अमेरिका प्रवास.....भाग-१

एक प्रवास अनुभव असा ही ..

प्रवास करण्याचे प्रत्येकाचे मजेशीर ,अविस्मरणीय अनुभव असतात .त्या आठवणी नंतरही आपल्याला सुखावून जातात्त.माझाही अमेरिका प्रवासाचा अनुभव इथे सर्व मैत्रिणीबरोबर शेअर करीत आहे.कदाचित भारताबाहेरच्या मैत्रीणीना ह्यात फारसे विशेष वाटणार नाही.पण इथल्या मैत्रीणीना आवडेल असे वाटते. भारतात रेल्वे ,बस किंवा विमानाने करताना कुणास ठाऊक इतके दडपण येत नाही .त्याचे मुख्य कारण म्हणजे भाषा .पण परदेशातला विमान प्रवास मला प्रत्येक वेळी एक वेगळाच अनुभव देऊन जातो. यंदाचा हा तिसरा विमान प्रवास ,म्हणजे पूर्वीचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे थोडी बिनधास्त होते. आतापर्यंत मुंबईहून जायचे आणि भाऊ-वहिनी एअरपोर्ट ला सोडायला यायचे पण ह्यावेळी पुण्याहून १३ नोव्हेंबर ला निघायचे होते. पहाटे ३:३० ची फ्लाईट होती. स्वतंत्र टेक्सी करून आरामात जा असे सगळ्या आप्तांचे मत होते.त्यासाठीचे फोन नं. ही तत्परतेने दिले गेले . पण एक तर ते किमान दोघेजण तरी एकमेकांबरोबर होते आणि दुसरे म्हणजे नेहमी प्रवास करणारे होते.रात्री निघायचे होते पण एकटीने स्वतंत्र टेक्सी ने जायची माझ्या मनाची तयारी नव्हती.सरतेशेवटी के.के. ट्रेवल्स ला फोन करून शेअर टेक्सी बुक केली. बरोबर लेडीज कोणी नसल्यास पुढे ड्रायव्हर शेजारी सीट देण्याची रिक्वेस्ट ही केली. पुढे वेळेत टर्मिनल २ ला पोहोचले चेक इन ही व्यवस्थित पार पडले. रमत गमत निश्चित जागी पोहोचले.वेळेशीर विमान प्रवासाला सुरुवात झाली. एमस्टरडेम हून मिनियापोलीस चा प्रवास ही सुखकर झाला . सामान ही व्यवस्थित मिळाले.मागील खेपेचा प्रवासाचा अनुभव खूपच आगळा-वेगळा होता .त्याची मजा [ हो.आता मजा म्हणायला हरकत नाही!] पुन्हा केव्हातरी लिहीन.
एअर पोर्ट ला राहुल आला होता .चार वर्षानंतर आम्ही मायलेक भेटलो होतो.एअर पोर्ट च्या दारा बाहेर पडल्याबरोबर “थंडी आणि गारेगार वारे” भी क्या चीज है चा चांगलाच परिचय झाला.घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली.चार वर्षानंतर मंकी—राहुल चा पाळीव कुत्रा- भेटला पण त्यानेही मला छान ओळखले.खूपच कौतुक वाटले.
एमस्टरडेम विमानात पाहुणचार छान झाला होता.त्यामुळे घरी आल्यावर काहीही खायची भूक नव्हती . विश्रांती रात्रीच घेतली तर जेट लेग जाणवत नाही . म्हणून घराजवळ च मंकी बरोबर पायी फेरफटका मारायचे ठरले. स्वेटर त्यावर पुलोवर घालून उबदार घरातून बाहेर पडले तेव्हा घराबाहेर किती थंड आहे ते जाणवले.बेक यार्ड मध्ये ओला बर्फ पाहून बर्फाचे गोळे बनवून फेकण्याचा मोह काही आवरला नाही. थंडीमुळे डोळ्यातून पाणी वाहायला लागले नाक ही सुरसुरत होते..बाहेर भुसभुशीत बर्फ ही होता त्यात पाय रोवून चालायला खूपच मजेदार वाटत होते.डोळ्यातल्या पाण्यामुळे समोरचे नीट दिसतही नव्हते .हातमोजे घालूनही बोटं गारठली होती तर नाक सुन्न झाले होते. आमच्या ब्लॉकचा एक मोठा चक्कर लावून आम्ही घरी परतलो.ice on  tree
दुसर्याच दिवशी इथल्या थंडी चा सामना करण्यासाठी दुसर्याच दिवशी सर्वात आधी शॉट लावून घेतला त्यानंतर स्वेटर्स,पार्का,गरम पायमोजे-हातमोजे , छानशी टोपी ,बर्फाचे बूट,लेयर्स अशी सगळी खरेदी आणि इंडियन स्टोर्स मधून बरेचसे सामान घेतले .दुसर्यादिवशीपासून माझी तिथल्या रुटीन ची सुरुवात झाली.आपली दिवाळी आणि तिथला थ्यांक्सगिविंग लागोपाठच आले. त्यामुळे ३-४ अमेरिकन घरी जेवणाचे आमंत्रण आगाऊ मिळाले होते. आम्ही दोघे ही चार वर्षानंतर दिवाळी नंतर लगेच भेटत होतो.त्यामुळे फराळाचे काही पदार्थ करायचेच होते.पातळ पोह्यांचा भरपूर दाणे घातलेला चिवडा ,बेसन लाडू वळण्याऐवजी मगज वड्या ,ओल्या नारळाच्या करंज्या ,कोथिंबीर वड्या भरपूर प्रमाणात केल्या आणि सगळ्याच्या घरी दिवाळी फराळ दिला.प्रत्येकाकडे थ्यांक्सगिविंग चा मुख्य पदार्थ “ मोठ्ठी टर्की त्यात मसाला भरून बेक “ केली होती आणि आमच्यासाठी सोफ्ट ड्रिंक्स ,सलाड,पास्ता,भात,करी,केक, असं बरंच काही होते. तर अशीच ख्रिसमस ची माजा ही घेतली. एव्हाना मी तिथल्या थंडीला सरावले होते. चुरचूरणार्या बर्फात पेंग्वीनसारखे फेन्गाडे पाय टाकून चालता येऊ लागले. त्यानंतर मात्र बर्फ पडायला सुरवात झाली. त्यावेळी मला खूपच अप्रूप वाटायचे.पांढराशुभ्र आसमंत पाहून खूपच छान वाटायचे.image 1 बर्फामुळे रात्रीत ही खूप उजेड जाणवत होता.त्यात पौर्णिमेचा चंद्र आणि शुभ्र बर्फ पहाताना सुखावले. पण त्याचबरोबर प्रत्येकाला स्व- जवाबदारीचे भान ठेवून आपल्याला जमेल त्या वेळेस स्वताच्या घरासमोरील [ पण पुढचा बर्फ पडून आधीचा बर्फ गोठण्याआधी ] बर्फ सरकवताना पाहिले.गारठणार्या थंडीत आकाशातून बर्फ पडत असतानाही , तरुण तसेच वयस्कर स्त्री-पुरुष न चुकता हे काम करत होते.रात्रीच्या वेळेस मुख्य रस्त्यावरील बर्फ मोठ्या ट्रक सारख्या गाड्याद्वारे सरकवून त्याचे ढीग कडेला लावले जात होते. रोज सकाळी गेरेज बाहेर कार मुख्य रस्त्यावर आणण्या आधी बाहेर चा बर्फ मोठ्या फावड्याने सरकवावा लागत होता . मी ही हे काम जमेल तितके केले पण बर्फाने पूर्ण भरलेला जड फावडा माझ्याच्याने उचलला गेला नाही. चालताना घट्ट जमलेल्या बर्फावरून ३-४ वेळा अनाहूतपणे घसरले पण सावरलेही .आता मात्र सतत पडणारा बर्फ आणि त्यामुळे पडणारी प्रचंड थंडी ,वहाणारे गारेगार वारे ह्यामुळे बाहेर पडू नये असेच वाटायचे.पण राहुल मला घराबाहेर काहीही निमित्ताने काढायचाच. मॉलमध्ये वॉक साठी जायचे नेहमीचेच झाले होते. तेवढाच पायाला व्यायाम. मिसिसिपी नदीचे भव्य पात्र ही गोठताना पाहिले. तळीगोठलेली पाहिली आणि हो धबधब्याचे पाणी ही गोठलेले पाहिले. घरांच्या तिरक्या छतावर ६ ते ८ इंच बर्फ जमा झालेला पाहिला.खालील फोटोत एका घरातील बॅक्र् यार्ड च्या मागे गोठलेले तळे दिसत आहे.त्यावर एक उत्साही माणुस स्किईंग करताना दिसत आहे. इथे हौशी लोकं आईस-हॉकी खेळतात असे कळले .
Gothalele Tale
आता राहुलला विन्टरव्हेकेशन असल्याने ८ दिवस सेन्डीयागो,सेनफ्रांसिस्को आणि लॉसएंजिल्स फिरण्याचा प्लान केला होता .त्या प्रवासाचे वर्णन पुढील भागात लिहिते.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle