द्यायला आलेल्या लोकांखेरीज एक छोटा मुलगा थोड्या अंतरावर बसलेला दिसतो, टोटो आपल्यातील निरागसता तिथे सोडून जातोय ,हे तर दिग्दर्शकाला सुचवायचं नसेल?

वर वर पाहता हा कुण्या साल्व्हेटरच्या आठवणी उलगडणारा हा सिनेमा.पण त्यासोबत बऱ्याच गोष्टींनाही स्पर्श करतो. युद्धानंतरची सामान्य लोकांची स्थिती ,काळानुसार बदलती गावं ,आर्थिक विषमता,तरुणाई ,पहिलं प्रेम इ ,पण सगळ्यात महत्वाची म्हणजे सिनेमाची माध्यम म्हणून परिणामकारकता सिनेमा पॅरॅडीसो च्या प्रेक्षकांच्या रूपाने अधोरिखित होते. सिनेमा पॅरॅडीसोत बसून लोक चित्रपट पाहत आहेत अशी बरीच दृश्ये आहेत. चित्रपटगृहाच्या अंधारात चित्रपट पाहताना लोक आपले प्रश्न विसरून त्या २-३ तासांसाठी चित्रपटाच्या कथेत हरवतात ,ते हसतात ,रडतात ,रागावतात ,चित्रपटातल्या भासमान जगातील भावना जणु स्वतः जगतात,हे सगळं कथेच्या ओघाने बघताना आपणही त्या प्रेक्षकांशी जोडले जातो.

१९८९ च्या बेस्ट फॉरेन सिनेमा या कॅटेगरीत ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब मिळवलेला हा सिनेमा उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी मुळे फार देखणा झालाय.छोट्या टोटो आणि अलफ्रेडोचं काम करणाऱ्या दोन्हीं कलाकारांच्या अभिनयातली सहजता प्रत्येक फ्रेम मधे दिसते. ह्या चित्रपटात जे पडद्यावरच्या चित्रपटांचे सीन्स वापरले आहेत ,ते त्याकाळचे क्लासिक्स असलेले कुरोसावा ,जॉन वेनचे पिक्चर ,चार्ली चॅप्लिन चे पिक्चर वापरले आहेत,एका दृष्टीने हा चित्रपटाचां ही नॉस्टॅलजिया आहे.

पुढे २००२ मध्ये याच सिनेमाचं डायरेक्त्तर कट व्हर्जन रिलीज झालं,त्यात काही कट केलेले सीन्स आहेत ,त्यात त्याच्या प्रेमकथेचा अधुऱ्या शेवटचा उलगडा होतो ,पण पूर्ण कथेच्या दृष्टीने पहिलं व्हर्जन जास्त परिणामकारक आहे.

'क्लासिक फिल्म्स' या कॅटेगरीत गणला जाणारा हा सिनेमा त्यातल्या तांत्रिक बाबींमुळे जितका फिल्म क्रिटिक्स मध्ये आवडता आहे तितकाच साध्या ,सोप्या पटकथेमुळे प्रेक्षकांचाही लाडका आहे.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle