तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - अंतिम भाग

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग १
https://www.maitrin.com/node/3038

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग २
https://www.maitrin.com/node/3051

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ३
https://www.maitrin.com/node/3076

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४
https://www.maitrin.com/node/3097

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ५
https://www.maitrin.com/node/3107

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ६
https://www.maitrin.com/node/3166

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ७
https://www.maitrin.com/node/3185

तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ८
https://www.maitrin.com/node/3187

————————————————————
पुढे चालू
————————————————————

राधाला काय बोलावं कशी प्रतिक्रिया द्यावी काही कळतच नव्हतं. सत्या? सत्या आपल्यावर प्रेम करतो? का? तिला आठवलं, तिला सिद्धार्थ आणि सत्या एकत्रच भेटले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत ती सिद्धार्थला बेस्ट फ्रेंड मानत आली होती. पण जे जे प्रसंग सिद्धार्थ आणि राधाने शेअर केले त्या सगळ्यात सत्याही होताच... नेहमीच... तिच्यासोबत... तिचं कधीच कसं लक्ष गेलं नाही? सत्याकडे? सत्याने नेहमीच तिला योग्य काय ते सांगितलं होतं, अर्थात त्यातलं तिने ऐकलं खूप कमी होतं, ही गोष्ट निराळी. पण सत्या नेहमीच तिचं चांगलं चिंतणारा मित्र होता.

तिला जाणवलं, तिने सत्याला जणू गृहीत धरलं होतं नेहमीच. सत्या असेलच, काहीही झालं तरी. त्याच्या नजरेत एखादी गोष्ट चूक आहे कि बरोबर याचा तिला फरक पडायचा आणि म्हणूनच जर तिचं काही चुकलं असेल तर ती सत्याला टाळायची, कारण त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नसायची आणि त्याच्यासमोर आपली चूक तिला कबूल करायची नसायची.
“सत्या....” राधाने सत्याला पहिल्यांदाच अशी हाक मारली. सगळं जग त्याला सत्या म्हणून बोलावत असताना राधा मात्र त्याला सत्यजितच म्हणायची. सत्यालाही ते जाणवलं. त्याने मागे वळून राधाकडे पाहिलं आणि हसला.
“Yes I know... आता तुला खूप प्रश्न पडले असतील आणि त्यांची उत्तरंही तुला लगेच हवी असतील. तू म्हणशील मला हे असं आवडत नाही, एकतर आर या पार, हे असं अधांतरी नको. “
“तू जरा जास्तच माझी वाक्य ओळखतोयस आज” राधा हसली.
“मी खूप ओळखतो तुला राधा. तू मला ओळखत नाहीस. पण या सगळ्याबद्दल नंतर बोलू. आधी आत्ताच्या आत्ता आपल्याला पुण्याला निघायचंय. सिद्धार्थ आणि निशा दोघेही एकमेकांसाठी perfect आहेत, जणू ते एकमेकांसाठीच बनलेत. तुला त्यांची माफी मागायला हवी राधा. इतकं तर तू सिद्धार्थची आणि तुझी मैत्री वाचवण्यासाठी करूच शकतेस.” राधा आणि सत्या रात्रीच्याच फ्लाईटने पुण्याला निघाले.

इकडे निशा पुण्यात पाहोचली होती. ट्रीपला जाताना हसत गेलेली निशा आणि आत्ता परतलेली निशा यांच्यात खूप अंतर होतं. निशाच्या आईने ते क्षणात ओळखलं. पण निशाने मात्र आईला काहीच सांगितलं नाही. तिला आईला कसलंही टेन्शन द्यायचं नव्हतं. आई बराच वेळ बाल्कनीत बसून कोणाशीतरी फोनवर बोलत होती.
“निशा, एक विचारायचं होतं तुला बाळा” आईने निशाच्या खोलीत येत म्हटलं.
“तुला आठवतंय का? मी तुला एक फोटो पाठवला होता, एका मुलाचा. पण तू म्हणाली होतीस कि मला इतक्यात लग्न करायचं नाही. त्यांचा फोन आला होता. तू अनायासे इथे आहेस, आणि तो मुलगाही भारतात आलाय, तर त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलावलंय.”
निशा काहीच बोलली नाही, नुसती मान डोलावली तिने.

निशाने दिवसभर जणू स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. अगदी बाल्कनीतही उठून गेली नाही ती. जेवणावरही तिचं मन राहिलं नव्हतं. पूर्ण दिवस विचार करण्यात घालवला निशाने. सिद्धार्थचा चेहरा तिच्या डोळ्यासोरून हलत नव्हता. त्याच्याबरोबर घालवलेले क्षण तिच्याभोवती फेर धरून नाचत होते. काय झालं, कशामुळे झालं काहीच कळत नव्हतं निशाला. तिचं प्रेम सुरु होण्याआधीच संपलं होतं. आईने खूपदा निशाला बोलतं करायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. निशाला जे काही झालं ते विसरता येत नव्हतं. तिची परतीची टिकेट्स प्रिपोन करायचा विचार करत होती ती. इतक्यात तिचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. निशाने उचललाच नाही. पण परत थोड्या वेळाने फोन आला. तोच नंबर. मग निरिच्छेनेच तिने उचलला फोन.
“हॅलो”
“हॅलो.... निशा?”
“हो बोलतेय. आपण कोण?” निशाला आवाज ओळखीचा वाटेना.
“निशा मी सत्या बोलतोय. कुठे आहेस तू?” सत्या होता पलीकडे.
“हाय सत्या.. मी घरी आहे माझ्या... पुण्यात.” न जाणे का निशाचा कंठ दाटून आला.
राधाचं तिच्याशी वागणं, बोलणं फक्त सत्याच समजून घेऊ शकतो असं का काय माहित निशाला वाटत होतं.
“निशा... काय झालं? अशी निघून का आलीस तू?” सत्याने विचारलं.
“सत्या... जाऊदे तो विषय. मी परत निघतेय २-३ दिवसात. तू कसा आहेस?” निशाने विषय बदलायचा प्रयत्न केला.
“निशा... प्लीज... तुला माहित आहे मी काय विचारतोय. आणि विषय टाळून तू स्वतःलाच सर्वात जास्त त्रास करून घेणार आहेस हेही तुला समजत असेल. सो प्लीज, बोल माझ्याशी.” सत्याला तिच्या मनाची अवस्था जाणवली.
“एक काम करूया का? तुला वेळ आहे का आज? भेटूया का बाहेर कुठेतरी? म्हणजे नीट बोलता येईल” सत्याने विचारलं.
“ठीक आहे. भेटूया” निशलाही हे असं स्वतःला कोंडून घेणं आवडत नव्हतं. पुन्हा तिला त्या बंद कोशात जायचं नव्हतं. कोणासमोर तरी बोलून मोकळं होणं गरजेचं वाटत होतं तिला. त्यामुळे निशा हो म्हणाली.
सत्याला तिने वेळ आणि पत्ता पाठवला. आवरून ती ठरलेल्या जागी येऊन थांबली. पाचेक मिनिटात सत्या आलाच.
“हाय निशा” सत्याच्या चेहऱ्यावर हसू होतं.
“हाय सत्या” निशानेही हसायचा प्रयत्न केला पण खूप विचार केल्यामुळे ती खरंच थकली होती.
“ चल आधी काहीतरी खाऊन घेऊ.” सत्या म्हणाला.
छानशी कडक coffee घेतल्यावर निशाला जरा हुशारी वाटली.
“आता बोल. का निघून आलीस अशी अचानक?” सत्याने ठरवलं होतं तिला बोलतं करायचं.
निशाने सत्याला सगळं सांगितलं काहीही मनात न ठेवता.
“निशा... तुला एक सांगू? तू तिथून निघण्यापूर्वी एकदा बोलायला हवं होतंस सिद्धार्थशी. आणि वेडे, त्या दिवशी पहाटेच मी आणि सिद्धार्थ राईडला गेलो होतो. रात्री माझ्याच टेंटमध्ये झोपलेला सिद्धार्थ. झोप लागेपर्यंत तुझ्याच बद्दल बोलत होता तो. कोणीही कोणावरही करणार नाही इतकं प्रेम करतो तो तुझ्यावर निशा. तुला तू एकदा राजस्थानला ट्रीपसाठी अाली होतीस ते आठवतंय? राधा आणि तू एकमेकींना ओळखत होता. तेंव्हापासून प्रेमात आहे तो तुझ्या. आणि तू! , आम्ही त्या दिवशी राईडवरून परत आलो तर कळालं कि तू निघून गेलीयेस. सिद्धार्थने कसं स्वतःला समजावलं हे त्याचं त्यालाच माहित.
आता राहता राहिला राधाचा विषय. तिचं बोलणं तर तू सोडूनच दे. थोडीशी over possessive आहे ती सिद्धार्थबद्दल. आणि जरा crack पण आहे, त्याच विचारांच्या भरात तिने तुला जे मनात येईल ते सांगितलं, तू त्याच्यापासून दूर जावंस म्हणून. कारण तुझ्यामुळे तिचं सिद्धार्थच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं असणं संपून जाईल अशी भीती वाटली तिला” सत्या न थांबता बोलत होता.
त्याच्या बोलण्याने निशाला तिच्या काही का होईना प्रश्नांची उत्तर मिळाली होती. पण अजूनही ती पूर्ण शांत नव्हती.
“तू राधाबद्दल इतकं खात्रीने कसं बोलू शकतोस सत्या?” निशाने विचारलंच शेवटी.
“कारण... I love her. या जगात तिला मी जितकं ओळखतो ना, तितकं तर ती स्वतःलाही ओळखत नाही” सत्याने असं म्हणायला आणि राधा तिथे यायला एकच गाठ पडली.
सत्याच्या या वाक्याने थोडी अवघडली ती. काय बोलावं ते पटकन न सुचल्याने नुसतीच उभी राहिली होती.
“चला, मी निघतो. आता पुढचं राधाच बोलेल तुझ्याशी.” म्हणत सत्या उठला.
“बाय राधा. आपण भेटूच. बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत अजून” असं म्हणत राधाकडे बघून मिश्किल हसला तो.
राधाला उगाच कानकोंडं झालं. आजपर्यंत सत्याने तिच्याशी असं खेळीमेळीत काही बोललेलं तिला आठवतच नव्हतं. बऱ्याचदा तो तिच्याशी बोलायचा ते तिचं काही चुकलं तरच आणि त्याकडेही तिचं लक्ष नसायचं. राधाने नुसतीच मान हलवली त्याच्याकडे बघून आणि निशासमोर बसली.
निशाला खरंतर खूप राग आला होता राधाचा. त्यामुळे उठून जाऊया का असा विचार करत तिने पर्स उचलली.
“निशा... प्लीज... एकदा माझं म्हणणं तरी ऐकून घे.” राधाने निशाला थांबवलं.
“मला मान्य आहे माझं चुकलं. मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं. सिद्धार्थची मैत्री माझ्यासाठी खूप काही आहे, पण माझी पहिली चूक म्हणजे मी त्याच्या आयुष्यावरच हक्क सांगायला लागले. त्याचा आनंद हिरावून घेण्याचा मला काहीही हक्क नाही. त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि हे मला खूप आधीपासून माहिती होतं. मी ते चुकीच्या पद्धतीने तुला सांगितलं त्याबद्दल सॉरी निशा. सिद्धार्थने नेहमीच माझ्याकडे फक्त चांगली मैत्रीण म्हणून पाहिलंय आणि मीही त्याला माझा बेस्ट friend मानते. त्या दिवशी माझ्या डोक्यात काय चालू होतं कोणास ठाऊक? माझा इगो दुखावला गेला होता, सिद्धार्थच्या आयुष्यात मी सोडून दुसरी कोणीतरी मुलगी महत्वाची होणार म्हणून. I’m sorry Nisha “
निशाने राधाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक सच्चेपणा होता. निशा काहीच बोलली नाही.
“निशा, तू मला माफ करशील कि नाही माहित नाही. पण सिद्धार्थ मला कधीच माफ करणार नाही. तू निघून गेलीस त्या दिवसापासून सिद्धार्थ एका शब्दानेही माझ्याशी बोललेला नाही. माझ्या मूर्खपणामुळे सिद्धार्थला गमावू नकोस निशा. त्याच खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर.” राधा इतकं बोलून सरळ निघून गेली.
निशाच्या मनातले प्रश्न कमी झाले होते पण अजूनहि ती अस्वस्थ होती. कारण सत्या आणि राधा यांच्यापेक्षाही तिला ज्याच्याशी बोलायचं होतं तो कुठे होता? कधी भेटणार होता? सिद्धार्थ.... निशाची नजर त्यालाच शोधत होती. पण सिद्धार्थ आलाच नव्हता. निशा घरी आली. रात्री आईने पुन्हा तिला आठवण करून दिली. उद्या त्या मुलाकडे जायचं आहे.
“आई, आपण नाही गेलो तर नाही का चालणार?” निशा म्हणाली.
“निशु, बाळा, मी कधीच तुला काही मागितलं नाही. प्लिज माझं एेक. मी काही तुला लगेच त्या मुलाशी लग्न कर म्हणत नाहीये. शेवटी निर्णय तुझाच असणार आहे. पण उद्या प्लिज चल माझ्याबरोबर.” आई असं म्हणल्यावर मात्र निशा नाईलाजाने हो म्हणाली.
“ठीक आहे आई. जाऊ उद्या आपण.”

दुसऱ्या दिवशी सकाळी निशा उठली. ती तयार झाली तेव्हढ्यात तिच्या खोलीत आई आली, तिच्या हातात निशासाठी त्यांनी घेतलेली गुलाबी साडी होती.
“निशा, आज साडी नेस की” आई म्हणाली.
“आई, साडी कशाला? मी ड्रेस घालते ना” निशाला साडी नेसून तयार होणं बरोबर वाटेना. उगाच कशाला? आता तिच्यासाठी लाईफ पार्टनरचा अर्थ एकच होता. सिद्धार्थ. सिद्धार्थ सोडून दुसऱ्या कोणाचा विचारही ती करू शकत नव्हती. निशा फक्त आईचं मन राखण्यासाठी चालली होती. निशा नाही म्हणत असूनही आईने तिला साडी नेसायला लावलीच.
थोड्याच वेळात त्या दोघी निघाल्या. त्या मुलाच्या घरी पोहोचल्यावर त्याच्या घरातल्यांनी निशा आणि आईचं स्वागत केलं. औपचारिक बोलणी झाल्यावर त्या मुलाच्या आईने सांगितलं, तू जरा आतल्या खोलीत जातेस का? तो आतच आहे. निशाला जरा विचित्रच वाटलं. काय चाललंय हे? हा मुलगा बाहेरसुद्धा यायला तयार नाही. आईकडे थोडसं रागावूनच बघितलं तिने. पण आईनेही जा म्हणून मान डोलावल्यावर निशाकडे दुसरा पर्याय उरला नाही. जरा निरिच्छेनेच तिने दारावर टकटक केली. दार उघडंच होतं. निशा आत गेली. आत कोणीच नव्हतं. रूम मोठी होती. छान सजवली होती. कडेच्या वॉल वर बरेच फोटोज लावले होते. पण त्यात... त्यातल्या मधोमध असलेल्या मोठ्या फोटोवर निशाची नजर खिळली. आता अवाक व्हायची पाळी होती निशाची. तो फोटो.... तो फोटो तिचा होता. तिचा स्वतःचा. खळखळून हसत होती ती. आणि निशाला आठवलं, ती राजस्थानला गेली होती तिथला फोटो होता तो. पण..... पण तिचा फोटो इथे कसा काय? कोणी काढलाय? कोण आहे हा मुलगा? त्याच्याकडे हा फोटो कसा आला? निशाला काही कळेचना. अचानक तिला मागे कोणाची तरी चाहूल लागली. ती मागे वळली तर तो मागेच उभा होता. आणि निशा पाहतच राहिली. पांढराशुभ्र शर्ट, ब्लू जीन्स आणि चेहऱ्यावर तेच घायाळ करणार हसू घेऊन तिचा सिद्धार्थ तिच्यासमोर उभा होता.

निशा डोळे विस्फारून पाहतच राहिली त्याच्याकडे.
“तू? तू इथे कसा?” निशाने विचारलं.
“मी? त्याचं काय आहे निशा, तू आत्ता ज्या रूममध्ये उभी आहेस ना, ती माझीच रूम आहे. हे माझंच घर आहे आणि ज्या मुलाला तू भेटायला आलीयेस तो मुलगा पण मीच आहे.”
निशाला आता काय बोलावं हेही सुचत नव्हतं. तिला जे काही चाललंय ते स्वप्नच वाटत होतं.
“म्हणजे? मला काही कळत नाहीये” निशाचा गोंधळ अजूनही कमी झाला नव्हता.”
“सांगतो. सगळं सांगतो.” सिद्धार्थने बोलायला सुरुवात केली.
“पण त्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगायची होती तुला.”
निशाने काय म्हणून त्याच्याकडे पाहिलं.
“खूप सुंदर दिसतेयस तू निशा..” सिद्धार्थ तिच्यावरची आपली नजर न हटवता म्हणाला. आणि निशाने आपली नजर झुकवली. तिच्या गालांवर गुलाब फुलले होते.
“निशा... इकडे बघ...” सिद्धार्थने तिच्या जवळ येत तिचा हात हातात घेतला.

निशाने वर पाहिलं. सिद्धार्थ तिच्याकडेच पाहत होता.
“आज इतक्या वर्षांचं सगळं सांगायचंय तुला. मी ते आपण पॅंगॉन्ग त्सो बघायला गेलो तेंव्हाच सांगणार होतो, पण.. जाऊदे... त्याबद्दल नंतर बोलू. काल रात्री मला सत्या आणि राधा भेटले, त्यामुळे ती misunderstanding clear झालेली आहे. हां.. तर मी अगदी सुरुवातीपासून सांगतो.
मी, राधा आणि सत्या आम्ही राजस्थान ट्रिपसाठी एकत्र एका ग्रुपमधून गेलो होतो. मला भटकंती खूप मनापासून आवडते हे तर तुला कळलंयच आता. तिथे एक दिवस मला तू दिसलीस. तू एकटीच अाली होतीस. एकटीच फिरायचीस. सगळ्यात असून नसल्यासारखी. स्वच्छंदी. एखाद्या स्वतःतच रमलेल्या मुग्ध कळीसारखी हसरी. मला माहित नव्हतं काय होतंय. मी माझ्याही नकळत तुझ्यावर प्रेम करायला लागलो होतो. आणि त्या दिवशी, मी रात्रभर झोपलोच नव्हतो, पहाटे उठून फिरायला बाहेर पडलो तर तू दिसलीस.. निघाली होतीस कॅमेरा घेऊन कुठेतरी. माझी पावलं आपोआप तुझ्यामागून पडायला लागली. तू बहुदा सूर्योदयाचे फोटोज काढणार होतीस. पण ऐनवेळी तो सूर्योदय पाहतच राहिलीस आणि फोटोज काढायचे विसरून गेलीस. तुझ्या ते लक्षात आल्यावर इतकी खळखळून हसलीस...ते दृश्य इतकं सुंदर होतं ना निशा... नुकताच सूर्योदय झाल्यामुळे सूर्याची सोनेरी किरणं तुझ्या चेहऱ्यावर पसरली होती, त्यामुळे आणखीच सुंदर दिसत होतीस तू. मला तो क्षण निसटू द्यायचा नव्हता, म्हणून मी तुझा फोटो काढून घेतला.”
“आणि हाच तो फोटो!” निशाने त्याचं वाक्य तोडत म्हटलं.
“हो” सिद्धार्थ हसला. “I’m sorry निशा... तुला माहित नसताना मी...” सिद्धार्थ थोडा अवघडला होता.
“हम्म... बरं.... केलं माफ तुला यासाठी. मग पुढे काय झालं?” निशाने शेजारच्याच आरामखुर्ची वर बसत विचारलं. जणू ती सिद्धार्थला जाब विचारात होती असा आव आणत. सिद्धार्थ पुन्हा हसला तसं तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिलं.
“ओके ओके... सांगतो पुढे.” म्हणून सिद्धार्थ पुढे सांगू लागला.

“पुढे माझं काही तुझ्याशी बोलणं झालं नाही. ट्रिप संपली होती पण मी तुझा विचार डोक्यातून काढू शकत नव्हतो. मी राधाला विचारायचो तुझ्याबद्दल. पुढे जॉब लागला. तूही जॉब करतेयस ते कळलं होतं मला. पुढे कळलं कि तू युकेला गेलीस. त्यानंतर राधाचा आणि तुझा contact तुटला. मलाही आमच्या यूके ऑफिसला assignment साठी जायचं होतं. मनात अनेकदा तुझा विचार यायचा. परत तू भेटशील का असं वाटायचं मला. पण माझ्याकडे तुझा कसलाही contact नव्हता. अखेर देवालाच तू मला भेटावंस असं वाटलं असावं बहुधा. गोखलेकाकांशी बोलताना एक दिवस अचानक तुझ्या बाबांबद्दल माहिती मिळाली. मग राधा आणि मी त्यांच्या मदतीने तुझ्या घरी माझा बायोडेटा पोहोचवला. I’m sorry निशा, तुला मी आगाऊ वाटलो असेन पण, हे सगळं काकूंना म्हणजे तुझ्या आईलाही आधीपासून माहिती आहे. आपण ट्रीपला जायचा प्लॅनही मी, राधा आणि काकू आम्ही तिघांनीच मिळून ठरवला होता. आणि पुढे काय झालं ते तुला माहीतच आहे.”
“काय? आईला हे सगळं माहित आहे?” निशा रागावलीच जरा. तरीच आईने आज इकडे येउया म्हणून आपल्या मागे लकडा लावला होता.
“हो. काकूंना मी सगळं सांगितलंय. आणि त्यांना मी पसंत आहे” सिद्धार्थ हसला.
“अरे वा! चांगलं आहे. पण लग्न जिच्याशी करायचंय तिला नाहीत विचारत वाटतं तुमच्यात पसंती?” निशा असं म्हणाली आणि तिला जाणवलं, आपण काय बोललोय. तिने झटकन मान फिरवली.
“तिलाच तर विचारलंय कधीचं. पण ती उत्तरच देत नाहीये.” सिद्धार्थ तिच्या जवळ येत म्हणाला,
“निशा, प्लीज... मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची... माझं तुझ्याशी जणू कित्येक जन्मांचं नातं आहे. I love you निशा....Will you marry me?”
आणि निशा मागे वळली.
सिद्धार्थकडे बघून म्हणाली.
“Yes. Yess... I will marry you...
I love you सिद्धार्थ... I love you...
या आधी माझ्या आयुष्यात कोणाबद्दलही मला असं काही वाटलं नाही जसं तुझ्याबद्दल वाटतं.
तू माझा श्वास झालायस सिद्धार्थ. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा मी नाही करू शकत.”
आणि ती सिद्धार्थच्या बाहुपाशात विसावली.
दूर कुठेतरी गाणं वाजत होतं....
“तेरा मुझसे है पेहले का नाता कोई......
यूॅंही नही दिल लुभाता कोई......”

समाप्त.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle