Opportunity

2012 सालापासून बर्क्लीमध्ये वर्षातला एक रविवार Sunday streets of Berkeley म्हणून साजरा केला जातो. Downtown मधले रस्ते सकाळपासून संध्याकाळी ६ पर्यंत रहदारीसाठी बंद केले जातात. सगळे स्थानिक व्यवसाय, रेस्ताराँट्स, बेकरीज, संगीत शाळा, लोकल बँडस, ब्रुअरीज, विनयार्डस, चित्रकार, शिल्पकार, रस्त्यावर छोटे टेबल्स, स्टाॅल लावतात;लोकं सायकलस आणि पायी फिरत शहर वेगळ्या पद्धतीने अनुभवतात. लहान मुलांना कुणीही न दटावता रस्त्यांवर बागडायला जणू मोठंच्या मोठं आंगण मिळतं. बेर्कली ह्या शहरात अनुभवण्यासारखं बरच काही आहे, पण Sunday Streets ला शहरात एक वेगळच फेस्टीव वातावरण असतं,धम्माल येते. ह्या बद्दल अजून बरच लिहिण्यासारखं पण ते नंतर कधीतरी.
ह्या वर्षी ३ जूनला Sunday Streets मध्ये सहभागी व्हायला आम्ही सायकल घेऊन गेलो होतो. आईस्क्रीम,पिझा, हुला हूप, लाईव्ह बँड च्या गाण्यांवर नाचणं, इराच्या मर्जीनुसार आमची सायकल पुढे पुढे सरकत होती. जून महिना असल्यामुळे रणरणतं उन होतं. मला सोहळा आटपून घरी जाऊन गुडूप झोपण्याची घाई झाली होती, पण इराला वाजणाऱ्या प्रत्येक गाण्यावर नाचायचं होतं, आणि प्रत्येक गिटारवाल्याची गाणी ऐकायची होती. मला जागं ठेवण्यासाठी आम्ही कॉफीच्या शोधात निघालो. दुपारचे दीड दोन वाजले असल्यामुळे मुलांच्या खिदळण्याबरोबरच, थोडे कुर्कुरीचे आणि भोकाड पसरल्याचे आवाज कानावर पडायला लागले होते. ब्रझीलीअन ड्रम बीट्सवरछाती धडधडत होती, पाय आपोआप ठेक्यावर हलत होते. ह्या सगळ्या कोलाहलात मला ती दिसली.
फोल्डिंगचं साधं टेबल आणि पत्र्याची खुर्ची रस्त्याच्या कडेला लाऊन, ती शांत बसली होती. तिच्या डोक्यावर टोपी नव्हती, छत्री नव्हती, टेबलवर एक टाईप रायटर, टिप्ससाठी एक प्लास्टिकचा ग्लास आणि टेबलसमोर काळ्या पाटीवर खडूने लिहिलं होतं ‘आस्क मी फॉर अ पोयम’/ Ask me for a poem’. ती एकटीच बसली होती, तिच्या समोर कुणीही कविता लिहून घ्यायला आलेलं नव्हतं, पण येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशाळभूतपणे बघत नव्हती. तिच्या नजरेसमोर जणू प्रत्येक माणसातून एक गोष्ट उलगडत होती. मी सायकल स्टॅंड शोधण्याच्या भानगडीत न पडता, सायकल रस्त्याच्या कडेला ढकलली,आणि तिच्याकडे वळले. तोपर्यंत २ लोकं तिच्याकडे कविता लिहून घ्यायला आली होती. मी त्यांच्यामागे जाऊन रांगेत उभी राहिले.
एखाद्या दुकानात जाऊन रांगेत उभं राहून , एखादी निर्जीव वस्तू विकत घेण्यासारखी,अशी स्वतः साठी जिवंत कविता लिहून मिळणं ही गोष्ट मला प्रचंडच भारावून गेली. मला वाटतं मूळतः लेखनाची प्रक्रिया प्रचंड एकाकी आहे, लेखक त्याच्या निर्मिती प्रक्रियेत असतांना कुठल्याच अंगाने glamorous वगैरे दिसत नाही, म्हणजे कागदावर पेन धरून लिहित बसलेला माणूस, किंवा कॉम्पुटर समोर कीबोर्ड बडवत बसलेला माणूस, ह्याच्यात बघण्यासारखं काहीही नाही. लेखकाचा निर्मिती प्रक्रीयाचे आनंद, खंत, दुख खूप वैयक्तिक असतं, ते पूर्णतः इतर कुणाबरोबर शेर करता येत नाही. सुस्वरूप, पूर्ण घडलेल्या निर्मितीवर त्याला दाद/ ताशेरे मिळतात. ही अशी सगळी निर्मितीची प्रक्रिया, दोन मिनिट मॅगीसारखी, रस्त्यावरून कुणीही समोर येऊन उभ्या राहिलेल्यासाठी, त्याच्यासमोर घडवायची, हे मला खूप Daring वाटलं.
माझा नंबर आला, हाॅलीवूडच्या सिनेमात लेखकांच्या टेबलवर असतो तसच तिचा antique करोना टाईपरायटर, त्यावर माझी नजर रेंगाळली. Writing softwares च्या जमान्यात ती ज्या अभिमानाने त्याच्यावर लिहित होती त्यामुळेही असेल कदाचित. खरंतर मला अफरोजकडे, तिच्या डोळ्यात बघायचं होतं. तिने विचारलं, “What do you want me to write on?” मला पटकन काही सुचलंच नाही, mind blank. मग मी म्हटलं, “Opportunity.”
अफरोज किंचित हसली, माझ्याकडे एकदा बघितलं आणि टाईपरायटर वर तिची बोटं भराभरा फिरायला लागली. टाईपरायटर शब्द लिहिला की तो backspace करून पुसता, खोडता येत नाही. माझ्याकडे बघून हसण्याच्या आणि एका कटाकशाच्या वेळात तिच्या मनात Insta-poem साकारली होती, ती तिने एकटाकी लिहिली आणि माझ्या हातात दिली. जुन्या कागदासारखा पिवळसर कागद.

Opportunity

This day
is an opening
like the glory
that unfolds
in the morning
every exhale
a new page
waiting
to be inscribed
सुसंधीच्या मागावर स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचा विचार करू नाहीये असं तिच्या मनात होतं का? का टाईपरायटरवर ती चिन्ह उमटवताना insta poem च्या प्रक्रियेचा वेळ वाढतो, म्हणून तिने वापर केला नाही? माहित नाही.
त्या दिवसानंतर मी अफरोज फातिमा अहमद बद्दल भरपूर वाचलं. भारतातून स्थलांतरित झालेल्या आईबाबांची ती लेक. ती पूर्ण वेळ हेच करते, म्हणजे on the spot कविता करते, “Hand crafted poems for all – pay what you will.” कविता लिहून देण्याचे पैसे स्वीकारते आणि बिलं भरते. लिहिण्याचे workshops घेते, पुस्तकं लिहिते. फार्मर्स मार्केट, शाळा, कम्युनिटी ईव्हेन्ट्स ना वेगवेगळ्या गावी, शहरात, महानगरात फिरते. हे इतक्या शेकडो लोकांसाठी वर्षानुवर्ष काव्य तयार करत राहणं, ह्यासाठी प्रचंड तल्लख बुद्धी आणि प्रगल्भता, प्रतिभा हवी; जी तिच्या लिखाणातून जाणवते. तिच्या वेबसाईटवर तिने लिहिलं आहे, “Numinous experiences for sale, please inquire within.” अलौकिक अनुभव विक्रीला आहेत/ कृपया आत चौकशी करा...” (https://afrosefatimaahmed.com/impromptu-poetry/)https://afrosefatimaahmed.com/impromptu-poetry/)
ते अनुभव स्वतःला पडताळून सापडणार आहेत का तिच्या वेबसाईटवर,तिला विचारून? हे प्रत्येकाने स्वतःच ठरवायचं आहे.
कुठल्याही प्रभावी लेखकाला, चित्रकाराला, शिल्पकाराला स्वतःच्या कलेसाठी मार्ग स्वतःच खणायला लागतो. जी पाऊलवाट एका कलाकाराला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते त्याच वाटेवर दुसरा एखादा कलाकार पहिलच वळण चुकू शकतो. अफरोजने ज्या वाटेवर जायचं ठरवलंय त्यात ती प्रत्येक लिहिलेल्या कवितेतून एका अनोळखी व्यक्तीशी नातं जोडते; स्वतःचं काहीतरी त्यात ओतते, त्या देण्यातून तिची कला समृध्द करणारं मिळवते.
लोकांनी, आवाजांनी गजबजलेल्या त्या Sunday Streets मध्ये अफरोजला पाहिलं होतं, तेव्हाच मला हे जाणवलेलं असावं. वाट शोधायचीच विसरून गेलेल्याला, वाट खणून तयार केलेल्या व्यक्तीभवतीचं तेजोमंडळ लगेच साद घालतं. म्हणूनच कविता कशावर लिहू असं तिने विचारल्यावर मी तिला सांगते “Opportunity.”

https://amrutahardikar.blogspot.com/2018/12/opportunity.html

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle