कम, फॉल इन लव्ह ...

ddlj

दहावी-अकरावीचं कोवळं वय आणि समोर डीडीएलजे! :dhakdhak: काजोल-शाहरुखची केमिस्ट्री!! काय गारूड झालं होतं मनावर!! Love खास मध्यमवर्गीय, खालमुंडी, पुस्तकी किडा असलेल्या पिढीच्याही स्वप्नात तेव्हाच अलगद अवतरलं स्वित्झर्लंड! थेट युरोपच!!! :dd:

Europe

मग तो योग पुढे खूप खूप वर्षांनी का येईना.. 'राज' सारखंच हात पसरून बोलावतं स्वित्झर्लंड! 'सिमरन' सारखं त्याच्या कुशीत शिरतांना आपल्याही कानांत असतोच गाईच्या गळ्यातील 'त्या' घंटेचा किणकिणाट! तो नाजूक किणकिणाट जागवतोच परत आपल्यातल्या त्या अल्लड स्वप्नाळू तारुण्याला! आणि सगळं विसरून तुम्हीही गुणगुणू लागता - 'जरासा झूम लू मै ... ' Love
युरोप भटकंतीसाठी शोधाशोध करतांना इटली-स्वीसची ८ दिवसांची वीणा वर्ल्डची टूर आमच्या यंदाच्या सगळ्या चाळण्यांतून पास झाली.. आणि बऱ्याच मजामजा होत आम्ही एकदाचे प्रस्थान ठेवले! मुंबई-अबुधाबी-रोम करून रोममध्ये डेरेदाखल झालो!
पहिला दिवस हॉटेल वर जाईपर्यंत रोम शहरातली भटकंती - टिबर रिव्हर, रोमन फोरम, पियाझ्झा वेनेझिया अशा बरीचशा प्रसिद्ध ठिकाणांची झलक आणि गृपची ओळख करून घेण्यातच गेला. ठिकठिकाणी इतरही जुने अवशेष दिसतच होते. रोम हे 'भग्न अवशेषांचेच' शहर..
दुसऱ्या दिवशी होती ती व्हॅटिकन सिटी, म्युझिअम, मायकेल एंजेलोचं चित्रप्रदर्शन, सेंट पीटर बासिलिका, सिस्टीन चॅपेल.. इथे टूरिस्ट सिझनमुळे खूपच गर्दी होती. प्रामुख्याने चायनीज, आणि अर्थातच आपले वीणा-केसरी/ थॉमस कूक, इतर भारतीय गृप.. प्रत्येक गृप लीडरकडे आपापला झेंडा/ रंगीत पताका होतीच! त्याचा माग घेत सगळ्या मेंढरांची वाटचाल सुरू होती.. :ड पण गृप टूर घेतल्याचा एक फायदा इथे जाणवला. शिस्तीत गृप्सना प्राधान्य देऊन एकत्र आत सोडत होते. लीडरचा गायडन्स असल्याने छोट्या छोट्या फॉर्मॅलिटीज आणि शोधाशोधीत वेळ गेला नाही. गोंधळ-गडबड न होता नीट सगळं पाहता आलं. अर्थात, ज्यांना अभ्यासाच्या दृष्टीने किंवा खूप रस घेत, समजून घेऊन प्रत्येक कलाकृती /अवशेष बघायचाय त्यांनी स्वतंत्र एक संपूर्ण दिवस घेऊन इथे यायला हवंच! इथे लोकल गाईडची सेवा घेतली तर व्यवस्थित माहिती मिळते आणि नीट सगळीकडे हिंडता फिरता येतं. अँजल्स अँड डेमॉन्स सारख्या पुस्तकांमुळे व्हॅटिकन सिटीचं सुप्त आकर्षण होतंच.. जगातला सगळ्यात छोटा देश! स्वतंत्र सरकार/प्रशासन असलेला. तिथे आता फक्त नन आणि प्रीस्ट राहतात त्यामुळे आता मर्यादित, सुमारे ८०० एवढीच लोकसंख्या आहे. आमची गाईड मनापसून माहिती देत होती. तिथलं वेगळ्या अक्सेन्टचं इंग्लिश समजायला वेळ लागतो मात्र. निगुतीने राखलेली ती सिटी बघतांना नको नको म्हटलं तरी मनात शनिवारवाड्याची खंत डोकावून गेलीच.

vatican
vatican

डोळ्यांचं पारणं फेडलं ते सिस्टीन चॅपेलने! अप्रतिम चित्रं, मूर्ती आणि देखावे, ते गाजलेलं 'द लास्ट जजमेंट'.. शब्दातीत काम आहे मायकेल अँजलोचं.. मोठमोठ्या देखाव्यांतून दिसणारे स्वर्ग-नरक.. वेगवेगळे प्रसंग, बारकाईने चितारलेले स्त्री/ पुरुष, विविध भावना दर्शवणारे त्यांचे भावाकुल चेहरे, गोबरी गोंडस लहान मुले-बाळे, जुनी शहरे, नकाशे, समुद्र-पर्वत इत्यादि निसर्गचित्रण.. वेगळ्याच जगात जाऊन पोहोचतो आपण! बरीचशी चित्रे / मुर्त्या / गाजलेल्या कलाकृती यांचे फोटो अगदी त्यातल्या खुब्या उलगडून सांगणाऱ्या माहितीसकट नेटवर उपलब्ध आहेत. पण तिथे जाऊन प्रत्यक्ष त्या पुरातन भव्यतेपुढे उभं राहणं, ते सगळं अनुभवणं याची सर कशालाच नाही!

vatican

कॅथलिक धर्माच्या दृष्टीने महत्वाचं असलेलं सेंट पीटर चर्च अतिशय भव्य आहे! सेंट पीटर येशूच्या महत्वाच्या शिष्यांपैकी एक आणि रोमचा पहिला बिशप पण. त्याचा सुरेख भव्य पुतळा आहे. त्याचे अवशेष आणि समाधी तिथेच बरोब्बर त्या मोठ्या घुमटाखाली आहे. खूप श्रद्धेची जागा आहे कॅथलिकांसाठी. अतिशय करूण अशी सूळावर चढवल्यानंतरच्या येशूला मांडीवर घेतलेली मेरीची मूर्ती - 'पीएता' ही कलाकृती पण इथे आहे.

vatican
vatican

चर्च बाहेरचा तो प्रसिद्ध चौक आणि कारंजे - इथे मंडळी कॅमेऱ्याला डोळे चिकटवूनच दिसतात! खूप दिवस मनात घोळत राहते व्हॅटिकन सिटी.

vatican
vatican

पाय निघत नव्हताच तरी पुढच्या 'कलोसीयम' ची उत्सुकता होतीच. अतिप्राचीन काळात बांधलेलं इतकं भव्य अँफिथिएटर केवळ थक्क करून सोडतं. तिथे त्याकाळी होणाऱ्या ग्लॅडिएटर्सच्या अटीतटींच्या स्पर्धा, लुटूपुटूच्या लढाया, नाटके यांची तर कल्पनाच करावी!

rome

वीणाच्या कृपेने चविष्ट भारतीय जेवण करून निघालो ते ट्रेवी फाउंटनला.. इथे मरणाची गर्दी आणि वात आणणारे चायनीज फोटोग्राफर्स.. आम्ही काय त्या फाउंटनमध्ये नाणं टाकलं नाही. पण तुषार अंगावर घेत बसायला छान वाटत होतं. त्या प्रसिद्ध जेलाटो आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. सोव्हिनियर्स घ्यायला झुंबड होती तिथे लुडबुडून घेतलं!

rome

सकाळपासून भरगच्च दिवस आणि भरपूर पायपीट झाली होतीच! आता गृप लीडरने हॉटेलवर परतून आराम आणि मग डिनरचा बेत जाहीर केला. ज्यांना भटकायचं आहे त्यांना आपापलं जाण्याची मुभा होतीच! परत जाऊन भारतीय जेवण कोण करणार? आम्ही लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन दुसऱ्या दिशेला भटकायला निघालो. एव्हाना छान ओळखीच्या झालेल्या अजून दोन फॅमिलीज पण सोबत आल्या! गुगल बघत गल्ल्यागल्ल्यांतून खूप भटकलो! भरपूर शॉपिंग केली. एकीकडे पिझ्झा हुडकत होतोच! ८ वाजले तरी लख्ख उजेड होता. मस्त एकदम ऑथेंटिक पिझ्झा आणि वाईनवर ताव मारला! अहाहा !! :drooling: आजचा दिवस वसूल! आता संधी मिळेल तेव्हा असंच भटकायचं ठरवून टाकलंच!

rome

मग गडबडीत माहिती काढत बसेस बदलत रात्री १० ला हॉटेलवर! जड झालेलं मन आणि हलकं झालेलं डोकं, दुखणारे पाय आणि तृप्त डोळे ... Blessed

तिसऱ्या दिवशी फ्लोरेन्स.. फार सुंदर शहर आहे हे.. अर्थात पिसापर्यंतच्या प्रवासातच ही शहराची झलक बघता आली.. हिंडत हिंडत लंचच्यावेळी पिसाला पोहोचलो. त्यामुळे आधी जवळच्याच भारतीय हॉटेलमध्ये राजस्थानी थाटाचं जेवण मिळालं. मग पळालोच मनोऱ्याकडे.. फोटो फोटो आणि फोटो... वेगवेगळ्या पोजेस मधले फोटो सगळीकडे चालूच होते. मनोऱ्याला मिठी मारतांना, ढकलतांना, आधार देतांना सगळं पब्लिक अगदी गुंगून गेलं होतं. वाटलं होतं तेवढा उंच नाहीये मनोरा. शेजारचं चर्चही फार सुंदर आहे.

pisa

तिथून निघालो शहराबाहेरच्या छोट्या टेकडीवरच्या पिआझ्झाले मायकेल अँजेलो ह्या स्टॉपला.. तिथे दणकट पिळदार शरीराचा डेव्हिडचा पुतळा आहे. तिथून खाली वाहणारी नदी, तिच्यावरचे पूल आणि फ्लोरेन्स शहराचे मनोरम दृश्य दिसते! हलक्या पावसाच्या सरी आणि अंधारून येतांना दूरवर उजळत जाणारे फ्लोरेन्स... इटलीतले बघावेतच असे सुप्रसिद्ध स्पॉट्स पाहिल्याच्या आनंदात परतलो.

florence

चौथ्या दिवशी बस सोडून व्हेनिसला बोटीने पोहोचलो.. एकदम उल्हासित हवा होती. मुख्य मध्यभागी मोठा सेंट मार्क स्वेअर - पिआझ्झा सान मार्को आहे. आजुबाजूच्या सगळ्या छोट्या-मोठ्या गल्ल्या इथे येऊन मिळतात.. तिथून आधी ग्लास ब्लोईंग फॅक्ट्री पाहायला नेलं. सुरवातीला माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवलं. बघता बघता कौशल्याने सुंदर काचेचा दौडता घोडा करून दाखवला. मग बाकी प्रदर्शन आणि विक्री.. काचेच्या तऱ्हेतऱ्हेच्या सुंदर नाजूक वस्तू.. काहींनी विकतही घेतल्या.
व्हेनिसच्या कालव्यांच्या भुलभुलैय्यातून गोंडोला बोटींची चक्कर मात्र फार एन्जॉय केली.. कालव्यांच्याच गल्ल्या.. कालव्याचेच चौक... फिरतांना अजुबाजूला जुनं बांधकाम.. उंच घरांच्या भिंती... असंख्य पूल ! चकवा लागल्यासारखंच वाटत होतं. परतीच्या बोटीच्या प्रवासात सगळेच शांत झालेले होते.

venice
venice
venice

पदोवाला हॉटेलला परतलो. हे हॉटेल फारच छान होतं. जरा उंचावर असल्याने बाहेरचा व्ह्यू सुंदर दिसत होता.. एकाच रात्र जेवण्या-झोपण्यापुरता मुक्काम होता मात्र.
पुढचा पाचवा दिवस होता मुख्यतः प्रवासाचाच.. इटलीतून स्वित्झरलँडला जायचे होते. हा लुसर्न शहराच्या दिशेनी प्रवास फारफार सुंदर होता.. जसजसे स्विस जवळ येत होते तसे बाहेरच्या दृश्यात फरक पडत गेला! तीच ती लांबच लांब पसरलेली हिरवीगार कुरणं ... सजवलेली टुमदार मुख्यतः लाकडी घरं ... आणि हो, चरणाऱ्या धष्टपुष्ट, गळ्यात घंटा लावलेल्या गाईसुद्धा!!
जड मनाने इटलीचा निरोप घेऊन आम्ही त्या स्वप्नांच्या दुनियेकडे निघालो ... :dd:

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle