'काचपंख' आणि 'पाठीमागून'

हा वीकांत कविता वाचत घालवला. (शुम्पीच्या इरामुळे स्फूर्ती मिळाल्यामुळे :fadfad: ) शोधाशोध करताना जपानी कवयित्री सगावा चिका हिच्या abstract, modernist (btw ह्या कविता १९२०-३० च्या काळातील आहेत) कविता खूप आवडल्या. ही उमदी कवयित्री वयाच्या अवघ्या पंचविशीत कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडली. अवघ्या पाच सहा वर्षात लिहिलेल्या तिच्या कविता आहेत. एक- दोन कवितांचा अनुवाद करण्याचा मोह आवरला नाही. त्या कविता इथे देतेय.

काचपंख

माणसं हळूच प्रेम पाठवतात
काचेच्या पंखांमध्ये अलगद ठेवून
चौकातच सूर्य त्यांचा करून टाकतो चुरा.
खिडकीसमोर आभाळ उभं ठाकतं
काळवंडू लागतं खोटा श्वास थांबताना.
एका सरळ रेषेत उडतो पाचोळा,
आणि वाकून पाहतात उतरती छपरं,
भरून वाहणाऱ्या रस्त्यांमधून
रांगत जातात लोकल ट्रेन्स.
दूर निळ्या संथ आकाशाच्या घडीत
भिरभिरणारी खलाशी शिडं.
उन्हाच्या चमचमत्या रेषा
तुटून कोसळतात अंधुक पेल्यात
जीव जागतात सुखाच्या सावल्यांत.

पाठीमागून

रंग गिळणारी रात्र
गुच्छातून गळलेले खोट्या चमकीचे मणी.
दिवस पाचोळ्यात पडतो चकाकत्या माश्यासारखा
झटापट करतो चिवट चिखलात.
आकारहीन स्वप्ने आणि
पोसलेली टवटवीत झाडे
या शुष्क, सुरकुतलेल्या
निराशेपलिकडे.
चिरून ठेवलेले अवकाश
गुदगुल्या करते पायाखालच्या
रानगवताला.
सिगारेटने काळवंडलेली बोटे
माया करतात सरपटणाऱ्या
काळोखाला.
आणि तेव्हा माणसे पुढे होतात.

Keywords: 

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle