उकरपेंडी

तुम्ही म्हणाल, या पदार्थाची काय रेसिपी लिहिते आहे ही? तर कारण सांगते.
मी हा पदार्थ तीनेक महिन्यांपूर्वी मावशीकडे गेले होते तेव्हा खाल्ला आणि जामच प्रेमात पडले. इतका आवडला की मावशी म्हणाली तू आहेस तोवर रोज हेच करते. आधी हा पदार्थ कधी खाल्ला होता, होता की नाही वगैरे काही आठवत नाही. मी फार विचार नाही करत बसले. आवडलाय न, खा आता असं म्हणाले स्वत:ला. मग तिच्याकडून रेसिपी घेउन घरी केली तर आमच्याकडे प्रचंड हिट झाला हा पदार्थ. खूष होतात दोघं हे खाउन. रुचकर, करायला सोपा आणि पोटभरीचा प्रकार असल्याने मीही खूष!
माझ्यासारख्याच कोणी असल्या इथे तर हा आपला जुना पदार्थ आठवून द्यायला/ओळख करून द्यायला हा प्रपंच!
साहित्य
तेल, मोहरी-हळद-हिंग, लाल तिखट, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, कणिक, चिंचेचा कोळ, साजूक तूप.

कृती
भ र पू र तेलाची खमंग फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून परता. मग कणिक घालून परता. रंग बदलेपर्यंत अगदी मंद आचेवर छान परता. पुरेसं परतून झाल्यावर पाणी आणि चिंचेचा कोळ घाला. एकदम जास्त घालू नका पाणी. आधी कणकेच्या पाउणपट घाला आणि मग गरज वाटली तर थोडं थोडं घाला. जरा घट्टसरच असतो हा पदार्थ. मग एक वाफ काढा. होत आली की कडेनी थोडं साजूक तूप सोडा. कोथिंबीर घालून खायला घ्या आणि द्या.
टीप - बरोबर ताकाची वाटी, लोणचं आणि पापड वगैरे असलं तर वेगळ्या स्वर्गाची गरजच नाही पडत.

समोर आला पदार्थ की फोटो काढायची आठवणच रहात नाही. परत केला की नक्की फोटो काढून इथे डकवेन.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle