सॅन-डी-यागो प्रवास ... भाग-२.

सॅन-डी-यागो प्रवास असाही भाग-२ ....
८ जानेवारीला सकाळी ११:३० च्या डेल्टा फ्लाईट ने मिनियापोलीस टू सेन-डी-यागो ला निघालो. रात्रीपासून बाहेर सतत बर्फ पडत होता आणि दुसरे दिवशीही सतत पडणार होता.फेडरल कर्मचाऱ्यांचा स्ट्राईक चालू असल्याने तीन महिन्यांपासून जवळ जवळ ८००० कर्मचार्यांना “आदरणीय ट्रम्प” च्या चाणक्य नीति मुळे पगार बंद,इतर सर्व सवलती बंद करण्यात आल्या होत्या. तरीही सेवाक्षेत्रातील बरेच कर्मचारी स्वताहून जवाबदारीचे भान ठेवून विनावेतन कामावर येत होते. त्यामुळे सर्व सरकारी आणि सेन्ट्रल ऑफिसेस मध्ये होणार्या दैनंदिन कामावर त्याचे परिणाम आणि प्रतिसाद दिसून येत होते . प्रत्येक ठिकाणी बराच वेळ लागत होता. पण सर्व सामान्य जनता ही समंजस पणे वागत होती.कुठेही धडापड,चढा आवाज दिसला नाही . त्यात बाहेर पडणार्या सतत च्या बर्फाने जणू प्रत्येकाची गती मंदावली होती. ह्यामुळे आम्ही घरातून ७:३० वाजता उबर टेक्सी निघालो. बर्फामुळे रस्ते निसरडे झाले होते .ब्रेक लावूनही कार आपोआप घसरत होती .सिग्नल च्या बराच आधी ब्रेक लावला कि सिग्नलपाशी कार थांबत होती.हा अनुभव देखील माझ्यासाठी नवाच होता. एअरपोर्ट वर प्रत्येक जागी लांबच लांब रांग दिसत होती. आम्ही घरातून निघण्याआधी राहुल ने चेक इन केले तेव्हा टी.एस.ए.प्री.चेक. लिहून आले.त्याचा अर्थ असा कि चेक इन साठी नेहमीच्या रांगेत उभे न रहाता स्पेशल रांगेतून चेक इन करता आले. त्यावेळी बूट-मोजे काढावे लागले नाहीत. शोल्डर बेग मधून इलेक्ट्रोनिक वस्तू बाहेर काढून ट्रे मध्ये ठेवल्या आणि एकूण अपेक्षेपेक्षा लौकर म्हणजे २० मिनिटात आमचे चेक- इन झाले .एरवी दिड तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागला असता. आता आमच्याकडे दोन तासांपेक्षाही जास्त वेळ होता. जी-१२ ला आमचे विमान येणार होते.आम्ही त्याच दिशेला जी-२२-२४ पर्यंत दोन एस्कलेटर नि गेलो.जी-२४ ला कॉफी घेतली आणि एका जागी असलेल्या रिकाम्या खुर्ची वर बसलो.घरून आणलेल्या मेथी पराठे आणि गरम कॉफीचा आस्वाद घेत आम्ही ब्रेकफास्ट पूर्ण केला.आमच्या समोर एअरपोर्ट वर काही विमाने उभी होती .त्यात सामान लोड करण्याचे काम यांत्रिक मदतीने सहजगत्या चालू होते. बर्फ सरकवणार्या गाड्या एकामागे एक रांगेत येऊन रन वे चा बर्फ सरकवत होत्या . दर मिनिटाला एक विमान आकाशात झेप होते तर दुसरे विमान खाली उतरताना दिसत होते. येणार्या विमानाला योग्य जागी येऊन उभे रहाण्यासाठी रेल्वेसारखेच पोर्टर लाल झेंडा दाखवत होते. विमानातील प्रवासी उतरले कि लगेच स्वच्छता कर्मचारी विमानाची साफसफाई करत होते.
साधारण ११:०० च्या सुमारास जी-१२ गेट जवळ आलो आणि ११:२० पर्यंत विमानात आमच्या सीट वर बसलो .३x३ चे विमान प्रवाशांनी पूर्ण भरले होते ११:३० ला विमानाने उड्डाण केले.आमचे गंतव्य स्थान सेन डी यागो ला पोहोचायला एकूण ३ तास लागले. तिथल्या व मिनियापोलीस च्या प्रमाणवेळेत २ तासाचे अंतर आहे. म्हणजे मिनियापोलीस ला दुपारचे ३:३० वाजले तेव्हा इथे दुपारचा १:३० वाजला होता.विमानात पीनटस ,डायेट कोक आणि तानंतर कॉफी दिली होती .त्यामुळे भूक लागली होती. सेन डी यागो चे विमानतळ भव्य आणि सुन्दर आहे. येथून उबर ने हॉटेल इन ला पोहोचलो. रूम खूपच प्रशस्त सर्व सोयींनी परिपूर्ण होती. येथून साधारण अर्ध्या तासाने आम्ही लाहोय्या भागातील टेस्टी टाको ह्या टाको साठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टारेंट मध्ये टाको खाण्यासाठी गेलो .इथे मका पिठाचे पुरी इतके लहान लहान टाको मध्ये उकडलेल्या भाज्या- फेंच बीन्स,राजमा,मशरूम,चीज आणि आंबट गोड चवीचे डीप्स भरून देत होते.हा आमच्यासाठी चा व्हेज ऑप्शन होता. व्हेकेशन मुळे इथे तरुणाई ची प्रचंड गर्दी होती.ह्या टाको शेजारी एक पिझ्झा हट आणि त्यापुढे तंदूरी हट नावाचे इंडियन कुसीन होते. पण गर्दी मात्र टाको ला..इथून पुढे बरेच पायी चालत समुद्र काठी पोहोचलो .समुद्राला भरती ची सुरुवात होती.समुद्रकाठावर नव्या-जुन्या उत्तम वास्तुरचना दर्शविणारी लहान मोठी हॉटेल्स –मोटेल्स ओळीने आपला दिमाख दाखवत उभी होती. इथून बरंच पुढे मैलभर चालत गेल्यावर एका ठिकाणी ३०-४० सील्स आपल्या कुटुंब- कबील्या सह मावळती च्या सूर्य प्रकाशात आरामात पहुडलेल्या दिसल्या. हे खरे इथले आकर्षण आहे.

IMG_8804.jpg

वर निळ्याशार आकाशात शहर आणि समुद्र दर्शन घडवणारी हेलीकोपटर्स सतत घिरट्या घालत होती. पर्यटक ही बरेच होते. काही भटक्या जमातीचे पर्यटक सर्व सोयींयुक्त ट्रक घेऊनच निघाले होते. तर काही स्थानीक लोक त्यांच्या कुत्र्या-मांजरींना फिरायला घेऊन आलेले दिसले.
निरभ्र आकाश,हवाहवासा वाटणारा सूर्यप्रकाश आणि बर्फमुक्त जमीन इतकं छान वाटत होत फिरायला. तीन ते साडेतीन मैलाचा फेरफटका मारल्यावर आम्ही लहोय्या च्या मुख्य रस्त्याकडे वळलो. इथे कपडे ,गालिचे,शोभेच्या वस्तू ,ब्युटी पार्लर इत्यादी दुकाने होती .सर्व दुकानात नवीन वर्षाची रोषणाई दिसली प्रत्येक दुकानात ३० /४०/५० टक्के सेल ही लावले होते. “द सेफ्रोन “ या थाई रेस्तारेंट मध्ये राईस नूडल्स ,कोकोनट करी विथ टोफू खाल्ले व हॉटेल ला परतलो.
दुसर्या दिवशी सकाळी हॉलिडे इन चा कोम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट घेऊन ८:१५ ला सन डी यागो झू समोर पोहोचलो.वाटेत लहान लहान टुमदार घरे व त्या समोर पार्क केलेल्या गाड्यांची रांग ,सर्व दूर हिरवळ.सतत नागमोडी, भयंकर चढ आणि प्रचंड उतार असलेले रस्ते ,निरभ्र आकाश, छान ऊन.आणि हवेत असलेला अपेक्षित गारवा असं सगळ अनुभवत सुमारे ३० मिनिटात झू समोर पोहोचलो. उबर ड्रायव्हर चे गाडी चालवण्याचे कौशल्य कमालीचे होते.
SDzoo2.jpeg
SDzoo3.jpeg

झू ची तिकीट बारी ९:०० वाजता उघडणार होती.
पण इथल्या ऑनररी वयस्कर वोलीनटियर नी झू संबंधीची भौगोलिक माहिती दिली आणि माहिती पत्रक ही दिले. तिकिटाचे दर वेगवेगळे होते. आम्ही ओपन बस ने झू चा ४५ मिनिटांचा राउंड व त्यानंतर पायी हिंडण्या साठीचे तिकीट काढले.इथे बाळंत पणासाठी नवरा बायको दोघानाही पगारी सुट्टी मिळते .काही जोडपी त्यांच्या तान्ह्या बाळांना बाबागाडीत लवाजम्यासकट आलेली दिसली. तर एक जोडपे त्यांचे बाळ आता काही दिवसाचे सोबती डिक्लेअर झाले आहे म्हणून त्याला घेऊन आले होते. त्याना विशेष प्राधान्य देवून स्पेशल ओपन गाडीतून फिरवून आणण्यात आले. बाळाला कुठलीच गती दिसत नव्हती .ह्यासाठी त्याना विनामुल्य पास व एक टूरगाईड ही देण्यात आला .त्याशिवाय बरीच वयस्कर मंडळी ही व्हीलचेअर वर दिसली.

बरोबर ९:३० वाजता आत प्रवेश केल्यावर प्रशिक्षित मकाऊ पोपटानी गलका करीत एकसाथ उडत जाऊन सर्व प्रवाशांचे स्वागत केले. त्यानंतर एका लहान तळ्याकाठी केशरी पेलिकन च्या थवे एका पायावर तंद्री लावून उभे दिसले.
IMG_8856.jpg

झू ला राउंडमारणार्या ओपन बस मध्ये बसण्या आधी येणार्या प्रत्येक समुहाचा फोटो काढून एक बार कोड देण्यात आला.आम्ही परत आल्यावर बार कोड अनुसार आम्हा दोघांच्या फोटो मागे हत्ती व सिंह असलेला एक फोटो दाखवण्यात आला .त्याची किंमत २९ डॉलर सांगण्यात आली.अर्थात आम्ही ही आठवण भेट घेतली नाही. ओपन बस चे ड्रायव्हर कम गाईड ३४ वर्षांपासून या झू मधेच काम करीत आहेत.त्यांनी प्रत्येक आवश्यक ठिकाणी बस थांबवून बस च्या डावीकडे व उजवीकडे असलेल्या प्राण्यांची ,वनस्पतींची माहिती सांगितली. डबल डेकर बस मधून फिरल्याने एकूण झू च्या विस्तीर्ण आकाराची कल्पना आली.
त्यानंतर आम्ही एकेक भाग पायी फिरलो. रंगीबेरंगी सुंदर लहान मोठे पक्षि,मासे,पांडा,असंख्य जातीची हरणे, सिंह,चित्ता, जिराफ,अस्वल,झेब्रा असे कितीतरी प्राणी-पक्षी –वृक्ष ,सुंदर फुले,केक्टस चे प्रकार, विलुप्त होणारे पक्षी-प्राणी-वृक्ष पाहिले.सर्वात शेवटी ह्या झू च्या निर्मिती , देखभाल करणाऱ्या प्राणीतज्ञाची माहिती देणारी एक तासाची डॉक्युमेंटरी पाहिली.एवढा मोठा झू,जगभरातील दुर्मिळ प्राणी-पक्षि- प्रजातींचे- वृक्षवल्लींचे संवर्धन करण्यासाठी कितीकांचे हातभार लागलेले आहेंत.खरंच सगळं अकल्पित आहे .ह्या झू मध्ये स्वच्छता कर्मचारी जागोजागी आपले काम करताना दिसत होते.कोणीही वेळकाढू पणा करीत नव्हते. क्लोज सर्किट टी व्ही मुळे प्रत्येक जण आपापले काम स्वयंपूर्ण जवाबदारीने चेहर्यावर हास्य ठेवून करताना दिसले.तसेच काही ठिकाणी वृद्ध स्वयंसेवक विनावेतन पिंजर्यातील प्राणी-पक्षी-वनस्पतींची शंकांसमाधान होईपर्यंत माहिती देताना दिसले. ह्या झू चे संवर्धन करणे ही आमची नैतिक जवाबदारी आहे. आम्ही करू तेव्हा पुढची पिढी ही अधिक जोमाने करेल. हे त्यांचे सांगणे होते.
या बेलबोआ पार्क भागात झू बरोबर बरीच म्युझियम्स ही आहेंत. प्रत्येक म्युझियमची विषयवस्तू वेगळी आहे आणि वास्तूरचनाही एकसे एक सरस आहेंत.प्रत्येक दोन म्युझियम्स मध्ये कमीतकमी २ कि.मी.चे अंतर आहे.आणि २ किंवा ३ मजली असल्याने पायर्या चढणे आलेच प्रत्येक जागी वेगळे तिकीट घ्यावे लागते. सूर्यास्ताला सगळी म्युझियम्स बंद होतात. एका संपूर्ण दिवसभरात ,ही सगळी म्युझियम्स पहाणे शक्य नाही तसेच खर्चिक ही आहे.आम्ही मानवाची उत्क्रांती दर्शविणारे म्युझियम ऑफ मेंन आणि नावाजलेल्या पेंटरच्या कलाकृतींचे म्युझियम ऑफ आर्ट तसेच जपानीज गार्डन पाहिले.बेलबोआ रेस्टारेन्ट ला भेट दिली.बेल्बोआ पार्क च्या विस्तिर्ण आवारात बरेच चिनी-जपानी प्रवासी त्यांच्या नविन वर्षाचे औचित्य साधून आले होते. त्यात काही नव-विवाहिता या बेल्बोआ पार्क च्या आवारात लग्नाचे ड्रेस घालून फोटो शूट करताना दिसले.हे सगळे भारतात ताज महाल समोर फोटो काढतात तसाच प्रकार होता. बेल्बोआ पार्क ला आतील आवारात संध्याकाळी एक मोठा इव्हेन्ट होता.त्यासाठी रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट केली होती.पांढरे झुळ्झुळणारे पडदे सोडले होते.मध्यभागी एक मोठे कारंजे होते.कारंज्याभोवती काही लोक लाईट आणि माइक चि व्यवस्था करीत होते.भोवतालीअसलेलुया बाल्कनीत काळ्या कपड्यांचा ड्रेसकोड असलेले वादक आपापल्या वाद्यांची जुळवाजुळव करीत होते.हे सर्व कार्य कमालीच्या शांततेत चालू होते.

मुख्य रेस्टारेंट च्या मेन्यु कार्ड मध्ये सामिष प्रकारच होते.भूक लागली होती त्यामुळे त्यांच्या रीफ्रेशमेंट च्या भागातुन स्टफ्ड कस्टरड स्कोन आणि हॉट चोकोलेट घेतले .त्यात थोडेसे तिखट ही असते.
या भागात एक लहानसे मेक्सिकन व्हिलेज वसवले होते. तिथे होतकरू,हौशी कलाकारांचे पेंटीग्ज विक्रीसाठी ठेवले होते.एव्हाना संध्याकाळ झाली होती.उबर टेक्सी ने हिल क्रेस्ट ह्या डाऊन टाऊन भागात आलो तिथे दीडतास पायी फेरफटका मारला.
rice noodles

”राकी टोरी”ह्या जपानी रेस्टॉरंट मध्ये एडमामे बीन्स ,सलाड आणि राईस नूडल्स खाल्ले व हॉलिडे इन ला परतलो.दिवसभर खूपच चालणे झाले होते त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ करून थकवा घालविण्याचा मार्ग पत्करला .दुसरे दिवशी ब्रेकफास्ट करून सेंन डी यागो रेल्वे स्टेशन जायचे होते.तिथून ९:३० च्या ट्रेन ने पुढील प्रवासासाठी निघायचे होते. ते वर्णन पुढील भागात लिहिते.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle