स्पॅनिश वारी -३ , नकटीच लग्न

स्पॅनिश वारी- नकटीच लग्न

सगळ्यात पहिल्यांदा काय केल तर ह्या ट्रिप च नाव ठेवल , कांपोस्टेला एक्स्पेडिशन !! कांपोस्टेला म्हणजे वारकर्‍याला वारी पूर्ण करण्याच मिळणारं सर्टिफिकिट ! आमचा उद्देश , स्पॅनिश वारी चालण्याचा अनुभव घेणे इतकाच होता , एक सांस्कृतिक अनुभव. मग वारकरी /पेरेग्रिनो म्हणवून घ्यायला पात्र होण्यासाठी निदान शेवटचे १०० किमी चालणे अपेक्षित असते तेवढे करूया अस ठरवल. कामिनो फ्रान्सिस हा 'बहुचलीत' मार्ग आम्ही निवडला . अन शेवटचे १०० किमी करण्यासाठी आम्ही सारीया हे गाव निवडल. आता वारीची वाट ११९ किमी , पण इतर आजूबाजूची गाव अन ट्रेल्स मोजले तर १४०-१४५ किमी होतील असा अंदाज होता. सराव करायला, शारिरीक क्षमता वाढवायला , मोप ८ महिने होते ( जे खरतर कसे संपले ते कळलच नाही अन आमचा आकार , स्टॅमिना जिथल्या तिथेच राहिला  106 ) , अन मानसिक क्षमता ,अर्थात ओव्हर कॉन्फिडन्स ऑलरेडीच मोप होता!

अजूनही आमच्या डोक्यात ( माझ्यातरी) हा एक ट्रेक वजा सहल असच होतं . रुट ठरवणे वगैरे ठरवा ठरव्यांना भेटणं पण मस्तच होतं. वातावरण निर्मिती तर जबरदस्त होत होती . इतर तयार्या ही उत्साहानी करायला घेतल्या !!

आमच्या शाळेत ( ज्ञानप्रबोधिनी) पहिल्याच वर्षी एक पद्य शिकवल होतं

'जिथे जायचे ठरवू तेथे आम्ही जाउच जाउ.....' . काय वाट्टेल ते झाल तरी ( हे मनातल्या मनात म्हणायचे मी ) ! आता प्रसंग , ध्येय , उद्दिष्ट याप्रमाणे ' वाट्टेल ' शब्दात जितके ट तितकी मजा जास्त! :P हे माझ्या सुखी जीवनाचे सार!!
तर या ट्रिप ला , प्लॅन करण्यापासून ते खुद्द जाईपर्यंत भरपूर ट आले. अन मजाही !

नकटीच लग्न अस रितसर तयारीच नाव ठेवाव लागल ! नकटी , शेंबडी पण होती ! अन दोन दा तर नेब्युलाइज करून परिस्थिती वर नियंत्रण मिळवाव लागल ! ह्यात निदान साडे तीन तरी 'ट " मोजावे लागतील. :uhoh:

जायच ठरवल अन त्यावर शिक्का मोर्तब म्हणून तारखा ठरवून विमान तिकीट करून टाकल. मुंबई माद्रिद मुंबई . अत्यंत भरवश्याची तरीही स्वस्त ( ३७,०००/- रिटर्न तिकीट ) मिळाल म्हणून , जेट एयरवेज. :rollingeyes:

२०१९ मे महिन्यातल्या तारखा नक्की केल्या , आदल्या सप्टेंबर महिन्यात ! आमच्या स्वस्तातल्या डिल वर बेहद्द खूष होतो आम्ही. चालण्याचा सराव {( ?) ऑफिसातून घरी , ८.५के ,चालत येणे आठवड्याचे निदान ३-४ दिवस} , आधी तिथे जाउन आलेल्यांशी ( तिघांशी बोललो अन तिघेही पूर्ण ७९० के चाललेले होते !! आम्ही लिंबूटिंबू ) गप्पा मारणे , सगळ दिवाळी पर्यंत व्यवस्थित चालू राहिल. आम्च्या पैकी एक डिटेल प्लॅनिंग वाली . तिनी रस्ते , अंतरं , चालतानाचे एलिव्हेशन गेन्स, हवामान , खादाडी ( हे तर महा महत्वाच !! ) , जिथे मुक्काम होउ शकतो तिथल्या अल्बेर्गेंची माहिती अस सगळ शोधून डाटा एकत्र करून ठेवला. एक्सेल्शीट !! मी ऐनवेळी , समोर येइल तस , सुचेल तस , वाटेल तस भटकण्यात सुख मानणारी , त्यामुळे त्यात अज्जिबात डोकावले नाही!

अजून खूप वेळ आहे म्हणता म्हणाता दिवाळी , वर्षाखेर उजाडली , ऑफिसात जे संपण अपेक्षित होतं ते तस संपेना. त्यातच दोन तिन खेळाडूंच्या विकेट पडल्या . केलेल्या कामांची फी वसुली, जी सहज होण अपेक्षित होतं त्याला एक अनिश्चित खिळ बसली , लेकाच्या परिक्षेच वेळापत्रक लागल अन नेमक ते मी जाणार तेव्हाच होतं :thinking: ( ह्याबद्दल नकटीचा दोष नाही खरतर , परिक्षा साधारण तेव्हाच असते , पण एव्हाना लेक आपापल पहातो त्यामुळे माझ्या रडार वर हा मुद्दाच उमटलाही नव्हता :rollingeyes: :ड . लेक म्हणाला , तू काय माझा अभ्यास घेणारेस का ? जा की ! :P )

मग काही बॅक बर्नर वरचे , काही पार माळ्यावर टाकलेले प्रोजेक्ट अचानक सजीव झाले ! हाताशी माणस नाहीत , नव्यांना शिकवण्यात प्रचंड शक्ती अन मनःशांती खर्ची टाकावी लागते, डोक्यात एका ट्रॅक वर ( मिड लाइफ क्रायसेस म्हणा) मी हा पसारा का मांडलाय ? ह्यात मजा येत नाहीये वगैरे ट्युन्स चालू होत्या. वसुली वेळेत न झाल्यानी लेकाच्या पुढच्या शिक्षणाची मांडून ठेवलेली गणितं बोंबलली. अन एका क्षणी सगळ रद्द करून टाकाव वाटल! तोवर जेट च्या गोयलांनी ते भलतच मनावर घेउन जेट च क्रॅश लँडिंग करून पण टाकल .

कांपोस्टेला च्या ग्रुपवर मैत्रीणींनी धीर दिला तरी आपल्या लढाया आपल्यालाच लढाव्या लागतात! मी माझ्या पद्धतीनी रितसर कागदावर मांडून सुरवात केली . सगळे प्रश्न एकत्र पाहिल्यावर दिसणारा गुंता कागदावर नीटच सोडवता येतो, एकेक धागा बाजूला काढत. ऑफिस चे, घरचे अन एक्स्पेडिशन चे धागे वेगळे केले . घरचा प्रश्न हा प्रश्न नव्हताच मुळी हे लक्षात आल ! ऑफिसातले मार्गी लावण्यासारखे होते . ठरलेल्या वेळी होणार नसले तरी उशीरानी होणारच होते सगळे टास्क . त्याप्रमाणे कामाच वेळापत्रक बदलल . अन प्राधान्यक्रमही!
एक्स्पेडिशचा पहिला धागा , जायच का नाही ? !! प्रबोधिनीतल गाण ठसक्यात अन चालीत म्हटल - जिथे जायच ठरवू तेथे आम्ही जाउच जाउ !! टिक मार्क
आता पुढचा प्रश्न जेट चा , इतर विमान कंपन्या ह्याला पैसे उकळण्याची संधी समजत होत्या पण नेमकी १८ एप्रिल पासून महाराजा नी दिल्ली माद्रीद सेवा चालू केली अन जराश्या वाढीव पण परवडण्यासारख्या दरानी तिकिट मिळाली पण .

मग स्पॅनिश व्हिसा! एम्बसी पेक्षा , आउटसोअर्स केलेली कंपनी जास्त खडूस्/काटेकोरपणा पणा करते ह्याबद्दल बरच ऐकल होतं. आमच्या ग्रुप पैकी प्लॅनर ला अचानक कामासाठी परदेशी महिनाभर जाव लागेल अस दिसल अन तिनी ,लगोलग उरकलेल बरं म्हणून दोनेक महिने आधी व्हिसा साठी अर्ज केला . दर दिवसाची रहायची सोय काय हे दाखवण अनिवार्य आहे अस सुनावण्यात आल. म्युनिसिपल अल्बेर्गे तर आगाउ आरक्षण करतच नाहीत मग खाजगी धर्मशाळा शोधल्या अन बुकिंग झालं , पोर्तोमरीन , सारीया , आर्झुआ, मेलिदे , ओ पेद्रोझो , पलास दे राय ,मोंतो दे गोझो या नावाची पिटुकली गाव अन तिथल्या धर्मशाळा, बुकिंग्स डॉट कॉम वर शोधणे ही भारीच उपक्रम होता !! कामिनो नंतर चा मिळणारा जवळपास एक आठवडा हाताशी होता . तिकीट बदलामुळे अजून एक दिवस बोनस मिळाला होता. अन माद्रिद ऐवजी, आमचा अंतोनी गाउडी अन बार्सेलोना खुणावत होतं . स्पेन ला दाखल होणे अन रवाना होणे ,इतपतच दिड दिवस माद्रिद ला ठेवला . बार्सेलोना मधे दोन स्पॅनिश मैत्रीणीं नी ( मैत्रीण की मैत्रीण अपनी मैत्रीण ह्या न्यायानी ओळख ) एकीनी घरी अन एकीनी तिच्या बोटीवर रहायच आमंत्रण दिल. आता मात्र व्हिसा साठी एक चक्क डमी बुकिंग करून मोकळ्या झालो. ( डोक्यात किडा पोखरत होताच ते व्हिसा इंटर्व्ह्यु च्या वेळी, माप त्यांच्या पदरात घालूनच आले, मग दर दिवसाच बुकिंग दाखवायच नसेल तर काय करायच हा सल्ला अन कामिनो साठी शुभेच्छा ,माझ्या पदरी पडले )
व्हिसा करताना १० युरो एका रात्रीचे ह्या रेटची बुकिंग पाहून डोळे पांढरे झाले त्या माणसाचे .चक्क नेटवर अन एका ठिकाणी कॉल करून खात्री करून घेतली त्यानी. माझ्या आगे मागे मुंबैकर सोबो गुज्जू कुटूंब , एक हनिमून ला चाललेले जोडपे होते , त्यांच्या खर्चाच्या तुलनेत तर त्याची शंका सार्थ होती. मग लगे हात त्यांच कामिनो प्रबोधन करून टाकल. गुज्जू बेन नी ,आर यु प्लॅनिंग टू कन्व्हर्ट असा प्रश्न विचारून घेतला मला ! :rollingeyes: :ड हनीमूनवाल्या बायकोला १० युरोत रहायच म्हणजे उरलेले पैसे शॉपिंग ला Party अस वाटून अत्यानंद झाला त्यावर , नवरदेवानी 'जानू रोजका बिस पच्चिस किलोमिटर पैदल चलना पडेगा' अस सांगितल अन मी डॉर्मिटरीत निदान दहा बंक बेड असतात एका हॉल मधे हे सांगितल . :P

नकटी च सगळ बर चाल्लय म्हणेतो , एक सुसंधी आली अन आमच ऑफिस जरा मोठ्या पण 'द फर्ग्युसन कॉलेज' च्या राजरस्त्यावरून दूर बाणेर मधे हलवण्याच ठरल .
पण तोवर कांपोस्टेला फिवर इतका चढला होता , की जेम्स बाबा भेटल्याशिवाय सोडत नाही हे मनात ठाम होतं.
नकटीच्या लग्नातल शेवटच मिनी विघ्न म्हणजे , मोठ्या प्रेमानी नवर्‍यानी एयर्पोर्टला ( पुण्याच्याच ) सोडतो सकाळी अस दोन दिवस आधी जाहिर केल. अन जायच्या दिवशी खाली आलो तर गाडीच नाही पार्किंग मधे. :hypno: त्याच्या कलीग ला घरी सोडून , उशिर झाला म्हणून डायवरबाबूंनी गाडी आपल्या घरीच लावली ( हे करतो तो बर्याचदा , अन तस सांगतो पण , आमचे नवरोबो , विसरले, ) माझी गाडी ,मी नसणारे म्हणून माझ्या कलीग कडे होती . अत्यंत शांतपणे मी ओला उबर शोधायला लागले ( ह्या संतपणाबद्दल बद्दल मी मला नंतर शाबासकी पण दिली ) पण डायवरबाबूंनी एका फोनवर , पहाटे पहाटे , लगेच गाडी घरी आणून सायबाची लाज राखली!

वाजंत्री वाजली !!

क्रमशः

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle