लव यु शेव!

शेव- सगळ्यांना आवडणारी, विविध स्वादात आणि आकारात उपलब्ध असणारी. ही शेव आपण अगदी सहज घरी करू शकतो. विना कटकट, झटपट. मुळीच तेलकट होत नाही, त्रास नाही आणि एकदम खुसखुशीत होते. स्वच्छता, पदार्थांच्या गुणवत्तेची गॅरंटी. आणि 'तू शेव घरी केलीस?' यातलं कौतुक हसतमुखानं झेलता येतं ते वेगळंच! त्यामुळे लव्ह यु शेव! - असं मी म्हणते. तुम्हालाही म्हणायचंय ना? मग ही घ्या कृती.
(अ‍ॅक्चुअली, कमलाबाई ओगलेंच्या 'रुचिरा' मधल्या कृतीला आंधळेपणाने फॉलो करा. यात माझं काहीच नाहीये वेगळं. अनेक जणी ऑलरेडी घरी करतही असतील शेव. युट्युबवरही अनेक व्हिडिओज आहेत. पण मी केली परवा , म्हणून इथे फोटो आणि कृती लिहितेय.)

साहित्यः-
१) डाळीचे पीठ- ४ वाट्या. (नेहेमीचे बारीक दळलेले चालेल. जाड पिठाची गरज नाही.)
(वाटी ज्या आकाराची असेल त्या चार वाट्या. कोणतीही स्पेसिफिक मापाची वाटी नाही. ग्रॅम्स मोजायची गरज नाही.)

२) मोहनाकरता तेल- पाव वाटी (कोणतेही खाद्यतेल) (वर जी वाटी घेतली आहे, त्याचंच पाव वाटी माप)

३) चवीपुरतं मीठ, तिखट, ओवा.

४) शेव तळायला तेल.

५) सोर्‍या आणि शेवेच्या चकत्या. बारीक आणि जाड दोन्ही.

कृती:-
पाव वाटी तेल तापायला ठेवा.
तेल तापतंय तोवर डाळीचं पीठ, मीठ, तिखट, ओवा एकत्र करा.
तेलाला धूर यायला लागला की गॅस बंद करा, मोहन पीठात ओता. चमच्याने जरासं पसरवा, जरा वेळ थांबा.
तेल कोमट झालं की चार वाट्या पीठाला बरोबर एक वाटी साधं पाणी घ्या आणि पीठात घाला. सगळं मिश्रण एकत्र करा. पिठाचा गोळा होईल. साधारण पोळीची कणीक ज्या कन्सिस्टन्सीची असते तसा होईल. छान मळून घ्या. याचे चार भाग करा.
शेव तळण्याकरता तेल तापवायला ठेवा.
सोर्‍यात शेवेची जाळी घाला, एक गोळा घाला.
तेल कडकडीत तापलं, की गॅसची फ्लेम एकदम लहान करून सोर्‍या थेट तेलावर गोल गोल फिरवायला लागा. शेव तेलात पडायला लागेल. अर्धा सोर्‍या फिरवून झाला की थांबा. शेवेचा घाणा दोन्ही बाजूने तळून घ्या. टिश्यु पेपरवर काढा.
पुढचे सगळे घाणे असेच करा.
झाली शेव! :)

टीपा:-
१) ही बेसिक शेव आहे. अशीच लसूण शेव, पाल्क शेव, टमॅटो शेव करायची. लसूण शेवेकरता लसूण ठेचायचा. पाण्याने गाळायचा. तेच पाणी पीठ भिजवायला घ्यायचं. पालक प्युरी / टमॅटो प्युरी वापरून पीठ भिजवलं तर तो तो रंग आणि चव पीठाला येईल.

२) शक्यतो बारीक चकती वापरली तर शेव आणखी खुसखुशीत होते आणि भरपूरही होते.

३) ही शेव मुळीच तेलकट होत नाही. स्टार्ट टु फिनिश अर्धा ते पाऊण तास लागतो फक्त.

फोटो-
ही जाड शेव:

jaad.jpg

ही बारीक शेवः

barik.jpg

गुलाब :

माझ्या नवर्‍याला शेव भयंकर आवडते. व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून मग त्याचाच गुलाब त्याला पेश केला Lol आमच्या क्रिएटिव्हिटीची मजल इतकीच!

gulab.jpg

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle