क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २

----
Screen-shot-2011-06-20-at-4.44.07-PM.png
(एक्सेल्सिअर)


१८९७ च्या वसंतऋतूत बर्फ वितळून वाहतूक खुली झाली आणि युकानमध्ये अडकलेल्या कित्येकांनी अनेक वर्षांनंतर आपल्या घरची वाट धरली. थोडीशी गंजलेली, चिखलाने माखलेली अशी 'एक्सेल्सिअर' आगबोट १५ जुलै १८९७ साली सानफ्रान्सिस्को बंदराला लागली तेव्हा तिचं स्वागत करायला लाखोंच्या संख्येने जनता लोटली होती. तीच गत सिअ‍ॅटल बंदराची. 'पोर्ट्लँड" सिअ‍ॅटल बंदराला लागली आणि 'Hurrah for the Klondike !!!' च्या गजराने संपूर्ण बंदर दुमदुमून गेलं. बोटीतून बाहेर येणारे प्रवासी युद्धात जिंकून आलेल्या वीरागत बाहेर पडत होते.


"ऐकलं का, त्या धोबी थॉमसला, २०० पौंडाचं सोनं गावलं म्हणे... !!"
"अहो तो अँडरसन, तोच तो उधारी मागत फिरायचा, लाखभर डॉलर्सचं सोनं घेउन आलाय आहात कुठे?"
"बाई, बंदरावर बघ तुझा नवरा पोतं भरून सोनं घेऊन आलाय बघ …" हे एवढं ऐकताच कपडे धूत असलेल्या विल्यम स्टेनलीच्या बायकोने कामधाम टाकून बंदराकडे धूम ठोकली.

कंड्या पिकायला सुरवात झाली होती.

klondike_gold_in_seattle_2.jpg
(सोनं भरून आणलेले प्रवासी)


पिशव्या म्हणू नका, औषधाच्या बाटल्या म्हणू नका, कॅन, पोती, पट्टे, बूट, शर्टांचे खिसे...परतलेल्या प्रवाशांनी अक्षरश: मिळेल त्या जागी सोनं भरून आणलं होतं.. त्यातच बंदराजवळ असलेली टाकसाळ बंद असल्याने हा जामानिमा थोडं दूरच्या Selby Smelting Works मध्ये न्यावा लागला. त्यात अनेक वाहतूकदारांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. जहाज बंदराला लागताच तासाभराच्या आत एक्सेल्सिअरच्या परतीच्या प्रवासाची तिकीटं विकली गेली होती.


klondike-gold-rush.jpg


वर्तमानपत्रांच्या कृपेने ही बातमी देशात पसरायला वेळ लागला नाही. त्याचवेळी काही कामानिमित्त सिअ‍ॅटलचा महापौर डब्ल्यू. डी. वूड सानफ्रान्सिस्कोमध्ये होता. क्लोंडायकला जाण्यासाठी त्याने तातडीने टेलिग्राफने आपला राजीनामा पाठवून दिला. 'क्लोंडायक' या शब्दानेच सगळ्यांना स्फुरण चढत होतं. अनेकजण 'I am going', 'I am going this spring' असे बॅच शर्टावर मिरवायला लागले होते. जे क्लोंडयकला जात नव्हते त्यांना तुच्छ कटाक्ष झेलावे लगत होते. सगळ्यांनाच या बातमीने वेडं केलं होतं, हे वेडं साथीच्या रोगासारखं पसरत होतं.आणि या रोगाचा मुख्य बळी होता सिअ‍ॅटल शहर. तशी पश्चिमेकडची सर्वच महत्त्वाची बंदरं - वँकुवर, ब्रिटीश कोलंबिया, ऑरेगॉन, सानफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, टाकोमा या संधीचा फायदा उचलायचा प्रयत्न करीत होती. पण त्यात बाजी मारली ती सिअ‍ॅटलने. 'Seattle Chamber of Commerce' ने सिअ‍ॅटलची 'Gateway to the Gold Field' म्हणून अशी काही जाहीरात सुरू केली हजारोंचा जमाव सिअ‍ॅट्ल शहराकडे रवाना झाला. ही जाहिरातबाजी चांगलीच फळाला आली. त्यावर्षी सिअ‍ॅट्ल शहराचं उत्पन्न होतं जवळजवळ २ करोड डॉलर्सच्या वर.

ऐकीव माहितीवरून क्लोंडायकच्या वातावरणाचा अंदाज लोकं बांधू लागले. तिथल्या हवेला मानवणाऱ्या लोकरीच्या, फरच्या कपड्यांची, चपलांची, टोप्यांची खरेदी वाढली. अनेकजण सिअ‍ॅट्ल शहरात पोचताच हा जामानिमा चढवून एक छायाचित्र काढून आपल्या घरी पाठवत असतं.

hos22.JPG


जाहिरातबाजी करून सिअ‍ॅटलने आधीच बाजी मारली होतीच पण क्लोंडायकला जाणार्‍या गर्दीला अनेकानेक सोयी पुरवणार्‍या वस्तूंच्या दुकानांची जंत्रीच लावली होती. सिअ‍ॅट्ल शहरातले कुत्रे अचानक गायब झाले. चाळीस पौंडापेक्षा जास्त वजनाच्या कुत्र्यांना बर्फात सामान वाहून नेणारी गाडी ओढण्याचं शिक्षण मिळत असे.

klondike1.jpg



लहानथोर सगळयांनाच आता क्लोंडायकने झपाटलं होतं. कोणं नव्ह्तं त्यात. नन्स होत्या, डॉक्टर होते, शिक्षक होते, फुटबॉलचा अख्खा संघ चालला होता, क्लार्क होते, व्यापारी तर होतेच होते. चार दिवसात सिअ‍ॅटल अग्निशमन दलातल्या बारा ऑफिसर्सनी राजीनामा दिला होता. न्यायाधिशांना खटले लवकरात लवकर आटपण्यासाठी धमक्या येऊ लागल्या. आरोपींनाही जायचं होतंच की क्लोंडायला.

getimage.exe_.jpg


ज्या दिवशी पोर्ट्लंड ही आगबोट सिअ‍ॅट्ल बंदराला लागली त्याच दिवशी Al-ki ही आगबोट उत्तरेला निघाली. ३०-४० डॉलर्सना मिळणारं तिकीट चोवीस तासांच्या आत हजाराच्या घरात गेलं होतं. तरीही सगळीच्या सगळी तिकीट विकली गेली होती. २०० फुटाच्या Al-ki मध्ये जवळजवळ ११० प्रवासी, ९०० मेंढ्या, ६५ गुरंढोरं, पन्नास एक घोडे भरले होते. वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून माहिती, सल्ले लिहीले जात होते. प्रवासाला निघालेले अनेकजण ऐकीव माहितीवरून क्लोंडायकचा अंदाज बांधत होते तर अनेकांनी पैसे देऊन आधी क्लोंडायक वारी करून आलेल्यांकडून माहिती मिळवली होती. हवा तर तापली होतीच पण भविष्यात काय वाढून ठेवलाय याचा काडीमात्र विचारही न करता प्रत्येकाने आपल्या परीने तयारी चालू केली होती.

काहीजणांसाठी ते एक धाडस होतं, काहींसाठी कधीही न संपणारी लालसा पण सिअ‍ॅटल बंदारात लोटलेल्या गर्दीतल्या अनेकांसाठी जगण्याची ती एक शेवटची आशा होती.


क्रमशः

क्लोंडायकच्या नावावर केलेल्या अजून काही जाहीराती.
hrs2b5-2.gif


hrs6a3.gif


old_ad2.gif


old_ad.gif


संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle