सन इन स्नो

लागणारा वेळ:
३ तास

लागणारे साहित्य:

अंडी जितकी खाणारी माणसे असतील तेव्हढी + २ ( सोईसाठी ४ माणसांचा अंदाज येथे घेऊ) - अंडी ६
चिकन किंवा मटणाचा खिमा अर्धा किलो
४-५ मोठे चमचे दही
फ्लॉवर पाव किलो
मटार पाव किलो
पनीर पाव किलो
कांदे ८
बटाटे ४-५
काजू १०-१२
आलं, लसूण, मिरचीचे वाटण अंदाजे दोन लिंबांएवढा गोळा
हळद, तिखट, मीठ चवी प्रमाणे
तेल
आवडत असल्यास २वाट्या मोकळा भात ( काहींना फक्त नॉनव्हेज जात नाही त्यांच्या साठी, किंवा जर व्हेगन असतील त्यांनी खिम्याऐवजी भात वापरावा )

क्रमवार पाककृती:

प्रथमच सांगते ही अतिशय खिटखिटीची पाककृती आहे. पण असली अफलातून लागते की एकदा करून बघाच, पुन्हा पुन्हा कराल स्मित

वैधानिक इशारा - कोलॅस्टॉल/ कॅलरी कॉन्शन्स व्यक्तींनी या डिशपासून लांब रहावे हे बरे स्मित

पूर्वतयारी

१. प्रथम खिमा धूवून त्याला आलं,लसूण, मिरच्याचे निम्मे वाटण, हळद, मीठ, तिखट, दही लावून ठेवावे.

२. फ्लॉवरचे मोठे तुरे धूवून त्याला अर्धा गोळा आलं, लसूण्,मिरची पेस्ट व मीठ लावावे.

३. मटारला उरलेली आलं,लसूण, मिरची पेस्ट आणि मीठ लावावे.

४. पनीरच्या चौकोनी तुकड्यांना मीठ, तिखट लावावे.

५. कांदे उभे चिरून घ्यावेत.

६. बटाटे सोलून गोल काप करून मीठ लावून ठेवावेत.

७. तांदूळ धूवून निथळत ठेवावेत.

८. ४ अंडी अगदी छोटे भोक पाडून त्यातील फक्त पांढरा बलक एका मोठ्या पातेल्यात काढून घ्यावा. एका पसरट भांड्यात उरलेल्या पिवळ्या बलकासह प्रत्येक अंडे सांभाळून ठेवावे.(पिवळे बलक एकत्र करू नका ) दोन अंडी तशीच बाजूला ठेवा.

मुख्य कृती

१. तेलात तांदूळ परतून घ्या. बेताचे पाणी घालून भात करून घ्या. परातीत पसरून गार करा, ज्यामुळे तो मोकळा राहील.

२. काजू तळून घ्या. त्यातच उभा चिरलेला कांदा तेलात कुरकुरीत ब्राऊन रंगात तळून घ्या, निथळत ठेवा.

३. त्याच तेलात फ्लॉवर तळून घ्या. त्यात पनीर तळून घ्या. निठळत ठेवा.

४.कांदा आणि फ्लॉवर मधून निथळलेल्या तेलाचा वापर करून लागल्यास अजून तेल घेऊन त्यावर मटार फोडणीस टाका. लगेच त्यावर खिमा घाला. मोठ्या गॅसवर ते परतत रहा. त्याला सुटणारे सर्व पाणी आटले पाहिजे. बाजूने तेल सुटू लागले की आर्धा पेला पाणी घाला. चांगले उकळले की गॅस बारीक करून १० ते १५ मिनीटे शिजू द्या. (खिमा करताना नेहमी पहिले सुटणारे पाणी आटल्याशिवाय गॅस बारिक करू नये अन वरचे पाणीही घालू नये व झाकणही ठेवू नये म्हणजे खिमा उग्र होत नाही )

५. आता एकत्र केलेले अंड्याचे पांढरे बलक फेटायला घ्यावे. हे फेटणे म्हणजे सर्वात वेळ खाउ काम. इतके फेटले गेले पाहिजे की त्यात चमचा उभा राहिला पाहिजे. शिवाय नंतर थर लावताना पुन्हा एकदा फेटावे.

थर लावणे

१. जाड बुडाचे पसरट भांडे घ्यावे . आतून सर्व बाजूंनी तेल लावून घ्यावे.

२. बटाट्याच्या चकत्या सर्व बुड झाकले जातील अशा पसरवाव्यात.

३. भाताच थर द्यावा.

४. त्यावर अर्ध्या खिम्याचा थर द्यावा.

५. त्यावर तळलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा पसरावा.

६. त्यावर फ्लॉवर पसरवा.त्यावर पनीर पसरा.

७. उरलेला खिमा पसरवा.

८. बाजूला ठेवलेली दोन अंडी (पांढरे+पिवळे एकत्र)फेटून सगळीकडे सारखी टाका.

९. तळलेले काजू पसरा.

१०. उरलेला कांदा पसरा

११. अंड्याचा पांढरा बलक पुन्हा फेटून तयार झालेला पांढरा स्नो त्यावर पसरा.

१२. आता भांडे गॅसवर ठेवा. गॅस मंद ठेवा, झाकण आता ठेवू नका.

१३. पाच मिनिटांनी या पांढ-या स्नोला चार बाजूंना ( थोडे मध्ये ) चार खोलगट गोल करून घ्या. ( चमचा थोड दाबला की होईल ) फार दाबू नका.

१४. आता या प्रत्येक खोलगट भागात (स्नोमध्ये) अगदी काळजी पूर्वक बाजूला ठेवलेले एक एक पिवळे बलक (सन ) टाका. {ते खाली गेले नाही तर तुम्ही सुगरण :)}

१५. आता झाकण ठेवून किमान अर्धा तास मंद आचेवर ठेवा.

१६. गॅस बंद केल्यावर किमान १५ मिनिटं झाकण काढायचे नाही. हा पदार्थ खुप वेळ गरम राहतो. त्यामुळे जरा लवकरच करून ठेवावा. म्हणजे जास्ती वेळ झाकण तसेच ठेवता येते अन स्नो मध्ये सन राहतो. नाही तर सन खाली जातो. अर्थात स्नो खाली गेला तरी चव बहारदारच लागते.

खरे तर अगदी पाट पाणी घेऊन सर्व मांडा ठेऊन बसली की च झाकण काढायचे. पांढ-या शुभ्र बर्फातले सोनेरी सुर्य इतके अप्रतिम दिसतात की झालेले कष्ट विसरायला होतात.

वाढताना उभे काप करून प्रत्येकाला एक एक सूर्य द्यावा, बाजूने थराची नक्षी ही मस्त दिसते.

हुश्य लिहितानाही दमले बुवा. वाचणा-यांपैकी कोण कोण करतय बघू. मला सांगा बर का आवडला का "सन इन स्नो" !

वाढणी/प्रमाण:

चार

माहितीचा स्रोत:

मावशी + माझे प्रयोग

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle