अनिश्चित अनाकलनीय :Entropy

माझी प्रिय अमृता, Estrogen आणि Entropy song by Mr Sid Sriram यांस.

अमृता,
मी किती वर्षांनी अशी निरर्थक गोल फेऱ्या मारतेय या डहाणूकर सर्कलला. कानात loop वर एकच गाणं सुरू आहे कधीचं सिद् श्रीरामचं Entropy!
मे महिन्याची संध्याकाळ, उकाडा त्रासलाय आताशा या महिन्याला. हे गाणं मला कसल्याश्या वेगळ्या dimension मधे नेतय.
लहानपणी सोबत करणारी तू या क्षणी का नाहीयेस इथे? आपण परत त्या ना धड लहान ना धड तरुण वाल्या टीनेजर का नाही आहोत आत्ता?

Dusk darkness creeping in
Drops of rain stain
clouds of white linen

बदललाय भवताल हा सगळाच आपणही बदलतोय. एकाकी मळभ दाटतच अताशा मनात. परिटघडीचं स्वच्छ आयुष्य गोंदलं जातच एखाद्या चुकार थेंबानं.

किती काय काय बघत , अनुभवत आपण इतक्या लाम्ब आलो नि इतक्या मोठया झालो?
तेंव्हा घाई झाली होती कधी एकदा मोठया होतोय अशी! कमावत्या होऊ , आपले निर्णय आपण घेऊ, वाटेल तेंव्हा भेटू, हवं ते खाऊ, वाटेल ते घालू, एकत्र बिनकामाचं अखंड बोलू भटकू!

Frail paper boats of hope try, to stay afloat against the natural tide
ही असली तेंव्हा भन्नाट वाटणारी स्वप्न इतकी नाज़ुक असतील आणि कागदाच्या बोटी सारखी या कुटूंब वत्सल नैसर्गिक आपत्ति(!) मधे गटांगळ्या खातील कुठे माहीत होतं तेंव्हा.
तरी पण secretly सांभाळतोच की आपण ही सगळी frail paper boat स्वप्न.

Starry eyed stupid, is how it all
started and now it has to end

आपले ‘Best days of our life’ आठवतायेत? लहानपण आणि वयात यायच्या उंबऱ्यावरचे?
तुझं आणि या estrogenचं माझ्या आयुष्यातलं ते ठळक अस्तित्व! शरीरातले मुलगी असल्याचे बदल दिसू लागलेले दिवस. तरंगायचे -स्वप्न बघायचे ‘starry stupid eyes days’
तो तरंगायचा प्रवास तिथे सुरू झाला , सुरू राहिला. अमृता, आपण कधी पासनं आहोतच ना सोबत. कधी प्रत्यक्ष कधी विचारात, आठवणीत तर कधी चिडचिडीत. आणि या सगळ्या mood swings ला स्वतः जबाबदार असुनही गम्मत बघणारे, आपली महिन्याची चक्र, D3, bone density वगैरे घोळ निस्तरणारे, मातृत्व सुखरुप पार पाडणारे Estrogen! ते ही आधी कमी होत जातील मग आटतील सावकाश - It has to end!

Melancholic views mixed with saturated stereotypes
This is the state of Entropy,
and all you can do is
hold on

या आपल्याला ओळखणाऱ्या गुलमोहोर आणि बहाव्या खालून फिरतेय. कानातले earplugs हे गाणं loop वर ऐकवतायेत. मी आपल्याला शोधतेय. मनातलं मळभ या साचल्या उदास आसमंतात मिसळतय. बहावा उगाच फिकटला आहेसं वाटतय. गुलमोहोर ऋतुमति असल्या सारखा लाल पाझर पसरवतोय रस्ताभर.
ही state of Entropy- कुठे जातेय, काय करणार काय होईल सगळं अनिश्चित. मे संपत आलाय , दाटलय आभाळ पण उकाडाही गच्च भरलाय. मॉन्सून येईल, कसा किती कधी, नेमकं नाही माहीत. काहीच नेमकं नाही माहीत.
इतकच कळतय की ,all I can do is
hold on!

A desperate orange as the sunsets
And the streetlights start shining

किती वेळ जुन्या-नव्या आठवणी, घटित अघटीत प्रसंग त्याने निर्माण झालेल्या शक्यता पुन्हा वेगवेगळ्या क्रमात लावतेय , रचना बदलतेय, डोक्यातला गुंता वाढतोय. मनाला गुंगी येतेय , कितवी फेरी ही सर्कलला लक्षात नाही. पण पृथ्वीची आजची स्वतः भोवती फेरी संपत आलीये म्हणजे आपल्या पुण्याच्या perspective ने हां. सूर्य तिकडे अमेरिकेच्या कुठल्याश्या भागात चमकायची तयारी सुरू करतोय. गडबडीत जाता जाता त्याचा उरला सुरला केशरी उजेडाचा पसारा मी बघतेय. स्पर्श करावा वाटतोय या हुळहुळत्या रंगाला. पण त्या उतावळ्या संधिप्रकाशातल्या उदास सोन्याला फार निरखू दिलं नाहीच रस्त्यावरल्या दिव्यांनी.

A desperate scream as you undress
मगासच्या प्रकाशाची जादू विरली , तरंगत्या स्वप्नाची, चकचकीत वस्त्र एकएक करत उतरवून टाकतोय भवताल पुन्हा. आठवणींच्या नॉस्टॅल्जियातनं, चालू वर्तमानात ढकलतोय मला.

And these thoughts start rewinding, pleading
मी पुन्हा हट्टाने जुनेच संदर्भ शोधते.
सरळ फेरी उलटी मारता येईल का , वेळ rewind करता येईल का तिथवर?
विचार मागे मागे ढकलतायेत. आर्जवे, विनवण्या, हट्ट, त्रागा, सगळी पानं, हुकमी एक्के, बदाम सात गोंधळ घालतायेत. बहावा, गुलमोहोर, सर्कलच्या आतला तो झेंड्याचा खांब उगाच हाका मारतायेत.
Give me back my sunshine, give me back my youth
Give me back my tears, and keep all your truths

Confused and chaotic is how it all started and now it has to end
हे गोंधळ- गडबड विचारांचे उच्छाद या सर्कल भोवती सुरू झाले . मी इथेच फिरतेय, उलट की सुलट? माहीत नाही. पृथ्वी फिरतेय स्वतः भोवती, सूर्या भोवती. ते ही उलट की सुलट काय माहीत!

Melancholic hues mixed with saturated skylines
मी तो मगासचा desperate orange प्रकाश शोधतेय, हवेत हात फिरवून तळवे निरखतेय, ते उतावळं सोनं कुठे चिकटलय का ते. डोळे धुसरलेत, ही वेळच अशी कलती संध्याकाळ. ‘ते धुके अवेळी होते की परतायाची घाई?’ ग्रेस आवडेल सिदला , तेच गातोय ना तो काहीसं दुःखाचं महाकाव्य- melancholic hues किंवा संध्याकाळचं गीत.

Physics काय बेकार अवघड प्रकार होता तेंव्हा ना. अजून पण आहेच तसा. पण तरी गूगल बाबा म्हणतोय की Entropy म्हणजे एखाद्या वस्तुमधे असलेली अशी ऊर्जा-energy जिचा वापर कोणत्या कामासाठी करता येत नाही! तर ती लपवलेली स्वप्न आहेत ना ती अशीच राहतील का आता? बघूया...
सिद् तरी म्हणतोय,
This is the state of entropy, and all you can do is hold on!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle