कोकणी मेजवानी: गुरगुट्या भात

कोकणी मेजवानी: मऊ भात किंवा गुरगुट्या भात:
आमच्याकडे दरवर्षी कमीअधिक प्रमाणात मुंबईकर नातेवाईक मे महिन्यात एकत्र स्नेहभेट ठरवून दोन दिवस येतात. अशाच भेटीच्या वेळी या मंडळींची सुप्रभात होते ती मऊ भाताने!
पाहुणे येणार म्हटलं की ठेवणीतली माळ्यावरची पितळी पातेली खाली उतरून राखेने चकचकीत केली जातात. माती आणि राख एकत्र करून ओलं करून त्याचा थर बाहेरून पातेल्याला दिला जातो, याला लेवण घेणे म्हणतात,यामुळे पातेलं जळत नाही आणि पदार्थ लागत नाही. चुलीवर आधण ठेवून20190526_072517minalms.jpg
घरातली बाई आपल्या इतर कामांकडे वळते. चुलीवरच्या आधणात घरचे धुवून धोतराच्या कापडावर पसरलेले तांदूळ वैरले जातात.

20190526_073407minalms.jpg

जशी माणसं वाढतील तसं मोठं पातेलं चुलीवर चढतं. हळूहळू पातेल्यातला भात रटरटायला सुरुवात होते. चुलीत कांदे भाजले जातात.
20190526_073421minalms.jpg
घरात धुराचा वास पसरायला लागतो आणि पाहुणे मंडळी मऊ भाताच्या ओढीने लवकरच अंथरूण सोडतात. भात शिजेपर्यंत आंबे, फणस स्वागतासाठी तत्परतेने पुढे सरसावतात. किती गरे संपतात किती आंबे चोखले जातात याची गणती करायची नसतेच! या हवेला किती खाल्लं तरी पचतं म्हणत मंडळी भात शिजल्याचा कानोसा घेत माजघरात घुटमळतात. इकडे भात शिजून मीठ घातलं की लाकडं बाहेर ओढून निखाऱ्यावर झाकून ठेवला जातो. आता भाताचे एक एक सहकारी हजेरी लावू लागतात. लोणकढं तूप हळूच फडताळातून बाहेर येतं! पाहुण्यांसाठी केलेलं ताजं मेतकूट खमंग सुवासाने भूक चाळवू लागतं. ताज्या कैरीच्या लोणच्याचा दादरा सोडून रसरशीत लोणचं पंगतीत येतं. एखाद्या सौम्य स्वभावाच्या आजीसारखं लिंबाचं गोड लोणचं आपली जागा घेत बसकण मारतं. या दोघांचा तोरा कितीही असला तरी फोडणीची मिरची त्यांना बाजूला सारत हक्काची जागा घेते. भाजलेल्या कांद्याची सालं काढून तयार ठेवले जातात. कोणी एखादी आत्या चुलीतल्या निखाऱ्यावर चार उडदाचे पापड शेकवून घेते. आता मुख्य शिलेदार माजघरात प्रवेश करतो!
20190526_090846minalms.jpg
भाताचं पातेलं मध्यभागी अध्यक्षस्थानी येऊन बसतं आणि आजूबाजूला घुटमळणाऱ्या, झोपाळ्यावर झोके घेणाऱ्या मंडळींना हाकारे केले जातात. भाताच्या पातेल्याभोवती एकच झुंबड उडते. आपापल्या आवडीप्रमाणे तूप मेतकूट भात हातानेच पटापट मटकावून, परत ताटल्या सरसावत मंडळी पातेल्याकडे आपला मोर्चा वळवतात.
20190526_091215minalms.jpg
दुपारच्या जेवणासाठी आंबे आणताना डोळ्यांच्या कोपऱ्यातुन घरीण हे चित्र आनंदाने बघत या सगळ्या सोहळ्यात सामील होते. तृप्तीचा ढेकर देत पाहुणे मंडळी अंगणाकडे वळतात आणि एखादी आजी पातेलं निपटून त्याची गोडी पुढच्या पिढीला सांगत राहते!
20190526_094020.jpg
मऊभातासारखी नात्यांची वीण सहज पचनी पडत जाते... आभासी जगातली कोवळी पावलं आनंदाने कोकणातल्या घरट्याकडे वळतात..मऊ भाताच्या...प्रेमाच्या... मातीच्या ओढीने! त्यासाठी इथली पाळंमुळं जपून त्यावर प्रेमाचं शिंपण घालणारी पिढी फक्त कोकणात तग धरून रहायला हवी... खरं कौतुक त्या आधारस्तंभाचं!
मीनल सरदेशपांडे

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle