परकी दुःखं

कविता माझा प्रांत नाही. तरीपण एका खोल वेदनेतून हे या फॉर्म मध्ये लिहिलं गेलं. दोन वर्षांपूर्वी लिहिलेलं हे आज काही कारणाने वर आलं. अस्वस्थ वाटतंय !

परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा हळूच कुरवाळावं

पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी.

त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी...

जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या

त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे..

झेपले तर थोडा दूधभात घालावा म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल...

कोण कुठले गरीब बिचारे

देवा ! आई गं ! अरेरे ! वगैरे..

मनी साठलेले सुस्काऱ्यांचे घट रिकामे करत

जड वाटल्याचे भासवत हलके हलके व्हावे !

परोपकाराची साय दाट झाली की

मग मात्र त्या मांजराला विसरून जावे!

जणू ते अस्तित्वातच नव्हते..नाही...नसणार !

एवढे करून चिरेबंदी वाड्यात परतताना

पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये

नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे !

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle