बालपणीचा काळ सुखाचा:

बालपणीचा काळ सुखाचा:ghar.jpg

आता मुलांसाठी रोज काहीतरी नवीन करायचं म्हणून शोध घेऊन इतके प्रकार करतेय... काहीतरी करून खाऊदेत! आपल्या लहानपणी जवळपास प्रत्येकाची परिस्थिती सारखीच होती. सकाळी उठल्यावर थाळीत गोवऱ्या भाजून किंवा भाताच्या करलांची रांगोळी घेऊन मस्त दात घासायचे. घरचं दूध असेल तर दूध प्यायचं नसेल तर काहीच नाही. रतीबाचं दूध आणून किती पुरणार... आणि चहा प्यायल्याने काळं व्हायला होतं त्यामुळे चहा लहान मुलांना नाहीच! मग अभ्यास करत करत माड पोफळीना पाणी लावायचं. आठ वाजले की लाल तांदळाचा मऊ भात, वर वेस्वार, साजूक तूप आणि लिंबाचं लोणचं... असा राग यायचा खरं तर... कारण मेतकूट, छान पांढरे तांदूळ हे श्रीमंती लाड फक्त पाहुणे आल्यावर! कधीतरी भाताबरोबर चुलीत भाजलेला कांदा.. पण तो फक्त रविवारी.. अवसे पौर्णिमेला नाही.
rasta.jpg
दुपारी जेवायला अगदी डब्यात सुद्धा तांदळाच्या भाकरी आणि सुरबुरीत भाजी.. म्हणजे आमटी भाजीचं काम एकात व्हायचं. गोड म्हणून रव्याची खीर किंवा केळ्याची शिकरण! आई भाकऱ्या एवढया मोठया करायची की सातवीपर्यंत एक चतकोर भाकरी कधीतरी अननसाचा, आंब्याचा मुरांबा किंवा गूळ तूप आणि भाजी असा डबा असायचा. आम्ही कधीच दुसऱ्या मुलांचा डबा शेअर नाही केला कारण आमची भाकरी... बाकीच्यांनी आणलेली काळी नाचणीची भाकरी आवडत नसे. शाळेतून घरी आल्यावर मात्र रोज नाश्ता असायचा. यात पोहे आणि नारळ म्हणजे ओलं खोबरं कॉमन, बाकी फोडणीची मिरची, गूळ, लसणीचं तिखट हे बदलून दडपे पोहे! आई गहू भाजून त्याचं पीठ करायची तेही दुधात भिजवून मस्त नाश्ता व्हायचा. कधी धिरडी तर कधी उकड कधी मोकळ भाजणी, कधीतरी शिरा पण असे.
बाबा रत्नागिरीत गेले की त्या सिझनची एक दोन फळं आणि रंगीत तुकडे असलेला गोडसर ब्रेड आणायचे. दरवर्षी पुस्तकं घ्यायला रत्नागिरीत गेलो की बाबा आठवणीने गणेशभुवनला मेदूवडा आणि त्यावर उसाचा रस घेऊन द्यायचे... मज्जा वाटायची अगदी! वर्षातले बरेचसे सण घरचे तांदूळ, नारळ आणि गूळ यांनी साजरे व्हायचे, प्राजक्ताच्या देठाचं केशर या आमच्या पदार्थांना सुरेख साज चढवायचं! केशराचा सुगंध नसला या देठांना तरी लहानपण सुगंधित राहिलं! मला कधी दर संकष्टीला मोदक, कांदे नवमीला भजी, बटाटेवडे असं केल्याचं आठवत नाही... कांदे नवमी पातेल्यात लावलेल्या थालिपीठाने साजरी व्हायची! पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा.. त्यामुळे पाहुणे येतील तेव्हा मात्र चंगळ असायची. मोदक, खांडवी, पातोळे, सांदण हे सगळं व्हायचं तेव्हा!
आजूबाजूला मुक्त उधळण करीत निसर्ग भरभरून देत होता... पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात अनेक फळं, भाज्या, रानमेवा मिळायचा की तो बिनचवीचा फ्लॉवर, कोबी हे कधी खावंच नाही लागलं! तिन्ही त्रिकाळ तांदूळ.. गोड पदार्थ तांदळाचा तरी कधी वजनाची चिंता नाही करावी लागली.. चिंचा आवळे खाताना सर्दी खोकल्याची आठवण नाही झाली. एकदा नदीला हौर म्हणजे पूर येऊन गेला अन पाणी नितळ झालं की पाण्यात उड्या मारून दोन दोन तास ... बाबांच्या भाषेत म्हशीसारखं डुंबण्याची मजा काही स्विमिंग टँक मधे येत नाही! एक मात्र नक्की परिस्थितीने कधी आयुष्याची चव नाही बदलली उलट सुखाचे अनेक गहिरे रंग भरून समृद्ध बालपण दिलं... कुपीत दडवून ठेवायला!!rasta2.jpg
rasta1.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle