पातोळे:

पातोळे:patole
कोकणात पूर्वीपासून केली जाणारी पक्वान्न ही तांदूळ, नारळ आणि गूळ या त्रिकुटा भोवती फिरणारी... आणि निसर्गाच्या जवळ जाणारी! माझ्या आजी कडून शिकलेलं हे पक्वान्न म्हणजे या मोसमात येणाऱ्या हळदीच्या पानांचा उपयोग करून आणि नेहमीच्या शिलेदार मंडळींना बरोबर घेऊन केलेलं. यामुळे एक व्हायचं..... भाकरी, भाजी याची गरज उरायची नाही. घरचं साजूक तूप आणि पातोळे! अगदी तुम्हाला हवंच तर बेगमीचं आंब्याचं लोणचं घेतलं की अहाहा!
पहा एकदा करून आमच्या कोकणची खासियत..... यात रत्नागिरी भागात हे पातोळे मी देतेय असे तर सिंधुदुर्ग भागात मोदका सारखे करतात.

साहित्यः २ वाट्या काकडीचा कीस, २ वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, हळद चिमुटभर, मीठ, वेलची पावडर, रवाळ तांदूळ पीठ २ वाट्या, हळदीची पाने ७/८
कृती:
हळदीची पाने स्वच्छ धुवावीत. पुसून घ्यावीत. तवसं म्हणजेच जून काकडी किसून घ्यावी. नारळ खवून घ्यावा. जेवढा कीस असेल तेवढा गूळ घ्यावा. तांदुळाचे रवाळ पीठ घ्यावे. रवाळ पीठ नसल्यास त्यात चार चमचे रवा मिसळावा. कीस आणि गूळ कढईत एकत्र करून गॅसवर ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ. हळद घालावी. गूळ विरघळला की त्यात मावेल तेवढे तांदळाचे पीठ मिसळावे. वाफ काढावी. वेलची पावडर घेतलीय पण खरं तर याला हळदीचाच छान स्वाद येतो.
मिश्रण गार करण्यास ठेवावे. हळदीची पाने अर्ध्यावर दुमडून घ्यावीत. त्याच्या पाठच्या बाजूला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर एका बाजूला तयार मिश्रण थापावे. एका पातेल्यात पाणी घ्यावे. त्यात एक पसरट डबा ठेवावा. त्यातही पाणी घ्यावे. त्यावर चाळण ठेवावी. चाळणीत एखादी वाटी ठेवावी. वाटी भोवती तयार पाने उभी करावीत. त्यावर झाकण ठेवावे. पंधरा मिनिटे वाफ काढावी. पातोळे तयार आहेत. साजूक तूपाबरोबर खावे.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle