मन हळवं पाखरू... त्याला कशी सावरू

गेल्यावर्षी याच दिवशी मी ओवरीज आणि युट्रस रीमुव करून घरी आले. हिमोग्लोबिन 6 वर आलं होतं. सात आठ महिने पाळी महिना महिना चालू रहात होती. त्यामुळे ऑपरेशन करावं लागलं. त्याक्षणी माझ्या मनातल्या भावनांचा गुंता शब्दबद्ध केलाय..तो शेअर करतेय.

चाळीशीच्या उंबरठ्यावर कधी पोहोचले कळलंच नाही...आयुष्याचे विविधरंगी टप्पे पार करताना! हा उंबरठा ओलांडल्यावर वाटलं, आता लेक स्वतःच्या बळावर पंख पसरून झेपावतोय या भल्यामोठ्या जगाच्या पसाऱ्यात...अस्तित्व निर्माण करू पाहतोय स्वतःचं! हे सारं दुरूनच अनुभवत मिळालेले निवांत क्षण एकमेकांच्या सहवासात मुक्तपणे उधळावेत, चाळिशीच्या उंबरठ्यावरचं रिकामपण आनंदाने फुलवावं... पुन्हा नव्याने उमलावं अलगदपणे... पण तेवढाच क्षण हाती येतोय म्हणताना निसटला. ज्या कप्प्यात हळुवारपणे जपलं मातृत्व नऊ महिने...आणि मिरवलं स्त्रीत्व...आज अस्तित्वच संपताना मन सैरभैर झालंय... शरीरातून एक कप्पा निखळताना.. ज्याने दिला मातृत्वाचा सगळ्यात सुंदर अनुभव!
नाही रीती कशी असेन मी...भरभरून दिलंय या सुंदर आयुष्याने... अगदी दोन्ही ओंजळीत प्राजक्ताचा सडा पडावा तसं!!!!
तरीही एक खंत राहतेच ना :)

स्त्रीत्वाचं दान आनंदाने स्वीकारलं जन्म घेताना...

आज मात्र मन कातर झालंय सर्वार्थाने रितं होताना!!!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle