आलू मेथी पराठे: खमंग चवीसोबत अजून एक सुगरण

एखादा सतत उत्साहाने खळाळता झरा पाहिला की मन कसं प्रसन्न होऊन जातं... अशी माणसं जेव्हा आपली जिवलग असतील तेव्हा राजहंसाच्या डौलदार चालीकडे पहात रहावंसं वाटतं.. खूप काही शिकत!
माझी आत्या सुनीता गोरे खेडेगावात बालपण जाऊनही मुंबईच्या वातावरणात छान रुळली. आधी महानगरपालिकेत नोकरी करून त्यानंतर आपला अभिनयाचा छंद जोपासला, तरीही घरातल्या सगळ्या गोष्टी अगदी आवडीने करत असते. नाटक, सिनेमा, मालिका, जाहिराती सगळ्याच ठिकाणी काम करत असताना पहाटे उठून घरी जेवण करून जायची सवय आज 77 व्या वर्षीही कायम आहे. स्वभावातील परखडपणा, सतत नवीन शिकण्याची वृत्ती आणि प्रचंड ऊर्जा आजही वाखाणण्यासारखी आहे! घरी कोणीही येणार असेल तर अक्षरशः विविध पदार्थांची रेलचेल असते. आजही ती वनिता समाज, चतुरंग प्रतिष्ठान, दिलासा, संवाद, ब्राह्मण सेवा मंडळ, कलाकार संघ या सगळ्या संस्थांमध्ये सक्रिय आहे.FB_IMG_15388357198590519.jpg तरीही आम्ही येणार म्हटल्यावर बासुंदी, कोथिंबीर वडी, आमटी, भात, पोळ्या, मुलांना खायला डिंक लाडू, शंकरपाळे सगळं स्वतः करून ठेवलंय!
तिची खूप दिवस इच्छा होती की मी तिची स्पेशल रेसीपी लिहावी!
आज घेऊन आलेय आत्याची स्पेशल रेसीपी
आलू मेथी पराठे! IMG_20181215_084049minalms.jpg
साहित्य: एक जुडी मेथी, चार बटाटे, एक चमचा मिरची पेस्ट, एक चमचा आलं लसूण पेस्ट, चार वाट्या कणिक, मीठ, तेल, फोडणीचं साहित्य
कृती: मेथी निवडून स्वच्छ धुवा. बारीक चिरून घ्या. दोन चमचे तेलाची मोहोरी हळद घालून फोडणी करा. त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून छान परता. त्यावर मंद गॅसवर मेथी घालून परतत रहा. बटाटे शिजवून घ्या. मेथी खूप वेळ त्यातील पाणी जाईपर्यंत परतायची आहे, घाईघाईने नाही....इति आत्या! आता शिजलेला बटाटा कुस्करून या मेथीत मिक्स करा, मीठ घाला. मिश्रण कोरडे होईपर्यंत मंद गॅसवर परतत ठेवा. पोळ्यांना भिजवतो तशी मीठ, तेल घालून कणिक भिजवून झाकून ठेवा.
भाजी नीट कोरडी झाली की गार होऊ द्या. छान मळून त्याचे सारखे गोळे करून घ्या. सारणा एवढाच कणकेचा गोळा घ्या. मोदकाची करतो तशी कणकेची वाटी करून त्यात सारण भरून बंद करा. तांदळाच्या पाठीवर पराठा लाटा. तव्यावर तेल सोडून छान भाजून घ्या. चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
आधीपासून सगळे गोळे भरून ठेवू नका. खायला बसल्यावर गरमागरम पुरणपोळी सारखे मऊसूत पराठे वाढा.
या वयात पहाटे तीन वाजता उठून हे सगळं करून त्याच उत्साहात आम्हाला आयतं करून देणारी मिळणं हे आमचं भाग्य! आमच्या या सुगरणीला हा फक्त मानाचा मुजरा!...एक मैत्रीण मला म्हणाली तसं राजहंस कितीही डौलदार चालत असला म्हणून बाकीच्यांनी चालूच नये असं थोडंच आहे,
त्यामुळे शक्य तेवढं शिकत राहून आपणही चालायचा प्रयत्न करायचाच... रुबाबदारपणे!!!
मिनल सरदेशपांडे

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle