अंतरीच्या गूढगर्भी

निःशब्दतेच्या गूढगर्भी
अर्था-अनर्थांची वादळे
अर्थाच्या हिमनदीखाली
वाहणारे
घाव मनीचे कोवळे-सावळे

जुनाट जखमा, वाळलेले अश्रू
चोळामोळा झालेलं
चुरगळलेलं मन
आणि
कोरड्या एकाकी वाटा
पाहणारे निष्प्राण चक्षू

असह्य एकटेपणानी
चहुबाजूंनी उठवलेली वावटळ
आणि त्या अंधारानी
फेर धरून मांडलेली रास
आणि
कुडीचं वस्त्र फेडून
बाहेर येण्यासाठी
तगमग करणारं
आपल्या आतलं
काहीतरी

नकोसेच वाटणारे
निरर्थक उन्हाळे-पावसाळे
बाहेरचे आणि आतलेही .
नकोश्या संवेदना
नकोशी नजर , आवाज
स्पर्श आणि अस्तित्व .
या सगळ्यांची ,
पंचेंद्रियांच्या काड्यांची
मोळी बांधून फेकून देणारी
माझ्या आत वळलेली
माझी नजर
आता ---
शुष्क नाही.
पण आता
आत कुणालाही प्रवेश नाही.
मलाही.
आता ---
अंतरीच्या गूढगर्भी
वाहत जाणारं
माझं उरलेलं अस्तित्व -
त्याही प्रवासाच्या अंताची
प्रतीक्षा करणारं
प्रवाहपतित --

~ देवयानी गोडसे

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle