चांदण गोंदण : 1

घरात अजूनही गडबड चालूच होती. जिकडे तिकडे बॅगा पिशव्या अर्ध्या उघड्या , उपसलेल्या, काही सामान अजून भरायची वाट पाहणाऱ्या अन काही रिकाम्या होण्यासाठी ताटकळलेल्या. लांबचे बरेचसे पाहुणे परतले असले तरी मे च्या सुट्या असल्याने हक्काची मोठी माणसं, लहान मुलं गलका करतच होती.
घरात खूप पसारा असला, कामं असली तरी त्याचा शीण नव्हता तर घराचं ते अस्ताव्यस्त असणंच साजरं होत होतं. बाहेर रात्रभर चालू असलेल्या लाईटच्या माळा बंद करायच्या राहिल्या होत्या. लग्न होऊन तीन दिवसच झाले होते त्यामुळं सगळं घर तिच्यासारखंच नवीन आणि आनंदाने भरून गेलं होतं.

दुपारच्या जेवणानंतर सगळे हॉल मध्ये सतरंजीवर टेकायला आले होते.पंखा पाचावर गरागरा फिरत होता. काकांनी पानाच्या सामानाचे तयार तबक पुढ्यात घेतले आणि मोठ्या आवाजात काहीतरी गंमत किस्सा सांगत विडे लावायला घेतले. बाहेर अंगणात मुलं कॅरम खेळताना चेकाळली होती. आमरस पुरीचं तुडुंब जेवण झाल्याने धाकटा दीर वर खोलीत जाऊन घोरत पडला होता. तिलाही खरंतर तीव्रतेने आपल्या खोलीत जाऊन पाठ टेकायची तीव्र इच्छा होत होती पण साक्षात नवराच समोर इतर भावा बहिणींमध्ये गप्पा ठोकत बसल्याने तिनं एकटीने उठणं बरं दिसलं नसतं. मग ती तशीच एका कोपऱ्यात भिंतीला पाठ टेकून बसून इवलेसे हसत आपली दाद देत राहीली.

ती ज्या कोपऱ्यात बसली होती तिथून तिला तो एका बाजूने दिसत होता. सगळ्यांमध्ये राहून पण आपल्याला त्याला असं मनसोक्त बघता येतंय हे तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला फार मजा वाटली. गेले कित्येक दिवस शंभर माणसात तिला त्याला धड डोळे भरून बघता पण आलं नव्हतं. धार्मिक विधी, फोटो, आणि शुभेच्छा आशीर्वाद द्यायला येणारे लोक यात शेजारी उभा असलेला तो फक्त तिला जाणवत होता दिसत नव्हता. न जाणो आपण त्याच्याकडे बघायला आणि कुणी पटकन क्लिक करायला एक वेळ आली तर चिडवायला नवीन कारण मिळेल या शंकेने ती फार जपून राहत होती. कारण आता चिडवणं खूप झालं होतं गेले सहा महिने; पण ते सगळं प्रत्यक्ष कधी घडतंय याची तिला आस लागली होती. तर आता तो असा समोर होता आणि ती त्याच्याकडे बिनदिक्कत बघू शकत होती.

पांढरा शुभ्र झब्बा घातला असल्यानं तो जास्तच हँडसम दिसत होता. काहीही म्हणा झब्ब्यात पुरुषाचं जे रूप दिसतं ते टीशर्ट सूट बूट कशातच नाही. तिला आठवलं, अरे,आपण याला म्हटलं होतं की सिरीयल मध्ये दाखवतात तसं तुम्ही पुरुष घरात का छान सैल सुती झब्बे घालत नाही? तेव्हा तो खो खो हसला होता आणि म्हणाला तू पण मग तशी साडी नेसून आणि दागिने घालून बसणार असलीस तर मी पण घालेन हा झब्बा घरात! तिला साडी तशीही आवडतेच आणि नंतर ऑफिस सुरू झालं की नेसून होणार नाही शिवाय घरात बरीच वयस्कर जनता असल्याने तिने दोन दिवस साडीच नेसली होती आणि सासूबाई कडून कौतुक पण करून घेतलं होतं. आज आंघोळ करून खाली आला तेव्हा जिन्यात असतानाच त्याने का डोळा मारला होता ते तिला आत्ता कुठे स्ट्राईक झालं!ओह माय माय. तो ये बात है! इतकी बारीक गोष्ट त्यानं लक्षात ठेवलेली पाहून ती मनातून सुखावली.

काहीतरी मोठा विनोद झाला आणि एकदम हास्याची कारंजी उसळली तशी ती भानावर आली. तो वर बघून मनमोकळं हसत होता तेव्हा त्याच्या गालांचे कट्स आणखीच शार्प दिसत होते आणि वरखाली होणारा तो कंठमणी! उफ्फ. त्या कंठमण्यात तिचा कसा जीव अडकला आहे हे त्याला तिला कधीचं सांगायचं आहे. ती त्याचे एका सरळ रेषेत असणारे शुभ्र दात, हलकेच खळी पाडणारी धनुष्यासारखी जिवणी बघत आपले ओठ आता कसे दिसत असतील हे आठवत राहिली. त्या ओठांवर हे ओठ कसे दिसतील हा विचार करताना तिचा श्वास कधी रोखला गेला तिला समजलंच नाही. तसं दोन तीन वेळा किस करून झालं पण होतं आतापर्यत पण ते कुठंतरी अंधाराचा फायदा वगैरे घेऊन,चार चौघात कोपरा गाठून. तेव्हा दोघांचीच धडधड इतकी होती की हा विचार मनात आलाही नव्हता. आता कसं आपली दोघांची खोली, आपला बेड आपला आरसा आपलं बाथरूम आपला शॉवर! कुणापासून काही लपून नाही सगळं कसं हक्काचे, राजरोस, हवं तेव्हा! आपल्या विचारांची धाव पाहून तिची तीच लाजली!

आता त्यानं हात मागे घेऊन खांद्याच्या रेषेत आडवे भावांच्या पाठीवर टाकले होते. केवढे लांब हात आहेत याचे! सहा फुटी उंचीला शोभतील असेच. आणि ते भरदार पसरट गोरे गुलाबी तळहात. बरंय वरच्या बाजूने पटकन दिसत नाहीत. ते तळहात ती निमुळती बोटं तिने कित्येकदा डोळे भरून स्पर्शली होती. गाडी चालवताना, हॉटेल, सिनेमा, दुकानात बिल पे करताना वोलेत मध्ये घुटमळणारी ती बोटे, वोलेत खिशात ठेवताना त्याच्या संपूर्ण हाताचा होणारा विशिष्ट कोन, कन्यादानाच्या वेळेस त्याच्या तळव्यात सहजच सामावलेले आपले मेंदीभरले नाजूक छोटे तळहात आणि नंतर गळ्यात मंगळसूत्र घालत असताना मानेला झालेले पुसट स्पर्श तिला आताही लख्ख आठवत होते.

किती वेळ गेला कुणास ठाऊक ती अशी नुसती बसून त्याला बघत असल्याला. तिच्या लक्षात आलं तेव्हा सगळे चहा आणा चहा करत होते. ती पटकन उठली आणि उठताना बांगड्यांचा आवाज झाला तसं त्याच्या नजरेने तिला वेधलं. काल रात्रीची बांगड्यांची गंमत तिला क्षणात आठवली आणि तिचे गाल अक्षरशः गर्द गुलाबी झाले. ती झटदिशी आत पळाली आणि एका हाताने दुसऱ्या हातातल्या बांगड्या घट्ट धरल्या तेव्हा कालची त्याच्या हातांची पकड याहून किती भरीव मजबूत आणि तरीही एकही बांगडी पिचकू न देणारी आश्वासक होती हे जाणवलं. तिच्या मेंदीचा गंध जेव्हा त्याने खोल श्वासात भरून घेतला तेव्हा त्या धारदार सणसणीत नाकावर हे आता फक्त माझं आहे असा ओठाचा शिक्का तिनं उमटवला होता.

ती आत चहाचा ट्रे न्यायला आली तसं सासूबाईंनी उद्याची बॅग तयार आहे ना ग म्हणत हनिमूनला जायची आणखी डझनभर स्वप्नं पुढ्यात ओतली! आता ती इतकी अलवार झाली होती जसा तो चहाचे कप भरलेला ट्रे.. जरा धक्का लागला तर सांडेल की काय! ती नक्की काय जपत सांभाळत चालली होती ते तिलाच समजत नव्हतं. चहा देऊन झाला तसं चुलत सासूबाईंनी ओवलेला भरगच्च गजरा हातात दिला आणि तिचा श्वास गंधित झाला.. आजची रात्र मोगऱ्याची, मेंदीची, गंधभरल्या श्वासांची का सत्यात येणाऱ्या स्वप्नांची..! तिच्या समोर तिचा पांढरा शुभ्र मोगरा हसत होता फुलत होता आणि ही त्यात दोऱ्या सारखी स्वतःला विसरून गुंतत चालली होती!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle