मुळ्याचे पराठे

लागणारे जिन्नस:
किसलेला मुळा-ज्या प्रमाणात हवा असेल त्या प्रमाणात,
बारीक चिरलेला कांदा- साधारण पाव वाटी,
मसाले- MDH चा पराठा मसाला, रजवाडी गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पावडर.
हवा असल्यास अर्धी/एक वाटी बारीक चिरलेला पालक,
भरपूर कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, १ चमचा ओवा, फोडणीकरता तेल, जिरं, हिंग, हळद,
४,५ चमचे बेसन,
पराठ्याकरता कणी़क.
क्रमवार पाककृती:
मुळा किसून घ्यावा. कांदा, पालक, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावे.
पसरट फ्रायपॅनमध्ये एक चमचा तेल गरम करुन त्यात जिरं घालावं. जिरं तडतडल्यावर हिंग, हळद घालून त्यावर कांदा परतून घ्यावा. त्यावर बाकीचे मसाले घालून जरा परतून घ्यावं. त्यावर चिरलेला पालक आणि किसलेला मुळा घालून झाकण न घालता शिजू द्यावं. हळूहळू पाणी सुटेल. त्यातच मावेल तेवढं बेसन घालून किंचित गॅस मोठा करावा म्हणजे पाणी पटकन आटेल. चवीप्रमाणे मीठ,घालून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व एखाद्या पसरट प्लेटमध्ये पसरुन गार होऊ द्यावं.
कणकेत मीठ, लाल तिखट, हिंग, हळद, ओवा घालून नीट मिक्स करुन घ्यावं. त्यात हे गार झालेलं मुळ्याचं मिश्रण भरुन अगदी किंचित पाणी घालत घालत घट्ट पीठ भिजवावं व लगेच पराठे लाटायला घ्यावेत.भाजताना दोन्ही बाजूंनी तेल्/बटर लावून पराठे भाजून घ्यावेत.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle