जेथे आशियाला युरोप मिळते. ( इस्तंबूल भाग-४)

आज सकाळी लवकर उठून ब्रेकफास्टला हजर झालो कारण आजच्या दिवशी अनेक गोष्टी बघायचे साधायचे होते. तक्सिम सुट्समध्ये छानपैकी आॅम्लेट ,सब्जेली पिडे आणि तुर्की चाय पिऊन मोर्चा वळवला तक्सिम स्क्वेअर स्टेशनकडे. आजचे पहिले ठिकाण होते सुलेमानिये मशीद. आज नेहमीसारखी फ्युनिक्युलर न घेता मेट्रोने प्रवास करायचा होता. नेहमीचेच इस्तंबूलकार्ट तिथेच रिचार्ज करुन घेतले. आणि डावीकडे येनीकापीच्या M2 मेट्रोकडे दाखवणारा बाण बघत प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. अगदी वेळेत फारशी गर्दी नसणारी मेट्रो आली. आम्ही Vezneciller स्टेशनवर उतरलो. प्रत्येक स्टेशनजवळ कोणते बघण्याचे ठिकाण आहे हे देखील बोर्डवर लिहिलेले असते. त्यामुळे चुकीच्या स्टेशनवर वगैरे आपण जात नाही! उतरून मग बरेच मजले चालून आपण स्टेशनबाहेर येतो. बाहेर आल्यावर नेमके कुठे जावे कळत नाही कारण मशिद समोर दिसत नसते. बाहेरच असणाऱ्या टपरीवर विचारल्यावर त्याने मागे बोट दाखवले! त्यावरून कसे कळावे? मग गुगलबाबाला विचारले. त्याने बरोब्बर सांगितले स्टेशनकडे पाठ केली तर उजव्या हाताला वळून समोर दिसणारा रस्ता वर चढत जायचे. याच रस्त्यावर युनिव्हर्सिटी देखील आहे. त्याची आॅफिसेस उजव्या हाताला ठेवुन चालत रहायचे. रस्त्यात मधेच सुंदर आॅटोमनकालिन इमारती दिसतात. सुरेख गार हवा, युनिव्हर्सिटीकडे जाणाऱ्या ,आपल्यातच दंग असणाऱ्या अप्सरांसारख्या मुली ( खरंच तुर्की मुली अप्रतिम देखण्या आहेत. उंच, सोनेरी केस, आशियायुरोपचं काँबिनेशन असणारा गोरा रंग,गुलाबी गाल आणि कमनीय! अजयला काय पाहू काय नको झालेले हे पहिलेच ठिकाण Wink
अशा सुंदर वातावरणात चालत म्हणण्यापेक्षा चढत अलगद मशिदीसमोर येऊन उभे ठाकलो. मागून ही मशीद तेवढी आकर्षक दिसत नाही. तिचे देखणेपण आवार ओलांडून पुढे आले की सामोरे येते.
.

इस्तंबूलच्या टेकडीवर समुद्राच्या काठावर ही मशीद प्रसिद्ध सुलतान सुलेमान द मॅग्निफिसंटने बांधलेली. मिमार सिनान या जगप्रसिद्ध वास्तूतज्ञाच्या देखरेखीखाली बांधलेली ही देखणी मशीद. तिचा कर्ता त्यावेळचा महापराक्रमी, कुबेराची संपत्ती असणारा सुलेमान. त्यामुळे नुसती मशीद न बांधता हे संकूल बांधले गेले. मदरसा,अन्नछत्र,हाॅस्पिटल असे सर्व काही या आवारात आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे इथे सुलतानाच्या वंशजांच्या अनेक कबरी आहेत. काही अगदी छोट्या तर काही भल्यामोठ्या. स्वतः सुलेमान आणि त्याची लाडकी राणी हासेकी हुर्रेम सुलतान उर्फ रोक्साना इथेच कबरीत विसावलेले आहेत. तसेच नंतरच्या काही सुलतानांच्या कबरी इथे आहेत. थडगी आणि त्यावर हिरवी झोपडीसारखी वेष्टनं. सुलतान आहे तिथे त्यावर पागोटे ठेवलेले दिसते. स्त्रियांच्या कबरीवर फळाफुलांची नक्षी दिसते ती अर्थातच वंश वाढवणारी स्त्री याचे प्रतिक.

समोर बाॅस्फरस खाडीचा देखणा देखावा डोळ्याचे पारणे फेडतो. मशिदीची रचनाही अतिशय सुबक आहे. सलग लहान मोठे घुमट आणि कोपऱ्यात जाळीदार मिनार. आत प्रवेश करताना मध्ये मोठा चौक लागतो. मशिदीच्या अंतर्भागात नेहमीप्रमाणे मिमार सिनानने आॅटोमन वास्तूकलेला पणाला लावलेले आहे. सुंदर घुमट,प्रचंड झुंबरं ,प्रकाश परावर्तित करणाऱ्या काचेच्या रंगीत खिडक्या .सर्वच अतिशय देखणे.
.

बाहेरच्या दालनात रोक्सानाची चांदीने मढवलेली कबर आहे. सुलतानाकडे बटीक म्हणून आलेल्या या स्त्रीने सुलतानाला मुठीत ठेवून त्याच्यासोबत राजकारण केले. तिचे परदेशी राजांशी कामासंदर्भात पत्रव्यवहार असत. आपल्या मुलाला सुलतान बनवण्यासाठी अनेक लटपटी करुन खून पचवून तिने सम्राज्ञी म्हणून आणि वालिदे सुलतान म्हणजेच तिचा मुलगा सुलतान झाल्यावर सर्व राज्यकारभार हातात घेऊन तिचा काळ गाजवला. अय्या सोफियासमोर तिने बांधलेला सुरेख हमामखाना आहे. आयुष्याच्या शेवटी दानधर्म करुन जग गाजवून ही इकडे कबरीत विसावली आहे. तिच्या कबरीबाहेर मला घसरुन पाडून तिने माझ्याकडून साष्टांग नमस्कार घालून घेतलाच!
.

मशिदीच्या बाहेर येताच समोर खाण्याचे स्टाॅल दिसतात. इथे जायला अजिबात चुकवायचे नाही. कारण इथला कुरुफाल्सुये नावाचा पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे. आपल्या राजमा चावल सारखाच पदार्थ. इथे कुरुपिलाव म्हणून खातात. पोटभरीचा आणि चविष्ट. नुसतं मागवलं तर सोबत पाव येतो. पिलाव सांगितले तर भातासोबत. खाऊन बघाच!
.

मशीद बघून निघाल्यानंतर आजचा मोठा कार्यक्रम होता बाॅस्फरस क्रुजचा. ट्रिप अॅडव्हायजरवर मिळालेल्या मोलाच्या सल्ल्यामुळे आम्ही हाॅप आॅन हाॅप आॅफ टूर निवडली होती. त्यामुळे नेहमीच्या नुसते बाॅस्फरसमधून फिरवून आणणाऱ्या टूर्सपेक्षा बाॅस्फरसकाठच्या बागा,महाल असे सर्व निवांत बघता येते. ही टूर निघते काबातासच्या फेरीवरुन. यासाठी आम्ही मेट्रोने तक्सिमला येऊन फ्युनिक्युलरने काबातासला आलो. समोरच पेट्रोल पंपाच्या मागे जेट्टी आहे. तिथे या क्रुजची तिकिटं मिळतात. आम्ही अकराची क्रुज घेतली. तिकिटासोबत नकाशा पण मिळाला. कोणत्याही स्टाॅपवर उतरून नंतर मागून येणारी पुढच्या क्रुजवर आपण त्याच तिकिटात चढु शकतो. ही अतिशय छान सोय आहे. पण याची माहिती कोणीच देत नाही. ट्रिप अॅडव्हायजरवर मी या सहलीबद्दल माहिती विचारली असता एकीने या क्रुजची लिंक दिली होती.

.

अगदी ठरल्या वेळेला क्रुजने काठ सोडला. पहिले ठिकाण लगेचच लागते. दोल्माबाचे पॅलेस. तोपकापी राजवाडा जुनाट झाल्यावर हा पॅलेस बांधला गेला. बाॅस्फरसकाठी असणारा हा पॅलेस म्युझियम तिकिटात येत नाही. आतून नेहमीसारखाच पॅलेस आहे. फार विशेष नाही. म्हणून त्याचे वेगळे तिकिट काढून बघायला गेलो नाही. बाहेरून मात्र लांबलचक पसरलेला शुभ्र पॅलेस अगदी सुंदर दिसत होता. समुद्राच्या निळाईच्या काठावर अगदी उठून दिसत होता. एका स्टाॅपनंतर एमिग्रान येते. इथली बाग अतिशय प्रसिद्ध आहे. इथे यावे ते ट्युलिपच्या हंगामात. हाॅलंडला ट्युलिप आले ते तुर्कस्तानमधूनच. ट्युलिप तुर्कांचे राष्ट्रफूल अाहे. हे एमिग्रान पार्क या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. वरवर चढत जात बाग फिरत होतो. हनिमूनर्ससाठी अनेक ठिकाणी पुष्परचना, बदामाच्या आकारचे खांब मध्येमध्ये लागतात. आम्ही पण बदामात उभे राहून फोटो काढलेच! खोटे कशाला बोला Wink लग्नाला वीस वर्ष झाली आहेत म्हणून काय झालं अजून बदामात उभे राहून फोटो काढावेसे वाटताहेत तरी! !आजुबाजुला अनेक प्रिवेडिंग शुट सुरु होती. पांढऱ्या वेडिंग गाऊनमधल्या नवरीला पकडून पोझेस देणे सुरु होते. तो व्याप बघता लग्नाला वीस वर्ष होऊन गेलेली आहेत याचे फारच बरे वाटले Wink
.
एका तळ्याकाठी निवांत बसलो. आणि तासाभरात समुद्राच्या कडेकडेने असणाऱ्या सुंदर रस्त्यावरुन चालत जेट्टीवर आलो. लगेच ठरल्या वेळेत पुढची क्रुज हजर!

आता दमलोय म्हणत पुढ्यात आलेला ज्युसचा ग्लास रिकामा केला. सोबतच्या नकाशाकडे नजर टाकली तर लगेचच पुढचा स्टाॅप होता सुरेख कुकुक्सु पॅलेस. ट्रिप अॅडव्हायजरवरच्या सल्ला देणारीने हा जरुर बघा सांगितले होते. त्यामुळे उत्सुकतेने लगेचच उतरलो. थोडेसे बाहेर चालत जाताच पॅलेसचे गेट लागते. मध्यभागी विस्तीर्ण गॅलरी आणि दोन्ही बाजूने वळून वर जाणारे ऐटदार संगमरवरी जिने या पॅलेसची शोभा वाढवतात. त्याच्या तिकिटात पॅलेसची गायडेड टूर असते. आत शिरताच आपल्या शुजवर प्लास्टिकचे आवरण चढवावे लागते. हा पॅलेस फ्रेंच पद्धतीने सजवलेला आहे. आत जुने खानदानी फर्निचर आणि सोनेरी काम असणारी सिलिंग, तुर्की गालिचे महालाची शोभा वाढवतात. हा पॅलेस महत्त्वाच्या पाहुण्यांसोबत मीटिंगसाठी केमाल पाशा वापरत असे.
.

महाल बघून जेट्टीपाशी येताच पुढची क्रुज हजरच होती. तिच्यावर मात्र आरामात बसून मस्त गरम चिज सँडविच आणि काॅफी पित सामोरा येणारा सुंदर नजारा बघत बसलो. बाजूने रुमेली फोर्ट म्हणजे इथला किल्ला लागतो. तिथे स्टाॅप नाही. पण बाहेरून छान बघता येतो. नंतर बेयेलेरबेयी पॅलेस दिसतो. अनेक देखण्या इमारती दिसत राहतात. परतताना आशिया आणि युरोपला जोडणारा पूल समोर येतो. त्याच्या बाजूला असणारी काॅर्ताकाॅयची मशीद आणि हा पूल तर तुर्की स्टँपवर जाऊन बसलेत. समुद्रावरून देखणे सिगल उडत असतात. निळाशार स्वच्छ समुद्र, हा फक्त दोन खांबांवर असणारा सुरेख नाजूकसा दिसणारा ब्रिज आणि आजूबाजूचा एशियन साइडचा भपकेभाज खानदानी परिसर सगळेच बघत राहण्यासारखे.
.
.

फेरी संपवून आलो तेव्हा चारच वाजले होते. आम्हाला सूर्यास्त बघायला गलाटा टाॅवरला जायचे होते. मग मधल्या वेळात आर्किआॅलाॅजी म्युझियमला जायचे ठरवले. काबातासहून ट्रामने सुलतानअहमेत स्थानक गाठले. तोपकापी पॅलेस बंद असल्याने आतला रस्ता बंद होता. तिथल्या गार्डने बाजूच्या रस्त्याने जायला सांगितले आणि आमच्या ध्यानीमनी नसताना एका सुंदर रस्त्याने जायचा योग आला. हा रस्ता आॅटोमन काळातील पण आता जीर्णोद्धार केलेल्या सुंदर सुबक घरांच्या बाजूने जातो. म्युझियम तर राजवाड्याचाच भाग असलेला एक मोठा महाल आहे. हे म्युझियम म्युझियम पासमध्ये येत असल्याने वेगळे तिकिट नाही. प्रचंड मोठे असल्याने इथे नेमके काय बघायचेय मी लिहूनच आणले होते. त्यामुळे प्रथम इथल्या जगप्रसिद्ध शवपेट्यांच्या कक्षात आधी गेलो. इथे सिरियातल्या साइदा गावात उत्खननात मिळालेल्या या शवपेट्या आहेत. इथली अलेक्झांडरचे चित्रण असणारी भलीमोठी शवपेटी प्रसिद्ध आहे. यावर अलेक्झांडर आणि सोबत्यांचे लढाईचे दृश्य अप्रतिम कोरलेले आहे. दहा फूट लांब पाच फूट रुंद अशा भल्यामोठ्या आकारात कोरलेले हे अप्रतिम काम चुकवू नये असेच.
.
इथे इतरही अनेक सुंदर शवपेट्या (विचित्र वाटतं खरं सुंदर म्हणायला! ) आहेत. त्यावरून त्या काळातल्या लोकांच्या समाजजीवनाचा नेमका अंदाज येतो.

.
पुढच्या दालनामध्ये रोमनकालिन सुंदर पुतळे अाहेत. अक्षरशः असंख्य गोष्टी ठेवलेल्या अाहेत. काय बघु काय नको असे होते. पायाचे तुकडे पडायला आल्यावर निघालो आणि ट्रामने शिशाने स्टेशनला उतरलो. वर चढत जाताच गलाटा टाॅवर डोकावू लागतोच.

.
हा टाॅवर उंचावरुन नगराचे निरीक्षण करण्यासाठी चौदाव्या शतकात बांधला गेला. यावरून इस्तंबूल शहराचे सर्व कोनातून दर्शन होते. इथून दिसणारा सूर्यास्त अतिशय प्रेक्षणीय असल्याने अर्थातच तिकिटाला भलीमोठी रांग होती. आम्ही टाॅवरच्या वरच्या मजल्याचे तसंच तिथल्या ३ डी शोचे पण तिकिट काढले. वर कसेबसे उभे राहायला जागा होती इतकी गर्दी. तीन दिवस फिरल्यामुळे वरुन दिसणाऱ्या वास्तू ओळखता येत होत्या. प्रसिद्ध गोल्ड हाॅर्न, त्याकाठचा तोपकापी राजवाडा, अया सोफिया,सुलेमानिये मशीद सर्वकाही खेळण्यात मांडून ठेवल्यासारखे दिसत होते.

.

.

बघता बघता सूर्य अस्ताला गेला. अद्भूत केशरी प्रकाशात इस्तंबूल अजूनच रहस्यमय दिसायला लागले. ते गारूड तसेच मनावर ठेवून परतलो..उद्याचा दिवस इथला अखेरचा ....

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle