जर्मन वर्मन

एकीकडे अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये शशी गोडबोले इंग्रजीचे धडे घेत होती आणि साधारण त्याच काळात मी इकडे जर्मनचे. भारतात असताना थोडेफार शिकले असले तरीही ती थीअरी असते आणि पहिल्या १-२ कोर्सेस मधले अगदीच बेसिक होते. प्रत्यक्षात इथे आल्यानंतर खूप गोष्टी बदलतात, रोज एखादे नवीन संकट उभे राहते. कधी थोडेसे काही जमले तरी जग जिंकल्याचा आनंद होतो आणि कित्येक वेळा अगदी 'चुल्लूभर पानी में डूब मरू' अशी अवस्था होते. या सगळ्याला इथे शिकण्याची जोड मिळाली तरीही नवीन प्रश्नांचा, गमतीशीर घटनांचा प्रवास सुरु होतो आणि काही आठवणीत राहण्यासारखे किस्से घडू लागतात.

येउन चार दिवसच झाले असतील आणि घरासाठी म्हणून काही सामान घ्यायला एका दुकानात गेलो. सामान घेतले आणि भूक लागली म्हणून तिथेच बाहेर मिल्कशेक दिसले ते घेऊयात असा विचार केला. मला जरा भाषेची सवय व्हावी या उद्देशाने नवरा म्हणाला, तू दे की ऑर्डर. तुला येईल तेवढे सांगता. काय सांगायचे ते त्याला विचारून कन्फर्म केले आणि ऑर्डर द्यायला गेले. ऑर्डर देऊन नंतर एका मशीन वर फ्लेवर सिलेक्ट करायचे होते.
मी: "दोन मिल्क शेक." (एवढे सांगितले की आपले काम झाले असे वाटून पैसे काढण्याच्या तयारीत)
ऑर्डर घेणारी मुलगी: "…………………………….."
ती जे काही बोलली त्यातला एकही शब्द मला कळला नाही. मी निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले. तिने परत प्रयत्न केला.
"…………शोकोलाडं…………."
यात फक्त एक शब्द कळला. शोकोलाडं. येस्स. हा शब्द माहितीये मला. शोकोलाडं म्हणजे चॉकलेट. बाकी काय विचारतेय वगैरे कशाशी देणेघेणे नाही. लग्गेच मी अगदी उत्साहात उत्तर दिलं.
"या या, शोकोलाडं शोकोलाडं" (आपल्याला जमले काहीतरी असे चेहऱ्यावरचे भाव) आणि परत काहीतरी प्रश्न आला. तिचा थोडासा वैतागलेला चेहरा दिसत होता. माझ्या मागे रांगेत जे होते त्यांचेही असतील ते माहित नाही.
"…………शोकोलाडं…………."
मी: "या, २ मिल्क शेक". (इंग्रजी-जर्मन मधला या, मराठीतला नाही)
ती पण हरली असणार इथे. "मला जर्मन येत नाही. तुम्ही इंग्रजीत सांगाल का?" हे वाक्य खरंतर मला व्यवस्थित यायचं. पण या गडबडीत ते सुचलं नाही. शेवटी मी मागे उभ्या असलेल्या नवऱ्याकडे मदतीसाठी आशाळभूत नजरेनी पाहिलं. गर्दीतून वाट काढत शेवटी तो आला, बोलला आणि काम झालं. मिल्क शेक घेत बाहेर आलो तेव्हा माझी फजिती कळली. त्यांच्याकडे जे ३ फ्लेवर्स होते आणि त्यातला शोकोलाडं संपलेला होता. इतर दोन चालतील का एवढा साधा तिचा प्रश्न होता. आणि जे ती नाहीये म्हणून सांगत होती तेच मी तिला दे म्हणून सांगत होते. हे ऐकून तर अजूनच चिडचिड झाली. पण नंतर लक्षात आलं की ये तो सिर्फ शुरुवात है. Wink

पहिला आठवडा गेला. नवरा ऑफिसला गेला आणि थोड्याच वेळात बेल वाजली. संकट आल्यासारखी मी आता काय करू अशा विचारातच होते. शेवटी दाराजवळ असलेल्या यंत्राचे बटन दाबून हेलो एवढे बोलले. पलीकडून एका मनुष्याचा आवाज आला आणि पुढे तो काय बडबडला हे काहीच झेपलं नाही. अर्थात हे अपेक्षित होतं. त्यामुळे पटकन "मी इथे नवीन आहे. तुम्ही थोडे सावकाश किंवा इंग्रजीत बोलू शकाल का?" एवढे बोलायला सुचले. मग त्याची पुढची दोन वाक्य कळली. कळली याचा आनंद झाला पण तो आला होता इथल्या foreigners office मधून. म्हणजे जिथे व्हिसा वगैरेची कामं होतात ते सरकारी ऑफिस. आधीच इकडे येताना व्हीसाने इतका त्रास दिला होता की आता अजून काय अशा विचारातच मी खाली येते असे म्हणत गेले. मग तो जे काही बोलला ते सगळे ऐकले. जे नाही समजले ते परत विचारले आणि ३ महिन्या नंतरच्या व्हिसा एक्सटेंशन साठी तो फक्त आठवण द्यायला आलाय आणि एक पत्र द्यायला आलाय असे समजल्यावर हायसे वाटले. हे एवढं मला जमलं म्हणून त्या क्षणी तर मी खरंच हरभऱ्याच्या झाडावर चढले होते आणि उग्गाच भाव खाऊन घेतला. तो आनंद फार काळ टिकणारा नव्हता हे माहित होतंच तसंही.

यादरम्यानच मला डोळे तपासण्यासाठी जायचे होते चष्म्यांच्या दुकानात. पहिल्या वेळी नवरा सोबत आला. पण माझे नाव सांगणे एवढेच तो करू शकला. आत तपासणीसाठी इतर कुणालाही प्रवेश नव्हता. जेव्हा त्या डॉक्टरने 'तुम्ही नाही येऊ शकत आत' असे त्याला सांगितले तेव्हा माझी अवस्था अगदी बालवाडीत पहिल्या दिवशी आई बाबा बाहेर आहेत आणि शाळेतल्या बाई मला आत घेऊन जाताहेत अशी झाली होती. मग डोळे तपासणीला जशी आपली इंग्रजी/मराठी अक्षरे येतात तशी जर्मन मुळाक्षरे समोरच्या स्क्रीनवर दिसू लागली. माझी डोळ्यांची परीक्षा नसून भाषेची परीक्षा असल्याप्रमाणे मी वाचायला सुरुवात केली. बरेच काही जमले आणि पहिला टप्पा पार पडला. मग त्याने इतर काही माहिती विचारायला सुरुवात केली ती मी दोन दोनदा रिपीट करायला सांगून कशीबशी दिली. एका शब्दासाठी जास्तच अडले असता मी त्याला म्हणाले की "मला समजले नाही. प्लीज इंग्रजीतून सांगू शकाल का?" पण ऐकेल तर शप्पथ. चार वेळा त्याने समजावून सांगितले पण इंग्रजी शब्द काही सांगितला नाही. नशीबाने चौथ्या प्रयत्नात मला झेपले आणि तपासणीचा पहिला अंक संपला.

पुढच्या वेळी मग मी एकटी गेले. तिथे जाउन रिसेप्शन वरच्या मनुष्याला सांगितले
मी: "मी मागच्या वेळी येउन गेले आहे. आता पुढची टेस्ट आहे."
तो "आत्ता बरीच गर्दी आहे . अजून अर्धा तास तरी लागेल. तुम्हाला कुठे जायचे असेल तर जाउन या."
मी ठीक आहे म्हणाले आणि पुढचा प्रश्न आला, "Sie sind Frau .....?"
Sie sind म्हणजे You are. जर्मन मध्ये स्त्री किंवा महिला यासाठी शब्द आहे फ़्राऊ. (Frau). पण त्यासोबतच फ़्राऊ म्हणजेच बायको सुद्धा. म्हणजे 'मी स्त्री आहे' हेही फ़्राऊ, 'मी याची बायको आहे' हेही फ़्राऊ आणि 'मी मिस/मिसेस मधुरा' अशी स्वतःची ओळख करून द्यायची असेल तरीही 'फ़्राऊ मधुरा'.
तर तेव्हाच्या माझ्या अर्धवट ज्ञानामुळे या वाक्याचा शब्दशः अर्थ "तुम्ही स्त्री आहात?" असा मी घेतला. माझ्या डोक्यात त्याक्षणी फ़्राऊ म्हणजे बाई एवढेच आले. वाक्यातली प्रश्नचिन्हाची जागा मी बदलली किंवा यात एक गाळलेली जागा आहे ज्यात माझे नाव सांगायचे आहे हा विचार दुरूनही डोक्याला स्पर्शून गेला नाही आणि अनर्थ घडला. मी प्रश्नार्थक आणि गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागले. आणि तो मात्र 'नाव विसरली का ही मुलगी स्वतःचे, गजनी झालाय का हिचा' अशा विचारात माझ्याकडे बघत होता.
माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून त्यालाही काही कळेना, की नाव सांगायला काय प्रॉब्लेम असावा? त्यात आधीचे एक वाक्य जर्मन मध्ये बोलले असल्याने भाषेबद्दल शंका आली नसावी. मी शक्य ते सगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याने परत विचारले, पुन्हा तेच. आता माझं डोकं हलायला लागलं. 'असा काय विचारतोय. कळत नाही का. आधीच भाषा येत नाही मला एवढी. यांना इंग्रजी पण बोलायचे नसते. याच वेळी नवऱ्याला पण यायला काय प्रॉब्लेम होता का? (आधी हे मीच म्हणाले होते की मी जाऊ शकेन, पण आता सगळा दोष त्याचा आहे असं मला वाटत होतं). एकाच वेळी एवढे प्रश्न हिच्या डोक्यात आहेत हे कळले असते तर त्याने आयुष्यात चुकुनही तुम्ही स्त्री आहात का? असा प्रश्न विचारला नसता. माझ्या डोक्यात 'अरे भाई केहना क्या चाहते हो' चा प्रश्न कायम होता. नंतर त्याच्या बहुधा लक्षात आले. नशीबच म्हणायचे माझे. :) मग सरळ वाक्यात विचारतोय, तुमचे नाव काय?. आत्ता माझी ट्यूब पेटली की याला काय विचारायचे होते आणि मी काय समजत होते. नाव सांगितले आणि मग मी अर्धा तास बाहेर जाऊन आले. डोळ्यांच्या टेस्ट पण झाल्या.
त्या अर्ध्या तासात मी काय केले हे विचारू नका. आम्हाला जे शिकवले होते त्यात नाव विचारण्याच्या ज्या पद्धती पुस्तकात होत्या त्यात हे नक्की नव्हते हे पुन्हा पुन्हा स्वतःलाच सांगत होते. आणि तेव्हा पुस्तकाशिवाय बाहेरचा अनुभव नव्हता. स्वतःवर चिडचिड होत होती. राग येत होता. त्या माणसाला साध्या सरळ भाषेत विचारायला काय प्रॉब्लेम होता म्हणून त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. नवऱ्याशी बोलून थोडा राग उगाचच त्याच्यावर काढून झाला. तुझ्यासाठी इकडे या परक्या देशात आले आणि नुसती फजिती होतेय माझी वगैरे वगैरे. या भाषेत दोन स्वतंत्र शब्द असते तर काय फरक पडला असता का? म्हणून त्यांनाही बोलून झाले. असोच.

जेव्हा सवयीने जर्मन बोलले जाते तरीही काही वेगळे किस्से घडतात. मध्यंतरी नाश्ता आणि कॉफी घ्यायला एका बेकरीत गेलो होतो. आम्ही ऑर्डर दिली आणि तिने नेहमीप्रमाणे विचारले, की "सोबत न्यायचे आहे की इथेच खायचे आहे?" इथेच खाऊ असे सांगितल्यावर ती म्हणाली की मग जाऊन बसा. ऑर्डर घ्यायला येईल कुणीतरी. पुढचे पाच ते सात मिनिट कुणी येईना. दोनदा आवाज देऊन झाला पण नाहीच. शेवटी वैतागून आम्ही उठलो आणि तेवढ्यात बया हजर झाली. नवऱ्याने त्याची ऑर्डर दिली आणि मी म्हणाले 'ग्लाइश' (gleich). म्हणजे मला पण हेच हवंय. ग्लाइश या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक similar, same या अर्थाने तर दुसरा म्हणजे 'आज, आत्ता, ताबडतोब'. आधीच आम्ही उठायच्या तयारीत असल्यामुळे असेल किंवा ती तंद्रीत असेल, तिने दुसरा अर्थ घेतला आणि रागाने उत्तर आले, "नाही लगेच नाही जमणार. मला इतर पण ग्राहक आहेत, लगेच कसे देणार, वेळ लागेलच". ती का भडकली हे आम्हाला कळेना. आम्ही काही हिला चिकन बिर्याणी बनवायला सांगत नव्हतो. एकूण तिचा सूर बघता आता काहीच नको मग म्हणून सरळ निघालो आणि नंतर लक्षात आले की तिचा आणि आमचा देखील काय गैरसमज झाला ते. मी सहजपणे 'मला पण हेच हवे' एवढे वाक्य न सांगता एका शब्दात गुंडाळले आणि असे बाहेर पडावे लागले.

मध्यंतरी दुकानात खरेदी करत असताना असाच किस्सा घडला. गुढीपाडवा म्हणून आम्रखंड करायचे होते. इथल्या दुकानांमध्ये चक्क्याच्या जवळ जाणारा एक पदार्थ मिळतो. एकतर एकाच खाद्यपदार्थाचे हजारो प्रकार. कुठल्या घ्यायचा म्हणून बघत होतो आणि माझे त्यातील घटक पदार्थांकडे लक्ष गेले, Eiweiß. या शब्दाचे पुन्हा दोन अर्थ आहेत. एक म्हणजे प्रथिने अर्थात प्रोटीन्स आणि दुसरा म्हणजे अंड्यातील पांढरे अर्थात एग व्हाईट. पहिला अर्थ माहिती होता परंतु ठार विस्मरणात गेला होता. त्यामुळे एग व्हाईट असलेला चक्का गुढीपाडव्याला? अय्यो रामा पाप की हो. मग दुसऱ्या कंपनीचे बघितले, अजून तिसरे पाहिले आणि बाकी काही पाळत नाही तरी ऐन सणाला हे नको हे म्हणून परत ठेवले. आता गोड काय करायचे यावर विचारचक्र चालू झाले. आणि मग अचानक साक्षात्कार झाला, अरेच्चा, ही तर प्रथिने. प्रथिनांचे प्रमाण दिले होते ते. चक्क्याचे डबे घरी आले आणि आम्रखंड ओरपले गेले.

पुस्तकात शिकवलेले जर्मन आणि प्रत्यक्ष वापरात येणारे बोलीभाषेतील शब्द, लोकांची लकब यात प्रचंड फरक असतो. तेही हळूहळू जमू लागतं आणि सवयीने रोजच्या बोलण्यात इंग्रजीसोबत जर्मन शब्द येऊ लागतात. यातलाच एक प्रकार म्हणजे शिव्या. काही शब्द तर ते शिव्या आहेत हे माहित नसतानाच कानी पडले, तेव्हा अर्थ माहित नव्हता, काहीतरी वाईट म्हणायला आहे एवढेच. शिवाय लोक सर्रास वापरताना दिसायचे म्हणून आपोआप आम्हीही त्या शब्दांना सरावलो. नंतर अर्थ कळले आणि समजले की या शिव्या आहेत. अशीच मध्यंतरी एकदा एका कामातल्या बाबतीत जाम भडकले होते. एका कलीगशी फोनवर फोनवर बोलत होते आणि फोन ठेवल्यावर त्या फडतूस त्रासदायक software ला अगदी या लोकांच्या टोन मध्ये शिव्या घातल्या. शेजारचा कलीग म्हणाला. 'एक तर तू कधी एवढी भडकत नाहीस म्हणून मला आज कळले किंवा मग खरंच हा तुझ्यावरचा जर्मन प्रभाव असेल, पण तू शिव्या द्यायला भारी शिकली आहेस. अगदी आमच्या स्टाईलमध्ये'. कौतुक म्हणून घ्यावे की काय करावे आता?

अशा एक ना अनेक घटना अजूनही घडतात आणि भविष्यातही घड्तीलच. सुरुवातीला अगदी अपमानास्पद वगैरे वाटायचे, कधी सहज हसण्यावारी नेता यायचं. कधी कुणाकडून कौतुकाची थाप पडते ते सुखावणारे क्षण असतात तर कधी 'का जमत नाही मला हे, कधी येणार मला हे' असे असतात. हल्ली तर बरेचदा अरेच्चा, याला इंग्रजीत काय म्हणतात असेही खुपदा घडते. चांगले वाईट सगळेच प्रसंग घडत भाषेचा प्रवास चालू राहतो. त्यातून शिकत जाणे हीच तर भाषेची गंमत असते. :)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle